श्री संभाजी बबन गायके
जीवनरंग
☆ “मी ‘ती’ला शब्द दिला होता !” भाग -3 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
(भावानुवाद – हिन्दी कथा – उसने कहा था – लेखक स्व चंद्रधर शर्मा गुलेरी)
(“तू जा रे… एक एक शीख सव्वा लाखाला भारी पडतो… जा… वाहेगुरू तुला यश देवोत!” आणि तो एखाद्या भूतासारखा खंदकाच्या मागच्या बाजूने धावत सुटला.) – इथून पुढे —
मी दबक्या पावलांनी बाहेर आलो. ‘लपटनसाहेब’ खंदकाच्या भिंतीवर काही तरी चिकटवताना दिसले….. बॉम्ब! त्यांनी खंदकाच्या ओल्या भिंतीमध्ये तीन गोळे चिकटवले… त्या गोळ्यांना सुतळीसारखे काहीतरी एकमेकांना जोडून बांधले आणि त्या सुतळीची उरलेली गुंडाळी शेगडीपर्यंत आणून ठेवली.. खिशातून काडेपेटी काढली आणि शिलगावली…. सुतळीने आग पकडली असती तर सबंध खंदक हवेत उडाला असता आणि आम्हां दहा जणांच्या चिंधड्या उडाल्या असत्या…. आमच्यात बोधासिंगही होता… त्याच्या आईला, सरदारणीला मी शब्द दिला होता.. त्याला काही होऊ देणार नाही म्हणून.!…..
मी वीजेच्या चपळाईने नकली ‘लपटन’ साहेबाच्या दिशेने धाव घेतली. तो सुतळीला आग लावण्याच्या अगदी बेतात होता…. मी माझ्या दोन्ही हातांनी माझी रायफल वर उचलून तिच्या दस्त्याचा एक जोरदार फटका त्याच्या कोपरावर हाणला…. तो तीन ताड उडून पडला. त्याच्या हातातली काडेपेटी दूर पडली.
दुसरा प्रहार मी त्याच्या मानगुटीवर केला…. ‘अरे देवा!’ अशी किंकाळी मारत तो खाली पडला आणि त्याची शुद्ध हरपली. मी त्याने भिंतीवर चिकटवलेले तिन्ही गोळे काढून दरीत फेकून दिले. जर्मनाला ओढत आणून शेगडीपाशी उताणे झोपवले. त्याच्या खिशात तीन-चार लिफाफे, डायरी मिळाली… ती मी माझ्या खिशात टाकली. “वाह रे! नकली लपटनसाहेबा! तु भाषा तर थोडीफार शिकून आलास…. पण तुला हे माहित नाही की शीख सिगारेट ओढत नाहीत, आमच्या भागात नीलगायी आढळत नाहीत, मुसलमान नोकर हिंदुंच्या देवांना कशाला पाणी घालेल? तुला वाटले तू ह्या लहनासिंगला उल्लू बनवशील… अरे लपटन साहेबासोबत पाच वर्ष काढलीत मी… त्यांना ओळखण्यात मी चूक करीनच कशी?…
तो जर्मन थोडा शुद्धीवर आला तेंव्हा मी त्याची मनोसोक्त मस्करी चालवली. पण… माझी चूक झाली होती.. त्या हरामखोराच्या पॅन्टच्या खिशाची तपासणी करायला मी विसरून गेलो.
त्याने जणू काही खूप थंडी वाजते आहे म्हणून आपले दोन्ही हात खिशात घातले आणि खिशातल्या पिस्तुलातून गोळी झाडली ती माझ्या मांडीत घुसली! मी माझ्या हेनरी मार्टिन रायफलीतून त्याच्या कपाळावर दोन गोळ्या धडाधड डागल्या…. त्याला कपाळमोक्ष प्राप्त झाला. आवाज ऐकून खंदकातले सात जण बाहेर धावले… ”काय झाले?” आजारी बोधाने आतूनच ओरडून विचारले…. मी म्हणालो… “तू झोप.. काही झालं नाही. एक भटकं कुत्रं घुसलं होतं आपल्या खंदकात….. त्याला पाठवून दिलं वर!” एवढं म्हणून मी माझ्या पटक्याच्या कापडानं माझी जखम घट्ट बांधून टाकली.. रक्त बाहेर येणं थांबलं.
एवढ्यात सत्तर जर्मनांनी अचानक दरीच्या बाजूने खंदकावर आक्रमण केले…. आम्ही आठ आणि ते सत्तर…. मी उभा… ते जमिनीलगत झोपून फायर करत होते…. आम्ही आठजणांनी त्यांचा पहिला हल्ला रोखला…. दुसरा रोखला… जबाबी फायरींग जोरात सुरू होते. जर्मन सैनिक त्यांच्याच सहकारी मृत सैनिकांच्या मुडद्यांवर पाय देऊन आमच्या खंदकाच्या दिशेने येत होते!
आता आम्ही संकटात होतो…. तेवढ्यात जर्मनांच्या पाठींवर गोळ्या बरसू लागल्या…. सुभेदार साहेब निरोप मिळताच अर्ध्या वाटेतूनच माघारी फिरले होते. पुढून आम्ही संगिनी भोसकत होतो आणि मागून सुभेदार हजारासिंग साहेबांचे सैनिक त्यांना भाजून काढत होते. आम्ही जर्मनांना जणू फिरत्या जात्यातल्या जोंधळ्यासारखं दळायला सुरूवात केली…
चकनाचूर! त्रेसष्ठ जर्मन प्राणांना मुकले होते आणि आमच्यातले एकूण पंधरा वाहेगुरूंच्या चरणी लीन झाले होते…. माझे जीवाभावाचे साथीदार मला सोडून गेले होते…. पण नकली लपटन मला दिसला नसता तर आमची खूप मोठी हानी झाली असती!
या संघर्षात सुभेदार साहेबांच्या उजव्या खांद्यातून एक गोळी आरपार निघून गेली होती…. आणि माझ्या बरगडीत एक गोळी रुतून बसली होती… खोलवर!
मी खंदकातली माती माझ्या या जखमेत दाबून भरली…. कमरेला पटक्याची उरलेली पट्टी बांधली…. आणि माझी जखम कुणाच्याही लक्षात आली नाही… मी ही याकडे दुर्लक्ष केले! वजीरासिंगने जीवाच्या आंकाताने धावत जाऊन सुभेदारांना रोखले होते, इकडे मी नकली लपटन साहेबाचा डाव उधळून लावला होता….
सारी कहाणी ऐकून सुभेदार हजारासिंग अभिमानाने भरून गेले होते… “वाह रे पठ्ठे…” त्यांनी आम्हां दोघांना शाबासकी दिली!
अंधार होता अजूनही… उजाडायला वेळ होता. आमच्या गोळीबाराचा आवाज तिथून दोन-तीन मैलांवरील आमच्या तुकड्यांनी ऐकला… त्यांनी पाठीमागे कंट्रोलला खबर दिली… दोन डॉक्टर आणि दोन रूग्णवाहिका आमच्यासाठी निघाल्या आणि दीड तासांनी पोहोचल्या… आमच्यातले जखमी वेदनेने विव्हळत होते… माझी जखम ठणकत होती.
डॉक्टरांनी गाडीच्या प्रकाशात सर्वांवर तात्पुरती मलमपट्टी केली आणि जवळच्या फिल्ड हॉस्पिटलमध्ये सर्वांना हलवण्याचा निर्णय घेतला… तिथे पोहोचेपर्यंत उजाडणार होते. एका गाडीत आपल्या जवानांची प्रेतं ठेवली… त्या गाडीत जागाच उरली नाही.
दुस-या गाडीत जखमी भरले… त्यात फक्त आता दोनच लोकांची जागा होती. मी, सुभेदार आणि बोधा मागे उरलो होतो… बोधाला खूप ताप चढला होता…. ‘ताप मेंदूत जाऊ शकतो!’ मी विचार केला आणि सुभेदार साहेबांना बोधाला घेऊन गाडीत चढायला लावले… ते काही मला मागे सोडून जायला तयार नव्हते… उशीर होत होता… त्यांना माझी जखम दिसली असती तर ते माझ्याशिवाय पुढे गेले नसते. त्यांनी माझ्या मांडीत झालेली जखम पाहिली वाटतं… पट्टी तरी बांधून जातो म्हणाले… मी नको म्हटलं.. थोडीच आहे जखम! अंधार होता! मी उभा होतो..उभा राहू शकत होतो म्हणजे मी ठीक होतो! शिवाय गाडीत जागा तशीही नव्हतीच!
मी त्यांना सुभेदारणीची शपथ घातली… “हे बघा.. माझ्या जखमा फार नाहीत… .सुभेदारणीने मला काही सांगून ठेवले आहे.. एक महत्त्वाचे काम सोपवले आहे.. तुम्ही गाडीत चढा नाहीतर सुभेदारणी माझ्यावर नाराज होतील… तुम्हांला त्यांची शपथ आहे सुभेदारजी!…. बोधा गाडीत आलाय ना…. जा… निघा…” गाड्या निघाल्या!
“तुम्ही हॉस्पिटलला पोहोचल्यावर माझ्यासाठी गाडी पाठवालच की… आणि या जर्मनांचे मुदडे न्यायला गाड्या येतीलच…. आणि हो सुभेदारणीला पत्र लिहाल ना तेंव्हा त्यांना माझा नमस्कार सांगा…. म्हणावं लहानासिंगने त्यांनी सांगितलेले काम निभावले!”
सुभेदारजींनी जाता जाता माझा हात पकडला आणि म्हटलं “पत्र कशाला लिहू? आपण तिघेही आपल्या घरी जाऊ सोबत.. तू उद्या लवकर हॉस्पिटलला पोहोच. सुभेदारणीला तुच सांग तुझ्या तोंडाने… आणि काय रे? तुला काय सांगितलं होतं सुभेदारणीनं?”
मी म्हटलं, ”सुभेदार साहेब,.. जा, गाड्या निघाल्यात… मी जे सांगितलं तसं पत्रात लिहाच आणि घरी गेल्यावर सांगाही सुभेदारणीला… म्हणावं ‘लहनासिंगने शब्द पाळला!’
गाड्या निघाल्या… मी जमिनीवर कोसळलो…. पंचवीस वर्षांपूर्वीच्या सगळ्या स्मृती फेर धरून माझ्याभोवती नाचू लागल्या…. बाजारात भेटलेली ‘ती’ दिसू लागली…. आणि माझी शुद्ध हरपली… कायमची !
— समाप्त —
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈