🌸 जीवनरंग 🌸
☆ देवपंगत – भाग – २ ☆ श्री सचिन मधुकर परांजपे ☆
(मागील भागात आपण पहिले,- पहिली पंगत बसण्याआधी एका बाजूला अंगण सारवून तिथे छान बैठक मांडून, सजवून चौघा देवांसाठी चार पानं मांडली जात. तो नैवेद्य मात्र गायीला अर्पण केला जाई. पंगत संपवून माणसं घरोघरी जाताना सोबत प्रसादाचे लाडू दिले जात. हरिभाऊंच्या वेळी द्रोणातून प्रसाद वाटला जाई आता झीपलॉकच्या पिशवीतून… इतकाच काय तो फरक. – )
विराज आणि मालिनी या भावाबहिणींचा एकमेकांवर प्रचंड जीव. मालिनी आता लग्न होऊन जोगळेकरांकडून करमरकरांची सून झाली असली तरी तिच्यावर संस्कार सगळेच सुरेख होते. जगावर प्रेम करायची ती. कोणालाही खायला देणं, आवडीचं काही करुन देणं तिच्या खास आवडीचा विषय होता….देवपंगत दोन महिन्यावर आली तशी विराजने गावाकडे एक चक्कर टाकली. जुन्या वाड्याची साफसफाई करुन झाली. ग्रामपंचायतीचं पटांगण देवपंगतीसाठी नक्की झाले. भावकीतील मंडळींशी भेटीगाठी झाल्या. यंदा तब्बल आठशे पानांचा अंदाज होता. कॅटरर्सशी बोलणं झालं. तारखा ॲडवान्स…दोन दिवसाच्या विधीसाठी नेहमीप्रमाणे रत्नागिरीहून आठल्ये गुरुजी, फडके गुरुजी येणार होते…आणि ….
कोरोनाची साथ आली…. विराज हादरला.. आजवर कधीही म्हणजे अक्षरशः कधीही न आलेली अडचण समोर ठाकली. आजवर आलेल्या प्रत्येक अडथळ्यांवर आणि विघ्नांवर त्याचा आजापणजांनी मात केली होती. गांधींच्या हत्येनंतर आसपासच्या गावात जाळपोळी झाल्या तेव्हा यांच्या गावकऱ्यांनी मानवी साखळी करुन जोगळेकर वाडा वाचवला होता. “बामणाच्या नखाला पण हात लागू देणार नाई” अशा निर्धाराने शेंबडं पोरही छाती पुढे काढून आलं होतं. वाडा जाळपोळीपासून सुरक्षित राहिला होता. अशा कठीण परिस्थितीतही देवपंगत उठली होती पण आजचा प्रसंग अवघड होता. इंटरनॅशनल फ्लाईट्स तातडीने बंद करण्यात आल्यामुळे मालिनीचं येणं अशक्य होतं. देवपंगत झाली असती पण नियमानुसार पंगतीला घरातल्या बायकांसोबत बहिणीने वाढणं आवश्यक होतं… आता काय करायचं? मोठाच यक्षप्रश्न होता…
“दादा… मला व्हिडिओ कॉल कर. परिस्थितीच अशी आहे की आपला नाईलाज आहे.” विराज हो म्हणाला. यंदाच्या देवपंगतीला मालिनी नाही म्हणून राधिकाकाकू पण थोडी नाराज होती. विराजची बायको म्हणजे अनिताही थोडी बावरली होती. मालिनी असली की तिला जरा आधार वाटे यंदा सगळंच तिच्यावर आलं होतं. नाही म्हणायला भावकीतील स्नेहाकाकू, दस्तुरखुद्द राधिकाकाकू म्हणजे तिच्या सासूबाई, गोखल्यांची नमिता, पावसकरांची सून या सगळ्या असल्या तरी मालिनी असली की तिला बरं वाटे. दोघी नणंदाभावजयींचं रिलेशन छान होतं. तू अजिबात काळजी करु नकोस….देव काय ते बघून घेईल असं मालिनीने अनेकदा सांगितले…
सगळी तयारी जय्यत झाली. आसपासच्या परिसरात आमंत्रणे गेली आणि दोन दिवस आधी मालिनीचा फोन आला “अरे दादा, मी नेमकी देवपंगतीच्या दिवशी एका अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी एकेठिकाणी जातेय. निनादचं एक काम आहे रे. तो एरिया लो नेटवर्कचा आहे. मीच कॉल करेन जमेल तसं” देवपंगतीच्या आधीचे दोन दिवस सतत विधी सुरु होते… विराजला श्वास घ्यायलाही फुरसत नव्हती… आज पदोपदी मालिनीचं नसणं खटकत होतं… पहिली पंगत घेण्याची वेळ आली. लोकं स्थानापन्न झाले. आपटे गुरुजींनी खड्या आवाजात त्रिसुपर्ण म्हणायला सुरुवात केली. भावकीतील नातेवाईक आणि स्त्रीया पंगत वाढायला सज्ज होत्या. विराज तूपाचं भांडं आणि अनिता मसालेभात घेऊन तयार होते….आज मालिनीची पुरणपोळी वाढण्याची जबाबदारी राधिकाकाकूंनी घेतली होती… आणि अचानक एका कार मैदानात येऊन थांबली आणि त्यातून लगबगीने मालिनीच उतरली… हे दृश्य बघून सगळेच थक्कं झाले…
“मालिनी? हे कसं शक्य आहे?” सगळेच म्हणाले. “दादा तुला नंतर सांगते डिटेल…” त्रिसुपर्ण संपलं आणि आईकडचं पुरणपोळ्यांचं ताट घेऊन मालिनी नेहमीप्रमाणे पदर खोचून वाढू लागली. इतक्या मोठ्या लांबच्या प्रवासाहून आली असली तरी तिच्या चेहर्यावर थकवा नव्हता. लख्खं गोऱ्यापान वर्णाची, सुंदर चेहऱ्याची एक लक्ष्मीकन्याच जणू काही पंगतीत वाढते आहे असं विराजला वाटलं… आज नेहमीप्रमाणे वरणभात, तूप, लिंबू, बटाट्याची भाजी, पुऱ्या, आम्रखंड, पुरणपोळी, चटणी, कोशिंबीर, कोथिंबीर वडी, पापड, मसालेभात, कुरडया, पंचामृत आणि अळूवडी हा बेत होता…. फक्कड बेत झाला. आठेकशे लोक तृप्त झाले. ओळखदेख नसणारे मोठमोठे तालेवार जसे जेवत होते तसेच आसपासच्या गावचे गोरगरीब जेवत होते. आपल्या शेजारी कोण बसलंय? याची खंत कोणाला नव्हती. कराडच्या नगराध्यक्षांच्या मांडीला मांडी लावून एक गरीब शेतकरी बसला होता तर आमदारांच्या शेजारी पानाची टपरी असलेला विठोबा माने जेवत होता…. मोठी छान मैफिल जमली होती. दक्षिणा घेऊन शुभेच्छा देऊन आणि प्रसाद घेऊन जो तो आपापल्या घरी गेला… मंडपात मालिनी, विराज, राधिकाकाकू, अनिता आणि थोडी इतर नातेवाईक मित्रमंडळी असताना मालिनीने जे सांगितले ते ऐकून सगळेच थक्क झाले…
इंटरनॅशनल फ्लाईट्स ताबडतोब बंद झाल्यावर मालिनीचे इथे भारतात येण्याचे मार्ग बंद झाले. तिने आणि निनादने अक्षरशः आकाशपाताळ एक केलं पण जाणं इंपॉसिबल होतं. इतक्यात चार दिवस आधी निनादच्या मित्राचा फोन आला. त्याचा एक इंडस्ट्रीएलिस्ट मित्र जो बिगशॉट होता तो दोन दिवसात स्पेशल परमिशन घेऊन स्वतःच्या चार्टर्ड विमानाने भारतात, मुंबईत चालला होता. मालिनीने स्वतः त्या मित्राला फोन केला… मला नेऊ शकता का? असं विचारलं… त्याने सांगितले “ताई, अशा प्रसंगी मी उपयोगी पडलो नाही तर देव मला क्षमा कशी करेल” तडकाफडकी सर्व अत्यावश्यक टेस्ट्स केल्या आणि स्पेशल परमिशन्स काढली गेली. आणि देवपंगतीच्या एक दिवस आधी मालिनी संध्याकाळी मुंबई एअरपोर्टला उतरली. तिला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं… आणि पंगतीच्या अगदी वेळेवर ती पोहोचली… आणि पंगतीत तिला नियमानुसार वाढता आलं…
तिला ज्यानं सुखरुप भारतात आणलं तो इंडस्ट्रीएलिस्ट म्हणजे कैवल्य…कैवल्य भोसले. त्याला दुसरीकडे जायचं असल्याने देवपंगत अटेंड करणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्याला प्रसादाचे लाडू ताबडतोब कुरियर केले गेले. आणि पुढच्या वर्षीपासून तोही आवर्जून येणार होता असं त्याने मालिनीला वचन दिले होते. ही सगळी स्टोरी ऐकून उपस्थित सगळेच गहिवरून गेले. इच्छा तिथे मार्ग म्हणतात ते उगाच नाही…
विराज शांतपणे उठून शेजारच्या वाड्यातील माजघरात गेला. हरिभाऊ, कावेरी, विष्णुआजोबा, गंगाआजी, भाऊकाका आणि मंदाआत्या सगळ्यांच्या फोटोला हात जोडले. मनोमन प्रार्थना केली…. परंपरा म्हणजे काय नेमकं? एक आनंदप्रवाह. देवी पार्वतीची आज्ञा हो… पंगतीत वाढायला बहीण हवीच… विषयच संपला. नियती काय ठरवायचं ते ठरवू दे… पंगतीला माझी बहीण येणारच. जगाच्या पाठीवर कुठेही असो…
विराजच्या खांद्यावर मालिनीचा हात विसावला… “देवाची इच्छा देव कशीही पूर्ण करतो ना दादा? आज मला एक गोष्ट पटली. प्रवाहाचा प्रवास असाच सोपा सुरु असतो… आपण फक्त विश्वस्त. तो प्रवाह पुढच्या पिढीला सुपूर्द करणारे त्रयस्थ…” दोघा बहिणभावांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.
– समाप्त –
© श्री सचिन मधुकर परांजपे
(पालघर)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈