डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ पायगुण – भाग-2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
(तो भेटल्याशिवाय कोणताही उलगडा होणार नाही. मी योगेश भेटला की लगेच तुम्हाला सांगेन काय झालं ते! उगीच नको रडत बसू आई.”) – इथून पुढे
अजिता हॉस्पिटलमध्ये गेली पण तिलाही चैन पडेना.हे काय झालं आणि यातून आता पुढे काय होणार याची तिलाही काळजी वाटायला लागली.लग्न ठरवून सहा महिने झाले,आपण दोघे सर्वस्वीअनुरूप आहोत, आपले स्वभाव जुळतातआवडीनिवडीसारख्याआहेत.आता हे काय विघ्न मधेच?अजिताने दुपारी योगेशला फोन करायचे ठरवले. शांतपणे ती आपल्या कामात गुंतून गेली.दुपारी योगेशचा तिला फोनआला. तिला म्हणाला, जरा बाहेर जाऊया जेवायला !अजिताला तो कारने न्यायला आला.हॉटेलमध्ये ऑर्डर देऊन झाल्यावर म्हणाला,’अजिता!माझी आई तुमच्या घरी आली होती आणि काय काय बोलली ते तिनंच सांगितलं मला.
मला तर हे अनपेक्षितच आहे सगळं! माझ्या असं कधी मनात तरी येईल का?मला तू खूप आवडतेस आणि मी मला भाग्यवान समजतो की अशी हुशार गुणी मुलगी मला मिळतेय.आईचं सोड तू!मी कधीही हे होऊ देणारनाही.आपलं लग्न होणार म्हणजे होणार.तुझ्यासारखी मुलगी टाकून दुसरी बघत बसायला मी मूर्ख नाही.तू क्षमा कर मला.तुम्हाला सगळ्याना खूप त्रास झाला असेल ना?माफ कर अजू मला!
योगेशच्या डोळ्यात पाणी आलं. शरमेने त्याचा चेहरा लाल झाला.
अजिता शांतपणे म्हणाली, “ थँक्स योगेश. आपण या सहा महिन्यात एकमेकांत खूप गुंतलो आहोत.हो ना?तू जर साथ देणारअसलास तर आपलं लग्न कसं मोडेल?शांत राहूया आपण.मला खूप धीर आला रे तुला भेटून.किती शहाणा आहेस तू. थँक्स योगेश.पण एक सांग, तुझ्या आईचा तू एकुलता एक मुलगा आहेस.त्यांच्या मनाविरुद्ध मी तुमच्या घरात आले तर माझं स्वागत कसं होणार? मला सतत जाणवत रहाणार की मी यांना नको असतानाही इथे आलेय!अजिता रडायला लागली.’मला काही सुचत नाही योगेश .मला तुला तुझ्या आईपासून तोडायचं नाहीये आणि तुला गमवायचंही नाहीये.”
योगेश विचारात पडला. ‘ अजिता,आपण जरा वाट बघूया. आपली साथ घट्ट असणार हे कायम लक्षात ठेव. मीआणि तू कधीही वेगळे होणार नाही’. योगेश अजिताला हॉस्पिटलला सोडून घरी गेला. अजिताने हे आईबाबांना सांगितलं. त्यांनाही आता हायसं वाटलं.
पण तरीही मनात धाकधूक होतीच की हे जे सुषमा बाई बोलल्या ते ठीक नाही झालं.
असा किंतु मनातअसताना आपल्या मुलीला तिथे सुख लाभेल का?काय कमी आहे अजितामधे?आता होईल ते बघत बसण्याशिवाय त्यांच्याही हातात काही नव्हते. अनपेक्षितपणे संध्याकाळी योगेशचे आजीआजोबा आणि बाबा अजिताच्या घरी आले.तिचे आईबाबा गडबडूनच गेले यांना असं अचानक बघून!या ना,म्हणत त्यांचे स्वागत केले दोघांनी. आजी म्हणाल्या’,मी पहिल्यांदा बोलते हं.हे बघा कुंटे, काल सुषमा तुमच्या घरी आली आणि जे बोलली ते आम्हाला अजिबात माहीत नव्हतं. आम्हाला तिचे विचार मान्य नाहीत.अहो, कसला पायगुण आणि कसले शुभ अशुभ हो? याच मुलीनं योगेशचे बाबा हॉस्पिटल मध्ये असताना रात्रंदिवस कष्ट घेऊन त्यांची सेवा केलेली आम्ही बघितली नाही का?उलट कौतुकच वाटले तिचे आम्हाला.ती या हॉस्पिटलमध्ये आहे म्हणूनच सगळ्या गोष्टी किती सुलभ झाल्या आम्हाला. ही अशी गुणी मुलगी आम्ही नाकारणे म्हणजे दारी आलेली लक्ष्मी नाकारण्यासारखे होईल.
“ कुंटे,तुम्ही आता हे लग्न लवकरात लवकर करून टाका.कशाला उगीच लांबवायचं ?योगेश आणि अजिता एकमेकांना अनुरूप अनुगुणीही आहेत आणि त्यांचं प्रेमही जडलंय एकमेकांवर.तर लवकरचा मुहूर्त बघून आपण हे लग्न पार पाडूया.अगदी हौसेने !” अजिताच्या आईवडिलांना अतिशय आनंद झाला हे ऐकून.पण मग जरा संकोचून बाबांनी विचारलं,पण सुषमाबाईना काय वाटेल?’
“ त्यांचं काय? ते योगेश बघून घेईल.’आजोबा म्हणाले, लग्नानंतर योगेश आणि अजिता इथे आमच्याजवळ बंगल्यात रहाणार नाहीत. आमचा दुसरा मोठा फ्लॅट आहे,तिकडे ते राहिलेले उत्तम! म्हणजे कोणालाच कानकोंडे होणार नाही. नवीन लग्न होऊन येणाऱ्या अजिताला कोणाच्या मनाविरुद्ध आपण घरात आलोय, असं वाटता कामा नये. आणि हीही सूचना योगेशची आहे. हुशार आहे हो आमचा नातू.”
आता योगेशचे बाबा म्हणाले, ‘ सुषमा जरा मागासलेल्या विचारांची आहे . आमचे आईबाबाच किती पुढारलेल्या विचारांचे आहेत तिच्यापुढे तुम्ही बघता आहातच. खरं सांगायचं तर तिला एवढी शिकलेली डॉक्टर सून नकोच होती. तिच्या मैत्रिणीची मुलगी फार मनात होती तिच्या सून म्हणून .पण योगेशने ठाम नकार दिला.मी माझ्याच व्यवसायातली मुलगीच माझी बायको म्हणून पसंत करणार हे त्याचे निश्चित होते.आम्हालाही ते मान्यच होते.पण घटना अशा घडल्या की बिचारी अजिता घरात येऊ घातली आणि दुर्दैवाने हे दोन अपघात म्हणा, प्रसंग घडले. मग तर सीमा आणि सुषमा हे लग्न नकोच व्हायला या निर्णयावर आल्या. त्या मायलेकी स्वभावाने अगदी सारख्या आहेत. पण माझा योगेश फार गुणी आणि मॅच्युअर्ड आहे .सुषमा तुमच्या घरी येईल आणि हे असं सगळं बोलेल हे आम्हाला कोणालाच माहीत नव्हते. तुम्ही प्लीज हे मनावर घेऊ नका.आम्हाला अजिता अतिशय आवडली आहे. मुख्य म्हणजे योगेश तिच्यावर मनापासून प्रेम करतो. आपण मुलांची मनं नको का जाणून घ्यायला?काय कमी आहेतुमच्या अजितामध्ये?आम्ही तिलाआदराने आणि प्रेमाने आमच्या घरी सन्मानाने आणणार सून म्हणून ! ‘ योगेशचे वडील म्हणाले. अजिता आणि तिच्या आई बाबांच्या डोळ्यात पाणी आले.आईबाबांची खात्रीच पटली,आपली अजिता योगेशच्या घरी सुखी होईलच.या मंडळींचं मनापासून कौतुक वाटलं अजिताच्या आईबाबांना. अजिता तर थक्क झाली आजी आजोबांचे आधुनिक विचार बघून. इतक्यात योगेशही आला अजिताच्या घरी. झाली का मीटिंग आणि चाय पे चर्चा?आमच्या माँ साहेब नाही का आल्या?’
‘नाही बाबा ! त्यांना न सांगताच ही सभा भरलीय. काय करणार बाबा?आम्हाला तुमचं लग्न लावून द्यायचंय. त्यात बाधा नाही आणायचीय.’
योगेश म्हणाला, ‘आजी होईल ग सगळं नीट. अजिता घेईल सगळं सांभाळून.इतके पेशंट लीलया जिंकून घेणाऱ्या अजिताला आपल्या आईला आपलंसं करायला नक्की जमेल.थोडा वेळ देऊ या आपण सगळ्यांना. मला खात्री आहे,अजिता लाडकी सून होईल आपल्या आईची !’ कौतुकाने अजिताकडे बघत योगेश म्हणाला. सगळी मंडळी गेल्यावर आईबाबांनी कौतुकच केले आपटे लोकांचे.आपली मुलगी चांगल्या कुटुंबात आणि मुख्य म्हणजे अतिशय चांगल्या मुलाच्या हातात पडलीय याची खात्री पटली सगळ्यांना.आणि खूप उत्साहाने अजिताचे आईवडील लाडक्या लेकीच्या लग्नाच्या तयारीला लागले.
– समाप्त –
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈