☆ जीवनरंग ☆ क्षणिक ☆ एका घटकेचा खेळ – भाग 1 ☆ श्री आनंदहरी ☆
तो घरी परतला तेव्हा मनावरचं मणामणाचं ओझे उतरल्यासारखा तो रिलॅक्स झाला होता. तो सोफ्यावर आरामात पहुडला.. टीव्हीचा रिमोट समोर टीपॉयवर पडला होता पण त्याला टीव्ही चालू करावा असे काही वाटलं नाही उलट घरातली शांतता हवीशी वाटू लागली होती. त्याने खिशातून सिगारेटचे पाकीट आणि लायटर काढून टीपॉयवर ठेवला पण त्याला सिगारेट ओढविशीही वाटली नाही.
‘अलिकडे आपले सिगारेट ओढायचं प्रमाणही खूपच वाढलंय…’ सिगारेटचे पाकीट ठेवता ठेवता उगाचंच त्याच्या मनात आलं आणि मनात आलेल्या त्या विचाराने तो स्वतःशीच हसला. मनातलं विचाराचं वादळ शांत झाल्याचे त्याचे त्यालाच जाणवत होतं. त्याला घरातील एकांत सुखावह वाटत होता. हे एकटेपण हवंसं वाटत होतं. खूप दिवसानंतर ऑफिसमधून लगेच घरी परतावे असे वाटू लागले होते. घराची ओढ वाटू लागली होती.. त्याला जेंव्हा मनाची ही ओढ जाणवली तेंव्हा क्षणभर त्याचे त्यालाच आश्चर्य वाटलं होतं.
‘खरंतर आपल्याला कोणत्या वेळी नेमकं काय वाटेल , काय हवेसे वाटेल हे आपल्यालाही उमजत नाही हेच खरे..’ सोफ्यावर पाय ताणून तो आरामात पहुडला असताना त्याच्याही नकळत मनात आले.. आणि मनात आलेल्या विचाराने तो काहीसा अस्वस्थ झाला…’ म्हणजे आपण स्वतःलाच ओळखू शकत नाही काय ?’ आणि आपण आपल्या स्वतःलाच ओळखू शकत नसू तर मग दुसऱ्याला पुरेपूर ओळखण्याचा दावा तरी कसे करतो आपण..? स्वतःच्याच मनात आलेल्या विचाराने निर्माण झालेली अस्वस्थता कणाकणाने वाढतच गेली ..
‘जाऊदे. उगाच काहीतरी विचार करत बसतो आपण..’ असे पुटपुटत त्याने मनातली अस्वस्थता झटकण्याचा प्रयत्न केला.. त्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून त्याने टीव्ही चालू केला .. तो टीव्ही पाहू लागला. त्याला थोडे बरेही वाटू लागलं.. त्याला त्याचे डोळे टीव्ही पाहू लागले होते पण तो पहात होता त्यातलं काहीच मनापर्यंत पोहोचतच नव्हतं. काही वेळातच त्याला हे जाणवलं तेंव्हा तो दचकलाच.
‘अरे, काय झालंय काय आज मला …?’
दुसऱ्या कुणाला तरी विचारावं तसा तो पुटपुटला आणि दुसऱ्याच क्षणी झटकन सोफ्यावरून उठला. काहीसा विचार करून तो थेट बाथरूममध्ये घुसला..
काही वेळाने गरम पाण्याने मनसोक्त अंघोळ करून तो बाथरूममधून बाहेर आला तेव्हा त्याला ताजेतवाने वाटत होते.
‘काय करावे? मस्तपैकी खिचडीचा कुकर लावावा काय ?’
मनात येताच तो किचन कट्ट्याजवळ गेला. त्याने डावीकडची ट्रॉली बाहेर ओढून कुकर बाहेर काढला.
त्याला आईची आठवण झाली. आई म्हणायची, ‘काहीही शिकलं तर ते कधीच वाया जात नाही..’
कॉलेजच्या शिक्षणासाठी परगावी राहावे लागणार हे निश्चितच होतं, त्यामुळे त्याच्या आईने आधीपासूनच त्याला हळू हळू स्वयंपाक करायला शिकवले होते. तो कॉलेजसाठी खोली घेऊन राहिला होता तेंव्हा त्याला स्वयंपाकाचे शिक्षण उपयोगी पडलं होतंच पण नंतर नोकरी लागल्यावरसुद्धा त्याला बाहेरच्या जेवणाचा कंटाळा यायचा म्हणून तो सुट्टीदिवशी, तसेच एरवीही कधी वेळ मिळाला की खोलीवरच स्वयंपाक करायचा. त्याला आई-वडिलांची तीव्र आठवण झाली. ‘ कितीतरी दिवसात, नव्हे महिन्यात आपण गावी गेलेलो नाही..’ हे त्याला जाणवलं. ‘चार दिवस रजा काढून जाऊन यावं काय ?’
‘नको ! आत्ता गेलो की आई तिची चौकशी करणार .. मग सांगणे ही अवघड आणि न सांगणेही अशक्य… तेव्हा नकोच.’
त्याच्या मनात गावाकडे जाण्याचा विचार आला तसे त्याच्या मनात गावाकडच्या आठवणींचा झुला झुलू लागला होता.
क्रमशः…
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈