श्री दीपक तांबोळी
जीवनरंग
☆ पश्चात्ताप… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी ☆
(मागील भागात आपण पहिले – पण एवढं सगळं करायला तुला वेळ तरी कसा मिळायचा?” नरेशने विचारलं – आता इथून पुढे)
“आम्हांला वेळ मिळत नाही असं म्हणणारे तासंतास टिव्ही बघत बसलेले असतात नाहीतर मोबाईलवर व्हाँट्सअप,फेसबुकमध्ये बुडून गेलेले असतात.मी त्याऐवजी वेळेचं मँनेजमेंट केलं.अर्थात खुप स्ट्रिक्टली नाही कारण मग आपण जे करतो त्यातला आनंद हरवून जातो.आणि मी जे करत होतो ते आनंदासाठी.मला काही त्यात करीयर करायचं नव्हतं”
नरेशला आपलं आयुष्य आठवलं.नोकरी एके नोकरी आणि नोकरी दुणे घर याशिवाय त्याला दुसरं काही माहित नव्हतं.अफाट पैसा कमवायचा मग तो कोणत्याही मार्गाने असो आणि तीन पिढ्या बसून खातील अशी प्राँपर्टी जमवायची हे त्याच्या आयुष्याचं एकमेव ध्येय होतं.हे ध्येय साधतांना आपण कधीही न मिळणारे आनंदाचे क्षण गमावतोय हे कधी त्याच्या लक्षात आलं नाही.निवृत्त झाल्यावर आपल्याला भरपूर वेळ असेल.तेव्हा जे करायचं राहून गेलंय ते करता येईल असं त्याचं मत होतं.
” मीही आता ठरवलंय.उरलेलं आयुष्य मजेत घालवायचं” नरेश म्हणाला ” आताशी तर आपण साठी गाठलीये.अजून दहा वर्ष तरी काही होत नाही आपल्याला”
” तसं झालं तर सोन्याहून पिवळं.पण आयुष्य हे क्षणभंगूर आहे असं ग्रुहीत धरुनच मी माझं जीवन जगलो”
सुनीलच्या या म्हणण्यावर नरेश जोरात हसून म्हणाला
” डोंट वरी यार.तुही काही लवकर मरत नाहीस.आता हे जग मला दाखवण्याची जबाबदारी तुझी.बरं ते जाऊ दे.तुझी मुलं काय करताहेत?लग्नं झाली असतील ना त्यांची?”
“हो तर! मुलगी डेंटिस्ट आहे आणि मुलगा चार्टर्ड अकाउंटंट. मुलगा माझ्याच सोबत रहातो आणि मुलगीही याच शहरात असल्याने नातवंडासोबत माझे दिवस झकास चालले आहेत”
नरेशचा चेहरा पडला.वर्षभरापासून बंगलोरला रहाणारी मुलं घरी न आल्याने नातवंडाशी त्याची भेट आजकाल व्हिडीओ काँलवरच व्हायची.
“घरबीर बांधलंस की नाही?”त्याने उत्सुकतेने सुनीलला विचारलं
” हो तर!तुझ्यासारखा बंगला नाहीये माझा पण एक टूबीएचकेचं घर आहे.मुलगा चांगला कमावतोय.तो बांधेल मोठा बंगला पुढे. शेवटी त्यालाही काहीतरी स्वकष्टाची प्राँपर्टी केल्याचं समाधान मिळायला हवं ना!तुझी कार मात्र झकास आहे हं”
“तू केव्हा पाहिलीस?”नरेश आनंदाने फुलून म्हणाला
“मगाशी तू आलास तेव्हा मी बाहेरच होतो”
“अच्छा!लग्न लागल्यावर चल.तुम्हांला गाडीतून घरी सोडतो”
“अरे मी आणलीये ना माझी गाडी.तुझ्या गाडीइतकी आलिशान नाहिये पण ठिक आहे.माझं काम भागतंय तिने”
नरेशचा चेहरा पडला.”अरेच्चा!आपण कमावलेल्या सगळ्या गोष्टी सुनीलकडेसुध्दा आहेत.मग आपण एवढा गर्व का करतोय?”त्याच्या मनात विचार आला.सुनीलला कमी लेखून आपण मोठी चुक करतोय हेही त्याच्या लक्षात आलं. तेवढ्यात नवरदेवाची मिरवणूक आली.अर्ध्या तासात लग्न लागलं.सुनीलला पाहून बरेच लोक त्याला आनंदाने भेटत होते.तरुण मुलंमुली त्याच्या पाया पडत होते.सुनीलला पाहून नवरीला खुप आनंद झाला.त्याच्या पाया पडून ती नवऱ्याला म्हणाली ” हे आमचे भागवत सर.यांनी आम्हांला भरभरून जगायला शिकवलं.शिकणं आणि जगणंसुध्दा किती आनंददायी असतं हे त्यांच्यामुळेच आम्हांला कळलं” तिच्या नवऱ्याने सुनीलला वाकून नमस्कार केला.
सुनीलला मिळणारा आदर पाहून नरेश मनातून खट्टू झाला.त्याला आठवलं.निवृत्तीनंतर तो आँफिसला दोनतीन वेळा गेला तेव्हा तिथल्या स्टाफने त्याची दखलसुध्दा घेतली नव्हती.ही ब्याद कशाला इथे आली असेच भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते.
जेवण झाल्यानंतर दोन्ही मित्र एकमेकांना घरी यायचं निमंत्रण देऊन निघाले.
नरेशने ठरवलं आता सुनीलसारखं जगायचं.आहे ते उरलेलं आयुष्य आनंदात घालवायचं.आता त्याला त्याचा एकटेपणा खटकू लागला.म्हणून मग त्याने दुसऱ्याच दिवशी ज्येष्ठ नागरीक संघाची सदस्यता घेतली.आतापर्यंत कट्ट्यावर बसणारे हे म्हातारे त्याला आवडत नव्हते.हळुहळू त्याची त्यांच्याशी मैत्री झाली. माँर्निंग वाँक त्यांच्यासोबत होऊ लागला.एक दिवस तो त्याच्या बायकोला घेऊन गाण्याच्या कार्यक्रमाला गेला.या वयातही संगीत आपल्याला आवडतं,आपल्या मनाला भारुन टाकतं हा नवीन शोध त्याला लागला.अभ्यासाच्या पुस्तकांखेरीज इतर पुस्तकांना कधी त्याने हात लावला नव्हता.वपु.काळे,चेतन भगत,पाऊलो कोएल्होची पुस्तकं आता टेबलवर उपस्थिती देऊ लागली.स्वयंपाक हे बायकांचं क्षेत्र आहे असं तो आजपर्यंत मानत होता.पण आता नवीन रेसिपीज तो बायकोला सुचवू लागला आणि ती बनवण्यासाठी तिला मदतही करु लागला.एक दिवस ज्येष्ठ नागरीक संघाच्या सदस्यांना त्याने एका चांगल्या हाँटेलात पार्टी दिली.सुनीललाही त्याने स्पेशल गेस्ट म्हणून बोलावलं.आपल्या या मित्रामुळेच आपण आनंददायी जीवन जगायला सुरुवात केली आहे याचा त्याने सर्वांसमक्ष उल्लेख केला.सुनीलनेही मग आपण कसं जीवन जगलो आणि उरलेलं आयुष्य कसं भरभरुन जगलं पाहिजे याबद्दल एक खुमासदार भाषण ठोकलं.
सिंगापूर, मलेशियाच्या टूरला आता चारपाचच दिवस उरले होते.ही टूर झाली की हिस्टोरिकल युरोपची टूर करायची हे नरेशने ठरवून टाकलं.आपलं हे सुंदर आयुष्य फार कमी उरलंय याचा खेद त्याला आजकाल वाटू लागला होता.
टुरला दोन दिवस बाकी होते.तो सकाळी आपल्या मित्रांसोबत माँर्निग वाँक करत होता.जाँगिंग ट्रँकचे तीन राऊंड त्याने पुर्ण केले.चवथ्या राऊंडला त्याने सुरुवात केली आणि त्याच्या छातीत कळ आली.कळ इतकी जोरदार होती की तो खालीच कोसळला.पडता पडता त्याचा उजवा गुडघा जोरात आपटला.त्याच्याबरोबरचे सगळे धावून आले.सगळ्यांनी मिळून त्याला बेंचवर झोपवलं.घामाच्या धारांनी तो न्हाऊन निघाला होता.अँब्युलन्स बोलवण्यात आली.त्याला हाँस्पिटलमध्ये अँडमिट करण्यात आलं.ट्रिटमेंट सुरु झाली. दोन तासांनी तो शुध्दीवर आला. समोरच त्याची बायको आणि डाँक्टर उभे होते.
“कसं वाटतंय?”त्याच्या बायकोने मीराने विचारलं.त्याच्या अंगात अजिबात त्राण नव्हतं.उजवा गुडघा भयंकर दुखत होता.
“मला काय झालं होतं?”खोल गेलेल्या आवाजात त्याने डाँक्टरला विचारलं. “तुम्हांला मासीव्ह हार्ट अटँक आला होता.त्यात तुम्ही नेमके गुडघ्यावर आपटल्यामुळे तुमचा गुडघा तुटलाय.त्याचं आँपरेशन करावं लागणार आहे.”
” मग करुन टाका.आम्हांला दोन दिवसांनी सिंगापूरला जायचंय”
डाँक्टर हसले. म्हणाले,
“साँरी मिस्टर नरेश.यु हँव टू फरगेट अबाउट युवर टूर.तुमची शुगर आणि बी.पी.जोपर्यंत नाँर्मल होत नाहीत तोपर्यंत आँपरेशन शक्य नाही.आँपरेशन नंतरही तुम्हांला लवकर चालता येईल असं वाटत नाही.दुसरी गोष्ट उद्या तुमची एंजिओग्राफी करणार आहोत.हार्टमधल्या ब्लाँकेजेसवर तुमची बायपास करायची की एंजिओप्लास्टी ते ठरेल.माझ्या अनुभवानुसार तुमची बायपासच करावी लागेल असं वाटतं.आणि बायपास झाल्यावर कमीतकमी तीन महिने तरी तुम्ही कुठे जाऊ शकणार नाही”
नरेशने हताशपणे बायकोकडे पाहिलं.
जाऊ द्या .तुम्ही अगोदर बरे व्हा.मग बघू कुठे जायचं ते” ती त्याला समजावत म्हणाली ” जीव वाचला ते काय कमी आहे? सिंगापूर काय नंतर केव्हाही करता येईल!”
नरेश काही बोलला नाही.पण त्याला समजून चुकलं होतं.त्याच्या जीवाचं काही खरं उरलं नव्हतं.नशीबात असलं तर टूर होतीलही पण ते कायम तब्ब्येतीच्या काळजीने भरलेले असतील.त्यात आनंद,उत्साह यांचा अभाव असेल.जीवनात आता कुठेशी रंगत येऊ लागली होती आणि त्यात हे असं घडलं.आयुष्य हे क्षणभंगुर आहे असं सुनील म्हणाला होता.खरंच होतं ते!आता टूरच काय आयुष्यात राहून गेलेल्या कितीतरी गोष्टी करता येणार नव्हत्या.’अनेक गोष्टी योग्य वयातच केलेल्या चांगल्या असतात ‘ असं सुनील जे म्हणत होता ते चुकीचं नव्हतं हे त्याला आता ठाम पटलं होतं.क्षणभर त्याला सुनीलचा हेवा वाटला.आणि त्याच्यासारखं आयुष्य आपण का जगलो नाही या पश्चातापाने त्याचं मन भरुन गेलं.
– समाप्त –
© श्री दीपक तांबोळी
जळगांव
मो – 9503011250
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈