सुश्री मंजुषा सुनीत मुळे
जीवनरंग
☆ बृहन्नडा… भाग-२ – लेखिका : सुश्री संगीता मुकुंद परांजपे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
शेजारच्याच गावी सुगंधाला दिली होती. दुसऱ्या दिवशी पहाटेच सगळं वऱ्हाड ट्रक टेंपोमधून नवरदेवाच्या गावी पोहोचलं. लग्नासाठी गोरज मुहूर्त धरला होता. मोठं तालेवार घराणं होतं नवरदेवाचं. १०० एकर जमिन, गाई गुरं, शेती बागायती .. लक्ष्मी पाणी भरत होती म्हणा ना. नशीब काढलं होतं अगदी सुगंधानं. घरच्या जमिनीवरच बंगल्याजवळच्या भल्या थोरल्या आवारात लग्नाचा मांडव घातला होता. बाजूलाच गाईगुरांचे गोठे, कोंडवाडे होते. सुगंधा पिवळी साडी नेसून मंडपात आली.. नवरदेव घोड्यावर बसून मंडपात येत होते. स्वागताला खंडू नटून थटून नऊवारी साडी नेसून, केसांना गंगावन लावून अंबाडा आणि त्यावर गजरा माळून तो सुगंधाच्या आई वडिलांबरोबर मंडपाच्या दरवाजात पंचारती घेऊन ओवाळायला उभा होता. आणि इतक्यात काही कळायच्या आतच वरातीचं घोडं उधळलं !!!! रोषणाईसाठी घासलेटचे दिवे डोक्यावर घेऊन चालणाऱ्या माणसांना धडक देऊन घोडं मंडपात घुसलं. नवरदेव खाली पडले. ते घासलेटचे दिवेही खाली पडले आणि क्षणार्धात मांडवाला आग लागली. मांडवाचं सेटिनच कापड भराभर पेटलं. रुखवताच्या टेबलाला धडक देऊन आजूबाजूच्या खुर्च्या आणि माणसेही घोड्याच्या सैरावैरा धावण्याने वेड्यावाकड्या होत खाली पडल्या. कडेच्या रांगेतल्या प्लास्टिकच्या खुर्च्याही पेटू लागल्या. सगळीकडे धूर पसरू लागला होता. आगीला पाहून ते घोडं आणखीनच बिथरलं. लग्नाला आलेले पैपाहुणे सैरावैरा धावू लागले. चेंगराचेंगरी होत होती. लहान मुलं आणि वयस्कर माणसं यांच्या किंकाळ्यांनी आसमंत दणाणून गेला होता. खंडूने धावत जाऊन सर्वप्रथम इलेक्ट्रिक सप्लाय बंद करून टाकला. इलेक्ट्रिकल कंत्राटदाराकडे हरकाम्या म्हणून केलेल्या कामाचा अनुभव इथे उपयोगी पडला होता. मांडवात एकच हलकल्लोळ माजला होता. खंडू पदर खोचून जीवाच्या आकांताने सुगंधाकडे धावला. ती घाबरून रडू लागली होती. त्याने तिला धीर दिला आणि तिला खांद्यावर टाकून मांडवाच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवली. नंतर त्याने मामा मामी ला वाचवले. नवरदेव बिचारा आधीच बाहेर जाऊन उभा राहिला होता. आता खंडू झपाट्याने आग विझवायच्या मागे लागला. कितीतरी लहान मुलांना आणि म्हाताऱ्या माणसांना त्याने आपल्या खांद्यावर घेऊन मांडवाबाहेर सुरक्षित स्थळी नेऊन ठेवले. त्याचा झपाटा पाहून लोक आणि तातडीने तिथे पोहोचलेले पोलीस आश्चर्यचकित झाले होते. आगीचा बंब येईपर्यंत गावकऱ्यांनीही आग आटोक्यात आणण्यास हातभार लावला. आगीचा बंब येईपर्यंत अगदी न थांबता खंडू लोकांना वाचवण्याचं काम करत होता. आगीत त्याचे हातपाय होरपळून निघाले होते नुसते. साडीही थोडीफार जळली होती. गंगावन सुटून खाली आलं होतं. तो प्रचंड थकलाही होता. प्रसंगावधान राखत त्याने मांडवाचा गुरांच्या कोंडवाड्याकडे जाणारा दोर वेळीच कापून टाकला म्हणून त्या मुक्या जिवांचे प्राण वाचले होते, अन्यथा काय घडलं असतं याची कल्पनाही सहन होण्यासारखी नव्हती. अंब्युलन्सही येऊन पोहोचली. सरतेशेवटी आग आटोक्यात आली. जीवित हानी झाली नाही. काही जणांना आगीचा तडाखा बसला होता पण तो जखमी होण्यापुरताच. दोन चार जण धुरामुळे आणि घाबरल्यामुळे बेशुद्ध पडले होते.. त्यांना तातडीने हॉस्पिटलला नेण्यात येत होतं. काही जणांचे हात पाय चांगलेच दुखावले होते चेंगराचेंगरीत..परंतु बरेचसे लोक सुरक्षितरित्या मांडवाबाहेर पडले होते. आणि हे सगळं कुणामुळे घडू शकलं होतं तर अख्ख गाव ज्याची खिल्ली उडवतं होतं.. ज्याची कुचेष्टा करत होतं.. ज्याच्यातल्या न्यूनत्वाला हिडीसफिडीस करत होतं त्या खंडूमुळेsss !!!! आज अनेकांच्या माना शरमेनं खाली गेल्या होत्या. स्वतःला पुरुष म्हणवणारे लोक खंडूच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हते. ज्याला हिजडा म्हणून साडी चोळी देऊन हिणवत होते तो तीच साडी चोळी नेसून, हातात बांगड्या घालून निधड्या छातीने, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचवण्यासाठी धावपळ करत होता. आगीचं तांडव विझवण्यासाठी जीवाच्या आकांताने लढत होता. दुसऱ्या दिवशी खंडूचा पेपरमध्ये बातमीसकट फोटो छापून आला. “ एका तृतीयपंथीयाने वाचवले शेकडो लोकांचे प्राण !!!” वा रे वा!!! देवा तुझी लीला अगाध आहे हेच खरं !!! खंडू रातोरात हिरो झाला होता. त्या दिवशी लग्न रहित झालं हे सांगायलाच नको. नवऱ्यामुलाकडची लोकं समजूतदार होती म्हणून कुठचाही शुभअशुभाचा संबंध न जोडता एक महिन्यानंतरचा पुढचा मुहूर्त धरला गेला.. आणि लग्न सुरळीत पार पडलं सुद्धा. खंडू सुगंधाच्या घरी पाठराखीण म्हणून महिनाभरासाठी रहायला गेला. तिच्या सासरीही त्याची मोठ्या मानाने उठबस केली गेली. आता गावात कुठलंही शुभकार्य असो खंडूला फार आग्रहाचं निमंत्रण असे. त्याचा यथोचीत मानही ठेवला जाई. त्या दिवसापासून खंडू; मामामामीच्या आणि अख्ख्या गावाच्या गळ्यातला ताईत झाला.. सारं गाव आता खंडूला मान देऊ लागलं होतं. खंडूच्या नशिबाने त्याला हेही दिवस दाखवले होते.
त्या दिवशी पोलिसांनी, आणि जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रपती अर्जुनशौर्य पुरस्कारासाठी खंडूची शिफारस दिल्लीला पाठवण्याचं ठरवलं. बऱ्याच कालावधीनंतर काही महिन्यांनी दिल्लीहून उत्तर आलं की खंडूला तो मानाचा ”अर्जुन शौर्य पुरस्कार” देण्यात येणार आहे म्हणून. बातमी ऐकताच खंडूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आईच्या आठवणीने त्याला उमाळे आवरत नव्हते. सबंध गावभर उत्साहाचं वातावरण पसरलं.
बातमी समजतांच शाळेतले त्याचे लाडके गुरुजी त्याला भेटायला आले. त्याने शाळा सोडली तेव्हा त्याला परत शाळेकडे वळवण्यासाठी त्याची समजूत काढायला ते घरी आले होते त्यानंतर आज तो त्यांना भेटत होता. ‘ खंडू फार मोठा झालास बाबा ‘ .. गुरुजी म्हणाले. ‘ कसलं काय गुर्जी .. मी हा असा…. कसला मोठा न कसलं काय? आगीचा वणवा इझवला हो फकस्त.. ‘ ‘ असं नको म्हणूस. खंड्या तू आज जे करून दाखवलस; जे धैर्य आणि प्रसंगावधान दाखवलस ते सामान्य माणसाचं काम नाही रे.’ गुरुजी म्हणाले; ‘ आणि आज ज्या अर्जुन शौर्य पुरस्काराचा तू मानकरी ठरला आहेस त्या अर्जुनाला देखील काही वर्ष किन्नर बनून राहावं लागलं होतं पोरा.; ‘बृहन्नडा’ या नावानं. ‘बृहन्नडा’ या शब्दाचा अर्थ माहीत आहे तुला? बृहन्नडा म्हणजे श्रेष्ठ, मोठा, महान मानव. आज तू श्रेष्ठच ठरला आहेस ना !!! आणि योगायोग बघ कसा तो .. जो पुरस्कार तुला मिळाला आहे त्याचं नावही “अर्जुन शौर्य पुरस्कार” च आहे. बृहन्नडेचं, किन्नराचं रूप घेतलेला अर्जुन…!! ‘ खंडू भावनातिरेकाने रडू लागला होता. त्याच्या डोळ्यातला अश्रूपात थांबतच नव्हता. तो गुरुजींच्या पाया पडला.. गुरुजींनी त्याला उठवला आणि छातीशी धरून घट्ट मिठी मारली.. ‘ मोठा हो पोरा .. असाच मोठा हो..!!!!! ‘ बाहेर त्याची मिरवणूक काढण्यासाठी बैलगाडी सजून तयार होती. आणि त्या गाडीचं सारथ्य करायला सुगंधाचा नवरा आणि सुगंधा पदर खोचून बैलगाडीवर उभी होती. ढोलताश्याच्या गजरात आणि गुलालाची उधळण करीत एका बृहन्नडेची मिरवणूक निघाली होती!!!!!!!
— समाप्त —
लेखिका : सुश्री संगीता मुकुंद परांजपे
प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈