श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ पितृदेवो नम: – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
माझी शाळा सुटली तशी मी धावतच घरी आले. बाकी वर्गातील मुले रेंगाळत रेंगाळत येत होती मागाहून, पण मला घाई होती. दूध पिऊन आप्पा सोबत देवळात जायचे होते. आमच्या घराच्या पानंदी जवळ अप्पाचं दिसलें. काठीने आमच्या काळू आणि सैना या गाईना हाकवत गोठ्याकडे नेत होते. मला पहाताच आप्पा म्हणाले
“नंदा, धावतेस कशाला? कोण पाठी लागलाय?
मी म्हंटल “अहो आप्पा, तुमच्या बरोबर देवळात यायचंय, रोजच येते ना मी ‘.
आप्पा हसून म्हणाले “होय बाई, मला माहित होते पण गमतीने विचारले ‘.
मी धावत धावत घरात घुसले आणि दप्तर कोपऱ्यात ठेवले. घरात गेले तर आईने नुकतेच चुलीवरून दूध उतरवून ठेवले होते. चुलच्या बाजूला ठेवलेल्या फडक्याने मी गरम पातेल्यातील दूध माझ्या ग्लासात ओतले आणि फुन्कर मारीत मारीत दूध पिऊन टाकले.
मग खोलीत जाऊन फ्रॉक बदलला आणि अप्पांची वाट पहात राहिले.
गोठ्यात आई काळूचे दूध काढत होती आणि आप्पा छोटया वासराला पकडून होते. दोन तांब्ये भरून आईने दूध काढले आणि अप्पानी वासराला लुचायला सोडले. दोन हातात दोन दुधाने भरलेले तांब्ये घेऊन आई मागील दाराने आत आली आणि मला पहाताच म्हणाली
“दूध घेतलंस का? आणि रात्री घरी आल्यावर अभ्यास पुरा करायचा गुरुजींचा. सकाळी उशिरा उठतेस तू, सकाळसाठी ठेऊ नकोस. दादा आला का शाळेतून “?
मी म्हंटल “नाही बहुतेक, आला तर मला दिसला असता ‘.
तेव्हड्यात आप्पा त्यान्च्या पंच्यावर अंगात बंडी घालून आणि मोठी बॅटरी आणि काठी घेऊन लोट्यावर हजर झाले, मला पहाताच म्हणाले
“चला, नंदू बेटा.. ते खोरणात पुस्तक असेल ते घे आणि चप्पल घाल, चला..
एव्हड्यात आई पदराला हात पुशीत बाहेर आली आणि मला म्हणाली
“अप्पांचा हात सोडू नकोस जाताना येताना.. वाटेल फुर्शी, दिवडे येतात पायाखाली, बघूनचाल ‘.
मी हो.. हो म्हंटले आणि अप्पांचा हात पकडला, आम्ही अंगणातून बाहेर पडणार एव्हड्यात दादा शाळेतून आला. मी अप्पांचा हात पकडून निघणार, एव्हड्यात तो माझ्यावर खेकसला “नंदे, काय चाललंय तुझं? कसली फालतू नाटकें करता? गावातील फालतू माणसामध्ये वावरता? निदान तू तरी..
मी त्याच्या बाजूने धावत बाहेर गेले आणि अप्पांच्या पुढे चालू लागले.
आप्पा – नंदे, तूझ्या दादाला आवडत नाही तू माझ्याबरोबर येतेस ते, मग तू कशाला येतेस, तू जा बरे घरी
मी – आप्पा, मला आवडते नाटक, तुम्ही इतरांना नाटक शिकवता ते आवडत, मला आता नाटक पाठ पण झाले आहे.
आप्पा – खरे की काय आणि नाटकातल्या पार्ट्याना पाठ होत नाही.
बोलत बोलत मी आणि आप्पा देवळाकडे पोहोचलो.
मी आप्पाचा हात पकडून देवळात पोहोचलो तोपर्यत गावातील इतर झिलगे आले होते, मी काही लोकांना ओळखत होते, कुंभारांचा नामू, मोन्या जळवी, संतू मडवल, कृष्णा जगताप आणि इतर काही. अप्पानी माझ्याकडून पुस्तक मागून घेतले आणि आप्पा म्हणाले -अंक दुसरा -प्रवेश पहिला.. औरंगजेब आणि दिलेरखान… म्हणताच दिलेरखनाची भूमिका करणारा नामू कुंभार उभा राहिला, औरंगजेबाची भूमिका आप्पा स्वतः करत होते. अप्पानी नामूला दरबारात प्रवेश कसा करायचा, नजर कुठे ठेवायची.. बादशहाला मुजरा कसा करायचा हे दाखवले आणि नामूकडून तीन वेळा करून घेतले. मग आप्पा बादशहाच्या भूमिकेत बाकावर बसले आणि बादशहाचे सवांद म्हणू लागले. माझ्या मनात आले, माझे आप्पा पहिली की दुसरी शिकलेले, गावात भिक्षुकी करणारे, कधी शिवाजी, कधी सोयराबाई, कधी दिलेरखान तर कधी औरंगजेब बादशहा कसे बनतात? त्यान्च्या भूमिकेत कसे काय शिरतात? या गावाच्या पलीकडे ते फारसे जात नाहीत.. कधी मधी रत्नागिरी पर्यत.. मग एव्हडे नाटक बसवणे कसे काय जमते? याचा अर्थ माझे अप्प्पा खुप खुप हुशार असणार. मग माझा दादा आप्पावर का चिडून असतो? तो त्याच्याशी एक शब्द पण बोलत नाही.. सारे आईकडे.
नाटकाची तालीम संपवून आम्ही घरी आलो. आई बिचारी आमची वाट पहात होती. मग जेवणं करून झोपलो.
सकाळी मला जाग आली, तेंव्हा माझ्या लक्षात आले आप्पा सकाळीच भिक्षुकीला गेले असणार, त्याआधी त्यानी गोठ्यात गाईचे शेण काढले असणार आणि शेण डोकयावरून टोपलीतून बागेत फोफलीना टाकले असणार, मग आप्पा किती वाजता उठले असतील? रात्री उशिरा झोपतात आणि भल्या पहाटे उठतात आप्पा.
मी खोलीतून बाहेर आले एव्हडयात आतील खोलीतून आई आणि रविदादा यांचे मोठमोठ्याने बोलणे ऐकू आले, मी कान टवकारले
दादा – मला हे पसंत नाही, रोज नाटकें करतात.. गावातल्या कसल्या कसल्या लोकांना जमवतात.. तो कोण न्हावी, कुंभार, मडवल, हरिजन सुद्धा असतो म्हणतात नाटकात.. सकाळी गावात भिक्षुकी करतात आणि रात्री नाटकाची तालीम, आणि नंदेला घेऊन जातात बरोबर, तू सांगत कसे नाहीस त्यांना?
आई – रवी, त्त्यांची आवड आहे ती. नाटक, भजन हा त्त्यांचा श्वास आहे. त्त्यांचे रोजचे काम ते व्यवस्थित करतात ना, रोज गावातील भिक्षुकीला जातात शिवाय कुठे एकादशणी, सत्यनारायण असेल ती पण चुकवतत नाहीत. आपण दोन वेळ जेवतो, कपडे घालतो तो त्याचेंचमुळे. शिवाय गुरांना चरायला नेणे, गवतकाडी घालणे कोण करत? तू करतोस काही?
रवी – पण खालच्या जातीच्या लोकांमध्ये वावरणे बरे काय? आपले मामा बघ.. म्हणजे तुझे भाऊ.. कसे अलिप्त राहतात गावापासून, तूझ्या भावाकडे असे वातावरण असताना, तू तूझ्या नवऱ्याला का सांगत नाहीस?
आई – लग्नाच्या आधी मी माहेरची होते, त्यावेळी ते संस्कार होते.. लग्न करून या घरात आले, आता माहेरचे विसरले आणि या घराचे झाले.
रवी – पण नंदेला तरी या लोकात नेऊ नको म्हणावं.
आई – तिला आवडते नाटक, जाऊदे तिला.. नाहीतरी या गावात कसली करमणूक आहे.. जाते आवडीने.. जाऊदे.
दादा रागारागाने त्याच्या खोलीत गेल्याचे मी पाहिले. मी आईजवळ जाताच आई म्हणाली “नंदे, दोघांचे एक मिनिट पटत नाही.. हा रवी बोलत पण नाही आप्पशी. कसला राग घेऊन बसला आहे?
रवी – आईला किती सांगितले तरी ती अप्पांचीच बाजू घेते, खरे तर तिने तिचे भाऊ.. म्हणजे माझे मामा कसे वागतात हे तिला माहित आहे.. गावचे मामा पण गावातील इतर समाजापासून अलिप्त असतांत, मुंबईचे मामा पण, कामावर जाताना आपला डबा आणि पाण्याच्या बाटलीला कोणाला हात लावू देत नाहीत, एव्हडे सोवळे पाळतात आणि माझे वडील आप्पा सर्व जातीतील लोकांमध्ये मिसळतात. त्याचेंसोबत जेवत पण असतील, भजनाच्या वेळी कुणाच्याही घरी चहा पितात, मला हे अजिबात आवडत नाही. सोबत नंदेला घेऊन जातात हे पण पटलेले नाही. नंदेला काय.. आपल्या अप्पांचा पुळका असतो.
मी दोन वेळा वाद घातला अप्पांशी, पण त्यान्च्यात काही बदल नाही. या घरात रहाण्याचा पण मला कंटाळा आला आहे, पण आई म्हणजे माझा वीक पॉईंट आहे, तिच्यावर माझे फार प्रेम आहे. मी जन्मत. अशक्त होतो म्हणे, आईने निगुतीने मला मोठं केल, तिला वाईट वाटतं मी अप्पांशी बोलत नाही ते.. पण त्यानी आपले वागण बदलावं.. मग मी बोलेन.
नंदा – दादा मॅट्रिक झाला आणि मोठया मामाकडे शिक्षणासाठी मुंबईला गेला. दादा माझ्या मामाचा खुप लाडका. दोघांचे विचार सारखेच…. अप्पांच्या विरुद्ध.. म्हणून दोघेही अप्पाना दुषणे देत असतांत… पण मी आप्पाच्या विचाराची.. अप्पांची नाटकें आवडीने पहाणारी.. भजने ऐकणारी.
कॉलेजात असताना दादा चार दिवसासाठी यायचा, आई आणि तो तासंतास गप्पा मारायचे पण तो अप्पांशी कधी बोलला नाही. दादा आला म्हणजे आप्पा खुश असायचे, त्याच्यासाठी शहाळी आणायचे, ओले काजू आणायचे, आंबे आणायचे पण दादाला त्त्यांचे हे प्रेम कसे दिसायचे नाही कोण जाणे?
दादा ग्रॅज्युएट झाला आणि नोकरीला लागला. त्याने पत्र लिहून आईला कळविले. आईने अप्पाना सांगितले, तेंव्हा त्याना किती आनंद झाला. ते जेथे जेथे भिक्षुकीला जात तेथे त्या लोकांना आपल्या मुलाबद्दल सांगत. त्यानी आमच्या वाडीत सर्व घरात पेढे वाटले पण आईला आणि मला वाटतं असे त्याने हे अप्पाना सांगायला हवे होते.. एकवेळ त्याने आम्हाला कळविले नसते तरी चालले असते..
– क्रमशः भाग पहिला
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈