डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ पायगुण – भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
पावसाची झुम्मड लागली होती.अजिता अगदी पूर्ण भिजून गेली.घरून निघताना अजिबात चिन्हनव्हतेपावसाचे आणि अचानकच कोसळायलाच लागला अजिता पूर्ण भिजून गेली. जवळच्या दुकानात शिरली आणि मग तिला आठवलं, बऱ्याच गोष्टी संपल्या आहेत की आपल्या. तिने दुकानातून बरीच खरेदी केली. तोपर्यंत पाऊस थांबला आणि अजिता आता हॉस्पिटल मध्ये न जाता तिच्या क्वार्टर्स वरच गेली. पारुबाईने सांगितलेलेसामान तिने ओट्यावर ठेवले आणि छान चहा करून घ्यावा म्हणून गॅस जवळ गेली.तेवढ्यात शेजारची मीता आली. अजिता,मला पण टाक हं आल्याचा चहा.कॉटवर बसत मितानेफर्मावले.थांब मी माझ्या रूम मधून चिवडा घेऊन येते.कालच आईने मामा बरोबर पाठवला.मीता चिवडा आणि बर्फी घेऊन आली आणि तिने अजिताच्या कॉटवर बैठक मारली.मस्त झालाय ग चहा अजिता. चिवडा खा ना!,आईनं तुझ्यासाठी पण दिलाय. उद्या काय लागलंय ग तुझं शेड्यूल? मला उद्यापासून पूर्ण आठ दिवस नाईट इमर्जन्सी आहे.
कठीण आहे रे बाबा.त्या डॉ अभय समोर बोलायची सोय नसते.त्यांनी लावल्या ड्यूट्या की करायच्या. अजिता म्हणाली मला तशी खूप ड्यूटी नाहीये पण मी ऑन कॉल आहे.म्हणजे आलं की नाही इथेच बसणं?चांगली जाणार होते ती बाबांकडे तर आता कुठलं जमायला?कुठून ही डॉक्टरकी हौसेने पदरात घेतली असं होतं बघ काही वेळा. बघ की,आपल्या वर्गातल्या मुली बीएस्सी एमेस्सी झाल्या आणि मस्त कपडे घालतात, लग्न मुंजी सिनेमे एन्जॉय करतात आणि आपण!
बसलोय बाळंतपण नाही तर कसल्या कसल्या सर्जऱ्या करत शिकत, सिनियर ची बोलणी खात!’
अजिता वैतागून म्हणाली.मीता हसली आणि म्हणाली,अजू, खरंच असं वाटतंतुला?’अजिता म्हणाली, नाही ग मीता!पण काहीवेळा अति काम पडलं की होते चिडचिड!
मला तर अभिमान आहेच की एवढी धडपड करून मरमर करून झालोय डॉक्टर,ते काय उगीच? आता हे एमडी धड पदरात पडलं की सुटलो बघ. कालच बघ ना, रात्रभर उभीच्या उभी होते मी! सगळ्या अवघड केसेस!वर त्या डॉ अभयला फॉरसेप्स लावताना बोलावलं तर म्हणाले”,एमडी होणार ना?दर वेळी लोकाला बोलावणार का स्वतःच्या हॉस्पिटल मध्ये? लावा बघू!मी आहे मागे उभा.पोरी बाकी बावळट आणि घाबरटच.’इतका राग आला होता ना!पण शिकवलं मस्त बाकी!किती हुशार रजिस्टार आहे ग तो! मला नाही वाटत तो इथेच थांबेल.नक्की जाणार बघ कुठल्या कुठे!’तोंड मात्र आहे फाटकं. कद्धीही चांगलं म्हणत नाही की शाबासकी देत नाही!’दोघी हसल्या आणि मीता गेली. अजिताची लास्ट टर्म होती एमडी ची. मीता आणि अजिता अगदी घट्ट मैत्रिणी. दोघीही डॉक्टर झाल्या आणि सुदैवाने एमडीलाही ऍडमिशन मिळाली ती एकाच हॉस्पिटल मध्ये. मीता म्हणाली मी नाशिकला जाणार आणि तिकडे माझ्या मावशीच्या हॉस्पिटलला अनुभव घेईन.तिचं मोठं हॉस्पिटल आहे आणि खूप गर्दी असते .मला खूप मिळेल तिकडे शिकायला’ अजिता म्हणाली,माझं काहीच नक्की नाही.आमच्या घरात डॉक्टरची बॅक ग्राउंड पण नाही.आधी मी कुठेतरी नोकरी करीन, मग बघूया .एमडी झाल्याबरोबर अजिताला लगेच मोठ्या हॉस्पिटल मध्ये नोकरीही मिळाली आणि तिचं पॅकेज सुद्धा छान होतं. अजिता, आता लग्नाचं बघूयाना?घालूया ना नाव एखाद्या चांगल्या संस्थेत? आई नं अजिताला विचारलं.’हो आईमाझी हरकत नाही ,पण शक्यतो डॉक्टरच बघितला तर ते पूरक होतं एकमेकांना.’ आई नं अजिताचं नाव एका चांगल्या विवाह मंडळात घातलं. थोड्याच दिवसात अजिताला बघायला योगेश आपटे आला. छान होता मुलगा. मंडळाकडूनच स्थळ सुचवलं गेलं होतं आणि पत्रिकाही चांगली जुळत होती. योगेश फिजिशियन होता आणिचांगला जम बसला होता त्याचा. दोघांना एकमेक पसंत पडले आणि अजिताचं योगेशशी लग्न ठरलं.आई बाबांनी छान साखरपुडा करून दिला .सगळे खूष होते अगदी. साखरपुडा झाल्यावर पंधरा दिवसात योगेशच्या वडिलांना हार्ट अटॅक आला.अजिताने आणि योगेशने धावपळ करून त्यांना ऍडमिट केले आणि अजिता तर त्याच हॉस्पिटल मध्ये नोकरी करत असल्याने तिने खूप काळजी घेतली त्यांची. त्यांची बायपास यशस्वी पार पडली आणि ते सुखरूप घरी आले.सगळ्याना हायसं झालं. योगेशची धाकटी बहीण सीमा दिल्लीला होती.
तिला नुकतेच दिवस गेले होते.त्यातच योगेशचं लग्न खूप आनंद झाला होता.अचानकच दिल्लीहून फोन आला,सीमाला अचानकच रक्तस्त्राव सुरू झाला आणि तो गर्भ टिकू शकला नाही. सगळ्याना वाईट वाटलं.
एक दिवस, योगेशच्याआई सुषमा बाई अजिताच्या घरी अचानकच आल्या.इकडंच तिकडंच बोलून झालं.अजिताच्या आईनं विचारलं,’आता लग्नाची तयारी सुरू करायला हवी ना?आपण कार्यालय कोणते बघायला जाऊया?तुमचा काय विचार आहे?मी इतक्यात तुम्हाला फोन करणारच होते.’
योगेशच्या आई म्हणाल्या,’हे बघा ! हे लग्न करू नये असं वाटतं आम्हाला. साखरपुडा झाला आणि लगेचच दोन वाईट घटना घडल्या आमच्या घरात! तुमचा विश्वास नसेल, पण माझा आहे.अजिताचा पायगुण म्हणा हवं तर पण हे घडलं खरं , हो ना?तर आता आणखी नको विषाची परीक्षा घ्यायला.आपण इथंच थांबवू हे सगळं! “
अजिताच्या आईला हे ऐकून तर शॉकच बसला. “ अहो हे काय बोलता? असं कुठं असतं का?होणाऱ्या गोष्टी होत असतात अहो ! इतकी शिकलेली मुलं आपली.त्यांचा तरी विश्वास बसेल का असल्या शकुन अपशकुन आणि पायगुण असल्या गोष्टीवर?योगेशला विचारलंय का तुम्ही?
“ नाही ! त्या मुलांना काय समजतंय.पण मलाच आता नको वाटतंय हे लग्न !” त्या निघूनच गेल्या आणि अजिताच्या आईवडिलांच्या डोक्यात प्रश्नाचं मोहोळ उठलं. आता काय करावं हा यक्षप्रश्न त्यांना पडला आणि अजिता हे सगळं कसं घेईल हे त्यांना समजत नव्हते.रात्रीउशिराअजिता हॉस्पिटल मधून घरीआली.सकाळी बघू काय ते असं म्हणत आईबाबा झोपायला गेले. सकाळी हा विषय अजिताजवळ त्यांनी काढला.’ हो का?मला हे काहीच माहीत नाही.मला योगेश भेटलाय कुठं दोन दिवसात?आम्ही खूप बिझी आहोत ग आमच्या कामात!पण आज भेटूआम्ही!आई,तू उगीच पॅनिक नको होऊ! बघूया तरी काय होतं ते. तो भेटल्याशिवाय कोणताही उलगडा होणार नाही.मी योगेश भेटला की लगेच तुम्हाला सांगेन काय झालं ते!,उगीच नको रडत बसू आई.”
– क्रमशः भाग पहिला
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈