?जीवनरंग ?

☆ “क्वेश्चन मार्क …” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

‘चेहरा ओळखण्यापलीकडे गेलाय.

अर्धा किलोमीटर तरी ,ट्रकबरोबर घासत गेलीय बाॅडी.

भोसले , काही आयडेंटीटीफिकेशन होतंय का, बघा.

अन् बाॅडी  ससूनलाला पाठवून द्या.

अजून श्वास चालूय.

वाचेल कदाचित.’

पी. एस. आय. जमादार, पटाटा अॅक्शन घेत होते.

‘साहेब , पँटमधल्या वाॅलेटच्या चिंध्या झाल्या आहेत.

शर्टच्या खिशातल्या मोबाईलच्या ठिकर्या.

आॅफिसबॅगमधे एक बिल सापडलंय.

मोबाईल परचेजचं.

त्यावर नाव आणि अॅड्रेस आहे.

ए. ए. कुलकर्णी नाव आहे.

1763 , सदाशिव , पुणे 30 पत्ताय.’

‘ ताबडतोब त्या पत्त्यावर माणूस पाठवा.

नातेवाईकांना बोलावून घ्या.

मी चौकीवर जातोय.

आज खरं तर लवकर जायचं होतं.

लेकीचा वाढदिवस होता.

आता जमायचं नाही बहुतेक.

तुम्ही ससूनलाच थांबा.

मला तसा रिपोर्ट करा.’

जमादार टोकटोक बूट वाजवत, चौकीवर निघून गेले.

1763 ,सदाशिव , पुणे 30.

घराचं नाव सौभाग्य सदन.

आता कुठलं ऊरलंय सौभाग्य ?

सौभाग्य वाचव रे देवा , या घरचं.

तरी बरं , घराला काय घडलंय, याची खबरच नाहीये.

अरविंद आत्माराम कुलकर्णी.

वय वर्ष 63.

अक्षर प्रिंटींग प्रेसचे मालक.

गेली चाळीस वर्ष प्रिंटींगच्या धंद्यात आहेत.

या धंद्यातली ही आता चौथी पिढी.

खरं तर पहिल्यांदा वाड्यातच प्रेस होता.

आता जागा कमी पडायला लागली.

पाच वर्षापूर्वी प्रेस धायरीला हलवलाय.

सकाळी नऊ ते रात्री नऊ.

अरविंदराव मु. पो. धायरी.

दिवसभर प्रेस नाहीतर…

क्लायेंटकडे चकरा.

अॅक्टिव्हा वापरायचे.

पुढे गठ्ठे ठेवायला सोयीची.

दिवसभर दोघांचंही भरपूर रनिंग व्हायचं.

नुकताच अनुजही जाॅईन झालाय.

अनुज अरविंद कुलकर्णी.

बी. ई. ( प्रींटींग टेक्नाॅलाॅजी )

धंद्याला लागलेलं नवं ईन्जीन.

डबल ईन्जीन , डबल टर्नओव्हर.

धंदा जोरात चाललाय.

अनुजही अॅक्टिव्हाच वापरायचा.

कुलकर्णी फॅमिली, अॅक्टिव्हाचे ब्रॅन्ड अॅम्बॅसॅडर होणार.

घरी गडबड.

अनुजची बायको आणि आई.

किचनमधे आॅन ड्यूटी.

पुर्या तळणं चाललेलं.

अनुज आणि आरतीच्या लग्नाचा पहिला वाढदिवस.

त्यात आरती दोन महिन्याची पोटुशी.

आनंदघन बरसायची वाट बघतायेत.

आज तरी..

नक्की.

अनुज आणि अरविंद, आज नक्की लवकर घरी येणार.

घर दरवाजाकडे डोळे लावून, दोघांची वाट बघतंय.

फोनच आला.

‘ मी धायरी पुलीस स्टेशनमधून, काॅस्न्टेबल भोसले बोलतोय.

एका अॅक्टिव्हाला डंपरनं ऊडवलंय.

ए. ए. कुलकर्णी नावाची चिठ्ठी सापडलीय.

ताबडतोब ससूनला या.

कंडीशन सिरीयस आहे.’

अनुजच्या आईनं फोन घेतलेला.

कानापर्यंत पोचलेले शब्द.

मेंदूत शिरायला तयारच नव्हते.

अनुजची आई मटकन् खाली बसली.

‘ अॅक्सीडेन्ट झालाय.’

ती एवढचं बोलली.

आरतीचं चॅनल म्यूट.

ती फ्रीजींग पाॅईंटला पोचलेली.

संवेदना बधीर झालेल्या.

ती कोसळलीच.

अनुजची आई धीराची.

शेजारी हाक मारली.

शेजारचा रवी.

त्याला बोलावला.

तो लगोलग ससूनला पळाला.

अनुजची आई , आरतीच्या ऊशाशी.

घरचा गणपती पाण्यात.

‘कोण असेल नक्की ?

अनुज का अरविंद. ?’

मेंदूचा भुगा.

‘पोरीचं सौभाग्य सांभाळ रे देवा.

मग माझं सौभाग्य दावणीला…

स्वार्थ की त्याग ?

प्रत्येक माणूस आपलंच.

डावं ऊजवं काय करणार ?

कुणी का असेना.

सिद्धीविनायका , सांभाळ रे बाबा ‘

तेवढ्यात दारातून अरविंदराव घरात शिरले.

सहज.

काहीच माहिती नसल्यासारखे.

‘ म्हणजे , अनुजला..’

आता मात्र अनुजच्या आईचा धीर सुटला.

तीनं हंबरडा फोडला.

‘ अरे , नक्की काय झालंय ?

सांगेल का कुणी ?”

भिजलेल्या अश्रूंनी ,दर्दभरी दास्तान ऐकवली.

अरविंदरावांना बघितलं अन् ..

आरतीची ऊरलीसुरली शुद्ध हरपली.

अरविंदरावांच्या हातापायातलं त्राण गेलेलं.

थांबून चालणारच नव्हतं.

‘ तू पोरीला सांभाळ.

मी ससूनला जातोय.

धीर सोडू नकोस.”

अरविंदराव दरवाजातच थबकले.

हाशहुश्श करत ,अनुज घरात शिरत होता.

त्सुनामीच आली होती घरावर.

त्यातून वाचलेलं ते चार जीव.

आई , बाबा ..

टाकलेले निश्वास.

परमेश्वराचे आभार मानणारे डोळे.

डोळ्यातून धुवाधार नायगारा.

‘ आरती , डोळे ऊघड.

अनुज आलाय.’

काळझोपेतून जागं व्हावं, तशी आरती एकदम जागी.

डोळ्यांना दिसणारा अनुज.

डोळ्यात अवघं विश्व सामावलेलं.

अनुज..

तेहतीस कोटी देवांना,

कोटी कोटी थँक्स म्हणणारे ते डोळे.

धडपडत ती अनुजच्या मिठीत शिरली.

अनुजच्या चेहर्यावरचा क्वश्चनमार्क तसाच.

काहीच कळेना.

बाबांनी सगळी स्टोरी रीपीट टेलीकास्ट केली.

” म्हणजे बनसोडचा अॅक्सीडेन्ट झालाय.

आरती , तुझ्यासाठी नवीन सेलफोन घ्यायचा होता.

मग घरी यायला ऊशीर झाला असता.

बनसोड म्हणाला , साहेब तुम्ही घरी जा.

मी घेवून येतो.

म्हणलं गाडी घेवून जा.

मी रिक्षाने जातो.

बावीस वर्षाचा कोवळा पोर.

वर्षभरच झालंय कामाला लागून.

त्याच्या आईबापाला काय तोंड दाखवू मी ?”

आता अनुज हडबडला.

पुन्हा फोन किणकीणला.

” काका , रवी बोलतोय.

हा आपला अनुज नाहीये.

दुसराच कुणीतरी.

गाडी मात्र आपलीच आहे.

पण काळजी नको.

ही ईज आऊट आॅफ डेंजर.

अनुज पोचला का घरी ?”

‘ हो..

आम्ही येतोच आहोत तिकडे “

मणभर वजनाचा क्वश्चनमार्क.

सगळ्यांच्या डोळ्यांना खुपणारा.

पुसला गेला एकदाचा.

परमेश्वरा ,

ज्याचं ऊत्तर माहीत नाही,

असा प्रश्न नको टाकूस रे बाबा , आयुष्याच्या पेपरात.

अशीच कृपा राहू दे रे देवा….

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments