सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ सांगून ठेवते… भाग-३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(कारण आम्हा सर्वांवर तिचं अपरंपार प्रेम आहे आणि या प्रेमापोटीच ती सारं काही समजून घेईल, निराश होणार नाही.) आता पुढे —
आज ना उद्या तिला सांगावच लागेल आता उशीर नको. परवाच बायको म्हणाली, दादींना कसं सांगावं समजत नाही. त्या स्वयंपाक घरात येतातच. म्हणतात इतकी काही मी आजारी नाही. एवढे जपू नका मला. आण ती कणीक.मळून देते.”
“आम्ही काही बोललो तर दादींना वाईट वाटेल. दुःख तर सर्वांनाच होतं आहे. हे असं नकोच होतं व्हायला. पण आता लवकरच तुम्ही…”
मला बायकोचं बोलणं फारसं आवडलं नाही. तीव्र वेदना जाणवली पण मग वाटलं तिचं तरी काय चुकलं?
मी खिडकीतून बाहेर पाहिलं. दादी गंगीच्या गोठ्यात होती. गंगीला हिरवा चारा भरवत होती, गंगीच्या फुगलेल्या पोटावर ती हात फिरवत होती, तिला गोंजारत होती. दादी गोठ्यातून बाहेर येऊन निंबोणीच्या पारावर बसली. आणि मी तिच्याजवळ गेलो. संध्याकाळची शांत वेळ होती. कोण कुठे कोण कुठे होतं. आजूबाजूला सारीच शांतता. हालचाल नव्हती. कसली वर्दळ नव्हती. आसपास कोणीच नव्हतं. इतके दिवस मी तिला जे सांगायचं ठरवत होतो ते आताच सांगूया. हीच योग्य वेळ आहे असं मनाशी ठरवून मी तिच्या जवळ गेलो.
“ दादी..”
पण आताही दादीच म्हणाली,” बाबू! या गंगीची मला काळजी वाटते रे! या खेपेस तिला फार जड जाईल असं वाटतेय्. एखादा चांगला डॉक्टर बोलाव. हातीपायी नीट सुटका झाली पाहिजे रे तिची. जनावरांनाही दुखतं बरं..
सांगून ठेवते.”
दादीला सगळ्यांची काळजी.घरातल्या प्रत्येक व्यक्तीपासून ते गाई गुरांपर्यँत ती अशी प्रेमाने बांधलेली आहे.ती आमचा खांब आहे.
मी उठलो, घरात आलो आणि मला तीव्रतेने जाणवलं की मला जे दादीला सांगायचं ते मी कधीही सांगू शकणार नाही. ते धाडस माझ्यात नाही. ती शक्ती माझ्यात नाही. पण असं काही होईल का की दादीचं दादीलाच समजेल. तिची तीच माझ्याजवळ येईल आणि म्हणेल,” एवढी काय काळजी करतोस बाबू ?चल ही बघ मी तयार आहे. केव्हा निघायचं ?आणि बरी झाल्यावर परत येणारच आहे की मी. असं समज मी इतके दिवस कुठेतरी तीर्थयात्रेला गेले आहे त्यात काय एवढं ?”
असं झालं तर किती बरं होईल? साराच प्रश्न चुटकीसरशी सुटेल. सारं काही हसत खेळत सामंजस्यांनी होईल. कुठेही किल्मिष उरणार नाही. गढूळपणा असणार नाही.
धाकट्या भावाचा बाळ आज फार रडतोय. तसा संध्याकाळी तो किरकिर करतोच पण आज जरा जास्तच रडतोय, कळवळतोय. दूध घेत नाही, पाणी पीत नाही. काहीतरी दुखत असेल त्याचं. जोरजोरात हमसून हमसून रडतोय. त्याचं ते रडणं आणि आकाशात पसरणारे गडद नारंगी लाल रंग! विशाल आकाशात चमकणारा एकच तारा कसा भकास एकाकी वाटतोय! असा एकुलता एकतारा दिसला की मनातली इच्छा बोलून दाखवावी ती पुरी होते म्हणे.पण आज मनातल्या साऱ्या इच्छा अशा कोळपूनच गेल्या आहेत. मन निमूट बंद झाले आहे. सारे प्रवाह थंड झालेत, गोठलेत.
दादी घरात आली आणि तिने पटकन रडणाऱ्या बाळाला जवळ घेतलं, कुरवाळलं, त्याच्या हाता, पायावरून पोटावरून, गोंजारलं, त्याच्या गालाचे खारट पापे घेतले, त्याला छातीशी धरलं मग एक पाय दुमडून तिनं त्याला मांडीवर उपडं ठेवलं,थोपटलं .बाळ हळूहळू शांत झाला. झोपी गेला.
दादीची आणि बाळाची ती जवळीक पाहून माझ्या छातीत चर्र झालं! एक भीती दाटून आली. तीच भीती.. त्याच आकाराची, त्याच रंगाची.
थोड्या वेळाने मला माझ्या डोळ्यासमोर काही दिसेना. पांढऱ्या पांढऱ्या लाटा, काळे काळे ठिपके, त्यावर हळूहळू पसरत जाणारा अष्टवक्री एक जीव भयाण, भेसूर.
दादी नसेल तर या घराचे या परिवाराचे काय होईल?दादी आमच्या कणाकणात सामावलेली आहे.
सकाळ झाली. हळूहळू घर जागं झालं. व्यवहार सुरू झाले, नेहमीचेच. अण्णाही उठले होते, आज बंब अण्णांनीच तापवला. दादी अजून उठली नव्हती. हल्ली तिला सकाळी झोप लागते. आम्हीही तिला उठवत नाही. परवाच म्हणाली,” अरे या गोळ्यांनी मला कशी गुंगी येते रे! बधिर वाटतं, जीव घाबरतो माझा, झोपावसं वाटतं.”
आज गंगीही खूप हंबरत होती. तिचेही दिवस भरलेत. कालच दादी म्हणाली त्याप्रमाणे एखाद्या डॉक्टरला आणावं लागेल.
माझ्या टेबलवर श्री देशपांडे यांचं पत्र पडलेलं होतं. जिथे दादीला पाठवायचं होतं त्या संस्थेच्या संचालकाच पत्र होतं ते. मी ते पत्र हातात घेतलं, उलट सुलट केलं आणि मला काय वाटलं कोण जाणे मी ते फाडून टाकलं. तुकडे तुकडे केले आणि कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिले. दादी कुठेही जाणार नव्हती. दादी कुठेही जाऊन चालणार नव्हतं. दादी शिवाय आम्ही जगूच शकणार नाही.
हा आवाज माझ्या मुलीचाच होता. आजी शिवाय तिला करमतच नाही. जोरजोरात ती आजीला उठवत होती. “आजी उठ ना ग! त्या बदामाच्या झाडावर बघ एक वेगळाच पक्षी आलाय. तुर्रेवाला. आणि त्याचे पंख तरी बघ किती रंगाचे.. पिवळे निळे लाल ,.इतका छान गातोय.. आजी उठ ना, चल ना तो पक्षी बघायला. लवकर उठ ना आजी. नाहीतर तो उडून जाईल. आजीss आजीss “
मग आम्ही सारेच आजीच्या खोलीत गेलो.ँंंं
‘दादी’.
तिची गोरी पान तांबूस चर्या. ठसठशीत बांधा. त्यावर उठून दिसणारे तिचे गोठ, पाटल्या, एकदाणी.
शांत झोपली होती ती. तिचे ओठ किंचित काळसर होऊन विलग झाले होते. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मला पुन्हा एकदा वाटले जगातील साऱ्या भावभावनांना छेदून जाणारी तिची ही शांत मुखचर्या! जणू बंद ओठातून ती म्हणतेय् “ अरे बाबू! केव्हांच ओळखलं होतं रे मी सारं. मिटवली ना मी तुझी काळजी? सोडवला ना मी तुझा प्रश्न? सुखी राहा रे बाबांनो! सांगून ठेवते..”
माझ्या डोळ्यातून घळघळ पाणी आले. भोवती साराच कल्लोळ! दादीss दादीss दादीss
दादी आमच्यातून निघून गेली. अशी सहज, शांतपणे. तिचं प्रेम, वात्सल्य, अपरंपार अजोड, उपमा नसलेलं. तिच्या सामंजस्याला कुठे तोडच नाही. मी तिचे ताठरलेले पाय धरले,
“नाही ग दादी! तू आम्हाला हवी होतीस. सगळ्यांना खूप खूप हवी होतीस,सतत, सदैव आमच्याच सोबत. तू तर आमच्या जीवनाचा कणा होतीस.”
गोठ्यात गंगी हंबरत होती. बदामाच्या झाडावर पक्षी अजून गात होता…
— समाप्त —
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈