सौ. अर्चना सुरेश देशपांडे
जीवनरंग
☆ मोगरा फुलला ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆
शाळेतून निवृत्त झाल्यावर आयुष्य कसं आनंदात चालले होते. सकाळी पांच वाजता उठायचे, सकाळच्या प्रसन्न वातावरणात एक तास फिरून यायचे, आल्यावर बागेतून चक्कर मारायची. तोपर्यंत घरातील सर्वजण उठायचे. मग चहा करून बाल्कनी मध्ये बसून गरम चहाचे घोट घ्यायचे. कधी कधी फुले काढता काढता शेजारच्या काकूंशी गप्पा व्हायच्या. मग घरातील पुढचे व्यवसाय सुरू करायचे. पण आज माझी लगबग पाहून माझी मुलगी सोनू म्हणाली, “का ग आई !आज फार खुशीत दिसते आहेस आज काहीतरी विशेष दिसते “. मिस्टरांनी पेपर बाजूला करून माझ्या चेहऱ्याकडे पाहिले”अगं माझी बाल मैत्रीण’ विद्या तिच्या पुस्तकाचे प्रकाशन आहे. त्यासाठी कलेक्टर मेधाताई साने प्रमुख पाहुण्या म्हणून येणार आहेत आणि त्या सोहळ्याला मला आग्रहाचे निमंत्रण आहे. “त्यावर माझा मुलगा म्हणाला, “कोणाच्या? विद्यामावशीचया पुस्तकाचे का?”त्यावर मी होकार दिला आणि माझे मन भूतकाळात गेले.
आम्ही सांगलीला रहात असताना आमच्या शेजारी जोशींचे बिऱ्हाड राहायला आले. ते जोशी काका जिल्हा परिषद मध्ये नोकरीला होते. त्यांच्या घरी त्यांची पत्नी व दोन मुली आणि त्यांची आई असा परिवार होता. त्यांची थोरली मुलगी संध्या माझ्याच वर्गात होती व धाकटी विद्या माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होती. जोशी आजींना पहिली नात झाली तेव्हा त्या थोड्या नाराज झाल्या, त्यांना नातू हवा होता पण काही दिवसांनी दुसरी नात जन्मली आणि तिच्या दुर्दैवाने काही दिवसांनी त्यांचे यजमान अकस्मितपणे हृदयविकाराने स्वर्गवासी झाले. त्यांच्या जाण्याचे खापर विद्याच्या डोक्यावर फोडले गेले तिचे बारसेही केले नाही. ती दिसायला सुंदर होती. काळेभोर केस, टपोरे डोळे, गौरवर्ण आणि भरपूर बाळसे. इतकी सुंदर की पाहिली की उचलून घ्यावी अशी छान मुलगी होती ती, पण सगळेजण तिलाही हिडीस फिडीस करत. आजीनंतर तिचं नाव “नकोशी “ठेवलं होतं. आईचा मात्र तिच्यावर फार जीव होता. शेवटी मातृ हृदयच ते! आई तिला विद्या नावाने हाक मारत असे. ती अतिशय हुशार होती जणू तिच्यावर सरस्वतीचा वरदहस्त होता. अर्थात या सर्व गोष्टी मी मोठी झाल्यावर माझ्या आईकडून मला कळल्या.
हळूहळू विद्या मोठी झाली. तिला आमच्या शाळेत प्रवेश घेतला गेला. कोणतीही स्पर्धा असो ती कशातच मागे नव्हती. तिचं अक्षर मोत्यासारखं सुंदर होते.
प्रवेशद्वाराजवळील फलकावर सुविचार लिहिण्याचा मान तिलाच मिळायचा. शाळेमध्ये पहिला नंबर तिने कधीच सोडला नाही. दहावी परीक्षेत तर गुणवत्ता यादीत येण्याचे भाग्य तिला लाभले. तिला मोगऱ्याची फुले फार आवडत। कायम मोगऱ्याच्या दिवसात तिच्या शेपट्यावर मोगऱ्याचा गजरा असायचाच.
दहावी परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्यावर तिने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. गौरवर्ण, बोलके डोळे लांब सडक केसांचा शेपटा व त्यावर मोगऱ्याचा गजरा यामुळे एकदम सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळू लागल्या. हुशारी आणि मनमोकळा स्वभाव या गुणांनी लवकरच “कॉलेज क्वीन “होण्याचा मान तिला मिळाला. कॉलेजच्या स्नेहसंमेलनाचे नियोजन तिने केले होते
स्नेह संमेलनाच्या वेळी तिचे सौंदर्य ‘हुशारी व सभधीटपणा पाहून एका गर्भ श्रीमंत गृहस्थांनी माधवरावांनी, आपल्या एकुलत्या एक मुलासाठी तिला मागणी घातली. तिच्या वडिलांनी आनंदाने तिचे कन्यादान केले. लग्न होऊन सोन पावलांनी घरची लक्ष्मी घरी आणली. घरचा व्याप सांभाळून ती घरच्या व्यवसायातही मदत करू लागली. माधवरावांना तिचे खूपच कौतुक होते, आपल्या गुणांनी तिने सर्वांची मने जिंकून घेतली माधवरावांच्या निधनानंतर व्यवसायाची जबाबदारी तिने अंगावर घेतली व सुनीलच्या खांद्याला खांदा लावून ती मेहनत करत होती. अशा रीतीने दोन वर्षे भुरकन उडून गेली. आता मात्र सर्वांना लहान बाळाची चाहूल हवी होती. त्याचे बोबडे बोल ऐकण्यासाठी सर्वांचे कान आसुसले होते. . खूप डॉक्टरी उपचार करून झाले पण दैव साथ देत नव्हते. तिच्या मातृत्वाचा हक्क दैवाने नाकारला होता तिला मूल होणारच नाही हे समजता क्षणी घरची माणसे बदलली, सगळीच नाती विस्कटली. समारंभाला जाताना सारे जण तिला टाळू लागले पण नणंदेला तिचे कौतुक होते. विद्या मात्र शांत होती समईतील वातीसारखी. माणूस ठरवतो एक आणि नियती घडवते दुसरच आपण तिच्या हातातलं बाहुलं असतो हेच खरे!
पुढे दोन वर्षांनी नणंद बाळंतपणासाठी माहेरी आली. तिच्या डोहाळे जेवणाचा घाट विद्याने पुढाकार घेऊन घातला. तिला प्युअर सिल्कची साडी व गळ्यातील नेकलेस आणला. त्यावेळी सुद्धा ओटी भरताना विद्याच्या मावस सासूला ओटी भरायला सांगितले गेले, जाणून बुजून सुनेला डावलले गेले.
दिवस भरल्यावर नणंदेला मुलगा झाला. तिच्या सोबत सासूबाई दवाखान्यात दोन दिवस राहिल्या. मुलगी व बाळ घरी आल्यावर तिच्या खोलीत जाण्यास विद्याला बंदी केली गेली, बारशाचया दिवशी तर कहरच झाला नणंदेची ओटी भरायला पुढे आलेल्या विद्याला हात धरून मागे ओढले गेले आणि” अगं ‘बाळंतिणीची ओटी लेकुरवाळी स्त्रीने भरायची असते हे तुला माहित नाही का? असे म्हणत सासूबाई डाफरल्या आणि शेजारच्या काकूंना ओटी भरण्याचा मान दिला. प्रत्येक ठिकाणी अपशकुनी ठरवून तिच्या सासूने, एका स्त्रीने एका स्त्रीची अवहेलना केली.
विद्याने कधीही चकार शब्द काढला नाही. येईल ती परिस्थिती निमूट पणे सहन करत होती. माहेरच्या माणसांना वाटे, ” विद्या नशीबवान आहे’ चांगला बंगला आहे, दारात चार चाकी गाडी आहे, घरात नोकरांचा राबता आहे” आणि विद्या सुद्धा सर्वांच्या पुढे हसतमुख राहून आनंदी असल्यासारखी दाखवायची.
सुनील ‘तिचा नवरा सुद्धा रंग बदलू लागला सरड्यासारखा. ज्याच्या जीवावर आपलं घरदार सोडून, पुढील शिक्षण सोडून ती आली होती याचा विचार न करता तो तिला हिडीस-फिडीस करू लागला, मोलकरणी सारखा वागू लागला. मातृत्वाच्या कमतरतेवर वारंवार टोचून बोलू लागला. असेच दिवस चालले होते. नणंदेच मुलगा पाच वर्षाचा झाला. आजीने त्याचा वाढदिवस थाटामाटात साजरा केला. कार्यक्रमासाठी बरेच मित्र नातेवाईक, विद्याची बहिण व मेहुणे मुलासह आले होते.
कार्यक्रमाच्या दुसरे दिवशी घरातली मंडळी, नातेवाईक यांची सरबराई करण्यात विद्या दंग होती, त्यावेळी नणंदेचा मुलगा आणि तिच्या बहिणीचा मुलगा शेजारच्या आमराईत खेळायला गेले. तिथे कैऱ्या पडण्यासाठी आलेल्या मुलांपैकी एका मुलाचा दगड चुकून उत्सव मूर्तीला लागला आणि कपाळाला खोक पडली. कोणीतरी घरी येऊन सांगता क्षणीच नवऱ्याने तिच्यावर तोंड सुख घेतले” तू अवलक्षणी आहेस आता इतरांनाही तुझ्या पायगुणाचा प्रसाद मिळू लागला आहे तेव्हा तुझा घरात राहण्याचा अधिकार संपला आहे. तू घरातून चालती हो”
सर्व नातेवाईकांसमोर अपमानित झालेल्या विद्याने दोन कपड्यानिशी घर सोडले. रात्री ती स्टेशन वरील वेटिंग रूम मध्ये बसून राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी रेल्वेने तिने पुणे गाठले आणि “हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेत” दाखल झाली. तिने आपली कर्म कहाणी तिथल्या संस्थापकांच्या कानी घातली. तिथल्या संस्थापक ताईंनी संस्थेमध्ये राहण्याची तिला परवानगी दिली. संस्थेत राहून तिने बी. एड. केले. तिच्यातील जिद्द पाहून तिला त्यांच्या शाळेत नोकरीत रुजू करून घेतले. नोकरी करता करता तिने पी. एच. डी. पदवी संपादन केली आणि वसतिगृहाच्या संचालक पदाची सूत्रे हाती घेतली.
नोकरीतून जमलेल्या पुंजीतून आणि काही कनवाळू लोकांच्या देणगीतून पुण्याजवळ मायेची पाखर घालणारी” स्नेहालय” ही संस्था तिने सुरू केली. त्या संस्थेत अनाथ मुलं, दुर्लक्ष केलेल्या स्त्रियांना आसरा दिला. त्यांच्यासाठी व्यवसायाभिमूख कार्यशाळा सुरू केल्या, त्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवला. आपलं स्वतःच नाही म्हणून काय झाले संस्थेत येणारी मुले आपलीच आहेत असे मानून यावर मातेप्रमाणे प्रेमाचा वर्षाव केला आणि आपले जीवन सार्थक केले.
आज तिने लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन होते. नाव होते “मोगरा फुलला “. समाजामध्ये अनेक सामान्य स्त्रिया आहेत की ज्यांच्या पदरी दुःख आले असताना सुद्धा त्यांनी दुःखावर मात करून यशस्वी वाटचाल केली होती. रूढी अंधश्रद्धा यांना झुगारून प्रयत्नांची कास धरली होती आणि त्या यशस्वी झाल्या होत्या, अशा स्त्रियांचे उदाहरणे देऊन तिने कथा लिहिल्या होत्या.
मोगऱ्याचे छोटेसे सुंदर ताजे फूल सुगंध देते, गजरा करून डोक्यात माळला तर केसांनाही सुगंधित करते. ते हातात घेतलं तर हातांना सुगंध येतो, आपले सुगंध पसरविण्याचे काम ते सोडत नाही.
प्रकाशनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला. प्रखर बुद्धिमत्ता, श्रमाची आवड, मन ओतून काम करण्याची पद्धती या विद्याच्या गुणांमुळे अनेक प्रतिष्ठित लोकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत होता. कलेक्टर मेधाताईंनीही विद्याच्या कार्याचे कौतुक केले आणि तिच्या कामात सहकार्य करण्याची इच्छा दर्शवली. आता तिचं मित्र मंडळ ही मोठं होतं॰ कुठेच कमतरता,. . न्यूनता नव्हती. चहापानानंतर मेधाताईंना प्रवेशद्वाराशी निरोप देऊन आम्ही परत हॉलमध्ये आलो. त्यावेळी एक मोगऱ्याचा गजरा आणि चिठ्ठी असलेले एक तबक कार्यकर्त्याने विद्याच्या हाती दिले. चिठ्ठी कोणाकडून आली असावी ?असे प्रश्नचिन्ह तिच्या चेहऱ्यावर उमटले. शांत चित्ताने विद्याने चिठ्ठी उघडली. चिठ्ठीतील मजकूर पुढीलप्रमाणे होता.
विद्या
प्रिय विद्या म्हणण्याचा अधिकार मी केव्हाच गमावून बसलो आहे वर्तमानपत्रात पुस्तक प्रकाशन सोहळ्याची बातमी वाचली आणि आर्जवून समारंभास येण्याचे धाडस केले. पण तुला भेटण्याचे मनात असूनही पुढें आलो नाही. तसे पाहता माझ्याकडून तुझी अवहेलनाच झाली, मी तुझा शतशः अपराधी आहे. जमली तर मला क्षमा कर. मी माझं राहतं घर” स्नेहालय “संस्थेच्या नावे केले आहे त्याचा अव्हेर करू नकोस. केलेल्या चुकांचे परिमार्जन करण्याचा हाच एक मार्ग माझ्यासमोर होता माझ्या या विनंतीचा स्वीकार कर आणि यशस्विनी हो!.
सुनील !
अंधश्रद्धा आणि रुढीला चिकटून राहून सर्वांनी विद्याची अवहेलना केली होती पण त्या दुःखाला कवटाळित न बसता विद्याने पिडीत स्त्रियांना आणि निराधार बालकांना आधार दिला होता. त्यांची ती माय झाली होती. अशा प्रकारे महान कार्य करणारी माझी मैत्रीण खरोखर सर्वांची विद्याई झाली होती.
समारंभ संपता क्षणीच तिनं मला मिठी मारली. त्या मिठीत कौतुकाचा आनंद आणि पती न भेटता गेल्याचे दुःख सामावले होते. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आज खऱ्या अर्थाने विद्याच्या जीवनाचे सार्थक झाले होते.
*साहित्य प्रेमी भगिनी मंडळला पाठवलेली व प्रथम क्रमांक मिळालेली कथा
© सौ. अर्चना सुरेश देशपांडे
पुणे
मो. ९९६०२१९८३६
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈