श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “दाखला !श्री संभाजी बबन गायके 

मध्यरात्रीनंतरचा वाढतच जाणारा काळोख त्यात थंडीच्या दिवसांत पडलेलं धुकं. सतरा एकर माळावरच्या एका कोप-यात असलेली सात-आठ खोल्यांची कौलारू शाळा आणि शाळेपासून पायी सात-आठ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या शिक्षकांसाठीच्या क्वॉर्टर्स या धुक्यात हरवून गेल्या होत्या. गुरूजी आणि त्यांच्या शिक्षिका पत्नी नुकत्याच या क्वार्टर्समध्ये रहायला आले होते. पाच-सातच खोल्या होत्या इथे पण फक्त एक शिपाईच तिथे मुक्कामाला असे. इतर शिक्षकांनी गावातल्या वस्तीत भाड्याने जागा घेऊन राहणं पसंत केलं होतं. कारण माळारानाजवळ सोबतीला वस्ती नव्हती. विंचु-काट्याची,चोरा-चिलटांची भीती होतीच. हे पती-पत्नी दोघंही एकाच संस्थेत असल्यानं दोघांच्या बदल्याही एकाच वेळी आणि एकाच शाळेत होत असत, ते बरं होतं. नुकतंच लग्न झालेलं, नवीन संसार उभा करायचा होता. गावात भाडं भरून राहण्यापेक्षा क्वॉर्टर मध्ये राहणं परवडण्यासारखं होतं. आणि गुरूजींकडे मुख्याध्यापक म्हणून चार्ज असल्याने त्यांनी शाळेजवळच राहणं सोयीचं होतं. शिवाय शिपायाचं कुटुंब सोबतीला होतंच. शिक्षकाच्या घरात चोरांना मिळून मिळून मिळणार तरी काय म्हणा? घाबरायचं काही कारण नाही अशी एकमेकांची समजूत घालून गुरूजी आणि बाई नव्या जागेत रमण्याचा प्रयत्न करीत होते. एके रात्री दरवाजाच्या फटीतून एक नाग घरात शिरला होता. पण गुरूजींनी त्याला वेळीच पाहिल्यामुळे अनर्थ टळला होता. ती आठवण दोघांनाही अस्वस्थ करीत होतीच. 

दोन वाजत आलेले असावेत. दरवाजावर थाप पडली. नव्या जागेत आधीच लवकर झोप लागता लागत नाही. गुरूजींची झोप तशीही जागसूदच असे. ते चटकन अंथरूणवर उठून बसले. बाईही जाग्या झाल्या आणि दाराकडे पाहू लागल्या. एवढ्या रात्री कोण आलं असावं? एरव्ही फक्त रातकिड्यांचा आवाज ऐकण्याची सवय असलेल्या त्या माळालाही दरवाजावरची ही थाप ऐकू गेली असावी. गुरूजींनी खोलीतला चाळीस वॅटचा बल्ब लावला. दाराबाहेरचा बल्ब गेलेला होता. बाई म्हणाल्या… एकदम दरवाजा उघडू नका…खिडकीच्या फटीतून पहा आधी! आणि त्या गुरूजींच्या मागे येऊन उभ्या राहिल्या. डोक्याला मुंडासं, गुडघ्यापर्यंत धोतर, अंगावर काळी घोंगडी पांघरलेले कुणीतरी दरवाजात उभे होते. सोबत अर्ध्या बाहीचा सदरा आणि आणि पांढरा पायजमा घातलेला पोरसवदा तरूण उभा होता. थंडीमुळे कानावर रुमाल बांधलेला होता त्याने. दोन्ही हात काखेत घालून उभा होता पोरगा. म्हाता-याच्या हातात काठी आणि कंदील होता. दारावरचा आवाज शिपाईही जागा झाला होता, पण त्यानेही लगेच दार उघडायची हिंमत केली नाही. साहजिकच होतं ते. 

गुरूजी खिडकीशी आल्याचं पाहून म्हाता-यानं कंदिल त्याच्या चेह-यावर उजेड पडेल असा धरला आणि म्हणाला, “गुरूजी, माफी असावी. पण कामच तातडीचं आहे. म्हणून तुम्हांला त्रास देतो आहे.” त्याच्यासोबत असलेल्या त्या तरूणाने गुरूजींना पाहून हात जोडून नमस्कार केला. गुरूजींनी दरवाजा उघडला आणि ते बाहेर गेले. 

म्हातारा त्या पोराचा आज्जा होता. पोरगा याच शाळेत मामाच्या घरी राहून सातवी पर्यंत शिकला होता. त्याचा बाप मरून गेला म्हणून त्याची आई माहेरी येऊन राहिली होती. आता आईही वारल्यानं पोरगं पुन्हा आज्ज्याकडं राहायला गेलं होतं. या गावापासून त्याच्या वडिलांचं गाव वीस बावीस कोसावर असावं. पोरगं काही पुढं शिकलं नाही. पण शेतात कामं करून, तालमीत कसून त्याची तब्येत मात्र काटक झाली होती. तालुक्याच्या गावात फौजेची भरती निघाल्याचं त्याला आज सांजच्यालाच समजलं होतं. त्यानं आज्ज्याकडं फौजेतच जाणार म्हणून हट्ट धरला होता. शाळा सोडल्याचा दाखला लागणार होता भरतीत दाखवायला. आणि शाळा सोडली तेंव्हा त्यानं दाखला नेला नव्हता. आणि उद्या शाळा उघडेपर्यंत थांबण्याएवढा वेळ त्यांच्याकडे नव्हता. सकाळी सात वाजता भरती मैदानावर कागडपत्रांसह हजर राहायचं होतं. म्हाता-यानं गुरूजींना हात जोडले, “मास्तर, एवढा एक उपकार करा. पोरगं फौजेत गेलं तर चार घास सुखानं खाईल तरी…रांकेला लागंल.” 

बाई दारात उभे राहून सारं ऐकत होत्या. गुरूजींनी बाईंकडे पाहिलं. खोलीत आले,शर्ट,पॅन्ट चढवली. खिशाला पेन आहे याची खात्री केली,छोटी विजेरी घेतली आणि बाहेर पडले. तोवर शिपाई बाहेर आला होता. गुरूजींनी त्याच्याकडून शाळेची किल्ली मागून घेतली. तू बाईंना सोबत म्हणून इथंच थांब असं त्याला म्हणून गुरूजी त्या दोघांसोबत शाळेकडे निघाले सुद्धा.

त्या अंधारात, त्या माळावर आता ही सहा पावलं पायाखालचं वाळलेलं गवत तुडवत तुडवत निघाली होती. तुम्हाला उगा तकलीप द्यायला नको वाटतंय मास्तर, पण नाईलाज झालाय असं काहीबाही म्हातारा बोलत होता. पोरगा मात्र थोडंसं अंतर ठेवून अपराधी भावनेनं चालत होता, त्यालाही इतक्या रात्री गुरूजींना त्रास द्यावसा वाटत नव्हता. पण शेती धड नाही,रोजगार नाही. वय वाढत चालेलं. काहीतरी केलं पाहिजे पोटापाण्यासाठी , यासाठी फौजेसारखी दुसरी संधी मिळणार नाही, असा त्याचा विचार होता. त्याच्या गावातले जवान सुट्टीवर आलेले तो पहायचा. रूबाबादार युनिफॉर्म,काळी ट्रंक,त्यात घरच्यांसाठी आणलेलं काहीबाही. त्यात नोकरी संपवून गावी आलेले लोकही त्याला माहित होते. फौजेतच जायचं असं त्याने मनोमन ठरवलं होतं. 

गुरूजींनी शाळेचे कार्यालय उघडलं. कपाटातून रजिस्टर बाहेर काढलं. पोराचं प्रवेशाचं आणि शाळा सोडल्याचं वर्ष विचारून घेतलं. पोरानं अंदाजे वर्ष सांगितलं. गुरूजींना अचूक नोंद शोधून काढली. आपल्या वळणदार अक्षरात शाळा सोडल्याचा दाखला लिहून काढला. दाखल्याच्या कागदाखाली कार्बन पेपर ठेवायला ते विसरले नाहीत. त्यांच्या सहीचा त्या शाळेतून दिला जात असलेला तो पहिला दाखला होता. गुरुजींनाही त्यांच्या तरूणपणी फौजेत जायचं होतं पण तो योग नव्हता.

म्हाता-याचे डोळे भरून आले होते. त्याने गुरूजींचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि त्या हातांवर त्याचं मस्तक ठेवलं…उपकार झालं बघा! पोरगं खाली वाकून पाया पडलं आणि ते तिघेही शाळेच्या बाहेर पडले. म्हाता-याला आणि त्या पोराला शाळेपासून पुढच्या बाजूला असलेल्या रस्त्याने त्यांच्या मार्गाला जाता आलं असतं. पण ते दोघं गुरूजींना सोडवायला पुन्हा क्वॉटरपर्यंत आले. 

भरती झाल्यावर सुट्टीवर आलास की शाळेत येऊन जा. बाकीच्या पोरांनाही स्फुर्ती मिळेल देशसेवेची. बाईंनी त्या पोराला सांगितलं आणि त्याच्या हातावर साखर ठेवली. वीस रुपयाची नोट त्याच्या खिशात ठेवली. आईकडून आलेल्या लाडवांमधून चार लाडू त्याला शिदोरी म्हणून रुमालात बांधून दिले. पोरगं बाईंच्याही पाया पडलं आणि निघालं. पहाटेचे तीन वाजत आले होते. त्याला तालुक्यापर्यंत पायी जायला तीन-साडेतीन तास लागणार होते. सह्याद्रीचा पोरगा हिमालयाच्या रक्षणाला निघाला होता… त्याच्या पाठमो-या आकृतीकडे गुरूजी आणि बाई पहात राहिले ते दृष्टीआड होईपर्यंत. बाहेर झुंजुमुंजु होऊ लागलं होतं….गुरूजी आणि बाई यांच्या मनात समाधानाची पहाट उगवू लागली होती! 

(बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ही युद्धगर्जना, मानचिन्हात अशोकस्तंभातील तीन सिंह,तुतारी असलेल्या, कर्तव्य,मान,साहस असे ब्रीदवाक्य असलेल्या लढवय्या ‘दी मराठा लाईट इन्फंट्री’चा आज ४ फेब्रुवारी हा स्थापना दिन. यानिमित्ताने एका गुरुजींची ही सत्यकथा सादर केली आहे. देशासाठी लढणा-या सैनिकांना आणि विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र तत्पर असणा-या शिक्षकांना विनम्र अभिवादन.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments