सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

काचेचा स्वर्ग… (अनुवादित कथा) – भाग-2 – डॉ अमिताभ चौधुरी ☆ सौ. गौरी गाडेकर

(आणि तेच झालं. कित्येक महिने गेले. शंभुदयाल ना धरणीधरच्या घरी आला,ना त्याने पुन्हा फोन केला. धरणीनेही त्याचा नंबर सेव्ह केला नव्हता. त्यामुळे कॉलबॅकची  शक्यता नव्हती .दिवस-रात्री उलटत गेल्या. जग आपल्या चालीने चक्कर काटत राहिलं.) …इथून पुढे…..

विश्वविद्यालयाच्या समोरच्या लंकाच्या युनिव्हर्सल बुक डेपोमध्ये आदिवासींवर एक पुस्तक आलं होतं. धरणी काहीबाही लिहित असतो. तेव्हा त्याने फोनवर त्यांना विचारलं होतं. आज दुपारी तो तेच घेऊन परत येत होता. पण रेवडी तलावाच्या पुढे राजपुर्‍यात ट्रॅफिक एवढा ठप्प झाला होता, की वैतागून त्याला रिक्षातून खाली उतरावं लागलं. 

तेव्हा त्याच्या लक्षात आलं, की तो कुंवरजींच्या हवेलीजवळ उभा आहे. ‘अरे!’  तो विचार करू लागला, ‘ शंभूने सांगितलं होतं,की इथेच त्याने एक घर विकत घेतलंय. आज वेळ आहे, तर त्याला भेटून का येऊ नये?’ 

डॉ अमिताभ चौधुरी 

पण फक्त नावावरून नक्की पत्ता कसा मिळणार? या बाबतीत काशीचे चहावाले,पानवाले इन्क्वायरी काउंटरचं काम चोख बजावतात. 

“भैया, शंभुदयालजीचं घर कुठे आहे,सांगू शकता?” 

“कोण शंभुदयालजी? जमुहरामध्ये काम करायचे ,ते? दोन-तीन वर्षांपूर्वी त्यांनी इथे वर्माजींचं घर खरेदी केलं.”

“हा.हा. तोच.”

मग दिशा दिग्दर्शन सुरू झालं, ‘बाजूच्या रस्त्याने जा. पुढे खांबाकडून एक गल्ली आत गेलीय. त्या गल्लीत शिरा.तीन-चार घरं सोडून डावीकडे त्यांचंच घर आहे. समोरची खिडकी हिरवी आहे. वगैरे वगैरे.कोणालाही विचारलं तर सांगेल.’ 

विचारायची गरजच पडली नाही. धरणीने बेल वाजवली. एका बाईने बाजूच्या खिडकीचं एक दार उघडून विचारलं,”कोण आहे?” 

“नमस्कार. मी धरणीधर.शंभुदयालचा बालमित्र. त्याला सांगा,मी भेटायला आलोय.”   

आतमध्ये काहीतरी बोलणं झालं. मग दरवाजा उघडला,”या.”

हावभाव आणि बोलण्यावरून अंदाज करणं सोपं होतं, की ती शंभुदयालची बायको होती. धरणीला एका खुर्चीवर बसवून ती आत गेली. थोड्याच वेळात तिने नवर्‍याला आधार देत  बाहेर आणलं.

धरणीधर उठून उभा राहिला,” अरे शंभू, बच्चू! ही काय अवस्था करून घेतलीयस?”

साठी ओलांडलेले दोन्ही मित्र एकमेकांना बघत होते. बहुधा मनात विचार करत असावेत – ‘पंधरा-सोळाव्या वर्षी जेव्हा शेवटचं बघितलं होतं, तेव्हा हा कसा दिसत होता?’

शंभूने तोंड उघडलं,” आता एवढे आजार….त्या दिवशी सांगितलं होतं ना तुला?” 

“अरे,वहिनींशी ओळख तर करून दे.”

“हो,हो. देतो ना. हा धरणीधर. आम्ही दोघं प्रायमरीपासून एका वर्गात होतो. आता काय सांगू? तीन वर्षांपूर्वी मला पॅरॅलिसिस झाला. डाव्या बाजूला. तीन महिने बिछान्यात होतो.हळूहळू बरा झालो. आताही व्यायाम करावे लागतात.हीच करून घेते.”

“मग मुलाकडे का जात नाहीस? तो तर डॉक्टर आहे. आम्ही आपसात बोलत असतो, तुझे दोन्ही मुलगे चांगले निघाले.”

“काय   म्हणता, भाईसाहेब?” ती एवढ्या धारदार आवाजात बोलली,की धरणी नजर उचलून सरळ तिच्याकडे पाहायला लागला. “कोण डॉक्टर? आमचा मुलगा?” 

“अगं,कमला,इतक्या दिवसांनी मित्र घरी आलाय,त्याला चहा-बिहा नाही पाजणार?” शंभुदयाल गोंधळून गेला. जणू त्याच्या रहस्यावरचा पडदा बाजूला झाला होता. तो स्वतःच कसातरी उठून उभा राहिला. पण वादळात सापडलेल्या झाडासारखं त्याचं शरीर थरथरू लागलं. त्याचा डावा पाय आणि हाततर कमजोर होतेच. तो त्या पायावर नीट उभासुद्धा राहू शकत नव्हता. त्याचा उजवा हात हवा कापत होता. त्याचं तोंड एका बाजूला मिटलं गेलं होतं.  “अरे यार, बस ना. एवढ्या दिवसांनी भेटलो आहोत! “

कमला काहीतरी बडबडत आत निघून गेली,” हं. मुलगे! त्यांच्यापेक्षा परके बरे.”  

“काय झालं?” धरणीधरलाही संकोच वाटू लागला.संवादाच्या धाग्याचं कोणतं टोक पकडावं,हेच त्याला कळेना.

“तूच सांगितलंस ना? की तुझा मोठा मुलगा इंजिनिअर आहे आणि धाकटा डॉक्टर?  खरं सांगायचं,तर आम्हाला थोडीशी असूयाच वाटायला लागली होती -साल्याचं नशीब किती जोरावर आहे!” 

“देवाच्या मनात होतं,तसंच सगळं झालं. ते लोक आपआपला संसार सांभाळताहेत. आम्ही दोघं कोंबडा-कोंबडी इकडे बसून कुकूचकू  करतोय. हे घर घेतलं. आयुष्यभर जमवलेल्यातली अर्धी पुंजी या घरातच गेली.” 

‘ठक’…. कमला कधी खोलीत आली,कळलंच नाही. चहाचा कप टेबलावर ठेवून ती बोलायला लागली,” आणि आता तेच मुलगे सांगताहेत – हे घर विकून आम्हाला अर्धा-अर्धा हिस्सा देऊन टाका.”

“म्हणजे?” धरणीधर चकित झाला. 

“जाऊ दे गं. आपल्या मुलांनी काही मागितलं,तर काय झालं?”

” इंजिनिअर आणि डॉक्टर तर स्वतःच एवढं कमावतात,की…”धरणी बोलताना अडखळला.

” कुठचा इंजिनिअर आणि कुठचा डॉक्टर?” कमला तिरमिरीत बोलली, “मोठ्याला ह्यांनी टेम्पो विकत घेऊन दिला होता. तो त्याला धड चालवायला जमलं नाही. विकून टाकला. पिऊन पडलेला असतो आता. धाकटा कुठच्यातरी प्रॉपर्टी डीलरकडे काम करतो. जमिनीच्या खरेदी-विक्रीत काय घपला केला,कोणास ठाऊक.त्याला ते शहर सोडून दुसरीकडे पळून जावं लागलं.आता दोघेही बापाचा गळा दाबून सांगताहेत – घर विकून आम्हाला अर्धेअर्धे पैसे द्या.”

“अरे!” बस्स.धरणी फक्त एवढंच बोलू शकला. काही न बोलता ,तो आपल्या बालमित्राकडे बघत राहिला. त्याला खूप राग आला होता. एवढं मोठं खोटं! एवढं धडधडीत असत्य! आणि कशासाठी?  फक्त लोकांसमोर मोठेपणा मिरवण्यासाठी?

शंभुदयालच्या चेहर्‍यावर विचित्र उदासी तरंगत होती. डोळ्यांत अश्रू नव्हते. पण त्याच्या रक्तातून एक प्रकारचा पश्चात्ताप चेहर्‍यावर झिरपत होता. त्याने हसण्याचा प्रयत्न केला,”धरणी, कोण जाणे मेंदूत हे वेड कसं शिरलं? माझी मुलं जसजशी उद्दाम बनत गेली, तसतसा  मी जुन्या मित्रांना फोन करून-करून मुलांविषयीच्या स्वप्नांची बहार सजवत गेलो. कित्येकांच्या मुलांना, अगदी मुलींनासुद्धा चांगलं शिकून,एमबीए करून चांगल्या नोकर्‍या मिळाल्या. कोणी बॅंकेत नोकरीला लागले. पण माझी मुलं?” 

शंभुदयाल गप्प झाला. खोलीत भरलेल्या शांततेत विष तरंगत असल्यासारखं वाटत होतं आणि तो ते हळूहळू गिळत होता.  “जेव्हा माझ्या कानावर यायचं – कोणाचा मुलगा स्पर्धापरीक्षेत पास झाला, कोणाच्या मुलीला नोकरी लागली, आता तिच्या लग्नाचं बघताहेत,तेव्हा माझ्या छातीत विचित्र जळफळाट व्हायचा. डोक्याचा दाह व्हायचा. देवा,मी काय पाप केलं, म्हणून माझ्या नशिबात असली मुलं आली?”

शंभुदयालला धाप लागली.

मित्राला बघून धरणीधरच्या जिभेला जणू अर्धांगाचा झटका आला. काय सांगणार होता तो मित्राला? कसं करणार होता त्याचं सांत्वन? एका बापाने नकळत आपल्या आकांक्षांचा एक काचमहाल उभा केला होता. आणि आज तो फुटून विखुरला होता. शंभूदयाल हळूहळू बोलायला लागला,”आणि नंतर तर पॅरॅलिसिस झाला. त्यातून सावरल्यावर रोज कोणा ना कोणाला फोन करून हेच सगळं सांगत राहिलो, की माझा मोठा मुलगा इंजिनिअर आहे आणि धाकटा डॉक्टर . का कोणास ठाऊक, पण त्यामुळे मला एक विचित्र शांती मिळायची. मला माहीत आहे, सगळ्यांना वाटायचं की या साल्याने तर बाजी मारली!” 

धरणीधर आ वासून आपल्या मित्राकडे पाहत होता. माणूस स्वप्न व वास्तवाचा हा कुठचा साप-शिडीचा खेळ खेळू लागतो? 

त्याला चहाचा कप उचलण्यासाठी हात पुढे करावासा वाटला. पण त्याच्या हाताचा जणू दगड झाला होता. तो उठून उभा राहिला,”चल,यार.निघतो.येईन पुन्हा कधीतरी.”

मागून शंभूचा आवाज आला,” अरे,निदान चहा तरी पिऊन जा.”  

कमला काहीच बोलली नाही. ती गुपचूप उभी होती. दरवाजाजवळ भिंतीला टेकून. 

– समाप्त – 

मूळ लेखक :डॉ. अमिताभ शंकर रॉय चौधुरी 

मूळ हिंदी कथा :  कांच की जन्नत

मराठी अनुवाद :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments