श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ दोष ना कुणाचा… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(असा विचार करताना कॉलेजमधल्या आवारात पिवळ्या गुलाबावर कळी फुलली होती. कोणी पाहत नाही हे पाहून हळूच ती खुंटली आणि पर्समध्ये टाकली.) – इथून पुढे —
मुन्नीच्या घरी गेलो. तर मुन्नीची आई आणि भाऊ खुर्चीवर बसून कॉफी पित होते. मुन्नीच्या भावाकडे मी पाहत राहिले. अनोळखी तरुण मुलाकडे सतत पाहू नये हे माहीत असूनही त्याच्यावरुन नजर बाजूला करु नये असे वाटत होते. विलक्षण आकर्षण होते त्याच्यात. सरळ नाक, गोरा रंग, चेहर्यावर हुशारीची लकाकी आणि हसतमुख. मी पर्स उघडून गुलाबकळी बाहेर काढली आणि हळूच त्याच्या समोर धरली. त्याने माझ्याकडे पाहून स्मित केले आणि गुलाबकळी घेण्यासाठी हात पुढे केला. माझ्या बोटांना त्याच्या बोटांचा ओझरता स्पर्श झाला. त्याच्या बोटांचा स्पर्श होताच, सार शरीर थरारलं. पुरुषांचा स्पर्श घरीदारी होतच असतो. पण शरीरात अशी स्पंदने झाल्याचे कधी जाणवले नाही. मुन्नीच्या दादात काहीतरी विलक्षण जादू होती खरी.
आणि मग मी या घरी कधी मुन्नीसोबत कधी एकटी जातच राहिली. मुन्नीचा दादा नेहमी कॉलेजात किंवा घरी असेल तेव्हा त्याच्या खोलीत बंद दाराआड अभ्यास करत असायचा. मला आता पक्के माहीत झाले होते, त्याच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असेल तर तो घरी आहे, आणि त्याच्या खोलीचा दरवाजा उघडा असेल तर समाजव तो घरी नाही. मुन्नी खूपच लाडात वाढलेली. त्यामुळे तिचा घरात आरडाओरड चालायचा. मग मी तिला दटवायचे. दादाचा अभ्यास सुरु आहे ना, आवाज कमी कर. मुन्नीची आई गालातल्या गालात हसायची.
मुन्नीच्या घरचा वातावरण मला आवडायचं. सर्वजण प्रेमळ आणि एकमेकांची थ्ाट्टा मस्करी करत रहायचे. मुन्नीचे बाबा फक्त रविवारी घरी असायचे. पण घरी असले की, दोन्ही मुलांसमवेत गप्पा, आपल्या धंद्यातल्या गोष्टी, मुलांचा अभ्यास, नातेवाईकांकडे जाणे असा मस्त कार्यक्रम असायचा. मुन्नीची आई म्हणजे मुन्नीची मैत्रीणच. मुन्नी आणि मुन्नीचा दादा आपल्या आईला कॉलेजमधील मित्र-मैत्रिणींच्या गंमतीजमती सांगायचे आणि एकदम मोकळं वातावरण ठेवायचे. उलट आमच्या घरी हिटलरशाही. बाबा रागीट आणि हेकेखोर. त्यांच्यापुढे कुणाचे काही चालायचे नाही. आमची आर्थिक स्थिती यथातथाच. बाबा एका केमिकल कंपनीत केमिस्ट म्हणून नोकरी करीत होते. ते एकटेच मिळवणारे आणि आम्ही चारजण खाणारे. माझी आईमात्र कमालीची सोशिक. संसार काटकसरीने करणारी. तिचे सर्वगुण माझ्यात आहेत असे सर्वांचे म्हणणे. पण बाबांसमोर बोलायला मला भीती वाटते. त्यांनी एकदा निर्णय घेतला म्हणजे घेतलाच. आई बिचारी भांडण नको म्हणून पडतं घ्यायची. आमच्या घरच्या या कोंदट वातावरणामुळे मी मुन्नीच्या घरी वारंवार जायला लागले आणि कळायच्या आधी मुन्नीच्या दादाच्या प्रेमात पडले. मुन्नीचा दादा इंजिनिअर झाला आणि बेंगलोरला निघाला पण. माझे काळीज कासावीस झाले. आता तो नेहमी नेहमी दिसणार नाही हे समजत होते. पण मला वाटत होते. तो मला आपल्या प्रेमाबद्दल बोलेल. अगदी ट्रेन सुटेपर्यंत मला आशा वाटत होती. त्याच्या डोळ्यात माझे प्रेम दिसत होते. मग ओठांवर का येत नव्हते?
मुन्नीचा दादा बेंगलोरला गेला आणि काही महिन्यात मुन्नी पुण्याला गेली. मी मुन्नीच्या घरी जातच राहिले. मुन्नीच्या दादाची खबरबात घेत राहिले. मला वाटायचे. मुन्नीची आईतरी मला विचारेल? ती पण गप्प होती. मी मुलगी, आपल्या संस्कृतीत मुली असे उघड उघड प्रेम दाखवतात का? केव्हा केव्हा वाटत असे, मी नोकरी करणारी नाही म्हणून मुन्नीचा दादा माझा विचार करत नाही की काय? हल्ली सर्वांना नोकरीवाली बायको हवी असते. मुन्नीचा दादा आपले प्रेम व्यक्त करील यासाठी जीव आसूसला होता. तीन महिन्यांपूर्वी मुन्नीची आई म्हणाली, अगं वल्लभ कंपनीत असिस्टंट मॅनेजर झाला. आता एक्सटर्नल एम.बी.ए. करतोय. तेव्हा मात्र मी मनात घाबरले. हा असाच शिकत राहणार असेल तर माझे काय?
आमच्या घरी गेली दोन वर्षे माझ्या लग्नाचा विचार सुरु होता. मी गप्पच होते. पण गेल्या आठवड्यात पुण्याच्या मावशीने तिच्या पुतण्याचे म्हणजेच विनोदचे स्थळ आणले. आणि सर्वजण हुरळून गेली. आईवडिलांचे म्हणणे सोन्यासारखा मुलगा आहे. असा नवरा मिळणे म्हणजे मिताचे भाग्य. माझ्या इतर मावश्या, मामा यांचे हेच म्हणणे. मी विनोदला कोणत्या तोंडाने नाही म्हणणार होते. वल्लभ कडून निश्चित काही कळत नव्हते, किंवा वल्लभची आई ठोस काही बोलत नव्हती. माझ ‘मौनम्’ हिच सम्मती समजून आईबाबा तयारीला लागले सुध्दा. मी मुन्नीला फोन करुन माझे लग्न ठरतयं हे कळविले. म्हटलं वल्लभकडून किंवा वल्लभच्या आईवडिलांकडून काही हालचाल होते का हे पहावे. दोन दिवस वाट पाहून काल शेवटी वल्लभच्या घरी गेली. आईना सर्वकसे गडबडीत ठरते हे सांगत होते. आता लग्न करुन पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलियाला जावे लागणार हे सांगताना डोळ्यातून पाणी वाहू लागले. एवढ्यात खोलीचा दरवाजा उघडून वल्लभ बाहेर आला. एक क्षणभर त्याची आणि माझी नजरानजर झाली. रात्रभर झोप न झाल्याने ताठरलेल्या डोळ्यांनी त्याने माझ्याकडे पाहिले. माझ्याकडे दुर्लक्ष करुन आईना बँकेत जाऊन येतो असे म्हणून तो निघाला. आईने त्याला हाक मारुन, मिता लग्नाचे सांगायला आली रे वल्लभ असे म्हणाली. आणि बाहेर पडणारा वल्लभ मागे आला. आणि ‘‘अभिनंदन’’ असे म्हणून धाड्कन दरवाजा लावून बाहेर पडला.
– आई –
काल मिता आणि विनोद यांचे लग्न झाले. मुन्नी मैत्रिणीच्या लग्नासाठी मुद्दाम पुण्याहून आली. मी मुन्नीच्या बाबांना एक दिवस घरी थांबायला सांगितले. आणि आम्ही तिघेही लग्नाला गेलो. मुन्नी कार्यालयात गेली ती मिताच्या खोलीत तिची लग्नाची तयारी करायला. लग्नात मिताच्या शेजारी विनोदला पाहताना खूप त्रास होत होता. मुन्नीचे बाबापण गप्प गप्प होते. लग्नाच्या मंगलाष्टका सुरु झाल्या आणि मला वाटले या आनंदाप्रसंगी मला आता हुंदका येणार. कसे बसे रडू आवरले. मिता विनोदला भेटायला स्टेजवर गेलो. मला पाहताच मिता गळ्यात पडली. तिच्या डोळ्यातील दोन अश्रू माझ्या खांद्यावर पडले. आम्ही तिला अहेर केला आणि निघालोच. बाहेर पडून गाडी स्टार्ट करता करता हे म्हणाले, मला वाटलं होतं, वल्लभचं मिताशी लग्न होईल. हे असे कसे झाले ? मी म्हटले, वल्लभच्या मनात मिता होतीच. पण तो करियरच्या मागे लागला. मिताला तो गृहित धरुन बसला. आता दुखावलाय. मिताने तरी किती वाट पाहायची. प्रेमात पुरुषाने पुढाकार घ्यायला नको? तो तुमच्यावर गेलाय. मन मोकळ करावं माणसाने. नुसतं शिक्षण, शिक्षण… मिता किती दिवस वाट पाहिल याची?
मुन्नीचे बाबा शांतपणे गाडी चालवत होते, घरी येईपर्यंत कोण कोणाशी बोलले नाही. घरी आल्यावर कपडे बदलले. आणि बेडवर शांतपणे डोळे मिटून पडले. पहिल्यांदा मुन्नीसोबत आलेली १५-१६ वर्षाची मिता ते आज लग्नात शालू घातलेली मिता, मिताची अनेक रुपे डोळ्यासमोर आली. फार काहीतरी गमावलयं अशी हुरहूर मनाला लागून गेली. यात माझे काही चुकले का? या दोन तरुण मुलांची मने ओळखून मी पुढाकार घ्यायला हवा होता का? का नाही मी वल्लभला मिताबद्दल विचारले आणि मिताला वल्लभबद्दल? आता पुढे वल्लभ काय करील? विसरेल का तो मिताला आणि मिता वल्लभला ?
होय, वल्लभ आणि मिताप्रमाणे माझेपण चुकलेच. आता ही हुरहूर आयुष्यभर मन पोखरणार. त्रिकोणाच्या दोन बाजू तयार होत्या तिसरी बाजू त्याला जोडण्याची गरज होती.
मी कुस बदलली आणि उशीत डोकं खूपसून रडू लागले.
— समाप्त —
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈