सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ ईदगाह (अनुवादीत कथा) – भाग २ (भावानुवाद) – मुंशी प्रेमचंद ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पाहिले – ‘शंभर तर पन्नासपेक्षा जास्त आहेत ना,’ हमीदने विचारले. ‘कुठे पन्नास आणि कुठे शंभर? पन्नास तर एका थैलीतच मावतात. शंभर दोन थैल्यातसुद्धा मावणार नाहीत!’ – आता इथून पुढे)
आता वस्ती दाट होऊ लागलीय. इदगाह (मुसलमानांचे नमाज पढायचे मोकळे मैदान)ला जाणार्यांचे वेगवेगळे समूह दृष्टीला पडताहेत. एकापेक्षा एक भडक वस्त्र त्यांनी परिधान केली आहेत. कोणी एक्क्यावरून , टांग्यातून येताहेत. कुणी मोटारीतून येताहेत. सगळ्यांनी अत्तर लावलय. सगळ्यांच्या मनात हर्ष आहे. आनंद आहे. ग्रामीण बालकांचा हा छोटासा गट आपल्या विपन्नतेच्या बाबतीत अजाण आहे. संतोष आणि धैर्य यात मग्न होऊन तो पुढे चालत होता. मुलांसाठी नगरातल्या अनेक गोष्टी नवीन होत्या. जिकडे बघत, तिकडे बघतच रहात. मागून वारंवार हॉर्न वाजला , तरी तिकडे त्यांचं लक्षच नसायचं. हमीद तर एकदा मोटारीखाली येतायेताच वाचला.
एवढ्यात इदगाह नजरेस पडला. वर चिंचेच्या मोठ्या वृक्षाची घनदाट छाया. खाली पक्की फारशी घातलेली. त्यावर जाजम टाकलेलं. रोजा (उपास) करणार्याच्या ओळी, एकामागून एक किती लांबर्यंत गेल्या आहेत. अगदी पक्क्या जागेच्याही पलीकडे. तिथे तर जाजमही नाही आहे. मागून येणारे मागच्या बाजूला ओळीत उभे आहेत. पुढे जागा नाही. या ग्रामिणांनीही नमाज पढण्यापूर्वी हात-पाय धुतले आहेत आणि मागच्या ओळीत उभे आहेत. किती सुंदर संचलन आहे. किती सुंदर व्यवस्था. लाखो मस्तकं एकाचा वेळी गुढगे मोडून नमस्कारासाठी झुकताहेत. मग सगळेच्या सगळे उभे रहातात. पुन्हा एक साथ झुकतात. मग आपल्या गुढग्यांवर बसतात. किती तरी वेळा हीच क्रिया होते. असं वाटतं विजेचे लाखो दिवे एकाच वेळी प्रदीप्त झालेत आणि एकाच वेळी विझलेत आणि हाच क्रम चालू आहे. किती अपूर्व दृश्य होतं ते. या सामूहिक क्रिया, विस्तार, आणि अनंतता, हृदयाला श्रद्धा, गर्व आणि आत्मानंदाने भरून टाकत होत्या. जणू बंधुभावाच्या एका सूत्रात, या सगळ्या आत्म्यांना एका माळेत ओवून टाकलय.
नमाज पढून झालीय. लोक आता आपापसात एकमेकांना मिठ्या मारताहेत. आलिंगन देताहेत. मग मिठाई आणि खेळण्यांच्या दुकानाकडे धाव घेतली जाते. ग्रामिणांचं दलही मुलांपेक्षा काही कमी उत्साही नाही. हा बघा फिरता पाळणा. एक पैसा देऊन चढून बसा. कधी आसमानात जातोयसं वाटेल. कधी जमीनीवर पडतोयसं. हे चक्र आहे. लाकडाचे हत्ती, घोडे, उंट छड्यांना लटकलेले आहेत. एक पैसा द्या आणि पंचवीस चक्रांची मजा अनुभवा. महमूद, मोहसीन, नूरे, आणि सम्मी सगळे या उंट घोड्यांवर बसताहेत. हमीद दूर उभा आहे. त्याच्याजवळ तीनच पैसे आहेत. आपल्या खजिन्याचा तिसरा हिस्सा, तो थोड्याशा चकरा घेण्यासाठी नाही देऊ शकत.
सगळे चक्रावरून उतरले. आता खेळणी घ्यायची. किती तर्हेची खेळणी आहेत. शिपाई आहे. गवळण आहे. राजा आहे. वकील आहे. पाणी देणारा पाखालवाला पाणक्या, धोबीण, साधू, आणखी किती तरी खेळणी ….. सुंदर सुंदर खेळणी आहेत. महमूद शिपाई घेतो. त्याने खाकी वर्दी, लाल पगडी घातलीय आणि खांद्यावर बंदूक आहे. असं वाटतय, की आत्ता कवायतीला निघालाय. पाणक्याने पखालीचं तोंड हाताने धरून ठेवलय. किती प्रसन्न दिसतोय. नूरेला वकिलाबद्दल प्रेम आहे. किती विद्वत्ता झळकतेय त्याच्या तोंडावर. काळा कोट, त्याखाली सफेद अचकन, अचकनच्या पुढे खिशात घडयाळ, त्याची सोनेरी साखळी आणि एका हातात कायद्याचे पुस्तक. असं वाटतय, एवढ्यातच न्यायालयातून उलटतपासणी घेऊन किंवा खटल्यात आशिलाची बाजू मांडून येतोय. ही सगळी दोन दोन पैशांची खेळणी आहेत. हमीदजवळ फक्त तीन पैसे आहेत. इतकी महाग खेळणी तो कशी घेऊ शकेल? खेळणी हातातून पडली, तर मोडून जातील. थोडंसं पाणी पडलं, तर रंग धुऊन जाईल. असली खेळणी घेऊन तो काय करणार? काय उपयोग मग त्यांचा?
मोहसीन म्हणाला, ‘ माझा पाणक्या सकाळ-संध्याकाळ पाणी देईल.’
महामूद म्हणाला, ‘माझा शिपाई घराचा पहारा करील. कुणी चोर आला, तर बंदुकीच्या फैर्या झाडील.’
नूरे म्हणाला, ‘ माझा वकील खूप खटले लढेल.’
सम्मी म्हणाला, ‘ माझी धोबीण रोज कपडे धुवेल.’
हमीद खेळण्यांना नावे ठेवू लागला. ‘मातीची तर आहेत. पडली तर चक्काचूर होऊन जातील.’ तो असं म्हणाला खरं, पण लालचावलेल्या डोळ्यांनी खेळण्यांकडे बघतही होता. ती काही काळ हातात घेऊन बघावी, असंही त्याला वाटतय. अभावितपणे हात पुढेही करतोय. पण मुलं इतकीही त्यागी नाहीत. विशेषत: खेळणी इतकी नवी नवी असताना. हमीदची लालसा तशीच रहातेय.
खेळण्यानंतर मिठाईची दुकाने लगातात. कुणी रेवडी घेतलीय. कुणी गुलाबजाम. कुणी सोहन हलवा. सगळे मजेत खाताहेत. हमीद त्यांच्या टोळी पासून वेगळा आहे. बिचार्याजवळ फक्त तीन पैसे आहेत. काही घेऊन खात का नाही? लालचावलेल्या डोळ्यांनी सगळ्यांकडे बघतो आहे.
मोहसीन म्हणतोय, ‘हमीद रेवडी घे. किती मस्त आहे बघ. ‘
हमीदला संशय येतोय, ही केवळ क्रूर थट्टा आहे. मोहसीन काही इतका उदार नाही. तरीही तो अभावितपणे त्याच्याकडे जातो. मोहसीन पुड्यातून एक रेवडी काढून हमीदच्या दिशेने हात पुढे करतो. हमीद हात पसरतो. मोहसीन रेवडी आपल्या तोंडात टाकतो. महमूद, नूरे, सम्मी टाळ्या वाजवाजवून खूप हसतात. हमीद खजील होतो.
मोहसीन म्हणतो, ‘आता या वेळी नक्की देईन. अल्लाह कसम घे.’
हमीद म्हणतो ‘ठेव तुझ्याकडे. माझ्याकडे काय पैसे नाहीत?
सम्मी म्हणतो, ‘तीन पैसे तर आहेत. त्यात काय काय घेणार?’
त्यावर महमूद म्हणतो, ‘माझ्याकडून गुलाबजाम घे. हमीद मोहसीन बदमाश आहे.’
हमीद म्हणतो, ‘मिठाई काही खूप चांगली गोष्ट नाही. त्यामुळे काय काय अपाय होतात, याबद्दल पुस्तकात खूप लिहिलंय. ‘त्यावर मोहसीन म्हणतो, ‘ पण मनात म्हणतच असणार, मिळाली तर खावी.’
त्यावर महमूदचं म्हणणं असं की, ‘याची चलाखी लक्षात येतेय, जेव्हा आपले सगळे पैसे खर्च होतील, तेव्हा हा काहीतरी घेईल आणि आपल्याला टूक टुक करत खाईल.’
मिठाईनंतर काही लोखंडाच्या वस्तूंची दुकानं लागतात. काही गिलिटाच्या आणि नकली दागिन्यांची दुकाने लागतात. मुलांना काही याचं आकर्षण नाही. ते सगळे पुढे जातात. हमीद लोखंडाच्या वस्तूंच्या दुकानाशी थांबतो. तिथे खूपसे चिमटे ठेवलेले आहेत. त्याला आठवतं दादीजवळ चिमटा नाही. तव्यावरून रोटया काढते, तेव्हा हात भाजतो. जर त्याने चिमटा घेऊन दिला, तर तिला केवढा आनंद होईल. मग तिची बोटं भाजणार नाहीत. घरात एक कामाची वस्तू येईल. खेळण्याचा काय फायदा? उगीचच पैसे खर्च होतात. थोडा वेळ खूश होतात. नंतर तिकडे कुणी डोळे वर करून बघतसुद्धा आही. घरी जाताच तुटतील. फुटतील. किंवा जी लहान मुले जत्रेला आली नाहीत, ती जिद्दीनं ओढून घेतील आणि या ओढाताणीत खेळणी फुटतील. चिमटा किती कामाचा आहे. रोटया तव्यावरून काढा. चुलीत शेका . कुणी विस्तव मागायला आलं, तर झटपट निखारा चुलीतून काढूनं त्याला द्या. अम्माला कुठे फुरसत आहे की बाजारात जाऊन चिमटा आणावा आणि इतके पैसे तरी मिळतात कुठे? रोज बिचारी हात भाजून घेते.
ईदगाह क्रमश: भाग २
मूळ हिंदी कथा 👉 ‘ईदगाह…’ – मूळ लेखक – मुंशी प्रेमचंद
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈