डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ सांताक्लॉज – भाग-2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
(मेरी उत्कृष्ट ग्रेडस् मिळवून डॉक्टर झाली. आयर्लंडच्या एका विख्यात हॉस्पिटलमध्ये तिला जॉब मिळाला.) – इथून पुढे –
रोझीला धन्य धन्य झाले.कोणत्या कठीण परिस्थितीतून आपलं हे लेकरू शिकलं, वेळ प्रसंगी अर्धपोटी राहून जिद्दीने ही डिग्री मिळवली हे आठवून रोझीच्या डोळ्यात पाणी आलं. मायकेलकडे रोझी गेली आणि म्हणाली, “ मायकेल, मेरी आता हॉस्पिटलच्या क्वार्टर्सवर राहायला जाईल. मीही मग तिकडेच जाईन तिच्या बरोबर. तुम्ही फार एकटे पडाल हो. आपली ही चाळ पण किती खिळखिळी झालीय. तुम्हीही आता थकत चाललात. पुढच्याच महिन्यात आम्ही मेरीच्या हॉस्पिटलला शिफ्ट होऊ. काळजी घ्या मायकेल. काहीही लागलं तर फोन करा. मी दर आठवड्याला इकडे चक्कर मारीनच. “ मायकेल म्हणाले, “ मी ठीक आहे ग रोझी. काळजी नको करू माझी. आपल्या मित्राची मुलगी एवढी शिकून डॉक्टर झाली याचं किती समाधान वाटतंय म्हणून सांगू. “ मायकेलने डोळे पुसले. “ मी मात्र माझ्या छोट्या मैत्रिणीची आठवण विसरू शकणार नाही. किती ग गुणी लाघवी तुझी पोर.”
मायकेल जास्त जास्त थकले. दरम्यान अनेक गोष्टी घडल्या. मेरीला रॉबिनने लग्नाची मागणी घातली. तो तिच्याच हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून काम करत होता. अगदी साधेपणाने रॉबिन मेरीचं चर्च मध्ये लग्न झालं. मेरीने मुद्दाम मायकेल अंकलला आपल्या कारमधून लग्नाला नेलं होतं. लग्न लागल्यावर त्यांना मिठी मारून ती म्हणाली, “ अंकल, माझ्या आयुष्यातल्या सगळ्या सुख दुःखाच्या प्रसंगाला तुम्ही साक्षीदार आहात. मला आहेच कोण तुमच्या शिवाय? “ मायकेलच्या डोळ्यात पाणी आलं. ही गरीब, पित्याचं छत्र लहानपणीच हरपलेली मुलगी आता किती मोठी झाली, त्यांच्या मनात आलं. रॉबिन आणि मेरीला आशीर्वाद देत ते म्हणाले, “ सुखात रहा रे मुलांनो. आईला नीट संभाळ ग मेरी. तिनेही फार कष्ट काढलेत बरं.” हळूहळू चालत अंकल गाडीत बसले. मेरीने त्यांना घरी पोचवले. ती पडकी मोडकळीला आलेली चाळ बघून तिला भडभडून आलं. अंकल एक मिनिट ! तुम्ही माझ्याकडे येता का राहायला? हीअसली चाळ कधी पडेल सांगता येत नाही हो. बहुतेक सगळे लोक ही जागा सोडून गेलेत. नका राहू इथे. माझ्याकडे या ना. मी सांभाळेन तुम्हाला.” अंकल म्हणाले “ नको ग मेरी. बरा आहे मी इथेच. काही वाटलं तर बघू मग पुढे. “ हळूहळू पावलं टाकत अंकल घरात शिरले.
याही गोष्टीला पाच वर्षे झाली. मेरीने पोस्ट ग्रॅज्युएशन केले. दर पंचवीस डिसेंम्बरला आता तिला पोस्टाने थोडेसे पैसे येत. नोट वर पत्ता मात्र लिहिलेला नसे. ते पैसे बघून मेरीचे डोळे भरून येत. हा हितकर्ता आपल्याला भेटायला हवाच असं मनापासून वाटत राही तिला.
त्या दिवशी अतोनात बर्फ पडलं. रस्ते बर्फमय झाले. मेरीला त्या दिवशीऑफ होता म्हणून ती घरीच होती. अचानक तिचा फोन घणघणला. पलीकडून कोणीतरी बोलत होते. “ हॅलो डॉ मेरी ना? मी मायकेलचा शेजारी बोलतोय. मायकेल आत्ता बर्फावरून घसरून पडले. त्यांना आम्ही तुमच्या हॉस्पिटलला आत्ता ऍडमिट करायला निघालोय. तुम्ही लक्ष ठेवा “ फोन बंद झाला.मेरीने हॉस्पिटलला फोन केला. स्टाफला सगळ्या सूचना दिल्या. ‘ मायकेल नावाचे पेशन्ट आले की लगेच मला कॉल करा ‘ असं सांगितलं. डिसेंबर महिना होता तो. हाडं गोठवणारी थंडी आणि तुफान बर्फवृष्टी ! मायकेल ऍडमिट झाल्याचा सिस्टरचा फोन आला. मेरी तसल्या बर्फवृष्टीत गाडी चालवत हॉस्पिटलला पोचली. तिने मायकेलना बघितलं. नशिबाने आज रॉबिनची हॉस्पिटल ड्यूटी होती. भराभर सगळे एक्स रे, बाकीच्या तपासण्या झाल्या. हाडे ठिसूळ झाल्याने अंकलला हिप बोनचे फ्रॅक्चर झाले होते.
त्यांचे वय आणि इतर परिस्थिती बघता हे ऑपरेशन फार रिस्की होते. अर्धवट ग्लानीत होते मायकेल. मेरीने त्यांना उत्तम रूममध्ये भरती करून घेतले. रॉबिन म्हणाला “ यांचे हे ऑपरेशन करणं फार धोक्याचं आहे ग .पण न केलं तर जास्तच धोक्याचं आहे. ते उरलेलं सगळं आयुष्य मग बेडला खिळून रहातील .न जाणो एक टक्का चान्स आहे, कदाचित ऑपरेशन करून ते निदान वेदनामुक्त होतील आणि थोडे चालू तरी शकतील.” वेदनाशामक औषधे देऊन मायकेलना झोपवून ठेवलं. मेरी आणि रॉबिन सर्वतोपरी त्यांची काळजी घेत होते. त्यांची परिस्थिती ऑपरेशन सहन करण्याइतपत झाली की चार दिवसांनी रॉबिन त्यांची सर्जरी करणार होता. मायकेलने त्या दिवशी मेरी आणि रॉबिनला बोलावलं. “ मुलांनो,आता माझे हाल नका करू. तो येशू मला बोलावतो आहे. मला ऑपरेशन करून आणखी यातना नका देऊ. मी यातून वाचणार नाही.” रोझीही हे ऐकत होती. “ असं नका म्हणू मायकेल. तुम्हाला आपला रॉबिन नक्की बरं करेल.”
“ नको रोझी. माझीच आता जगायची इच्छा उरली नाही. मी आत्ता शुद्धीवर आहे तेवढ्यात बोलून घेतो. मग काय होणारे तो येशूच जाणे ! “ मायकेलला धाप लागली. ते थकून पडून राहिले. मेरी त्यांच्याजवळ बसली. मायकेलने तिला सांगितलं, “ माझ्या उशीखालचे पाकीट दे ग ! “ मेरीने पाकीट त्यांच्या हातात दिलं .”उघड ते.” मेरीने पाकीट उघडलं. त्यात एक मोठ्या रकमेचा चेक होता. “मला जगात कोणीच नाही. तूच माझ्या आयुष्यात हिरवळ होतीस. तुझ्या छोट्या जगात तू मला सामावून घेतलंस पोरी. रोज पायरीवर बसून मीही तुझी वाट बघायचो. तुझी शाळा,ते रुसवे फुगवे सगळं तू मला सांगायचीस. तू डॉक्टर झाल्याचा मला किती आनंद झाला म्हणून सांगू. फार सुख दिलंस मला माझ्या एकाकीआयुष्यात.” मायकेल पडून राहिले. “आणखी एक पाकीट असेल बघ त्यात. उघड ते. “ जराशाने मायकेल म्हणाले. त्या पाकिटात अगदी छोटी, नेहमी पंचवीस डिसेंबरला न चुकता येणारी रक्कम होती. मेरीला एकदम साक्षात्कार झाला .. अरे ! आपल्याला इतकी वर्षे न चुकता ख्रिसमस गिफ्ट देणारे दुसरे तिसरे कोणी नसून मायकेल अंकलच होते.
मेरीला हुंदके आवरेनात.रोझी आणि रॉबिनही सदगदित झाले. मेरीने मायकेलला मिठी मारली आणि म्हणाली ,” का हे इतके वर्ष लपवून ठेवलंत हो अंकल? मी पोरकी होते .. मला वाईट वाटेल म्हणून ना? माझी फी भरलीत, मला किती मदत केलीत हो न बोलता ! कसे फेडू मी तुमचे उपकार? किती मोठं मन तुमचं ! आता तुम्ही बरे झालात की माझ्या घरीच नेणार मी तुम्हाला. पुरे झालं त्या पडक्या घरात रहाणं. एवढं तरी करू दे ना मला …. आजपर्यंत अज्ञात राहिलेल्या या उपकारकर्त्या सांताक्लॉजसाठी “ मेरी बोलत होती आणि बघितलं तर मायकेलचे प्राण केव्हाच निघून गेले होते. मेरीने बघितलं तर तो दिवस होता पंचवीस डिसेंबर. मेरीला आपल्या आयुष्याची सगळी कमाई देऊन तिच्याच हातात आपली मान ठेवून तिचा उपकारकर्ता सांता क्लॉज निघून गेला होता. पुन्हा कधीही तिला गिफ्ट देऊन न भेटण्यासाठी !
– समाप्त –
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈