🌸 जीवनरंग 🌸
☆ देवपंगत – भाग – १ ☆ श्री सचिन मधुकर परांजपे ☆
….जोगळेकरांकडची ती पूर्वापार चालत आलेली देवपंगत मला वाटतं आसपासच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. देवपंगत या नावामागचा इतिहास मोठाच रंजक आहे. भाऊकाकांचे आजोबा म्हणजे हरिभाऊंपासून ही परंपरा सुरु आहे. एकदा जेव्हा हरिभाऊ अगदी तरुण होते तेव्हा त्यांच्या अंगणात दुपारच्या वेळी जेवणाआधी कसलेसे शेतीवाडीचे हिशोब करत असताना एकदम दोन जोडपी दारात आली… एकूण चार जणं… दोन पुरुष, दोन बायका…त्यातला एकजण पडक्या आवाजात अजिजीने म्हणाला,
“हरिभाऊ… लई लांबून आलोय बगा. पार उदगीर पासून… खूप मोटा दुष्काळ घडलाय वं आमच्याइथं… घरदार तसंच टाकून वणवण फिरतोय… काय पडंल ते काम करतो बघा. हरिभाऊ, तुमच्याविषयी खूप आईकलं… यायला उशीर झाला. पण दोन घास द्याल तर बरं हुईल हो… उद्यापासून आमी चौगं बी श्येतावर येतु तुमच्या… काय द्याल ते काम करु. आज भाकरतुकडा देता का पोटाला?”
त्या चौघांची अवस्था खरंच वाईट दिसत होती. अठरा विश्वे दारिद्र्याच्या खाणाखुणा सबंध देहावर मिरवत होत्या. हरिभाऊंचं नुकतंच लग्न झाले होतं. कोकणातलं एक छोटंसं गाव त्यातले हरिभाऊ जोगळेकर एक सधन शेतकरी…“इंदिरा…” त्यांनी बायकोला हाक मारली…चौघांना ओटीवर बसायला सांगून ताबडतोब जेवणाची व्यवस्था झाली. हरिभाऊ तेव्हाच्या काळी जातपात शिवाशिव मानत नसत. चौघे ओटीवरच बसले. पानं मांडली गेली… आणि एखाद्या तालेवार पाहुण्याचं आगतस्वागत करावं तसं जेवण वाढलं गेलं…हरिभाऊंची लग्न व्हायचं होतं अशी बहिण म्हणजे कावेरीही वहिनीच्या मदतीला लागली…हरिभाऊंकडे अन्नपूर्णेच्या कृपेने नेहमीच पेशवाई बेत असे.
केळीच्या पानावर शुभ्र पांढरा भात, पिवळंधम्मक वरण, घरचं साजूक तूप, अळूवडी, नारळाची चटणी, कोशिंबीर, रायतं, रोजच्या जेवणात एक गोड पदार्थ असायचा म्हणून आज केशरी जिलबी, कुरडया, एक रानभाजी, गरमागरम पोळ्या असा फक्कड बेत होता.
आलेले चौघेजण अक्षरशः अन्नावर तुटून पडले हो. अनेक दिवसांची भूक आज भागली होती. हरिभाऊ, इंदिराबाई आणि कावेरी तिघेही कौतुकभरल्या नजरांनी ती कृतज्ञ तृप्तता न्याहाळत होते. जेवणं झाली आणि चौघंही परसदारी जाऊन हातपाय धुवून ओटीबाहेर अंगणात आले. टळटळीत दुपारी आज आपल्या हातून चौघांना अनायासे अन्नदान झालं याचा मनस्वी आनंद सगळ्यांना होता. जेवणानंतर जशी ब्राह्मणाला दक्षिणा देण्याचा रिवाज असतो तसं हरिभाऊंकडे आलेल्या अतिथीला आणा द्यायची पद्धत होती. त्यामुळे रिवाजाप्रमाणे हरिभाऊंनी एकेक आणा चौघांना दिला… आणि अचानक…
त्या चौघांपैकी एकाची बायको बोलली, “हरी…” एकेरी उल्लेख ऐकून सगळेच दचकले. चौघांचंही रुपडं आता पालटलं होतं… “हरी… अरे मी पार्वती. हे माझे नाथ शिवशंभो. ते विष्णु नारायण आणि ती त्यांची सौभाग्यवती लक्ष्मीनारायणी… आज अगदी सहज तुझं अगत्याचं जेवण.. तुझा पंगत अनुभवायला आम्ही आलो रे. तू कोणाला उपाशी, विन्मुख पाठवत नाहीस. जे तुम्ही स्वतः खाता तेच अतिथीला देता असं ऐकून होतो.. आज अनुभव घेतला… आता आमची चौघांचीही कृपा तुझ्या सर्वच पिढ्यांवर अशीच राहील… पण आता मात्र एक करायचं…. दरवर्षी देवपंगत भरवायची. गावात आमंत्रणं धाडायची… येईल त्याचा आदरसत्कार करायचा… पंचपक्वान्नाचं जेवण ठेवायचं… त्यात पुरणपोळी आणि अळूवडी हवीच बरं का… कोणी काही जिन्नस पंगतीसाठी दिला तर आनंदाने स्विकारायचा… हरकत नाही. जो देवभंडाऱ्यात देतो त्याला कधी काही कमी पडत नाही. पण अट एक आहे… त्या पंक्तीला वाढायला आज जशी कावेरी होती तशी माहेरवाशीण हवीच… तुझ्या आणि तुझ्या सगळ्या पिढ्यांचं कोटकल्याण होईल…. तथास्तु” आणि हरिभाऊंना फक्त त्यांचे सस्मित चेहरे मात्र लक्षात राहीले. पुढच्या क्षणी अंगणात कोणीही नव्हते. तिघेही थक्क झाले…
चारही केळीची उष्टी पानं नुसती पुसून हरिभाऊंनी तिजोरीत जपून ठेवली. ज्यावर प्रत्यक्ष परमेश्वर उष्टावलाय ती पानं… त्या दिवसापासून हरिभाऊंची भरभराट सुरु झाली…दरवर्षी मग देवपंगतीचा घाट घालणं सुरु झालं. लोकांना हरिभाऊंवर नितांत विश्वास… दरवर्षी लांबलांबहून लोकं यायची. दरवर्षी गावातली आणि बाहेरची तालेवार माणसं साजूक तूप, पीठ, तांदुळ, भाज्या असं खूप काही दान करत. ज्यांना जमेल ते पैसे देत…देवपंगत शक्यतो वैशाख पौर्णिमेला भरायची. आणि मग आधी त्रयोदशीपासून दोन दिवस रुद्र, विष्णुयाग, सप्तशतीचे पाठ आणि श्रीसूक्ताची पुरश्चरणं केली जात. कावेरी नियमानुसार दरवर्षी त्याच वेळी सहकुटुंब सपरिवार येई. देवपंगत झाली की दोन दिवसांनी सासरी जाई… हा क्रम पुढे कायम सुरु राहीला…
हरिभाऊंनंतर पुढे पिढीत दरवर्षी एक मुलगा आणि एकच मुलगी जन्माला यायचे त्यामुळे फाटे फुटले नाही आणि परंपरा अबाधित राहीली. पिढी वंशसातत्य राहीलं… हरिभाऊनंतर विष्णुपंत आणि बहीण गंगा… त्यानंतर भाऊकाका आणि मंदाकिनी… आणि आता भाऊकाकांनंतर त्यांचा मुलगा विराज आणि बहीण मालिनी… परंपरा सुरू होती… विराज पुण्यात आणि मालिनी लग्नानंतर युके ला असली तरी ती दरवर्षी यायची आणि पंगतीचा उत्सव झाला की काही दिवस दादासोबत पुण्यात आणि सासरी साताऱ्याला जाऊन मगच परत जायची….विराजचा बिझनेस आता पुण्यात बऱ्यापैकी सेट झालेला होता. हरिभाऊंनी जपून ठेवलेली देवांची उष्टी पानं नंतर कधीच सुकली नाही हे विशेष. प्रत्येक देवपंगतीच्या आधी ती काढून त्याचं खाजगीत पूजन केलं जाई.
हरिभाऊंपासून आजतागायत ही परंपरा अबाधितपणे सुरु होती. सुरुवातीला शे दोनशे पानं उठायची ती आता पाचशे सातशे पानापर्यंत पंगत होत होती. पंगतीचा बेतही अगदी तसाच असायचा. कालमानानुसार थोडे बदल केले तरी मुख्य बेत तोच…आता कधीतरी आपटे मिठाईवाल्यांकडून खास बनवून आणलेले साजूक तूपातले मोतीचूर लाडू, कधी भोपळ्याची भाजी, कधी छान सुरेख बटाट्याची भाजी, कधी नव्या सुनेच्या आग्रहाखातर पंचामृताची आमटी, कधीतरी पालक बटाटा भजी असे आलटून पालटून बेत असायचे पण नियमानुसार पुरणपोळी आणि अळूवडी कंपलसरी होती. खास पुण्याहून श्रेयसचं केटरिंग असायचं. काळ बदलला आणि आधुनिकता आली तरी पंगत तशीच राहिली. त्याचा ना बुफे झाला, ना केळीच्या पानाऐवजी स्टेनलेस स्टीलची ताटं आली… मेन्यूतला बदल हा प्रथेत झाला नाही. देव जसे अंगतपंगत बसून जेवले तस्संच सगळ्यांनी जेवायचं हा अलिखित नियम होता… जेवणाआधी हातपाय धुणे, जितक्या पंगती उठतील त्यातील पहिल्या पंगतीअगोदर उपस्थित ब्रह्मवृंदांनी अन्नसूक्त आणि त्रिसुपर्ण म्हणणे, जेवणानंतर आलेल्या प्रत्येकाला आजही एकेक रुपया दक्षिणा दिली जाते. आज एक रुपयाला तितकंसं महत्त्व नसलं तरी देवपंगतीनंतर मिळालेली दक्षिणा लोकांना मौल्यवान वाटे…. सातारचे एक इंडस्ट्रीएलिस्ट त्या एक रुपया दक्षिणेसाठी येत. सगळ्यांसोबत बसून जेवत. त्यांच्यासाठी ते नाणं म्हणे अतिशय लकी होतं. दरवर्षी मिळणारं नाणं ते तिजोरीत जपून ठेवत…पहिली पंगत बसण्याआधी एका बाजूला अंगण सारवून तिथे छान बैठक मांडून, सजवून चौघा देवांसाठी चार पानं मांडली जात. तो नैवेद्य मात्र गायीला अर्पण केला जाई. पंगत संपवून माणसं घरोघरी जाताना सोबत प्रसादाचे लाडू दिले जात. हरिभाऊंच्या वेळी द्रोणातून प्रसाद वाटला जाई आता झीपलॉकच्या पिशवीतून… इतकाच काय तो फरक.
क्रमशः
© श्री सचिन मधुकर परांजपे
(पालघर)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈