डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ बैलपोळा- ☆ डॉ. शैलजा करोडे 

तिन्ही सांजा झाल्या तरी गंगाराम अंगणालगतच्या गोठ्याजवळ शून्यात नजर लावून बसलेला. आजूबाजूच्या परिस्थितीचं त्याला भानच नव्हतं. आपल्यावरच तो चिडला होता. आपल्या आर्थिक परिस्थितीने हतबल झाला होता. गोठ्यातला धोंड्याही त्याच्याकडे करूण नजरेने पाहात होता.

 तीन वर्षाचा सततचा दुष्काळ. जवळची होती नव्हती पूंजी तर संपलीच होती पण कर्जाचा डोंगरही वाढला होता. यावर्षी दुबार पेरणीही वाया गेली होती. विहिरी तळीही आटली होती. जनावरांना चारा मिळेनासा झाला होता. ऐन पावसाळ्यातही गावाला टँकरने पाणी पुरवठा होत होता. टँकरवर पाण्यासाठी ही झुंबड व्हायची. आपसात भांडणे व्हायची. रणांगणातील लढाईतील विजयी मुद्रेप्रमाणे टँकरवरून दोन/चार हंडे पाणी मिळण्यात धन्यता वाटायची.

 सायंकाळ झाली तशी रखमाने मडकी गाडगी पालथी घातली, जेमतेम तीन भाकरीएवढे पीठ निघाले. तिने भाकरी वळल्या, सासू सासरे व नवर्‍याला वाढलं.

 “आणि तू नाही जेवत ग रखमा.”

 “न्हाई, माझं पोटात गुबारा धरलाय. पोट डमारल्यासारखं झालंय. मला न्हाई जेवायचं.” 

 “रखमा, पोट गुबारा धरेल एवढं पोटभर अन्न तरी असतं काय घरात, मला समजत न्हाई व्हय. चल ही घे अर्धी भाकर. बैस जेवायला.” गंगारामनं आपल्या पुढ्यातील भाकरी तिच्या ताटात घातली.

 डोळ्यात अश्रूंची दाटी आणि मनाला गहिवर. रखमाचा घासही कंठातून खाली उतरत नव्हता. गंगारामच्या आश्वासक हातानं तिला आणखीनच भडभडून आलं.

 सावकारानं कर्जाचा तगादा लावलेला. गंगारामच्या गोठ्यातील धोंड्या व कोंड्याच्या खिल्लारी जोडीवर त्याची नजर पूर्वीपासूनच होती. कर्जाची परतफेड वेळेवर करू न शकल्यानं सावकारानं कर्जाचा हप्ता म्हणून गोठ्यातून कोंड्याला सोडवून घेऊन गेला होता. नेणार तर तो धोंड्यालाही होता, पण गंगारामने केलेल्या विनवणीनं त्यानं केवळ एक बैल नेला.

 धोंड्याच्या मदतीला दुसरा बैल भाड्याने घेऊन, तर कधी स्वतः जुंपून गंगाराम शेती करत राहिला. पण कधी दुष्काळ तर कधी अवर्षणानं गांजलं जाऊ लागला.

 गंगारामची दोन मुलं, सुरेश आणि नरेश. सुरेश घरातील परिस्थिती जाणून होता. “बाबा मी शिक्षण थांबवतो व शहरात जाऊन काही कामधंदा शोधतो.” 

 “आरं पोरा, पण तुझ्या शिक्सनाचं काय ? शिक्सन सोडू नकोस लेकरा. शिकशिन तर पुढं जाशीन.”

 “नाही बाबा, आता मी काम करणार, घरात एवढी अडचण असतांना मी शिक्षण करत बसू ? तुमचे हाल आता मी नाही पाहू शकत. आपण नरेशला मात्र शिकवू. नरेश खूप शिकेल, मोठा होईल व आपले दिवस बदलतील. मी जातो शहरात सुशीला मावशीकडे. शोधतो काम.”

सुरेश शहरात निघून गेला. छोटा नरेश वसतिगृहात राहून शिक्षण घेत होता.

सावकाराचं कर्ज फेडू न शकल्यानं तो गंगारामचा दुसरा बैल धोंड्यालाही घेऊन जाणार होता. पुढच्या आठवड्यातच बैलपोळा होता आणि गंगारामच्या डोळ्यापुढे पोळ्याचं जणू चलचित्र सुरू झालं.

दरवर्षी पोळ्याच्या दिवशी बैलांना हाळावर (हाळ =जनावरांना पाणी पिण्यासाठी केलेला पाण्याचा मोठा आयताकृती हौद) नेऊन स्वच्छ आंघोळ घालायचा. त्यांच्या गळ्यात कवड्यांची व घुंगरांची माळ, शिंगाची रंगरंगोटी, शिंगदोर/मोरकी, शिंगांना लावल्या जाणार्‍या गोंड्यांच्या पितळी शेंब्या, गुडघ्यांना बांधायला गंडे, नाकात वेसण व कपाळावर बाशिंग.

वर्षभर आपल्यासाठी राबणार्‍या या आपल्या सहकार्‍यांचं ऋण गंगाराम यादिवशी त्यांची सेवा करुन जणू फेडायचा. 

रखमाही त्यांची यथासांग पूजा करुन आरतीने ओवाळायची. पुरणपोळ्या खायला घालायची. सायंकाळी गावाच्या वेशीवर सगळे बैल जमवून पोळा फुटायचा. वाजत गाजत बैलांची मिरवणूक निघायची.

सुरेश आणि नरेश सणासाठी घरी आलेले असायचे. बैलांना घेऊन गावभर हिंडायचे, आनंद लुटायचे.

पण यावर्षी हा आनंद त्यांना  मिळणार नव्हता. एक बैल तर पूर्वीच सावकार घेऊन गेलेला. यावर्षी दुसराही तो नेणार होता. पोळ्याच्या दिवशी गोठा सुना सुना राहणार होता. त्यांचं सर्वस्वचं जणू लुटले जाणार होतं.

गंगारामला खूप भडभडून आलं. तो उठला व गोठ्यात जावून धोंड्याच्या पाठीवरून हात फिरवू लागला, धाय मोकलून रडू लागला. “तू खूप सेवा केलीस रे आमची, पण मीच काही करू नाही शकलो तुझ्यासाठी, तुलाही सावकाराच्या दावणीला देऊन बसलो. माफ कर रे माझ्या मित्रा, पण तुझं घर, तुझं स्थान माझ्या काळजात आहे एवढंच सांगू शकतो. माफ कर रे मला, करशील ना माफ, करशील ना?” 

धोंड्याही मान हलवू लागला, करूण नजरेनं पाहू लागला. अंगणातून हे सगळं पाहणार्‍या रखमाचाही उर दाटून आला. पदराचा बोळा तोंडात कोंबत ती ही रडू लागली.

“रखमा”

“जी धनी” 

दोन दिवसांनी धोंड्या जाईल, आपण उद्याच पोळा साजरा करायचा काय ?” 

“विचार चांगला हाय जी. पन घरात पैसा बी न्हाई कि खाया काही दाणे बी न्हाई.” 

“करू काहीतरी जुगाड, पण करू साजरा, बडेजाव नाही छोटेखानी का व्हयना करू आपण पोळा.”

सावकार धोंड्याला घेवून गेला तशी गंगारामनं अन्नपाणीच सोडलं. रखमा धास्तावली, “आसं काय करताजी, म्हातारे आई बाबा हायती घरात, त्येंचा तर इचार करा जरा.”

आज बैलपोळा, पण गंगाराम मात्र उदास बसलेला. परिस्थितीने गांजलेला, क्षीण झालेला. 

अचानक धोंड्या कोंड्याच्या हंबरण्याचा आवाज त्याच्या कानी पडला आणि वीज चमकावी व डोळे दिपावे तसे गंगारामचे झाले. डोळ्यातील अश्रूंच्या जागी आनंदाची चमक दिसू लागली. ‘माझे धोंड्या कोंड्या’ म्हणत तो जागेवरून उठला व बैलांजवळ जाऊन त्यांना कुरवाळू लागला. हे सगळे पाहतांना सुरेशचा चेहरा आनंदाने फुलला.

“केव्हा आलास रे लेकरा?” 

“हा काय, आताच येतोय बाबा, धोंड्या कोंड्याला घेवून‌” 

“आरं पन, सावकाराच्या दावणीची बैलं का सोडून आणलीस तू. बैल चोरीचा आळ घेईल तो आपल्यावर.” 

“नाही घेणार बाबा. मी बैलं सोडवून आणलीत. सावकाराचं कर्ज फेडलंय मी.” 

“कर्ज फेडलं ? पण ही जादू तू केलीस कशी ?” 

“सांगतो बाबा, सगळं सांगतो.”

सुरेश शहरात तर आला पण अर्धवट शिक्षण व कामातील कौशल्य नसल्याने त्याला चांगली नोकरी मिळत नव्हती. छोटी मोठी कामं करून तो गुजराण करू लागला. गावाकडे फार मोठी रक्कम कशी काय पाठवणार, थोडे बहुत पाठवत राहिला. 

शिक्षणाचं महत्व समजल्याने रात्रशाळेत जाऊ लागला. ग्रंथालयात जाऊन पुस्तकांशी दोस्ती वाढवू लागला, कामात कुशलता येण्याचेही प्रशिक्षण घेऊ लागला. सकाळी पेपरची लाईन टाकू लागला, एक वर्तमान पत्र स्वतःही घेऊन चालू घडामोडी जाणून घेऊ लागला आणि त्याच्या या passion मुळेच ‘कोण होईल करोडपती’ साठी प्रयत्न करू लागला. मेसेज पाठवणे, त्याची निवड होणे, त्यातून ग्राऊंड टेस्टसाठी सिलेक्शन व शेवटी Fastest Finger First साठी निवड होणे. या सगळ्या परीश्रमातून आज तो Hot sit वर होता व आपली मेहनत, परीश्रम व बुद्धीमत्तेच्या जोरावर तो पंचवीस लाख रुपये जिंकला होता.

आणि आज त्याने सावकाराचे कर्ज फेडले होते. शेतीसाठीही तो नवनवीन प्रयोग करणार होता. कमी पाण्यात अधिक उत्पादन व नवनवीन संशोधित बियाणांचा वापर करणार होता. 

घर आनंदानं न्हाऊन निघालं होतं. “रखमा, आजचा बैलपोळा दणक्यात झाला पाहिजे बरं का ?” 

“व्हयजी, आता तुमी बी लागा की कामाला.” 

“हा काय आताच लागतो बघ.”

धोंड्या कोंड्याच्या अंगावर थोपटत तो म्हणाला, “तुमचं घर माझ्या काळजात आहे सख्यांनो , तुम्ही घरी आलात, भरून पावलो मी.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments