श्री मेघ:श्याम सोनावणे
जीवनरंग
☆ ओली भेळ आणि गेलेली वेळ…! — लेखिका : सुश्री रमा ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆
खूप दिवसांनी पक्याचा फोन…
“नाक्यावर भेट, सत्याच्या भेळ कट्ट्यावर… सगळेच येतोय…”
सलग तीन दिवस सुट्टी आली होती… घरात जाम सडलो होतो. मॅच, वेब सिरीज सगळं पाहून झालं, पोटभर झोप काढून झाली, चवीचवीचं खाऊन झालं, तरी कंटाळा आला होता… आत्ता पक्याचा फोन आला आणि अंगात एकदम तरतरी आली !
बायकोला सांगून निघणार इतक्यात छोटी चिमणी आडवी आली… “बाबा, तू आज मला बागेत नेणार होतास, आता नको जाऊ बाहेर!”
“नेक्स्ट संडे जाऊ नक्की हां…” हे मी म्हणता क्षणीच भला मोठा भोंगा सुरू झाला.
मग बायको आडवी आली, “कशाला चिमूला उगाच प्रॉमिस करतोस? आज मला पण बाहेर पाणी पुरी खायला घेऊन जाणार होतास… दोन दिवस झाला ना आराम? साड्यांच्या एक्झिबिशनला पण घेऊन जाणार होतास!”
“नेक्स्ट संडे नक्की…”
“गेला महिना भर हेच सांगतोय तू…!” डोळे वटारून बायको करवादली, बॅकराऊंड ला भोंगा सुरूच होता.
“आम्ही मित्र किती दिवसांनी भेटत आहोत गं…”
“मॅच पाहायला आत्ता दहा दिवसांपूर्वी एकत्र जमला होतात ना…?”
बाकी कुंडली बाहेर यायच्या आत वटारलेले डोळे आणि चिमणा भोंगा दोन्हीकडे दुर्लक्ष करून मी पळ काढला.
भेळ कट्यावर आलो… सत्या भेळेच्या दुकानात गिऱ्हाईक सांभाळत होता. बाहेरून मी तोंडाने ‘टॉक’ आवाज करून त्याला बोलवलं..
“बस कट्ट्यावर… येतो अर्ध्या तासात…”
मी एकटाच लवकर आलो होतो. अजून कुणी चांडाळ जमले नव्हते. मी सुकी भेळ घेऊन आलो… मनात सत्या दिवसाला कसा आणि किती छापत असेल याचा हिशोब मांडत बसलो.
सुट्टीमुळं दुकान भरलेलं होतं. सत्या, त्याचा भाऊ आणि बापू फुल्ल खपत होते…
इतक्यात एक आज्जी-आजोबा आले. आजोबांचं वय अंदाजे ७० आणि आजीचं ६५ असावं. आजीला त्यांनी दुकानाच्या गर्दीत न बसवता माझ्या इथं मोकळ्या कट्ट्यावर बसवलं.
“बाळा, मी आत जाऊन भेळ सांगून येतो. जरा हिच्याकडे लक्ष ठेवशील का?”
“हो… या…” इती मी.
मनात विचार आला… ‘वा ! काय हौस आहे भेळ खायची आजी आजोबांना… इथे आपण बायकोला अजून टांग मारतो!’
आजी शून्यात बघत बसल्या होत्या. चेहरा एकदम निर्विकार. आजोबा आले आणि आजीशी गप्पा मारायला लागले. पण आजीच्या चेहऱ्याची रेष हालेल तर शपथ…
“आज त्याला सांगितलंय… दाणे घालू नको, तुला त्रास होतो ना चावायला, जास्त कोथिंबीर, जास्त शेव पण घालायला सांगून आलोय. येईलच सत्या भेळ घेऊन हां…” आजोबा आजीच्या हातावर थोपटत बसले. पण आजी एकदम फ्रीझ मोड मध्येच.
तितक्यात मिल्या आणि विक्या आले. एकेक कटींग मागवून आमच्या गप्पा सुरू झाल्या…
सत्यशील छोट्याशा द्रोणात भेळ घेऊन आला. ती त्यानं आजोबांना दिली, त्यांना वाकून नमस्कार केला, “आजी भेळ खाऊन आवडली का सांग गं!” असं काही बोलून आम्हाला जॉईन झाला.
सत्या कस्टमर्सशी इतकी सलगी का दाखवत होता, हे आम्हाला समजलंच नाही. सत्याचं हे रूप आम्हाला नवीनच होतं. खुणेनं मी त्याला ‘काय हे?’ असं विचारलं, तेव्हा “आई आली की सांगतो,” म्हणाला मग आम्ही पण जास्त विचारत बसलो नाही.
आमच्यात सगळ्यात अतिशहाणा मिलिंद होता… चहा पित फिदीफिदी हसत म्हणाला, “काय राव रोमँटिक आहेत आजोबा… दोघं एका द्रोणात भेळ खातायत!”
सत्यानं त्याला जोरात चिमटा काढून गप केलं. पण आजोबांनी ऐकलंच आणि त्याला जवळ बोलावलं…
“अरे बाबा, करायच्या वेळी रोमान्स केला असता तर काय हवं होतं रे? आज ही वेळ कदाचित आलीच नसती… पण एक लक्षात ठेव, आपल्याला माहीत नसेल, तर आपण काही बोलू नये!”
मिलिंद एकदम वरमला. आजीच्या नजरेतला तो निर्विकार भाव पाहून मिल्या अस्वस्थ झाला. मिल्यानं माफी मागितली आणि आमच्या कंपूत सामील झाला.
सत्यानं आणि मी मिलिंदला चागलं झापलं. तितक्यात सत्याई सत्याच्या बापूला घरचा चहा घेऊन आली.
प्रेम करण्यात या बायकांचा हात कुणी धरू शकत नाही… भेळेच्या दुकानाशेजारी चहाची टपरी आहे, पण सत्याई, बापूला घरचाच चहा आवडतो, म्हणून घरून चहा करून आणते. सत्याच्या आईला आम्ही ‘सत्याई’ म्हणत असू.
सत्यानं आईला हाक मारली आणि त्या आजी आजोबांची गोष्ट आम्हाला सांगायला सांगितली. मग सत्याईनं जे सांगितलं ते सगळं अचंबित करणारं होतं!
आजोबांचं नाव अविनाश भोळे… नाव ऐकून आम्ही एकदम चमकलो! भोळे कंपनीच्या उदबत्त्या, धूप, लोबान आजही घराघरात वापरले जात होते. आमच्या लहानपणापासून आम्ही घरात ‘A.B.’ कंपनीच्याच उदबत्या वापरल्यात… ते हे भोळे…?
सत्याई सांगत होती…
भोळे आजोबांचा तेव्हा एक छोटासा धंदा होता. आजोबांचं लग्न उषा आजीशी झालं आणि आजोबांना त्यांच्या धंद्यात एकदम यश मिळायला लागलं. कामानं आणि यशानं एकदम वेग घेतला. लग्नानंतरचे नवतीचे दिवस फुलपाखरू बनून उडून गेले.
सुरुवातीला आजोबा जमेल तसा वेळ आजीला द्यायचे. पण हळू हळू सगळं बदलत गेलं… आजोबांना कामाची, यशाची, पैशाची झिंग चढत गेली.
बघितलं तर सगळं आलबेल होतं. लक्ष्मी घरी पाणी भरत होती. सुबत्ता होती, पण सगळं गोड असून कसं चालेल ना! यात वाईट एकच गोष्ट अशी होती, की आजीची कूस उजवत नव्हती… आजी या दु:खात होती आणि आजोबाही कामात खूप गुंतत गेले होते. त्यांना सुद्धा या गोष्टीची खंत होती पण ते कामात मन गुंतवून घेत होते. आजी मात्र हा मानसिक त्रास एकटी सहन करत होती.
आजी मनापासून आजोबांचं सगळं करायची… खाण्या पिण्याच्या वेळा, आवडी निवडी… पण आजीलाही काही इच्छा असतील, ती मातृसुखासाठी आसुसलेली आहे, मनानी कष्टी आहे, तिलाही काही हवं नको पाहायला हवं, वेळ द्यायला हवा, हेच आजोबा विसरले होते.
आणि एक दिवस चमत्कार झाला… आजीला बाळाची चाहूल लागली ! आजीला वाटलं आता तरी आजोबा वेळ देतील, पण आता आजोबांना कामापुढे काही सुचत नव्हतं.
घरी काळजी घेणार मोठं कुणी नव्हतं. एक मुलगी त्यांनी आजीची काळजी घ्यायला सोबत आणून ठेवली होती. पण आजीला आजोबांची गरज होती. आजोबा म्हणायचे, “आता छोटे भोळे येतील, तर व्यवसाय अजून वाढवूयात…” ते सतत काम-काम-काम हाच जप करायचे.
यातच आजीला सतत आंबटचिंबट खायचे डोहाळे लागले.. सोबतीची मुलगी हवं ते बनवून देई, पण एक दिवस आजीनी हट्ट केला की तिला बाहेरचीच ओली भेळ खायचीय!
आजोबा म्हणाले, “घरी बनवून खा.”
आजी म्हणाली, “नाही खाणार.”
आजोबा म्हणाले, “घरी आणून देतो!”
आजी म्हणाली, “तशी नाही खाणार… आपण सोबत जाऊन एकाच ताटलीत बाहेरच खायची…!”
महिना झाला… आजीला आजोबा ‘आज जाऊ’, ‘उद्या जाऊ’ करत होते.
एक दिवस आजी हट्टालाच पेटली. रड रड रडली… “नाही नेलं आज तर आत्ताच माहेरी निघून जाईन, परत येणार नाही,” म्हणाली.
हे शस्त्र उपयोगी ठरलं. आजी एका संध्याकाळी गजरा माळून, सजून धजून तयार राहिली, पण आजोबा आलेच नाहीत! आजींनी कामाच्या ठिकाणी टेलिफोन केला तर आजोबा मीटिंग घेतायत असं कळलं…
डोहळतुली बाई काही वेळा हळवी होते, काही वेळा चिडचिड करते. तिच्या मनाचे कल बदलत असतात.
आजोबा सांगून पण आले नाहीत याचा आजीला खूप राग आला… तिरीमिरीत आजी उठली, भलं थोरलं पोट घेऊन निघाली आणि उंबर्याला अडकून पडली…! क्षणात सगळं बिनसलं… होत्याचं नव्हतं झालं…!!!
आजी मरणाच्या दारातून परत आली… पण येणारा नवा जीव यायच्या आधीच देवाला प्यारा झाला! याचा आजीला भयानक मानसिक धक्का बसला. ती पडली तेव्हा डोक्याला वर्मावर मार बसला म्हणून, की बाळ गेलं हा मानसिक धक्का बसून, माहीत नाही… पण आजी ही अशी झाली!
तिची अनेक गोष्टींची पार ओळखच पुसली गेली. देव, यांत्रिक मांत्रिक, डॉक्टर, सगळं झालं, पण आजी अशी निर्जीव झाली ती आज पर्यंत. आजोबा या गोष्टीमुळं खूप हादरले… या सगळ्याला त्यांनी स्वतःला जबाबदार धरलं.
चाळीस वर्षांपूर्वीचा तो दिवस आणि आजचा दिवस… आजोबा आजीला महिन्यातून एकदा तरी भेळ खायला घेऊन येतात. त्यांना वाटतं कधीतरी भेळ खाऊन तिला जुनं काही आठवेल. तिला आपण आठवू, तिचा सगळा राग ती बाहेर काढेल. आजही ते म्हणतात…
“देव मला इतकी कठोर शिक्षा देणार नाही… तिला एकदा तरी मी आठवेन!”
आजोबांकडे बघितलं तर आजोबा आजीला प्रेमानं एकेक घास भरवत होते.
“सत्याई, तुला कसं माहीत गं हे सगळं?” विक्यानं विचारलं.
“अरे, आजीला सोबतीला जी मुलगी ठेवली होती ना, ती मीच होते ! हे सगळं माझ्या डोळ्यासमोर घडलंय…!”
आम्ही सगळे वेगळ्याच मूड मध्ये गेलो होतो… मला एकदम तो चिमणा भोंगा आणि माझं वटारलेल्या डोळ्यांच प्रेम आठवलं…
“चल यार, मी निघतो… चिऊला बागेत आणि हिला पाणी पुरी खायला घेऊन जायचंय!”
आजी-आजोबाही भेळ खाऊन निघाले… सत्या आणि मी पटकन त्यांना आधार देऊन त्यांच्या गाडीपाशी सोडायला आलो. तितक्यात सत्याईनं एक चाफ्याचं फुल आणून आजीच्या अंबड्यात खोचलं. चाफा चाचपत आजी पहिल्यांदा एकदम गोड हसली. आजोबा पण त्यामुळे खुष झाले.
दोघं गाडीत बसताना आजोबा म्हणाले, “मुलांनो, तरुण आहात, एक सांगतो… ऐका, वेळेला जपा… आज करायचं ते आजच करा! एकदा का वेळ गेली की गेली… मग आयुष्यात येतो तो फक्त यांत्रिकपणा…!”
आणि आजीकडे बघत म्हणाले, “ओली भेळ कशी लगेच खाण्यात मजा, नंतर ती चिवट होऊन जाते! मला हे समजलं तेव्हा खूप उशीर झाला होता. म्हणून सांगतो… आयुष्यात योग्य वेळीच प्रत्येक गोष्टीला न्याय द्यायला हवा. उद्याची खात्री द्यायला आपण देव नाही… कायम ‘आज’ मध्ये जगा. चला निघतो, उषा दमली असेल आता !”
…. हे ऐकून डोळ्यात पाणी कधी जमा झालं, समजलंच नाही… पण सगळ्यांना ‘बाय’ करून मी सुसाट वेगानं घरी निघालो…
लेखिका : सुश्री रमा
संग्राहक : श्री मेघ:श्याम सोनावणे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈