श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ ‘भान…’ – भाग – 2 ☆ श्री आनंदहरी ☆
(ऑफीसातले काम घरी घेऊन यावे तसे ती त्याच्या आठवणीची फाईल घरी घेऊन येऊ लागली होती. हातातली कामं झटपट आटपून ती त्या फाईलमध्ये डोके खुपसून बसू लागली होती.) – इथून पुढे. .
अचानक एका रविवारी स्वप्नील घरी आला. त्याला असं अचानक समोर पाहून ती गडबडली.
क्षणभर आनंद लपवावा कि गडबड लपवावी या संभ्रमात ती त्याला ‘ या ‘ म्हणायचं ही विसरली.
आतून दीपक येत असल्याची चाहूल लागली तशी ती सावरली आणि दारातून बाजूला होत ‘ या सर ‘ म्हणाली.
स्वप्नील सोफ्यावर विसावला तोच दीपक बाहेर आला. तिने दोघांची ओळख करून दिली आणि ती चहा करायला म्हणून, पण खरंतर स्वतःचं मन आवरा- सावरायला आत गेली. थोड्याच वेळात चहा घेऊन बाहेर आली तर त्या दोघांच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या. सोनू स्वप्नीलच्या मांडीवर बसून त्याने आणलेला खाऊ खाण्यात गुंग झाला होता. तिला सोनूचं आश्चर्य वाटलंच पण त्याहीपेक्षा जास्त आश्चर्य स्वप्नीलचं वाटलं. काही क्षणातच तो संपूर्ण कुटुंबाचा मित्र झाला होता.
दीपक, स्वप्नील गप्पा मारत चहा घेत होते . ती तिथेच दीपकच्या शेजारी उभी होती. समोरच्या सोफ्यावर बसलेल्या स्वप्नीलची नजर अधून मधून आपल्याकडे वळतेय, क्षणभर खिळून राहतेय याची तिला जाणीव झाली होती. तिलाही स्वप्नीलला पाहत राहावे असे वाटत होते. ती पाहत ही होती. नजरेत नजर गुंतत होती.. तो शब्दांनी दीपकबरोबर बोलत होता पण सूचक नजरेने तिच्याशी बोलत होता.. तिच्या नजरेत नाराजी दिसली नाही याने तो सुखावला होता. चहा पिऊन निघताना त्याने दीपकला घरी यायचं आमंत्रण दिले.सोनूला आणि तिलाही तेच सांगितले.. तो निघून गेल्यानंतर कितीतरी वेळ ती त्याच्या नजरेतले अर्थ शोधत बसली होती… तिला उमजले होते तरीही..तिला ठाऊक होते तरीही.
ऑफिसमधले तांतडीचे काम पूर्ण करेपर्यंत तिला खूपच उशीर झाला होता. सारे ऑफिस तर केव्हाच रिकामे झाले होते .काही काळ तिला कामात मदत करून नंतर स्वप्नील काहीतरी दुसरे, त्याचे स्वतःचे काम करत होता. शिपाई त्यांचे काम संपायची आतुरतेने वाट पाहत होता कारण त्यांचं काम संपल्यावर ऑफिसला कुलूप लावून बरेच लांब असणाऱ्या त्याच्या घरी जायला त्याला उशीर होत होता.
“ मॅडम, झालं काय तुमचं काम ? “
“ हो. संपले. आलेच मी पाच मिनिटात..”
ती वॉशरूम कडे गेली.
“ सर, तुमचे?”
स्वप्नील ‘ झालेच’ म्हणत टेबलावरची फाईल कपाटात ठेवू लागला होता.
तिने टेबलाजवळ येऊन दीपकला कॉल केला आणि पर्स घेऊन बाहेर पडली. स्वप्नील दारातच उभा होता. दोघेही आपापल्या बाईक वरून बोलत निघाले. तिच्या घराकडे वळण्याच्या वळणावर निरोप घेण्यासाठी तिने बाईक उभी केली. स्वतःची बाईक उभी करून तो तिच्या जवळ आला. हॅंडेलवरच्या हातावर घट्ट हात ठेवत तो म्हणाला,
“ मला तू खूप आवडतेस .आय लव्ह यू . मला तू हवी आहेस. “
ती क्षणभर अवाक झाली, अगदी क्षणभरच.. पुढच्याच क्षणी ती जणू या क्षणाचीच आतुरतेने वाट पाहत असल्यासारखी आणि तो क्षण हातातून निसटून जाऊ नये असे वाटत असल्यासारखी ती झटकन म्हणाली,
“ मीही . मलाही तुम्ही हवे आहात..”
क्षणभर ती त्याच्या डोळ्यात पाहत राहिली आणि पुढच्याच क्षणी त्याला ‘ बाय ‘ म्हणून निघून गेली. तिच्याकडून आलेल्या अपेक्षित उत्तराने सुखावलेला तो स्वतःच्या कानावर विश्वास नसल्यासारखा दिग्मूढ होऊन काही क्षण तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे, त्या गडद अंधारात फारसे काही दिसत नसतानाही तिच्या गाडीच्या दूर जाणाऱ्या टेललॅम्पकडे,तो दिसत होता तोवर पाहत राहिला आणि नंतर भानावर येऊन स्वतःची बाईक चालू करून घराकडे निघाला.
हे सारे तिला अपेक्षित आणि हवंहवंसं वाटत असले तरी ती षोडश वर्षीया असल्यासारखी तिचं काळीज धडधडत होतं. आपला श्वासोश्वास वाढलाय असे तिला वाटू लागलं. तिने घराच्या थोडं अलीकडे बाईक उभी केली. दीर्घ श्वास घेतला. उगाचच चेहरा, गळा रुमालाने पुसला आणि स्वतःला सावरून घरात प्रवेश केला. दीपक, सोनू घरी आलेले होतेच.. त्या दोघांकडे न पाहताच गडबडीने टेबलवर पर्स टाकून ‘ आलेचं ‘ म्हणत वॉशरूम मध्ये शिरली.
मनात विचारांचे वादळ घोंघावत होते. कुठेतरी अपराधीपणाची भावना मधूनच वीज चमकावी तशी मनात चमकत होती आणि दुसऱ्याच क्षणी लुप्त ही होत होती. सोनू जवळ आला तरी तिच्या मनात तेच ते विचार येत होते.
“ कामामुळे डोके दुखतंय फार, मी जरा पडते..”
ती दीपकला म्हणाली आणि बेडरूम मध्ये गेली.
“ डोक्याला बाम लावून चोळून डोकं चोळून देऊ का? कि डोक्याला तेल लावून मसाज करू? जरा बरं वाटेल तुला .”
काळजी वाटून दीपक आत येऊन म्हणाला पण तिला त्याक्षणी दीपकचा स्पर्शही नकोसा वाटत होता.
“ नको काहीच. पडते मी जरा, जरा पडले की वाटेल बरं . मग उठून कुकर लावते. “
“ पड तू. कुकर नको लावू, मी सोनूला घेऊन जातो आणि पार्सल घेऊन येतो. तुलाही विश्रांती मिळेल.”
दीपक सोनूला घेऊन बाहेर पडला. ती रिलॅक्स झाली. तिला त्या क्षणी त्याच्यापासून दूर असा एकांत, एकटेपणा हवासा वाटत होता. मनात स्वप्नीलचे विचार होते. त्याचा तो स्पर्श हवासा वाटत होता. त्याला फोन करावा, त्याच्याशी बोलावे वाटत होते. तिने कितीतरी वेळा कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतला पण करू कि नको या संभ्रमात परत बाजूला ठेवला.
एक वेगळ्याच अस्वस्थतेनं तिला घेरले होतं .
मोबाईलवर मेसेजटोन वाजला. तिने आतुरतेने मोबाईल उचलला. तिच्या अपेक्षेप्रमाणे स्वप्नीलचाच मेसेज होता.
‘ थँक्स . खूप आठवण येतेय. खूप दिवस आतल्याआत अस्वस्थ होतो. बोलावं वाटत होतंच.
खूप मिस करतोय तुला. खरे सांगू ?.. तुला पाहिल्यापासून ,भेटल्यापासून मला दुसरे काहीच सुचेनासे झालंय.खरंच….’
तिने मेसेज वाचला , एकदा ,दोनदा, तीनदा,कितीतरी वेळा. रिप्लाय केला. ‘ मलाही. खूप खूप बोलावं वाटतंय. सेम हियर ’ आणि ती विचारात गढून गेली.
तिचं भावविश्व त्या क्षणापासून ढवळून निघाले होते. त्याआधी ती, दीपक आणि सोनू असेच आनंदविश्व होते तिचे. त्यात त्याचा,स्वप्नीलचा प्रवेश झाला होता.. त्या क्षणापासून की त्याआधीच कधीतरी चोरपावलांनी त्याचा प्रवेश तिच्या मनात झाला होता हे कदाचित तिलाही सांगता आले नसते. तिच्या मनात त्याच्याबद्दलच्या विचारांचा, आठवणींचा हिंदोळा झुलत राहायचा, कधी कधी तिच्याही नकळत …
क्रमशः भाग दुसरा
© श्री आनंदहरी
इस्लामपूर जि. सांगली – मो ८२७५१७८०९९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈