श्री मोहन निमोणकर
🌸 जीवनरंग 🌸
☆ “तिलांजली…” – लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
‘साडेबाराची गाडी आत्ताच गेली. आता दुपारी तीन वाजता लागेल पुढची गाडी नाशिकची. त्याचं तिकीट हवंय का तुम्हाला?’. दादरला एशियाड तिकीट खिडकीमागचा माणूस निर्विकारपणे मला म्हणाला. मी चरफडतच रांग सोडली. दिवस मे महिन्याचे. त्यात टळटळीत दुपार. मुंबईच्या दमट हवेत घामाच्या नुसत्या धारा लागलेल्या. पाठीला अडकवलेल्या अजस्त्र रकसेकचं ओझं मिनिटागणिक वाढत होतं. त्यात संध्याकाळपर्यंत माझं नाशिकला पोचणंही गरजेचं होतं. ज्या साहस शिबिरासाठी मी नाशिकला निघाले होते, ते शिबीर दुसऱ्या दिवशी सकाळपासून सुरु होणार होतं त्यामुळे जमेल तितकं जुनं नाशिक मला त्यापूर्वी बघून घ्यायचं होतं.
आता तीनपर्यंतची वेळ कुठे आणि कशी काढावी ह्या विचारात असतानाच, रांगेत माझ्या मागे असलेल्या माणसाने उपाय सुचवला, ‘घाई आहे तर शेअर टेक्सीने का जात नाहीस मुली? स्टेशनच्या अलीकडे असतात उभ्या गाड्या नाशिकच्या’. त्या माणसाचे आभार मानून मी पाठीवरची पिशवी सावरत स्टेशनकडे जायला वळले, तोच एका बाईंना माझ्या पिशवीचा ओझरता धक्का बसला, मी ‘सॉरी सॉरी’ म्हणत ओशाळून सेक खाली घेतली. त्या बाई ओढून-ताणून हसल्या. ‘रेहने दो, कोई बात नही’, म्हणाल्या. वयस्कर होत्या. साधारण साठीच्या उंबऱ्यात असाव्या. एकदम हाडकुळा, उन्हाने रापलेला चेहेरा, त्यावर ताणून बसवलेली कातडी, खोल गेलेले डोळे, सुंभासारखे चरभरीत केस कसेतरी करकचून आवळून घातलेला इवला अंबाडा, कशीतरी गुंडाळलेली स्वस्त सिंथेटीक साडी, तिसऱ्याच रंगाचं, उन्हात विटलेलं, कडा उसवलेलं पोलकं आणि पायात साध्या रबरी चपला असा त्यांचा अवतार होता. खांद्याला फक्त एक साधी कापडी पिशवी लटकवलेली आणि हातात लाल कपड्यात बांधलेलं एक बोचकं.
‘मुझे नासिक जाना है, टेक्सी कहां मिलेगी बेटा’? त्यांनी विचारलं.
‘मेरे साथ चलिये, मै भी वही जा रही हुं’, मी म्हटलं आणि आम्ही दोघी स्टेशनच्या दिशेने चालायला लागलो. ‘ मै मिसेज पांडे’, त्या म्हणाल्या. उच्चार थेट उत्तरप्रदेशी. मीही माझं नाव सांगितलं. त्यांच्याबरोबर सामान काहीच नव्हतं. ‘क्या आप नासिक में रेहती है’? निव्वळ काहीतरी विचारायचं म्हणून मी विचारलं.
‘नही बेटा, रेहती तो बंबई में हुं, नासिक काम के लिये जा रही हुं’. थंड, भावशून्य स्वरात त्या म्हणाल्या.
‘आप अकेले जा रही है नासिक’? परत एकवार मी काहीतरी बोलायचं म्हणून विचारलं.
‘अकेले कहां? मेरे पती है ना मेरे साथ’, खिन्न, काहीसं विचित्र हसत त्या उद्गारल्या.
‘मतलब?’ काही न कळून मी विचारलं.
‘ये है मेरे पती’ हातातलं आलवणात बांधलेलं बोचकं दाखवत त्या म्हणाल्या. ‘कुछ दिन पेहले आफ़ हो गये. उन्ही की अस्थियां गंगाजी में बहाने जा रही हुं नासिक’.
मी जेमतेम एकवीस-बावीस वर्षांची होते तेव्हा. त्या काय बोलत होत्या हे कळायला मला वेळच लागला अमळ, पण जेव्हा समजलं तेव्हा माझ्या अंगावर सर्रकन काटाच आला एकदम. जरासं थांबून मी त्यांच्याकडे परत एकदा नीट बघून घेतलं. त्यांच्या त्या श्रांत, ओढलेल्या चेहेऱ्यामागची काटेरी वेदना आत्ता कुठे मला जाणवत होती. मांजा तुटलेल्या पतंगासारख्या भासल्या मला पांडेबाई त्या क्षणी, एकाकी, अधांतरी, सगळ्या आयुष्याचं अस्तरच फाटून गेल्यासारख्या जखमी.
‘आपके साथ और कोई नही आया’? न रहावून मी बोलून गेले.
‘कौन आयेगा बेटा? बच्चे तो भगवान ने दिये नही, और सगे संबंधी सब गांव में है’. विमनस्कपणे त्या बोलल्या.
मला काय सुचलं कुणास ठाऊक पण मी त्यांना म्हणाले, ‘अगर आप चाहे तो मै आपके साथ चल सकती हुं’.
‘चलेगी बेटा, बहुत अच्छा लगेगा मुझे और इन्हे भी’. हातातल्या त्या गाठोड्याकडे अंगुलीनिर्देश करत पांडेबाई म्हणाल्या.
एव्हाना आम्ही गाडीतळापाशी पोचलो होतो. पहिल्या गाडीत बसलो. चालक सरदारजी होते. नासिकचे अनुभवी असावेत कारण त्या बाईंच्या हातातलं बोचकं बघून त्यांनी खेदाने मान हलवली. आम्ही गाडीत बसलो. दोघे उतारू आधीच बसले होते. गाडी सुरु झाली. पांडेबाई आपल्याच विचारात हरवल्या होत्या. माझं लक्ष राहून राहून त्यांच्या हातातल्या गाठोड्याकडे जात होतं.
आम्ही नासिकला पोचलो तेव्हा जवळजवळ पाच वाजत आले होते. रिक्षा करून आम्ही दोघी रामकुंडावर गेलो. नाशिक क्षेत्राचं गांव. आम्ही कुंडाजवळच्या पायऱ्या उतरताच तिथल्या सराईत नजरांनी आमचा अंदाज घेतला आणि लगेच दहा-एक गुरुजींनी आम्हाला घेरावच घातला. ‘बोला, काय काय करायचंय’? गुरुजींनी विचारलं. आम्ही दोघीही पार कावऱ्याबावऱ्या झालो होतो. पांडेबाई त्यांच्या डोंगराएव्हढ्या दुःखाने सैरभैर झालेल्या आणि मी ह्या बाबतीतला कुठलाच पूर्वानुभव नसल्यामुळे बावरलेली. तरी त्यातल्या त्यात जरा शांत दिसणाऱ्या, वयस्कर गुरुजींशी आम्ही बोलणं सुरु केलं.
‘गुरुजी, बाराव्याचे विधी करायचेत’, मी म्हणाले.
‘करूया ना. साडेचारशे रुपये पडतील. सगळं सामान माझं. वर दान-दक्षिणा काय करायची असेल ते तुम्ही आपखुशीने समजून द्या’, गुरुजी म्हणाले.
मी पांडेबाईंकडे बघितलं. त्यांनी संमतीदर्शक मान डोलावली.
‘चला तर मग’, गुरुजींनी तुरुतुरु चालत आम्हाला घाटाच्या एका कोपऱ्यात नेलं आणि खांद्याची पडशी उघडून सगळं सामान मांडायला सुरवात केली. सभोवताली अनेक माणसं थोड्या-फार फरकाने तेच विधी करत होती. सगळीकडून मंत्रोच्चारांचे आवाज येत होते. संध्याकाळच्या सोनेरी ऊनात गोदावरीचं पाणी हलकेच चमचमत होतं. मागून देवळांचे उंच कळस डोकावत होते. फार सुंदर संध्याकाळ होती, तरी सगळीकडे एक भयाण सुतकीपणा भरून राहिलेला होता. इतर तीर्थक्षेत्रात असते तशी आनंदी, उत्साही गडबड रामकुंडावर नव्हती. मृत्यू जणू अजून चोरपावलाने तेथे वावरत होता.
गुरुजींनी लगोलग दोन पाट मांडले. फुलं, दर्भाच्या अंगठ्या, तांब्या, काळे तीळ, पिंड वगैरे सामान पडशीतून काढून व्यवस्थित रचून ठेवलं आणि नको तो प्रश्न विचारलाच,
‘बरोबर कुणी पुरुष माणूस नाहीये का? विधी कोण करणार’?
‘मै करूंगी. इनका अग्नीसंस्कार भी मैने किया था और ये संस्कार भी मै करूंगी’, ठाम स्वरात एकेक शब्द तोलून मापून उच्चारत पांडेबाई म्हणाल्या. गुरुजींनी एकवार डोळे रोखून आमच्याकडे बघितलं आणि म्हणाले, ‘ठीक आहे, या बसा’.
पांडेबाईनी गुरुजींनी सांगितलेल्या जागेवर अस्थिकलश ठेवला आणि त्या पाटावर बसल्या. मी त्यांच्या शेजारी उभी राहून सर्व बघत होते. मंत्रोच्चार सुरु झाले. गुरुजींनी सांगितलेले उपचार पांडेबाई मनोभावे करत होत्या. शेवटी अस्थिकलश उघडायची वेळ आली. ‘अपनी बेटी को बुलाईये, अस्थिकलश उसके हाथोंसे खुलवाना होगा’, माझ्याकडे दृष्टीक्षेप करत गुरुजी म्हणाले. मी चमकून त्यांच्याकडे पाहिलं. ‘अहो, मी त्यांची मुलगी नाहीये’, असं म्हणणार तेव्हढ्यात माझं लक्ष पांडेबाईंच्या चेहेऱ्याकडे गेलं. त्या माझ्याचकडे बघत होत्या. स्थिर नजरेने. त्या दृष्टीत कुठेही विनवणीचा वा दीनवाणेपणाचा भाग नव्हता, होता तो फक्त आपलेपणाचा अधिकार.
भारल्यासारखी मी पुढे झाले आणि त्या लाल कापडाची गाठ सोडली. उन्हाने तापलेल्या त्या तांब्याचा तप्त स्पर्श त्या कपड्यातूनही माझ्या कापऱ्या बोटांना जाणवत होता. हरवल्यागत मी गुरुजींच्या सुचनांचं पालन करत होते. माझ्या ओंजळीत मुठभर काळे तीळ देऊन गुरुजी म्हणाले, ‘आता गेलेल्या आत्म्याला तिलांजली द्या’, गंभीर आवाजात त्यांचे मंत्रोच्चार सुरु झाले, माझ्या बोटांमधून ओलसर काळे तीळ अस्थिकलशावर पडत होते. शेजारी पांडेबाई हात जोडून उभ्या होत्या. त्यांच्या मिटल्या डोळ्यातून घळघळ पाणी वहात होते.
गुरुजींचे मंत्र संपले. अस्थिकलश उचलून ते म्हणाले, ‘चला’, आणि कुंडाच्या दिशेने चालू लागले. त्यांच्या मागोमाग आम्ही दोघी निघालो. चिंचोळ्या, दगडी फरसबंद वाटेवरून आम्ही दोघी चालत होतो. सतत हिंदकळणाऱ्या लाटांमुळे वाट पार निसरडी झाली होती. पाय घसरेल म्हणून मी जपून पावले टाकत होते आणि माझ्या हाताचा आधार घेऊन पांडेबाई सावकाश चालत येत होत्या. स्वतःच्या पोटच्या मुलीच्या आधाराने चालावं इतक्या निःशंकपणे.
आम्ही कुंडापाशी आलो. गुरुजींनी कलश पांडेबाईंच्या हातात दिला. ‘अब आप मां-बेटी मिलकर इस कलश को गंगा में रिक्त किजीये’, गुरुजी बोलले आणि दोन पावले मागे सरकून उभे राहिले. आम्ही दोघींनी मिळून कलश हातात घेतला. माझ्या मऊ, मध्यमवर्गीय हातांना पांडेबाईंच्या आयुष्यभर काबाडकष्ट केलेल्या हातांचा राठ, खरबरीत स्पर्श जाणवत होता. एखाद्या जाड्याभरड्या गोधडीच्या स्पर्शासारखा होता त्यांचा स्पर्श, रखरखीत, तरीही उबदार. आम्ही दोघींनी पाण्याच्या काठावर जाऊन अस्थिकलश हळूच तिरका केला. अस्थी पाण्यात पडू लागल्या. राखेचे मऊ, पांढुरके कण क्षणभर वाऱ्यावर गिरकी घेऊन कुंडाच्या पाण्यावर किंचित रेंगाळले आणि दिसेनासे झाले. मी कधीही न पाहिलेल्या एका व्यक्तीची शेवटची शारीर खूण निसर्गात विलीन होत होती. माझ्याही नकळत मी हात जोडले आणि ज्या अनाम, अनोळखी माणसासाठी मी लेकीचं कर्तव्य पार पाडलं होतं त्याला सद्गती लाभो अशी मनापासून प्रार्थना केली.
गुरुजींना दक्षिणा देऊन आणि त्यांचा निरोप घेऊन आम्ही गोदातीरावरून निघालो. आता सूर्य मावळला होता, पण आकाश अजूनही लाल-केशरी रंगात माखलं होतं. काळोख एखाद्या मखमली शालीसारखा हळूहळू उलगडत होता. मी पांडेबाईना रिक्षापर्यंत सोडायला गेले. त्यांना लगेचच मुंबईला परत जायचं होतं. रिक्षात त्यांना बसवून दिल्यावर माझा हात हातात घेऊन त्या बोलल्या, आधीच्याच ठाम, आश्वस्त स्वरात, ‘तुम संतान रही होंगी उनकी किसी जनम में इसीलिये आज ये काम हुआ तुमसे’. माझ्या केसांवर एक मायेचा हात ओढून त्या सावरून बसल्या. रिक्षा सुरु झाली. रिक्षा दिसेनाशी होईपर्यंत मी त्या दिशेने बघत होते. माझ्या हातांना मघाशी जाणवलेला अस्थींचा, काळ्या तिळांचा थंडगार स्पर्श अजून विझला नव्हता.
लेखिका : सुश्री शेफाली वैद्य
संग्राहक : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈