श्री व्यंकटेश देवनपल्ली
जीवनरंग
☆ आजीची माया… – भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆
“आई, येत्या सत्तावीस एप्रिलला अनु आणि प्रिया विथ फॅमिली आपल्याकडे येणार आहेत!” सुधीरनं मोठ्या उत्साहात सांगितलं.
“गेल्या कित्येक वर्षात त्या एकत्र कधीच फिरकल्या नाहीत. तर आताच दोघींना एकाचवेळी यायचं कसं सुचलं? तेहि असं अचानक?” सरस्वती खिन्न मनाने बोलली.
“अगं असं काय करतेस? येत्या तीस एप्रिलला तुझी पंचाहत्तरी साजरी करायचीय आहे ना?”
“माझी पंचाहत्तरी साजरी करायची काही आवश्यकता नाही. मी वयाने वाढले आहे, त्यात माझं काय कर्तृत्व आलंय? तो काळाचा नियम आहे, त्यात माझी काहीच कर्तबगारी नाही.” सरस्वती अनिच्छेनेच बोलली.
“आई तू म्हणतेस ते खरं आहे. अगं कृतज्ञतेचा म्हणून एक भाग असतो. आई वडिलांची पंचाहत्तरी, सहस्रचंद्रदर्शन असे कौतुकसोहळे प्रियजनांना साजरे करावेसे वाटतात. आई, हे सगळं या दोघी बहिणींनी मिळून हे ठरवलंय. त्या दोघींचं ह्या निमित्ताने मनमिलाप झालं असेल तर मी कसं नाही म्हणू?” सुधीरनं सांगितलं. पण सरस्वतीला ते खरं वाटलं नाही. ती काहीच बोलली नाही.
सुधीरनं लगेच अनुला फोन लावला. “अनु, तुम्ही सहकुटुंब सत्तावीस एप्रिलला इथे हजर असणार आहात. मी कसलीही सबब ऐकून घेणार नाही. येत्या तीस एप्रिलला आईची पंचाहत्तरी साजरी करायचीय. अनु आणि प्रिया या दोघींनीच हा कार्यक्रम आखला आहे म्हणून मी आईला पटवून सांगितलंय. ती किती खूश झाली, हे तुला कसं सांगू? तुम्ही दोघी आता एकत्र येणार नसाल तर कधी येणार आहात गं, आई गेल्यावर?.. खूप झालं तुमचं नाटक. तुम्हा सगळ्यांची रेल्वेची तिकीटं मी उद्या बुक करतोय. समजलं?” अनु काही बोलायच्या आतच सुधीरनं फोन ठेवून दिला. प्रियाला फोन लावून त्यानं तेच संभाषण रिपीट केलं.
कित्येक वर्षानंतर, नागपूरहून अनसूया आणि नाशिकहून प्रियवंदा त्यांच्या मुलांच्या सोबत एकाच दिवशी माहेरात येऊन पोहोचल्या. दोन्ही लेकी, चारी नातवंडांना पाहून सरस्वतीच्या चेहऱ्यावर आनंदाचं प्रसन्न चांदणं पसरलं. कधीकाळी उन्हाळ्याच्या सुटीत ही मंडळी दरवर्षी न चुकता यायची आणि जाताना एकाच दिवशी जायची.
नातवंडांनी भरलेलं गोकुळ पाहून सरस्वतीला काय करू, काय नको असं व्हायचं. कुठल्या दिवशी काय बेत करायचा ते सरस्वती आधीच ठरवायची. त्यानुसार सून सुजाता कामाला लागायची.
त्या मेनूत सरस्वती एकदा तरी न्याहरीला गव्हाची गूळ घालून केलेली लापशी स्वत:च्या हातानं बनवायचीच. त्यात काजू बदामाचे तुकडे पेरलेले असायचे, त्यावर तुपाची धार पडताच खमंग वास सुटायचा. सुरूवातीला एका बाऊलमधे लापशी घेऊन सरस्वती आपल्या मऊशार सायीसारख्या हातानं ती सगळ्या नातवांना प्रेमानं एक एक घास भरवायची. दोन्ही मुलींची चार आणि सुधीरची दोन मुलं अशी एकंदरीत सहा नातवंडे डायनिंग टेबलवर पाहून सरस्वतीचा जीव आनंदाने भरून जायचा.
सरस्वतीच्या तिन्ही मुलांना एक मुलगा आणि एक मुलगी ह्याचं वरदान लाभलेलं होतं. सगळी मुलं एकाच वयाची होती. फार तर दोन तीन वर्षाचं अंतर. सरस्वतीला मुद्दलाचा विसर पडला होता, ती व्याज पाहूनच हरखून जायची.
सुधीरमामा तालेवार नसला तरी मोठा दिलदार माणूस. आणि भाचरांवर जीव ओवाळून टाकणारा. उन्हाळा म्हटलं की आंब्याचेच दिवस. भाचरं यायच्या आधीच हापूस आंब्यांच्या पेट्या आणून ठेवायचा. सुधीरमामाला आंब्याची छान पारख होती. आमरसासाठी हापूस तर कापून खायला केशर, बदाम, लालबाग, लंगडा, तोतापुरी घेऊन यायचा. प्रत्येक आंब्याची वेगळीच चव असायची. आंब्यांचा घमघमीत सुवास सर्वत्र दरवळत असायचा. सगळी मुलं एकत्र बसून हसतखेळत कधी आमरस पुरी तर कधी आमरस धिरडं आणि त्या सोबत कुरडया, पापड्या, मिरची भजी, मसालेभात हादडायचे. वामकुक्षी म्हणत मुलं तासभर झोप काढायचे. कधी त्यांचे पत्त्यांचे डाव रंगत असत तर कधी कॅरम बोर्ड लागायचा.
संध्याकाळ झाली की सगळी मुलं आजीबरोबर शुभंकरोती म्हणायचे. आजी-आजोबा चांदण्याच्या आकाशाखाली बसून रामायण महाभारतातल्या कितीतरी गोष्टी सांगायचे. मामा व्हीसीआर सोबत एकाद्या सिनेमाची व्हिडियो कॅसेट भाड्याने घेऊन यायचा. सिनेमा पाहून झाला की रात्रीच्या जेवणाची वेळ व्हायची. कुणालाच तशी जास्त भूक नसायची. कधी पावभाजी तर कधी साधी खिचडी किंवा थालीपीठ खाल्लं की भागायचं.
गच्चीवर संध्याकाळी पाईपने पाणी मारून ठेवल्याने सगळी मुलं रात्री झोपायला ते गच्चीवरच जात असत. तोवर गच्ची थंड झालेली असायची. त्यावर मस्त गाद्या पसरून मुलं ठिय्या मांडत असत. गप्पा गोष्टी करत, रेडिओवर विविध भारतीची गाणी ऐकत पडायचे. थंड हवेच्या झुळकीने झोप अनावर झाली की आकाशातले नक्षत्र, तारे मोजत हळूहळू डोळे मिटत मस्त झोपायचे. सकाळी सूर्याची किरणे अंगावर पडल्यावरच उठायचे. कुणीही उठवायला यायचा नाही.
सर्व मुलांच्या दरम्यान एक अतूट स्नेहाचा घट्ट धागा होता. दोघा बहिणींचं अतिशय घट्ट सख्य होतं. प्रियंवदेची मुलं अभ्यासात खूप हुशार होती. प्रियंवदा मोठ्या उत्साहाने तिच्या मुलांची प्रगती अनसूयेला सांगायची. बघता बघता मुलांच्यातल्या निरोगी स्पर्धेचं रूपांतर कधी असूयेत झालं हे कुणाला कळलंच नाही. दोघा बहिणींच्या नात्यात खोल दरी निर्माण होत गेली. मुलांचं आजोळी येणं बंद झालं.
संस्कार वर्ग, पोहण्याचे क्लासेस, गिटार क्लासेस, व्हेकेशन बॅचेस, त्यासाठी एक ना अनेक कारणं होती. त्यामागचं खरं कारण वेगळं होतं हे कळायला सरस्वतीला वेळ लागला नाही. अनसूयेच्या मनात असूयेनं स्थान मिळवलं. ताईला माझ्या मुलांची प्रगती पाहवत नाही हे प्रियंवदेच्या मनात घर करून राहिलं.
मुलं आता आपापल्या दुनियेत व्यस्त झाली. नोकरीही करत होते. कुणी सॉफ्टवेअर तरी कुणी कुठे. नात्यात ईर्ष्या आणि गैरसमजाचा कळी शिरला की त्यात दुरावा हा येतोच.
– क्रमशः भाग पहिला
© श्री व्यंकटेश देवनपल्ली
बेंगळुरू
मो ९५३५०२२११२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈