सौ. गौरी सुभाष गाडेकर
☆ जीवनरंग ☆ दोन ध्रुवांवर दोघी …. – भाग 2 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
खरंच. ताईला घराबाहेरचं जगच ठाऊक नव्हतं. कसं असणार म्हणा? कोणाच्या तरी लग्नाला गेलेली लावण्यवती ताई सासूच्या नजरेत भरली. खरं तर ती सतरा वर्षांचीच होती पण उफाड्याची होती. आईसारखीच देखणी होती. त्यांचा बंगला, एकंदर श्रीमंती, उमदा नवरा हे सगळं बघून आई आणि ताई, दोघींचंही देहभान हरपलं आणि ताईचं लग्न झालं.
खरं तर बाबांना हे पसंत नव्हतं. ताईने निदान पदवी तरी घ्यावी, असं त्यांना वाटत होतं.
“पदवी काय चाटायचीय? एवढा देखणा,श्रीमंत नवरा मिळाल्यावर माझी बाय सुखात डुंबेल” आईच्या या बोलण्याने दुखावलेला बाबांचा चेहरा माझ्या अजून लक्षात आहे. त्या दोघांमधल्या नात्याचा हा पदर तोपर्यंत कधी जाणवलाच नव्हता मला.
मग बाबांनी आपलं लक्ष माझ्यावर केंद्रित केलं.
तशी मी बाबांच्याच वळणावर गेले होते. सुंदर नसले तरी दिसायला ब-यापैकी. पण बुद्धिमान. चेह-यावर आत्मविश्वासाचं तेज.
चांगलं शिकून सवरून उच्चपदावर नोकरी करत होते. तिथेच विकास भेटला. बाबांना आवडला तो पण आईचा विरोध होता. दोन खोल्यांच्या घरात- तेही जॉइंट फॅमिलीत – राहणारा म्हणून. मी हट्टाने विकासशीच लग्न केलं.
पुढे आई कॅन्सरने आजारी होती, तेव्हा बाबांना मदत करण्यात माझ्याएवढाच वाटा विकासनेही उचलला. कष्टांतही आणि आर्थिकही. जाण्यापूर्वी आई म्हणालीसुद्धा ,”शेवटी दिसणं, पैसा या गोष्टींपेक्षा माणसाचा स्वभाव महत्वाचा.”
ताई तेव्हा स्वत:च्याच व्यापात गर्क होती. आई असताना एकदा आणि गेल्यावर एकदा अशी दोनदाच, ती फक्त भेटून गेली. भावोजींना थांबायला वेळ नव्हता म्हणून तीही लगेचच परत गेली. आता ही एकटीच येतेय म्हणजे भावोजींशी भांडून बिंडून येतेय की काय?
मी ड्रायव्हरला आमच्या घराचा पत्ता, लॅन्डमार्क वगैरे सांगितलं.
“युवराज कुठे आहेत?”
‘युवराज?’ मला पूर्वीची आठवण झाली.
स्वप्नीलच्या वेळी माझे दिवस भरत आले, तेव्हा ताईचा फोन आला होता ,”आई गेली म्हटल्यावर तुझं बाळंतपण मलाच करावं लागणार. ये तू इकडे. आमच्याकडे नोकर-चाकर आहेत. शिवाय रूम्सही भरपूर आहेत. तुझं पोर रात्रभर रडत राहिलं तरी कोणाची झोपमोड होणार नाही.”
ज्याची आम्ही एवढी स्वप्नं बघत होतो आणि विकास ज्याचा उल्लेख नेहमीच ‘प्रिन्स’ असा करायचा, त्या आमच्या छकुल्याला ताईने पोर -तेही रडवं म्हणावं, याचा मला इतका राग आला की मी आमच्याच घरी राहिले. मदतीला एक बाई ठेवून बाबा आणि विकासने माझं बाळंतपण निभावलं. बाबा तर म्हणायचेसुद्धा, “तू माझी एकुलती एक लेक आहेस, असंच समजतो मी.”
पण एकंदरीत ताई बरीच बदललेली वाटत होती. मोठेपणा, खवचटपणा खूपच कमी झाला होता. घराकडेही तिने फारसं बघितलं नाही.
जेवण झाल्यावर विचारलं तिला, तर ती एकदम रडायलाच लागली. “मला वाटतं, मलाही आईसारखाच ब्रेस्ट कॅन्सर झालाय.”
“तू चेक-अप करून घेतलंस का तिकडे?”
“नाही अग. मला भीती वाटली, साहेबांना कळलं तर….”
“कळलं तर म्हणजे? भावोजींना सांगितलं नाहीस तू अजून?”
“नाही. समजा, मला एक बाजू काढून टाकायला सांगितली… तर? त्यांच्या मनातून साफच उतरेन मी. मला सोडलं त्यांनी, तर कुठे जाऊ ग मी?”
“असं का करतील भाऊजी?”
“तुला नाही कळणार माझं दु:ख. तुला असा आजार झाला आणि विकासने तुला सोडलं, तरी तू नोकरी करते आहेस. स्वत:च्या पायावर उभी आहेस.”
“एक मिनिट. समजा, मला असा आजार झाला आणि माझ्या एक नाही, अगदी दोन्ही बाजू जरी काढाव्या लागल्या, तरी विकास मला अंतर देणार नाही. अग, नवरा-बायकोचं नातं फक्त शारीरिक थोडंच असतं?”
“आमच्यातलं नातं फक्त शारीरिकच आहे.”
“कशावरून? बरं ते जाऊ दे. मुलांना तर तू नंतरही तेवढीच आवडशील ना?”
“खरं सांगू? माझा आणि मुलांचा संबंधच येत नाही फारसा. लहानपणापासून ते नोकरांकडेच वाढले. आता मोठे झाल्यावर तर काय, स्वत:च्याच विश्वात असतात. मघाशी स्वप्नील शाळेतून आल्या आल्या तुला बिलगला ना, तसे ते कधी माझ्याजवळ आल्याचं मला आठवतच नाही.” इतक्या तटस्थपणे बोलली ती! जरासुद्धा विषाद नव्हता त्यात.
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈