सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ स्वस्तिक… भाग-2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(मागील भागात आपाण पाहिले – भिंतीवरचे म्युरल पाहत असताना डीव्हींचा चेहरा अधिकाधिक शांत होत गेला. क्षणभर त्यांच्या मनात आलं स्वस्तिक हेच त्यांचं अस्तीत्व. अखंड सोबत. एक अदृश्य मार्गदर्शक आणि सहजच त्यांचा हात गळ्यापाशी गेला. आता इथून पुढे)
आयुष्याच्या ओघात तसे बदलही खूप झाले. आई गेली तेव्हा दुःख झालेच, पण जेव्हा वासूचे अकस्मात निधन झाले तेव्हां डीव्ही पार कोसळले. एक अंग गळून पडल्यासारखं त्यांना वाटलं. डीव्ही हे नावच त्यांना तुटल्यासारखं वाटलं. स्वस्तिक म्हणजे दोन रेषा, एक आडवी एक उभी. एक रेषा जणूं पुसली. हा आघात खूप मोठा होता. पण हळूहळू त्यातूनही सारं काही सावरलं गेलं. आयुष्य पुढे जातच. जावं लागतं.
स्वस्तिकचा पसारा वाढतच होता. आता वयात आलेली त्यांची उच्चशिक्षित तरुण मुलं आणि सुनाही हळूहळू प्रवेशत होत्या. नाविन्य येत होतं. आधुनिकतेतनं रूप पालटत होतं. अधिक मोठं, त्याहून मोठं! अधिक वेगळं, दैदीप्यमान, जे आजपर्यंत नव्हतं ते आता प्रथमच, या भव्यतेत, दिव्यतेत डोळे दिपवून टाकणाऱ्या स्वप्नांच्या प्रदेशात, एक एक पाऊल पुढे जात असताना नक्की काय झाले कळलेच नाही. वाटेतच काही गणितं चुकली. आराखडे चुकले. अंदाज खोटे ठरले. आश्वासनं पोकळ ठरली. फसवणूक झाली की झेपच पेलवली नाही? कित्येक कोटींच्या ड्रीमलँड प्रोजेक्टमध्ये इन्वेस्टरची पंधरा टक्के गुंतवणूक झालेलीच होती. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झालेल्या असतानाही काही परदेशी बँकांनी मंजूर केलेली कर्जे ऐनवेळी देण्यास नकार दिला. आणि सगळी उलथापालथ झाली. आधी घेतलेली स्थानिक बँकांतील कर्जे, त्यांचे हप्ते, कॅश क्रेडिट चे अकाउंट्स, स्टॉक अकाउंट्स सर्वांच्या हिशोबात प्रचंड गडबड झाली. नोटिसांवर नोटीसा येऊ लागल्या. वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या उलट सुलट बातम्यांमुळे चालू प्रोजेक्ट्सना खिळ बसू लागली. आणि या सगळ्यांमध्ये गुंतवलेला पैशांचा धबधबा एकदम कोसळला. संपूर्ण आयुष्य डेबिट झालं. प्रचंड उणे. मायनस.
” अहो माझं ऐकून तरी घ्या!” या विनवण्यांना कायद्यामध्ये सहानुभूती नसते. गुन्हेगारीच्या चक्रात डीव्ही पार अडकले.
” माणसं दिसतात तशी नसतात, अखेर पैसाच माणसाला विचलित करतो. वाममार्गाला नेतो.”
” काय गरज होती यांना? हे असे फसवणुकीचे धंदे करण्याची? ”
” लोक केवळ यांच्या नावावर भुलले आणि यांनी काय केलं स्वतःच्या झोळ्या भरल्या. भोगा आता.”
“विश्वासघातकी,भ्रष्टाचारी, चोर”
अशा अनेक तलवारींनी डीव्हींच्या काळजावर अक्षरशः वार केले. प्रॉपर्टीज सील होत होत्या. अटक सत्रं चालू होती. मुलं, सुना कुठे कुठे दूर देशी नातेवाईकांकडे निघून गेले. काही हितचिंतकांनी डीव्हींनाही पळून जाण्याचा सल्ला दिला. त्यातले काही राजकीय वर्तुळातलेही होते.
पण डीव्ही. शांत होते. अविचलित होते. पलायनवाद त्यांना मान्य नव्हता. चूक झाली होती. शिक्षा भोगायला हवी. त्यांना अजून अटक झालेली नव्हती. तत्पूर्वी न्यायालयीन चौकशी समिती समोर होणाऱ्या चौकशीला ते सामोरे जाणार होते.
ते सकाळी उठले. नित्य नियमाप्रमाणे सर्व अटपून त्यांनी मनोभावे पूजा केली. त्यांच्या पत्नीने, सावित्रीने पूजेची सर्व तयारी साग्रसंगीत केलेलीच होती. सुरेख सजवलेल्या रांगोळीत स्वस्तिक रेखाटलेला होता.
डीव्ही ध्यानस्थ बसले.
स्वस्तिनस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि:|
स्वस्तिन बृहस्पतिर्दधातु||
ॐ शांती: शांती: शांती :
घरातून निघताना पत्नीने हातावर दहिसाखर ठेवले. म्हणाली,
” तुम्ही नक्की यातून बाहेर याल. माझी खात्री आहे. काळजी नसावी. जाणून-बुजून न केलेली घटना गुन्हा ठरू शकत नाही. काहीतरी मार्ग नक्कीच निघेल.”
सदाशिव बॅग घेण्यासाठी आत आला. तेव्हा ते त्याला म्हणाले,
” आज गाडी काढू नकोस. मी रिक्षाने जाणार आहे.”
कोर्टात रिक्षातून बाहेर उतरणाऱ्या डीव्हींना पाहून पत्रकार, चॅनल्स वाले यांची धावाधाव झाली.
” काय हो डीव्ही? आज रिक्षातून? तुमच्याकडे अठ्ठावीस गाड्या आहेत ना ? सगळ्या जप्त?”
“मग नेमकं काय वाटते तुम्हाला? आज तुम्हाला अटक झाली तर?”
” तुम्ही हे सारं करताना तुमच्या प्रतिमांचाही विचार केला नाही का?”
गर्दीतून वाट काढत काढत डीव्ही चौकशी दालनात पोहोचले. अॅड. झुनझुनवाला त्यांच्या सहकारी वकीला सोबत थोड्यावेळाने आले. त्यांनी डीव्हींना नजरेनेच इशारा केला.
चौकशी समितीत मोठ्या टेबलासमोर, उंच खुर्च्यांवर चार दिग्गज न्यायाधीश स्थानापन्न होते. डीव्ही त्यांच्यासमोर शांत बसले होते. वातावरणात कमालीची सभ्यता होती. सहानुभूतीपूर्वक आदरही होता.
हळूहळू चौकशी प्रक्रिया उलगडत गेली. डीव्हींनी गळ्यातल्या स्वस्तिकास स्पर्श केला. आज ते शुभ्र, पांढऱ्या कुर्ता पायजम्यात होते. त्यांच्या गोऱ्या गळ्यात सोन्याचा स्वस्तिक चमकत होता.
विषयाला सुरुवात झाली. शपथेचं सत्र संपलं.
“मिस्टर दिनकर भास्कर वसिष्ठ, तुमच्या ड्रीमलँड प्रोजेक्टच्या माध्यमातून तुम्ही एकूण तीन हजार सातशे अठ्ठावीस कोटी रुपयाची फसवणूक केलेली आहे. असा तुमच्यावर आरोप आहे तो तुम्हाला मान्य आहे का?”
” नाही. माझ्या हातून चूक झालेली आहे हे खरं आहे. माझे हिशोब चुकलेत, अंदाज चुकलेत गणित चुकलंय. फसवणुकीचा कुठलाही माझा उद्देश नव्हता. आणि मी या सर्व रकमेची परतफेड करण्याची हमी आपणास देतो. मला फक्त थोडा वेळ द्यावा एवढीच माझी कोर्टाला विनंती आहे”
” पण कशी परतफेड करणार? इतकी मोठी रक्कम तुम्ही कशी उभी करणार? ”
” माझे वकील माझ्या स्थावर जंगम ,रोख मालमत्तेचे स्टेटमेंट देतील त्यासाठी मी आपणास विनंती करतो की माझ्या वकिलांना आपण परवानगी द्यावी.”
पुढील सर्व कायदेशीर बाबी अॅडवोकेट झुनझुनवालांनी अतिशय कुशलतेने पार पडल्या. आणि शेवटी ते कोर्टाला उद्देशून म्हणाले,
” युवर ऑनर, माझे अशील एक प्रतिष्ठित, नामांकित, धार्मिक वृत्तीची व्यक्ती आहे. आजपर्यंत त्यांनी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही. कुणाची फसवणूक केलेली नाही. त्यांचे सर्व व्यवहार अत्यंत पारदर्शक आहेत. आणि या व्यवसायात ते गेली पंचवीस वर्ष कार्यरत आहेत. अनेक सामाजिक प्रतिष्ठानांवर ते पदाधिकारी आहेत. आणि डीव्ही एक दानशूर व्यक्तिमत्व आहे. ते कुणाची जाणून-बुजून फसवणूक का करतील? कायद्याप्रमाणे जरी हा गुन्हा असला तरी ही एक निव्वळ चूक आहे. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना एक संधी द्यावी. त्यांची सील केलेली सर्व मालमत्ता मोकळी करावी. त्यांना अटक करू नये म्हणजे त्यांना त्यांच्या मालमत्तेचा योग्य विनियोग करून रक्कम उभी करता येईल व परतफेड करणे त्यांना शक्य होईल. कोर्टाने तसा पुरेसा वेळही त्यांना द्यावा.एव्हढीच माझ्या अशिलातर्फे मागणी आहे.”
आरोपी, गुन्ह्याचे स्वरूप, आरोपीचे सामाजिक स्थान, कायदा, कायद्यातील तरतुदी, मर्यादा, चौकटी आणि त्या बजावणाऱ्यांची मानसिकता याचा एकत्रित परिणाम म्हणून असेल कदाचित, पण कोर्टाकडून डीव्हींना एक संधी देण्यात आली. हा एक ऐतिहासिक निर्णय होता. पण ते न्यायदानाच्या प्रक्रियेत घडलं. त्यांची सर्व मालमत्ता मोकळी करण्यात आली. त्यांना तूर्त तरी अटक झाली नाही. वेळेची मर्यादा त्यांना देण्यात आली. त्या क्षणी तरी हा डीव्हींचा अंशतः विजयच होता.
इतिहासात,पुराणात असे घडले आहे. राजा हरिश्चंद्राला राज्य सोडावे लागले. शिवरायांचे सर्व गड ,किल्ले एका तहात त्यांना द्यावे लागले. रामाला,पांडवांना वनवास घडला. यादवीत युगंधराचाही अंत झाला. नियती, कालचक्र..
डीव्हींनी दिलेला शब्द पाळला. त्यांच्या चारित्र्याला लागलेला फसवणुकीचा, अनैतिकतेचा कलंक पुसला गेला. एक राज्य गेलं. एक साम्राज्य संपलं .पण एक व्यक्ती उरली. शुभ्र निष्कलंक .कदाचित पुन्हा नव्याने राज्य उभं करण्यासाठी त्यांना यातूनही सामर्थ्य मिळेल. श्रद्धेनं जपलेली आपली प्रतिकंच आपल्याला शक्ती देतात. नियतीचं आवाहन पेलण्याचं बळ देतात. कुठल्याही परिस्थीतीत तटस्थ ठेवतात.
गळ्यातल्या स्वस्तिकाला निरखत डीव्ही.हळूच पुटपुटले
कल्याणमस्तु।।
– समाप्त –
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈