डॉ. शैलजा करोडे
🌸 जीवनरंग 🌸
☆ बॅलन्सशीट – भाग – १ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆
सकाळी साडेपाचचा अलार्म वाजला. चला उठायला हवं, पण उठवलेच जात नाही आहे. शरीरच नकार देतंय. अंगात तापाची कणकण वाटतेय. आज रजा घ्यावी काय ऑफिसातून? नको, कामाचं आधीच प्रेशर आहे, त्यात रजा म्हणजे दुष्काळात तेरावा महिनाच म्हणावा लागेल . कितीही उपसला तरी कामाचा ढिग काही कमी होत नव्हता. या कर्ज विभागात तर कामाची कमतरताच नसते. जुनी कर्ज प्रकरणे, त्यांची वसूली, त्याचा पाठपुरावा, वेळोवेळी त्यांना पाठविलेल्या नोटिसा, दरवर्षी घेतले जाणारे बी सी लेटर्स, क्षेत्रीय व विभागीय कार्यालयाने वेळोवेळी मागविलेली माहिती, स्टेटमेंटस्, नवीन कर्ज प्रकरणे, त्यांची सगळी कागदपत्रे, बॅलन्सशीटचे विश्लेषण करणे, खाते एनपीए होऊ नये म्हणून प्रयत्न करणे, एनपीए झालेले खाते पुन्हा ॲक्टीव्ह करण्यासाठी झटणे, एक ना हजार अशी कामे, जीव नुसता मेटाकुटीला यायचा. काही वेळा मनात विचार यायचा, घ्यावी स्वेच्छा निवृत्ती, पण दुसर्याच क्षणी मन म्हणायचं, ‘आव्हानांना घाबरतेस काय ? स्विकार चॅलेंज आणि चल पुढे, प्रामाणिकपणे काम करायचे. मग कसल्या अडचणी ?’
घड्याळ बाबाकडे लक्ष गेले. बापरे सहा वाजलेत. उठले. सकाळची सगळी आन्हीकं आटोपली. आईला उठवलं, शंभरवर्षीय आई सर्वस्वी आम्हां भावंडांवर अवलंबून होती. तिला दात ब्रश करायला लावले. तिची वेणी घातली, स्नान उरकलं, चहा पाजला.
आईला सांभाळणारी बाई नऊ वाजेला यायची. मी फटाफट स्वयंपाक उरकला, डबा भरला व धावतपळत ऑफिस गाठलं.
आपल्या टेबलाशी आले. पी सी चालू केला आणि डे बिगीनला सुरूवात केली. काही महत्वाचे ईमेल आहेत काय पाहिले. त्यांना उत्तरे लिहिली. ग्राहकांच्या काही तक्रारी आहेत काय ते पाहिलं. एक तक्रार होती, त्याचा समाधानकारकपणे निबटारा केला.
इतक्यात माझ्या पी सी वर माझ्या वरीष्ठांचा मेसेज आला. मॅडम भेटून जा.
मी केबिनमध्ये गेले. “निलीमा मॅडम तुलसी पाईप्स, गौरव इंडस्ट्रीज, प्रथमेश रि रोलिंग, प्रसन्ना सिल्क मील यांच्या बॅलन्सशीटचं ॲनालिसिस करायचं आहे. तुम्ही केली काय सुरूवात. आम्हांला अगदी अग्रक्रमाने हे काम करायचं आहे. आता हा जानेवारी महिना, मार्चला आपलं क्लोजिंग. त्याच्या आत ही कर्जे मंजूर झाली पाहिजेत जेणे करून आमची तोट्यात गेलेली शाखा हा तोटा भरुन नफ्याकडे वाटचाल करील. नफा तर नाही होणार लगेच, पण आमचा तोटा तर कमी होईल. हळूहळू आमची ही गाडी राईट ट्रॅकवर आली कि पुढील भविष्यही मग उज्वल राहिल. यासाठी तुमचाही हातभार हवा निलीमा मॅडम. या चार दिवसात तुम्ही मला चारही बॅलन्सशीटचं विश्लेषण द्याल अशी मी अपेक्षा करते, जेणे करून मला पुढील प्रोसेस करता येईल.”
“मॅडम बॅलन्सशीटचं ॲनालिसिस करणं किती अवघड आणि जोखमीचं असतं. फार बारकाईने अभ्यासपूर्ण हे काम करावं लागतं. आमची बारीकशी चूकही महागात पडू शकते”
“होय निलीमा मॅडम, म्हणून तुमच्यासारख्या हुशार, प्रामाणिक, कर्तव्यदक्ष अधिकार्याकडे हे काम सोपवतेय. यापूर्वीही तुम्ही बर्याच बॅलन्सशीटचं विश्लेषण केलं आहे. यावेळीही तुम्ही चांगल्याप्रकारे हे काम कराल असा माझा विश्वास आहे. आणि तुम्ही ते करणारच याची खात्रीही आहे. मग शुभस्य शीघ्रम. आणि होय, हे काम झालं कि तुम्ही घ्या दोन दिवस सुट्टी. तुमची तब्येत बरी नसतांनाही तुम्हांला काम करावं लागतंय याचं वाईट वाटत आहे, पण तुमची कामाप्रतीची निष्ठा व तुमचं मनोधैर्य हे काम करण्यास ऊर्जा देईल. ऑल दि बेस्ट.”
मी आपल्या सीटवर स्थानापन्न झाले. “विवेक जरा चहा सांगशील रे माझ्यासाठी.” मी ऑफिसबाॅय ला आवाज दिला. गरम चहाचा एकएक घोट संपवत मी थोडीशी रिलॅक्स झाले. “दिपीका जरा तुलसी पाईपची फाईल दे गं”. फाईलमधून मी बॅलन्सशीट काढलं. “मनी कंट्रोल वेब साईट ओपन केली आणि बॅलन्सशीटच्या विश्लेषणाला सुरूवात केली. तुलसी पाईपच्या इतरही उपकंपन्या होत्या जसे तुलसी प्लाॅस्टिक, तुलसी स्टील, तुलसी ट्यूब सोल्यूशन. आम्ही फक्त तुलसी पाईपसाठी कर्ज देणार होतो म्हणून स्टँडअलोन बॅलन्सशीटच मला बघायचं होतं.
तुलसी पाईपची इमारत, वाहने, यंत्रसामग्री खरेदीसाठीची कर्जे, त्याचा परतावा, इक्विटिझ आणि लायबिलिटीझ मध्ये शेअर कॅपिटल रेशो स्थिर होता. एकंदरीत हे बॅलन्सशीट तसे ओ के होते. माझे विश्लेषण पूर्ण करून मी माझे कव्हरींग लेटर तयार केले.
उद्या सर्कल हेडची ब्रांच व्हिजिट होती. त्यांना काय माहिती हवी, काय काय चेक करायचं आहे व ते कसं व्यवस्थित असेल याची यादीच मॅडमने माझ्याकडे दिली. रात्री उशिरापर्यंत मी व मॅडम सुलेखा आम्ही दोघींनी ते काम पुर्ण केलं आणि सुटकेचा निःश्वास सोडला.
आज मला गौरव इंडस्ट्रिजच्या बॅलन्सशीटचं विश्लेषण करायचं होतं. कंपनीची दिर्घकालीन कर्जे होती. तसेच शेअर कॅपिटलही भरपूर होतं. यातुन कंपनीचे दायित्व बरेच असल्याचे दिसत होते. मी कंपनीच्या आयपीओ पोस्ट वाचायला घेतल्या आणि शेअर फेस व्हॅल्यू व शेअर व्हॅल्यूतून शेअर प्रिमियमचा अंदाज घेतला. टॅक्स आणि लाभांश देऊन बरीच रक्कम शिलकीत राहात होती. तसेच कपनीच्या काही ठेवींवरील व्याज, कर्मचार्यांना व इतर उपकंपन्यांन्या दिलेल्या कर्जावरील व्याज पाहाता रिझर्व्ह व सरप्लस रेशो समाधानकारक वाटला. चला हे ही काम झाले हातावेगळे. मला खरंच खूप मोकळं वाटलं.
– क्रमशः भाग पहिला
© डॉ. शैलजा करोडे
नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391
ईमेल – [email protected]