सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ पोट्रेट – भाग-१ (अनुवादीत कथा) – मूळ इंग्रजी कथा – रोअल्ड डाल्ह – हिन्दी अनुवाद – श्री सुशांत सुप्रिय ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
थंडीचा काळ जरा लांबलाच होता. शहरातील गल्ल्यांमधून अतिशय थंड वारे वहात होते. बर्फवृष्टी करणारे ढग आभाळात गडगडत होते.
ट्रिओली नावाचा तो म्हातारा माणूस, रुए दी रिवेलीच्याजवळ वेदनेने आपले पाय घासत फुटपाथवरून चालत होता. तो थंडीने पिचला होता आणि बिचारा दु:खी होता.
काच लावलेल्या दुकानात अनेक गोष्टी सजवून मांडून ठेवल्या होत्या. अत्तराच शिशे रेशमी टाय, हिरे, टेबल – खुर्च्या, पुस्तके इ. अनेक गोष्टी होत्या तिथे, पण तो या गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे जात होता. वाटेत त्याला एक चित्र प्रदर्शन लागलं. चित्र प्रदर्शने त्याला नेहमीच आवडायची. या प्रदर्शनात काचेच्या पलीकडे प्रेक्षकांना बघण्यासाठी अनेक चित्रे होती, पण त्यातील एक कॅन्व्हास विशेष लक्ष वेधून घेत होता. ते चित्र बघण्यासाठी तो तिथे थांबला. चित्र बघितलं आणि त्याला वाटू लागलं, ‘हे चित्र आपण बघितलय. पण कुठे?’ अचानक स्मृतीने त्याच्या डोक्यात टकटक केली. प्रथम कुठे तरी पाहिलेली, कुठली तरी गोष्ट, तिची जुनी आठवण, मन व्यापून गेली. त्याने ते चित्र पुन्हा पाहिले. एका निसर्ग दृश्याचे ते पेंटिंग होते. जोरदार वार्यामुळे झाडांचा एक समूह एका बाजूला झुकलेला होता. चौकटीबरोबर तिथे एक पट्टी होती. त्यावर चित्रकाराचे नाव लिहिलेले होते: चॅम सुतीने (१८९४-१९४३ ) .
त्या पेंटिंगकडे टक लावून बघत असताना ट्रिओली विचार करू लागला की या पेंटिंगमध्ये असं काय विशेष होतं, की जे आपल्याला ओळखीचं वाटलं. कसलं अजबसं विचित्र पेंटिंग आहे हे. तो विचार करत राहिला. पण मला हे आवडतय. चैम सुतीने…. सुतीने… !
‘अरे देवा…! तो अचानक ओरडला. ‘हा तर माझा जुना छोटा मित्र आहे. पॅरीसमधील सगळ्यात दिमाखदार, शानदार दुकानात त्याचं पेंटिंग टांगलं गेलय. विचार करा, केवढा प्रतिभावान आहे माझा दोस्त! की होता म्हणू? ’
म्हातार्याने आपला चेहरा खिडकीच्या काचेच्या जवळ नेला. तो त्या मुलाचा चेहरा आठवू लागला आणि त्याला तो आठवलाही. केव्हाची गोष्ट आहे बरं ही? बाकीच्या गोष्टी इतक्या सहजपणे त्याला आठवल्या नाहीत. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. किती जुनी? वीस… कदाचित् तीस वर्षांपूर्वीची असेल. एक मिनिट… हं! पहिल्या महायुद्धापूर्वी १९१३ची गोष्ट आहे ही. हो! हेच वर्ष! आणि हा सुतीने…. कुरूप मुलगा… सुतीने. सुतीने कुरूप होता, पण त्याला तो आवडायचा. त्याच्यावर तो प्रेम करत होता. दुसर्या कुठल्याही कारणाने नाही, तो चित्रे काढत होता. केवळ चित्रे काढत होता असं नाही, तर उत्तम चित्रे काढत होता. याच कारणाने सुतीने त्याला आवडायचा.
किती सुरेख चित्रे काढत होता तो. आता त्याला काही गोष्टी स्पष्टपणे आठवू लागल्या फाल्गुएरा शहरात, होय, तेच शहर. तेव्हा तिथे एक स्टुडिओ होता. तिथे केवळ एक खुर्ची होती. एक घाणेरडा सोफा होता. त्यावर तो चित्रकार मुलगा झोपत असे. तिथे दारूच्या नशेत धुंद झालेल्या लोकांच्या पार्ट्या होत. स्वस्तातली पांढरी दारू मिळत असे. प्रचंड भांडणे व्हायची. तिथे नेहमीच या मुलाचा उदास चेहरा दिसायचा. तो आपल्या कामाबद्दल सतत विचार करायचा. ट्रिओली विचार करू लागला. आता त्याला सगळं स्पष्टपणे आठवू लागलं. छोटयातलं छोटं तथ्य, त्याला त्या वेळाच्या काही वेगळ्या घटनांची आठवण करून देत होतं.
उदाहरण सांगायचं झालं, तर तिथे गोंदवण्याचा मूर्खपणा झाला होता. तसं पाहिलं, तर तो वेडेपणाच होता. ते कसं सुरू झालं? अरे… हं! एक दिवस तो श्रीमंत झाला होता. श्रीमंत झाला होता म्हणजे काय, तर त्या दिवशी त्याची नेहमीपेक्षा जरा जास्त कमाई झाली होती. असंच झालं होतं. मग त्याने दारूच्या खूप बाटल्या खरेदी केल्या होत्या. आता त्याला, तो दारूच्या खूप बाटल्या घेऊन स्टुडिओत शिरताना दिसत होता. मुलगा तेव्हा चित्रफलकाच्या समोर बसला होता. ट्रिओलीची पत्नी खोलीच्यामधे उभी होती. चित्रासाठी एक खास पोझ घेऊन ती उभी होती आणि सुतीने तिचं चित्र रंगवत होता.
‘आज रात्री आपण छोटीशी पार्टी करूयात. फक्त आपण तिघे…’ खोलीत शिरत ट्रिओली म्हणाला.
‘का रे बाबा? आपण कशासाठी पार्टी साजरी करणार आहोत?’ वर न बघताच मुलाने विचारले. ‘ तू आपल्या पत्नीला घटस्फोट देत आहेस का, म्हणजे ती माझ्याशी लग्न करू शकेल! हे तर कारण नाही ना पार्टी करण्याचं?’
‘नाही.’ ट्रिओली म्हणाला. ‘मला आज माझ्या कामाचे बरेचसे पैसे मिळाले आहेत.’
‘पण मला आज काहीच मिळालं नाही. तरीही आपण पार्टी करायला काहीच हरकत नाही! ’ ती तरुणी पेंटिंग पहाण्यासाठी त्याच्या जवळ आली. ट्रिओलीदेखील तिथे आला. त्याच्या एका हातात दारूची बाटली होती आणि दुसर्या हातात ग्लास.
‘ नाही.’ मुलगा ओरडला. ‘कृपा करा. नको. आत्ताच हे चित्र आपण पाहू नका. ‘त्याने झपाट्याने चित्रफलकावरून ते पेंटिंग काढले आणि भिंतीशी उभे करून ठेवले आणि त्याच्यापुढे तो उभा राहिला पण ट्रिओलीने ते पेंटिंग पाहिले होते.
तेच पेंटिंग तो आता काचेआड पहात होता.
त्यावेळी ट्रिओली त्या मुलाला म्हणाला होता, ‘हे अद्भूत आहे. तू बनवलेली सगळीच पेंटिंग्ज मला आवडतात. हे तर अप्रतिम आहे.’
‘समस्या ही आहे, की मी बनवलेली पेंटिंग्ज काही पौष्टिक नाहीत. ती खाऊन मी माझं पोट नाही भरू शकत!’ मुलगा उदास होऊन म्हणाला.
‘पण तरीही ती पेंटिंग्ज अप्रतीम आहेत.’ दारूने भरलेला एक ग्लास त्याच्या हातात देत ट्रिओली म्हणाला, ‘घे. पी. ही गोष्ट तुझे चित्त प्रसन्न करेल!‘ त्याने आजपर्यंत त्या मुलाइतका करूण आणि उदास चेहर्याचा माणूस बघितला नव्हता.
‘ मला आणखी थोडी दारू दे .’ मुलाने म्हंटले. ‘आपल्याला पार्टीच साजरी करायचीय, तर ती त्या पद्धतीनेच साजरी करायला हवी. ’
तिथून सगळ्यात जवळ असलेल्या दुकानातून ट्रिओलीने दारूच्या सहा बाटल्या खरेदी केल्या आणि त्या घेऊन तो स्टुडिओत आला. मग तो तिथे बसला आणि सगळे आरामात दारू पिऊ लागले.
‘अतिशय श्रीमंत असलेले लोकच आशा तर्हेने पार्टी करू शकतात.’
‘हे खरं आहे.’ मुलगा म्हणाला.
‘जोसी तुला काय वाटतं? खरं आहे नं हे?‘
‘अगदी खरं आहे.’
‘ही अगदी उत्तम दारू आहे. आपण ही पितोय. आपण भाग्यवान आहोत.‘
हळू हळू अगदी व्यवस्थितपणे ते पीत होते. खूपशी दारू पिऊन झाल्यावर ते नशेने धुंद झाले. पण तरीही दारू पिण्याच्या त्या प्रक्रियेतील औपचारिकता ते निभावत होते.
‘ऐका.’ ट्रिओली म्हणाला. माझ्या मनात एक जबरदस्त कल्पना चमकतेय. मला एक पेंटिंग हवय. छानदार पेंटिंग, पण मला वाटतं, ते पेंटिंग तू माझ्या त्वचेवर बनावावस. माझ्या पाठीवर. मग माझी इच्छा अशी आहे, की तू बनवलेल्या पेंटिंगवर तू गोंदण कर. त्यामुळे ते नेहमीसाठी माझ्याजवळ राहील. ‘
‘तुला वेड लागलय.’ मुलगा म्हणाला.
‘ गोंदवायचं कसं, हे मी तुला शिकवेन. हे अगदी सोपं आहे. लहान मुलगादेखील हे करू शकेल. ‘
‘विक्षिप्त आहेस झालं. अखेर तुला हवय तरी काय?’
‘मी तुला दोन मिनिटात सगळं शिकवेन.’
‘हे अशक्य आहे.’
‘तुला असं वाटतं का, की मी जे काही बोलतोय, ते मला कळत नाही.’
’हे बघ. मी एवढंच म्हणतोय, की तू आता नशेत धुंद झाला आहेस. तू काही तरी बरळतोयस तुझा हा विचार म्हणजे दारूच्या नशेची उपज आहे.‘ मुलगा म्हणाला.
‘मी दारूच्या नशेत आहे, हे खरं आहे. पण मी काही तरीच बरळत नाही. मी जे बोलतोय, ते मला नीट कळतय. तू माझ्या पत्नीचा या पेंटिंगसाठी मॉडेल म्हणून वापर कर. माझ्या पाठीवर जोसीचं एक भव्य चित्र काढ आणि ते गोंदव. ‘
हा काही चांगला विचार नाही आणि शक्यता अशीही आहे, की मी योग्य रीतीने गोंदवण्याचे काम करू शकणार नाही.’
‘ हे अगदी सोपं काम आहे. मी तुला दोन मिनिटात हे काम शिकवेन. मग तू स्वत:च बघशील. मला खात्री आहे, ते काम तू नीट करू शकशील. आता मी जाऊन गोंदण्याचे सगळे साहित्य घेऊन येतो.’
अर्ध्या तासात ट्रिओली जाऊन परत आला. ‘ मी सगळं जरूरीचं सामान घेऊन आलोय.
तो प्रसन्नतेने म्हणाला. त्याच्या हातात एक भुर्या रंगाची सुटकेस होती. ‘यात गोंदण्यासाठी आवश्यक असलेली सगळी उपकरणे आहेत.’ तो म्हणाला.
त्याने सुटकेस उचलून जवळच्या टेबलावर ठेवली. त्यात विजेवर चालणार्या वेगवेगळ्या आकाराच्या सुया, रंगीत शाईच्या बाटल्या होत्या. त्याने गोंदवण्याचे सगळे सामान बाहेर काढून टेबलावर ठेवले. त्याने सुईच्या तारेचा प्लग, विजेच्या सॉकेटमध्ये घातला. मग त्याने उपकरण आपल्या हातात घेतले. स्वीच सुरू केला. नंतर त्याने आपलं जॅकेट उतरवलं आपली डाव्या हाताची बाही दुमडली.
‘आता बघ. माझ्याकडे नीट काळजीपूर्वक बघ आणि मी तुला दाखवतो, की हे काम किती सोपं आहे! मी माझ्या बाहूवर किती सहजपणे कुत्र्याचं चित्र काढतो. नीट बघ.’ मुलाच्या मनात कुतूहल निर्माण झालं.
‘ठीक आहे. आता मी तुझ्या बाहूवर याचा अभ्यास करतो.’ गोंदण्याची सुई घेऊन मुलगा ट्रिओलीच्या दंडावर निळ्या रंगाने गोंदवू लागला.
बघितलंस, हे किती सोपं आहे.’ ट्रिओली म्हणाला. ‘लेखणी आणि शाई याचा उपयोग करून चित्र बनवण्यासारखं हे आहे. दोन्हीमध्ये एवढाच फरक आहे, की गोंदवण्याचे काम थोडे संथ गतीने करावे लागते.’
‘ ही काही फार मोठी गोष्ट नाही. तू तयार आहेस? आपण काम सुरू करूया?’
‘अरे, मॉडेल कुठे आहे?’ ट्रिओलीने विचारले.
‘जोसी तू इकडे ये. ‘ मुलगा अतिशय उल्हसित झाला होता. सगळं काही व्यवस्थितपणे करत होता. एखादं मूल खेळण्याशी खेळायला उत्सुक असतं, तसा तो उत्साहित झाला होता.
‘ ती कुठे उभी राहू दे? ‘
‘ त्या ड्रेसिंग टेबलाजवळ उभी राहू दे. ती कंगव्याने आपले पुढे आलेले केस, नीट-नेटके करत असेल. तिचे केस असे खांद्याशी आलेले असतील. त्यातून कंगवा फिरवताना मी तिचं पेंटिंग करेन.’
‘छानच! तू जबरदस्त प्रतिभाशाली आहेस. ‘
‘प्रथम मी एक साधारणसे पेंटिंग करेन. मला ते आवडलं, तर त्यावर मी गोंदेन. ‘ मुलगा म्हणाला. एक रुंद ब्रश घेऊन तो ट्रिओलीच्या उघड्या पाठीवर पेंटिंग करू लागला.
‘आता हलू नकोस….. हलू नकोस.’ तो जोसीला म्हणाला. त्याने पेंटिंग सुरू केलं. तो हळू हळू इतका एकाग्र झाला, की की त्या एकाग्रतेने दारूच्या नशेला निष्प्रभ केलं.
‘ठीक आहे. झालं आता. ‘ तो जोसीला म्हणाला.
तो साकाळ होईपर्यंत ट्रिओलीच्या पाठीच्या त्वचेवर काढलेलं पेंटिंग गोंदवत राहिला. ट्रिओलीला आता स्पष्ट आठवलं, जेव्हा शेवटी त्या कलाकाराने बाजूला सरून म्हंटलं, ‘ चला. झालं आपलं पेंटिंग’, त्यावेळी बाहेर प्रकाश पसरला होता. रस्त्यावरून लोकांच्या येण्या-जाण्याचे आवाज ऐकू येऊ लागले होते.
पोट्रेट – क्रमश: भाग १
मूळ इंग्रजी कथा – रोअल्ड डाल्ह
हिन्दी अनुवाद – खाल हिंदी अनुवादक – सुशांत सुप्रिय मो. -8512070086
मराठी स्वैर अनुवाद – पोट्रेट अनुवादिका – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈