सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ सांगून ठेवते… भाग-१ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

गेला संपूर्ण आठवडा मी दादीला जे सांगायचा प्रयत्न करत आहे ते नीटसं जमत नाही मला. जे काही सांगायचे ते माझ्या एकट्यासाठीच नसून ते आमच्या कुटुंबाच्या वतीने तिला सांगायचं आहे. हे सारे दिवस मी माझ्या मनाशी वाक्यं जुळवत आहे, शब्द शोधत आहे. कुटुंबातली जबाबदार व्यक्ती म्हणून ही कामगिरी नकळतच माझ्यावर येऊन ठेपली आहे. पण आता समजतं आहे की हे काम सोपं नाही. मी जे तिला सांगणार आहे ते ऐकल्यानंतर दादीची नेमकी प्रतिक्रिया काय होईल याचा अंदाज  मला नीटसा घेता येत नाही. कधी वाटतं तिला दुःख होईल, तिला आमच्या विषयी काय वाटेल? ती तळमळेल, कदाचित भांडेल, त्रागा करेल पण तरीही वाटतं तशी दादी समंजस आहे. मी जे तिला सांगेन ते ती शांतपणे नक्की स्वीकारेल.

एक दिवस दादी मला म्हणाली,” का रे बाबा! तुझा चेहरा का असा उतरलेला? कसली काळजी करतो आहेस? माझ्या आजारपणाची ?अरे मी औषधे वेळेवर घेते आहे ना? आणि हे बघ मला इतक्यात तर काहीच होणार नाही. मी खूप जगणार आहे. मला खूप जग  बघायचं आहे. तुम्हा सगळ्यांचं सगळं मी माझ्या हातानं माझ्या मनासारखं करणार आहे. सांगून ठेवते..”

मग मी काय बोलणार? काय सांगणार तिला ?

दादीचा गोरापान, तांबूस  कांतीचा चेहरा,ठसठशीत बांधा, देखणे अवयव, त्यावरचे खुलून दिसणारे गोठ, पाटल्या, एकदाणी आणि चापून चोपून नेसलेले स्वच्छ काठ पदरी लुगडे, आणि साऱ्या घरभर तिचे ते अविरत तुरुतुरु चालणे.

आमच्या कुटुंबावरच दादीचा केवढा मोठा प्रभाव आहे! खरं म्हणजे ती आहे म्हणूनच हे कुटुंब टिकले. आम्ही सारे भाऊ, आमच्या बायका, त्यांच्या विविध आवडीनिवडी, वेगवेगळे स्वभाव, इच्छा आकांक्षा, लग्न होऊन दूर गेलेल्या बहिणींचे माहेरी येणे जाणे, त्यांची मुलं आमची मुलं या सर्वांचा एक सुसूत्र समेट दादीमुळेच जुळून आलाय. तिच्या व्यक्तिमत्त्वातच असा काही चमत्कार आहे की सहसा तिच्यापुढे कुणीच जात नाही. या कुटुंबाची वीण तिने जुळवली आहे. त्यात तिच्या प्रेमाचे धागे अडकले आहेत.ती कुणाला बोलली, तिने कुणाला दुखावलं तर तेही हृदयात प्रेमाचा डोह साठवून.  आमच्या कुटुंबाचा दादी म्हणजे  एक मजबूत कणाच आहे. घरात भांडणं झाली, मतभेद झाले तर दादी गुपचूप ओट्यावर येऊन बसते नाहीतर गंगीच्या गोठ्यात जाऊन गंगीच्या पाठीवर हात फिरवत बसते. जणू तिला सांगते,” उगीच भांडतायेत हे. काही कळत नाही बरं त्यांना. तुला सांगून ठेवते.”

हं! फारच झालं तर निंबोणीच्या पारावर जाऊन वाती वळत बसते. पण कुणाचेही भांडण मिटवायचा प्रयत्न ती करत नाही. काही वेळ जातो, काही दिवस जातात पुन्हा कुटुंबाचा सुसूत्रपणा टिकून राहतो. दादी उगीच कुठेही ढवळाढवळ करत बसत नाही. कुणाची बाजू घेत नाही आणि कुणाला खडसावतही नाही. मात्र कधीतरी माझ्या बायकोला किंवा धाकट्या भावाच्या बायकोला म्हणेल,

“ का ग! आज गंगाफळाची भाजी केली आहेस ना मग बाबू काय जेवेल? त्याला आवडत नाही ती भाजी. त्याच्यासाठी वेगळं काहीतरी कर हो .आण तो लसूण मी सोलून देते. लसुण, कांदा घालून केलेला लाल मिरचीचा ठेचा त्याच्यासाठी करून ठेव. सांगून ठेवते ..”

धाकट्या भावाच्या बायकोच्या पाठीवर हात फिरवून म्हणेल,” अगं !आपल्या नवऱ्याची काळजी आपणच घ्यावी. त्याला काय आवडतं काय नाही हे आपणच लक्षात ठेवावं. कंटाळा करू नये ग! असेल हो तुमची स्त्री मुक्ती नाहीतर नारी स्वातंत्र्य आणि ते काय समान हक्क. आता तुम्ही शिकल्या सवरल्या, पैसे मिळवता म्हणून तुम्हाला हे कळतं. तसच  वाटतं. पण खरं सांगू गंगा यमुना आटतील पण स्त्रीचे मन नाही बदलणार. ते असंच पिंगा घालेल बरं तिच्या घराभोवती तुला सांगून ठेवते.”

हे खरं की खोटं, योग्य की अयोग्य, जुनं की नवं हा संघर्ष नंतरचा. पण दादी जे बोलते ते तिला तसंच वाटतं म्हणून ती बोलते. तुम्हाला ते पटवून घेतलं पाहिजे असं नाही. तिची गुंतवणूक आणि तिचा अलिप्तपणा याचा संगम इतका सुरेख आहे की म्हणूनच आमच्या कुटुंबावर तिचा जबरदस्त पगडा आहे. एका अनामिक शक्तीने तिने हा डोलारा  सांभाळला . पाठीच्या कण्यासारखा .कदाचित ती आमच्यातून गेली.. ती नसली तर …. 

आणि मग जेव्हा जेव्हा माझ्या मनात आज तिला हे सांगायचं ,आता लवकरच हा निर्णय घ्यावाच लागेल असा विचार आला की वाटतं पण दादीला हे असं व्हावं का? दादी इतकी निर्मळ, निष्पाप, सेवाभावी, इतकी स्वच्छ टापटीपीची. ती आजारी झाली, तिचं दुखलं खुपलं  म्हणून ती कधीही निजून राहायची नाही. तिच्या कुठल्या कामात कसूर नाही. मग बाळाची आंघोळ असू दे, नातीची रिक्षा आली नाही तर घेईल दप्तर धरेल तिचं बोट आणि चालेल तुरुतुरु “चल ग बाई! घरात मीच रिकामी आहे, तुझी शाळा नको बुडायला. येताना रामाच्या मंदिरातही जाऊन येईन. नातही खुशच असते आजी बरोबर शाळेत जायला.

आणि वयाच्या या उतरणीवर अण्णांचं काही कमी करावे लागतं का तिला? त्यांचं गरम पाणी, दूध, नाश्ता अजून ती त्यांच्या बाबतीत सुनांना सांगत नाही. मोलकरणीच्या हातून धुतलेले धोतर त्यांना आवडत नाही म्हणून दादी त्यांचं धोतर स्वतःच्या हाताने धुते. किनारी सारख्या करून, काठाला काठ जुळवून अगदी परीटघडी सारखं त्यांच्या हातात ठेवते.

गेल्या वर्षीच अण्णांना एक सौम्यसा हृदयाचा झटका येऊन गेला. अण्णांना तिनं एखाद्या फुलासारखं जपलं. तिचा तो मूकपणा! कामाची लय! सेवेची तन्मयता अजोड होती. किती उपास धरले, किती नवस केले, किती पोथ्यांची पारायणं केली. दिवस-रात्र अण्णाजवळ बसून राहायची. औषधांच्या वेळा सांभाळायची. ते झोपले तर ती झोपायची. ते जेवले तर ती जेवायची. कधी अण्णांनी रडावं, धीर सोडावा, निर्वाणीची भाषा बोलावी मग कठोरपणे तिनेच त्यांना दटवावं.

“ अहो आम्ही तुमची इतकी सेवा करतोय तर तो ईश्वर काही डोळे झाकून ठेवेल का?”

त्या दिवसात मी तिला म्हणायचोही “अग! दादी जरा स्वतःकडेही बघ. कशी दशा झाली आहे तुझी आणि घरात करणारे आहोत ना आम्ही?  उद्या तुलाच काही झालं तर?”

मग दादी चष्मा काढायची, पदराच्या टोकांनी  शिणलेले डोळे पुसायची आणि माझ्याकडे नुसती बघायची. तिच्या नजरेतील भाषाच जगातल्या सर्व भाव-भावांना छेदून जाते असंच मला वाटायचं .

अण्णा बरे झाले, हिंडू फिरू लागले मग दादीचं मन  निवारलं. ती हसू लागली, बोलू लागली, सुनांना हाका मारू लागली. 

आज मला वाटतं— जग कितीही पुढे जाऊ दे, कुठलंही युग येऊ दे, सुधारणांचं, नवमतवादाचं पण व्यक्ती व्यक्तीच्या मनात जे पाप-पुण्याचे संकेत टिकून आहेत ते तसेच अचल राहणार. जेव्हा डॉक्टरने म्हणाले,” दादीला हे असं व्हावं याचं मलाही आश्चर्य वाटतं. पण त्याला आता इलाज नाही. शिवाय आता वैद्यकीय शास्त्र पुढे गेलय्. औषधही खूप आहेत आणि लेप्रसी  हा रोग तसा असाध्य नाही. तो संपूर्ण बरा होऊ शकतो. फक्त अवधी फार लागतो. कदाचित तीन—चार— पाच वर्षेही लागू शकतात. घरातील लहान मुले आणि इतरांचा विचार करता दादीला तुम्ही…”

– क्रमश: भाग पहिला 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments