सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
जीवनरंग
☆ अनुभव…☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
‘साडेसात वाजले, चला उठायला हवं ‘, असं म्हणत चित्रा बेडरूममधून बाहेर आली. काल रात्री कथा लिहून पूर्ण करता करता दोन वाजून गेले होते. लिहून लगेच ती वाॅटसप ग्रुप्सवर पाठवली आणि त्यानंतर काही वेळाने तिला झोप लागली. तिनं तोंड धुवून, चहा घेतला आणि मोबाईलचं नेटवर्क ऑन केलं,तसं धाडधाड प्रतिक्रिया यायलाच लागल्या तिच्या कथेबद्दल! तिलाही उत्सुकता होतीच, लोकांना आपली कथा कशी वाटली ते जाणून घेण्याची. नेहमीप्रमाणे बरेचसे छान छानचे इमोजी होतेच. पण कथा लक्षपूर्वक वाचून सविस्तर अभिप्राय देणारे चोखंदळ वाचकही होतेच की! चित्राला त्यातच जास्त इंटरेस्ट असायचा.
असेच एक वाचक होते श्री. रमाकांत लिंगायत. त्यांचा अभिप्राय वाचताना चित्राच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य पसरलं.
‘नेहमीप्रमाणेच छान कथा. अगदी वास्तवदर्शी आणि वेगळ्या विषयावर भाष्य करणारी. कसं सुचतं तुम्हां लेखकांना काही कळत नाही बुवा! ग्रेट ! मैत्रिणी अशीच लिहित रहा. बाकी बोलूच प्रत्यक्ष भेटीत.’
मागच्या चार – पाच महिन्यांपासून त्यांचे सविस्तर अभिप्राय येत होते. त्याला वाॅटसपवर प्रतिसाद देता देता एकमेकांविषयी माहितीची देवाणघेवाणही झाली होती.
रमाकांत, साधारण ६५ च्या आसपासचं वय. मुंबईतल्या एका प्रख्यात इंजिनिअरिंग काॅलेजचे प्राचार्य म्हणून निवृत्त झालेले.शिवाय काही वर्षे नोकरीनिमित्त परदेशातही राहून आलेले.
पत्नी गृहिणी आणि दोन मुलं असा त्यांचा परिवार. दोन्ही मुलं विवाहित आणि नोकरीच्या गावी म्हणजे एक बेंगलोरला आणि दुसरा हैदराबादला, अशी स्थायिक झाली होती. संधिवातामुळे बायको आजारी, फारशी घराबाहेर पडत नव्हती. रमाकांत मात्र फिट अँड फाईन ! रोज अंबरनाथहून ठाण्याच्या स्पोर्ट्स क्लबमध्ये टेबल टेनिस खेळायला जायचे, सकाळी साडेपाचच्या लोकलने. अंबरनाथला त्यांनी बंगला बांधला होता.
‘मैत्रीण, आज वेळ आहे का तुला? सकाळी दहा-साडेदहा पर्यंत येऊ शकतो तुला भेटायला. बऱ्याच दिवसांपासून आपण भेटायचं ठरवतोय, पण काही ना काही कारणाने जमलंच नाही.’
चित्रानं घड्याळाकडे नजर टाकली, साडेआठ वाजून गेले होते. साडेदहा पर्यंत तिचं सहज आवरण्यासारखं होतं. शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तींबद्दल तिला विशेष आस्था होती. शालेय जीवनात ती एक हुशार विद्यार्थिनी होती. तिच्या अनेक शिक्षकांशी ती आजही संपर्क ठेवून होती. त्यांच्याबद्दल कायम आदराची भावनाच तिच्या मनात होती. एवढी मोठी, प्राचार्यपद भूषवलेली व्यक्ती आपल्या लिखाणाची दखल घेते, वेळ काढून आपल्याला भेटायला येतेय, आपल्याशी मैत्री करू इच्छिते, याचं तिला अप्रूप वाटत होतं. चला आज चांगली चर्चा आणि वैचारिक देवाणघेवाण होईल, असा विचार तिच्या मनात आला. ‘हो हो, या तुम्ही! मी तुम्हाला माझा पत्ता पाठवते हं! असं म्हणत तिने त्यांना पत्ता पाठवला देखील. कल्याणच्या खडकपाडा भागात होता तिचा फ्लॅट.
चित्रा सध्या एकटीच घरी होती. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. तो चेन्नईला हाॅस्टेलला राहात होता. तीन वर्षांपूर्वीच एका अपघातात तिचा नवरा गेला होता. सासूबाई अधून-मधून असायच्या तिच्याकडे, पण जास्त काळ त्या नागपूरलाच असायच्या मोठ्या दिरांकडे! चित्रा एका नामांकित कंपनीत अधिकारी पदावर होती. पण मुलगा बारावीला असताना, पाच वर्षांपूर्वीच तिनं स्वेच्छा निवृत्ती घेतली होती.त्याचं खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावं, म्हणजे रात्रंदिवस अभ्यासात गर्क असला तरी त्याची आबाळ होऊ नये, हा मुख्य उद्देश होता. निवृत्त होताना तिला भरपूर पैसा मिळणार होताच. एवढी वर्षे धावपळ करण्यात गेली, आता जरा दोघांनी सगळीकडे फिरायचं, मजा करायची असंही त्या नवरा-बायकोंनी ठरवलं होतं. पण विनयच्या अपघाती निधनामुळे ते सर्वच बेत निष्फळ ठरले होते.
आल्या प्रसंगाला धीराने तोंड देऊन , चित्रा आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत होती. तिचा स्वभाव मनमिळाऊ, त्यामुळे नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींचा गोतावळाही भरपूर होता. माणसं जमा करण्याची आवडही होती. लेखनाचा छंद असल्याने, अनेक लेखक-वाचकांशीही ती फोनच्या, वाॅटसपच्या माध्यमातून जोडली गेली होती.
आयत्या वेळी आता पाहुण्यांसाठी कांदेपोहेच करावे असं तिनं ठरवलं. शिवाय घरात फळंही होतीच. स्वतःची अंघोळ वगैरे आवरून, तिनं पोह्यांची तयारी करून ठेवली. वेळेवर फोडणीला घातले की झालं. १०-४० झाले तरी रमाकांत आले नाहीत, म्हणून तिनं फोन केला. तिला वाटलं यांना घर शोधायला वेळ लागला की काय!’ ट्रॅफिकमधे अडकलो होतो. पोचतोय पाच मिनिटात!’ त्यांनी सांगितलं तसं तिनं पोहे फोडणीला घातले. तोवर बेल वाजलीच.
‘ग्लॅड टू मीटर यू डिअर’, असं म्हणून त्यांनी मिठी मारण्यासाठी हात पसरले. चित्रानं नमस्कार करून, त्यांना सोफ्यावर बसायला खुणावलं आणि ती पाणी आणायला कीचनमध्ये गेली. पाणी पिऊन होईस्तोवर पोहे झाले होतेच. ती प्लेटमध्ये पोहे घेऊन आली आणि त्यांना देऊन, आपली प्लेट घेऊन समोरच्या खुर्चीत बसली. बोलता बोलता पोहे कधी संपले, कळलंच नाही. रमाकांत परदेशातल्या गमती-जमती सांगत होते. चहा, फळं ते नाही म्हणाले, दूध चालेल. चित्रा कपभर दूध घेऊन आली. तशी ते म्हणाले, बेडरूम कुठेय तुझी?
चित्रा गोंधळली, ‘काय?तुम्हाला बरं वाटत नाहीये का? काय होतंय? ‘
‘नाही, नाही, आपण बेडवर पडूनच जरा गप्पा मारल्या असत्या. तुला संकोच वाटत असेल स्पष्ट बोलायला, म्हणून मीच सुचवलं.’
क्षणभर चित्राला कळेचना, त्यांना काय म्हणायचे आहे.
तेच पुढे म्हणाले, ‘ अग, एवढं घरी बोलावलंस ते त्यासाठीच ना!कालच्या तुझ्या कथेतली नायिका असंच वागते ना? मी एकदम फिट आहे हं! आता बघ दोघांची परिस्थिती अशी आहे. माझी बायको सदाआजारी आणि तुझा नवराच राहिला नाही. मग मित्र हवाच ना यासाठी! एकमेकांची सोय बघायला! ‘ असं म्हणत ते सोफ्यावरून उठले.
त्यांच्या म्हणण्याचा उद्देश आता तिच्या नीट ध्यानात आला. तिला विलक्षण संताप आला. पण ती घरात एकटी होती. हा प्रसंग संयमानेच हाताळायला हवा होता. आवाज केला तर शेजारी-पाजारी मदतीला आले असते, पण नंतर तिचीच अक्कल काढली असती त्यांनी. एकटी असताना परपुरूषाला घरी बोलवायचं कशाला? तिनं असा काही प्रकार होईल याची कधी कल्पनादेखील केली नव्हती.
तिने मनात दहा अंक मोजले. त्यांना सोफ्यावर बसण्याची खूण केली. ‘तुमचा काही तरी गैरसमज झाला आहे.एकतर लेखक जे लिहितो, त्याचा त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंध असेलच असं नाही ना! समाजात, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे पडसाद, एक माणूस म्हणून त्याच्या मनावर उमटणारच. त्याला कल्पकतेची जोड देऊन, कथेच्या रूपात तो व्यक्त करतो इतकंच! मला अशा प्रकारची मैत्री अजिबात अपेक्षित नाही. मी माझ्या नवऱ्यासोबत खूप छान संपन्न जीवन जगले. त्या आठवणी माझ्यासाठी पुरेशा आहेत. एक चांगला मित्र मिळेल या भावनेनं मी तुमच्याकडे बघत होते. पण तुम्ही मित्र या व्याख्येलाच धुळीस मिळवलंत. तुम्ही एक प्राचार्य म्हणून, ज्येष्ठ व्यक्ती म्हणून, माझ्या मनात जी आदराची भावना होती, तिला धक्का पोचवलात. स्त्री-पुरूषातही निखळ मैत्री असू शकते, पण तुम्ही हा विचारच केला नाही. फार संकुचित विचार आहेत तुमचे. मला गृहीत धरण्यात तुम्ही खूप मोठी चूक केलीत. ‘
‘ हे बोलायला ठीक आहे ग! पण तुलाही मनातून वाटत असेलच ना? मी तेच बोलून दाखवलं. ‘
‘ तुम्ही प्लीज जा आता. मला तुमच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाही ‘,चित्रा म्हणाली. तिच्या मनाचा थरकाप उडाला होता. पण प्रयत्नपूर्वक तिनं चेहऱ्यावर ते दिसू दिलं नाही.
ते अजून सोफ्यावरून उठले नव्हते. आता या माणसाला कसं घराबाहेर काढायचं, असा विचार मनात करत असतानाच चित्राच्या फोनची बेल वाजली.
‘मुग्धा, अभिनंदन! तू तुझी स्वतःची कराटेची संस्था काढतेयस. आणि त्याच्या शुभारंभासाठी तुला तुझ्या गुरूची, म्हणजे माझी आठवण झाली हे ऐकून खूपच छान वाटलं. मी नक्की येणार तुला शुभेच्छा द्यायला.’ असं म्हणून चित्राने फोन ठेवला.
रमाकांत सोफ्यावरून उठून पायात बूट घालत होते.
तिकडे मुग्धा ही काय बोलतेय हे न कळल्याने अवाक् झाली होती.ती काही बोलण्याआधीच चित्राने बोलायला सुरुवात केली होती आणि आता फोनही ठेवून दिला होता.
तासाभराने चित्राने फोन करून तिला सगळं सांगितलं, तेव्हा तिला काय बोलावं हेच सुचेना. एकीकडे चित्रावर काय संकट ओढवलं होतं या जाणिवेनं तिला घाम फुटला होता तर दुसरीकडे तिच्या मैत्रिणीच्या खंबीरपणाचं,समयसूचकतेचं, प्रसंगावधानाचं कौतुक कोणत्या शब्दांत करावं हे मुग्धाला कळत नव्हतं.
चित्रानं मात्र समाजमाध्यमावरील अनोळखी व्यक्तीला आपली व्यक्तिगत माहिती न देण्याचा दृढ निश्चय केला होता. आजचा अनुभव ती कधीच विसरणार नव्हती.
© सुश्री प्रणिता खंडकर
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈