सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ ईदगाह (अनुवादीत कथा) – भाग ४ (भावानुवाद) – मुंशी प्रेमचंद ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पाहिले – महामूद आणखी जोर लावत म्हणाला, ‘वकील साहेब टेबल –खुर्चीवर बसतील. तुझा चिमटा स्वयंपाकघरात पडून रहाण्याशिवाय आणखी काय करू शकणार?‘
या तर्काने सम्मी आणि नूरेच्या जसा जीवात जीव आला. किती योग्य बोललाय पठ्ठ्या! चिमटा स्वयंपाकघरात पडून रहाण्याशिवाय आणखी काय करू शकणार? ‘ आता इथून पुढे )
हमीदला यावर पटकन उत्तर सुचलं नाही. त्याने गडबबड गोंधळ करत म्हंटलं’ माझा चिमटा स्वयंपाकघरात नाही पडून रहाणार. तो वकीलसाहेबांच्या खुर्चीवर बसेल. जाऊन त्यांना जमिनीवर पाडेल. आणि त्यांचा कायदा त्यांच्याच पोटात घालेल. ‘
इतरांना पुढे बोलणं काही जमलं नाही. चांगली शिवीगाळ झाली.पण कायदा पोटात घालण्याची गोष्ट भाव खाऊन गेली. अशी भाव खाऊन गेली की तिघेही योद्धे तोंड बघू लागलेज्सन काही आठ आण्याचा मोठा पतंग एखाद्या साध्याशा पाटांगाला काटून गेलाय. कायदा ही तोंडातून बाहेर येणारी गोष्ट आहे. ती पोटात घालण्यात विसंगती असली तरी त्यात काही तरी नावीन्य होतं. हमीदने मैदान मारलं. त्याचा चिमटा रुस्तुमे – हिंद आहे, याबद्दल सम्मी, नूरे मोहसीन, महामूद यांची खात्रीच झाली. विजेत्याला हरणार्यांकडून जो सन्मान मिळणं अपेक्षित असतं, तो हमीदला मिळाला॰ इतरांनी तीन तीन –चार चार आणे खर्च केले, पण कोणती कामाची गोष्ट आणू शकले नाहीत. हमीदने तीन पैशात रंग जमवला. खरच आहे! खेळणी तुटून फुटून जातील. त्यांचा काय भरवसा? हमीदचा चिमटा वर्षानुवर्षे टिकून राहील.
तडजोडीच्या अटी तयार होऊ लागल्या. मोहसीन म्हणाला, जरा तुझा चिमटा दे. आम्ही पण बघतो. तू माझा पाणक्या घेऊन बघ.‘
महामूद आणि नूरेनेही आपापली खेळणी दिली.
हमीदला ही अट स्वीकारण्यात काही अडचण वाटली नाही. चिमटा आळीपाळीने सगळ्यांच्या हातात गेला. त्यांची खेळणी आळीपाळीने हमीदकडे आली. किती सुरेख खेळणी आहेत!
हमीदने हरणार्यांचे अश्रू पुसले. ‘मी तुम्हाला चिडवत होतो. खरं म्हणजे लोखंडाचा चिमटा काय या खेळण्यांची बरोबरी करणार. मला वाटत होतं, आता म्हणाल…. मग म्हणाल ….’
पण मोहसीनच्या पार्टीला या दिलाशाने संतोष झाला नाही. चिमाट्याचा शिक्का पक्का बसला. चिकटलेलं तिकीट आता पाण्याने निघणार नाही.
मोहसीन म्हणाला, ‘पण या खेळण्यांसाठी कोणी आम्हाला दुआ ( आशीर्वाद) देणार नाही.
महामूद म्हणाला, ‘दुआ जाऊ देत, उलटा मार पडला नाही, म्हणजे मिळवलं. अम्मा म्हणेल, ‘जत्रेत तुला मातीचीच खेळणी मिळाली का?
हमीदला ही गोष्ट मान्य करावीच लागली. चिमटा पाहून त्याची दादी जितकी खूश होईल, तितकी या मुलांची खेळणी बघून कोणीच खूश होणार नाही. तीन पैशातच त्याला सगळं काही करायचं होतं आणि त्याने पैशाचा जो उपयोग केला, त्यात पश्चात्तापाची मुळीच गरज नव्हती. आता तो चिमटा रुस्तुमे-हिंद होता आणि सगळ्या खेळण्यांचा बादशहा होता.
रस्त्यात महमूदला भूक लागली.त्याच्या बापाने केळ खायला दिलं. महमूदने केवळ हमीदला भागीदार बनवलं. त्याचे बाकीचे मित्र तोंड बघत बसले. हा त्या चिमाट्याचा परिणाम होता.
अकरा वाजले. सगळ्या गावात गडबड सुरू झाली. मेळेवाले आले. …. मेळेवाले आले… मोहसींच्या छोट्या बहिणीने पळत येऊन पाणक्या त्याच्या हातातून ओढून घेतला. खुशीने टी उद्या मारू आगळी. , तर तो पाणक्या हाली कोसळला आणि स्वर्गलोकात पोहोचला. यावर भावा-बहिणीच्यात खूप मारामारी झाली. दोघेही खूप रडली. त्यांची अम्मा हा आरडाओरडा ऐकून खूप चिडली आणीदोघांनाही दोन दोन थपड्या लगावल्या.
नूरेच्या वकिलाचा अंत त्याला साजेशा प्रतिष्ठेने अधीक गौरवपूर्ण रीतीने झाला. वकील जमिनीवर किंवा कोनाड्यात बसू शकत नाही. त्याच्या प्रतिष्ठेचा विचार करायला हवा. भिंतीत दोन खुंटया मारल्या गेल्या. त्यावर एक लाकडी फळी ठेवली गेली. त्यावर कागदाचा गालीचा घातला गेला. वकीलसाहेब राजा भोजाप्रमाणे सिंहासनावर विराजमान झाले. नूरे त्यांना पंख्याने वारा घालू लागला. न्यायालयात वाळ्याचे पडदे आणि विजेचे पंखे असतात. इथे साधा पंखा तरी नको? कायद्याची गर्मी डोक्यावर चढेल की नाही? नूरे त्यांना वारा घालू लागला. पंख्याच्या वार्याने की, त्याच्या स्पर्शाने वकीलसाहेब स्वर्गलोकातून मृत्यूलोकात आले आणि त्यांचा मातीचा अंगरखा मातीत मिळाला.मग जोरजोरात मृत्यूशोक झाला आणि वकीलसाहेबांच्या अस्थी उकिरड्यावर टाकल्या गेल्या.
आता राहिला महमूदचा शिपाई. त्याला लगेचच गावाचा पहारा देण्याचा चार्ज मिळाला, पण पोलीस शिपाई ही काही साधारण व्यक्ती नाही. ती आपल्या पायांनी काशी चालणार?तो पालखीतून जाणार. एक टोपली आणण्यात आली. त्यात फाटक्या-तुटक्या चिंध्या घालण्यात आल्या. त्यात शिपाईसाहेब आरामात पहुडले. नूरेने ही टोपली उचलली आणि आपल्या दाराशी चकरा मारू लागला. त्याचे दोन्ही छोटे भाऊ ‘छोनेवाले जागते लहो’ पुकारत दोन्ही बाजूने चालले. पण पहारा द्यायचा म्हणजे रात्रीचा अंधार पाहिजे. महमूदला ठोकर लागते. टोपली त्याच्या हातातून सुटते आणि खाली पडते. मियाँ शिपाई आपली बंदूक घेऊन जमिनीवर येतात. त्यांचा एक पाय तुटतो. महमूदला आठवलं की, तो चांगला डॉक्टर आहे. त्याला मलम मिळालं. आता तो तुटलेली टांग लगेचच जोडून टाकेल. केवळ उंबराचं दूध हवं. उंबराचं दूध येतं. पाय जोडण्यात येतो, पण शिपायाला उभं करताच पाय डोलू लागतो. शल्यक्रिया असफल झाली. मग त्याचा दुसरा पायही मोडण्यात येतो. आता निदान एका जागीतो आरामात बसू तरी शकेल. एका पायाने तो बसू शकत नव्हता, चालूही शकत नव्हता. आता तो शिपाई संन्याशी झालाय. आपल्या जागी बसल्या बसल्या पहारा देतोय. कधी कधी तो देवता बनतो. त्याच्या डोक्यावरचा झालरदार साफा आता खरवडून काढून टाकलाय. आता त्याचं हव्या त्या प्रकारे रूपांतर करणं शक्य होतं. कधी कधी त्याच्याकडून वरवंट्याचंसुद्धा काम करून घेतलं जातं.
आता मीयाँ हमीदची परिस्थिती काय झाली, ते ऐका. अमीना त्याचा आवाज ऐकताच पळत पळत बाहेर आली आणि त्याला कडेवर ऊचलून त्याच्यावर प्रेम करू लागली. सहजच त्याच्या हातात चिमटा तिने पाहिला आणि ती चकित झाली.
‘हा चिमटा कुठे होता?’
‘मी तो विकत आणलाय.’
‘किती पैशाला?’
‘तीन पैसे दिले.’
अमीनाने छाती बडावून घेतली. हा कसला मुलगा आहे. असमंजस. दोन प्रहार होत आले. काही खाल्लं नाही प्याला नाही.आणलं काय , तर हा चिमटा. सगळ्या जत्रेत तुला आणखी काही मिळालं नाही, हा लोखंडाचा चिमटा उचलून आणलास ते?
हमीदने अपराधी स्वरात म्हंटलं, ‘तुझी बोटं तव्यामुळे भाजत होती ना, म्हणून मी हा चिमटा आणला.
म्हातारीचा राग लगेच मायेत बदलला. आणि स्नेहदेखील असा तसा नाही, जो प्रगल्भ असतो आणि आपली सारी तीव्रता शब्दातून विखरून टाकतो. हा मूक स्नेह होता. खूप ठोस, रस आणि स्वादाने भरलेला. मुलामध्ये किती त्याग, किती सद्भाव आणि किती विवेक आहे. इतरांना खेळणी घेताना आणि मिठाई खताना बघून त्याचं मन किती लालचावलं असेल! इतका संयम, इतकी सहनशीलता त्याच्याकडे आली कुठून? तिथेदेखील त्याला आपल्या म्हातार्या आजीची आठवण झाली. अमीनाचं मन गदगदून गेलं.
आणि आता एक अगदी विचत्र गोष्ट घडली. हमीदच्या या चिमाट्यापेक्षाही विचत्र. छोट्या हमीदने म्हातार्या हमीदचा पार्ट खेळला होता आणि म्हातारी अमिना बालिका अमीना झाली होती. ती रडू लागली. पदर पसरून हमीदसाठी आशीर्वाद मागत होती आणि अश्रूंचे मोठे मोठे थेंब बरसू लागली होती. हमीदला याचे रहस्य काय कळणार?
– समाप्त –
मूळ हिंदी कथा 👉 ‘ईदगाह…’ – मूळ लेखक – मुंशी प्रेमचंद
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈