श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ महाभोजन तेराव्याचे… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

पाठीमागच्या घरातून खूपच आरडा ओरड ऐकू येऊ लागला, म्हणून मी बायकोला विचारले “काय चालले आहें शेजारी, तिन्ही संजेला एवढा आवाज?’

“हे नेहेमीचे आहें, तुम्ही या वेळेला घरी नसता, आज घरी आहात म्हणून नवीन, आपा रोज दारू पिऊन येतो आणि मग म्हाताऱ्या म्हातारी बरोबर भांडण, शिव्या, मारझोड.. नेहेमीचंच.’

“पण काय घाणेरड्या शिव्या देतो हा आपा, आपल्याच आईला आणि बाबाला?

“कर्मभोग आहेत म्हाताऱ्यांचे, आणि काय?

एवढ्यात आपाची म्हातारी आई लंगडत लंगडत आमच्या घराच्या मागच्या बाजूला आली आणि मला हाका मारू लागली

“काकानू, तुमी तरी तेका सांगा कायतरी, कोयतो घेऊन मारुक इलोवा बापाशिक,खून चढलोवा तेच्या अंगात, कोयतो घेऊन मागसून धावता, काय तरी तेका सांगा ‘ अस म्हणून ती रडू लागली.

माझ्या बायकोने तिला घरात घेतले आणि पाणी आणून दिले.

मी बाहेर आलो आणि आपाच्या आईला म्हणालो ” काय कशासाठी कोयतो दाखवता?’

“काय सांगा काकानू, होयती दहा गुंठे जमीन आसा, ती आपल्या नावावर करून द्या, म्हणून भांडता..’.

मधेच माझी पत्नी बोलली “आपाच्या आई, जमीन तेच्या नावावर करून देव नको हा,तेचा नावावर जमीन केलास की तो विकतालो आणि पैसे दारूत उडवातलो.’

“होय गे बाये, म्हणूनच काय झाला तरी हेच्या नावावर जमीन करू नकात आसा हेन्का सांगलंय, म्हणून हो गाळी घालता आणि मारुक येता, आत आमी म्हातारी झालेव मा. काकानू, तुमी तेका जरा दम देवा, तुमका तो भियता ‘.

सर्वाना शिव्या देणारा आणि कोयता दाखवणारा आपा मला मात्र घाबरून असायचा, एक तर माझ्या शिक्षणाला तो घाबरत असायचा किंवा मी पोलीस  डिपार्टमेंट मध्ये नोकरीस असल्याने आणि माझी गाडी रोज पोलीसस्टेशन बाहेर उभी असते, हे त्याला माहित असल्याने असेल, पण माझ्या शब्दावर तो उत्तर दयायचा नाही.

मी आपाच्या आई पाठोपाठ बाहेर आलो आणि एक मोठी काठी घेऊन त्याच्या घराकडे आलो..

मी त्याच्या घराजवळ येऊन “कोणाची गडबड सुरु असा रे ‘ अस म्हणून काठी जमिनीवर आपटल्यावर घरातला आवाज बंद झाला. मी त्याच्यसमोर उभा राहिलो आणि त्याला बजावले ” पुन्हा जर कोयतो दाखवलंस तर पोलिसाक बोलावून लोकअप मध्ये टाकतालाय लक्षात ठेव,’.

असा मी दम भरताच आपा मागील दराने गुल झाला.

मी आपाच्या घरात आलो आणि आपाच्या बाबा म्हणजे गणपती समोर येऊन बसलो. गण्या मला पहाताच रडू लागला. “काकानू, काय हो माजा नशीब, नवसान झील झालो तो असो दारुडो, रोज रातिचो दारू पिऊन तयार. गवंडी काम करता ते सगळे सोऱ्यात. पाच पैशे घरात देना नाय. मी तरी खायसून हेका जेवूक घालू. आत धा गुंठे जागा तुमी घेऊन दिलात, ती आपल्या नावावर करून देऊक सांगता.’

अस म्हणून गण्या रडू लागला.मी त्याला पोलिसाला पाठवून दम देण्यास सांगतो, अस म्हणून घरी आलो.

माझ्या डोळ्यासमोर पंचवीस वर्षांपूर्वीचा गण्या आला. आमच्या पोलीस डिपार्टमेंट च्या समोर छोट्याश्या चहा हॉटेल मध्ये भजी, वडे तळणारा. अतिशय प्रामाणिक. आमच्या ऑफिस मध्ये चहा दयायला मालक यालाच पाठवायचा. कधीमधी त्याची नवीन लग्न झालेली बायको पण हॉटेल मध्ये दिसायची. त्याच शहरात छोटी खोली घेऊन राहत होते. हॉटेल मालकाने दुसरीकडे मोठे हॉटेल काढले आणि हे हॉटेल तो बंद करणार होता, आम्ही सर्व डिपार्टमेंट मधील लोकांनी मध्यस्थी केली आणि हॉटेल गण्या ला चालवायला सांगितले.

मग गण्या आणि त्याच्या बायकोने चहा भजी सोबत जेवण करायला सुरवात केली आणि आमच्या सारख्या बॅचलर लोकांची सोय झाली. त्याची बायको म्हणजे सुगरण होती, ती माशाचे कालवण खासच बनवायची शिवाय अधूनमधून कोंबडीवडे पण.

आमच्या डिपार्टमेंट च्या पार्ट्या असायच्या, त्याची जेवणं मला त्यांना मिळू लागली.

त्याच काळात माझं लग्न झाल आणि मी रोज गावाहून स्कूटर ने येऊ जाऊ लागलो.

आत गण्या कडे थोडे पैसे जमा झाले, त्यामुळे त्याला थोडी जमीन घेऊन घर बांधायची ईच्छा झाली. तो मला कुठे जागा असेल तर सांगा, लहानस झोपड बांधतो, अस म्हणु लागला.आमच्या घरात सण समारंभ असेल त्यावेळी गण्याची बायको माझ्या आईला आणि बायकोला मदत करायला येत असे, त्यामुळे त्या दोघींची पण जवळीक होती.

माझ्या काकांची दहा गुंठे जमीन पडून होती, त्यावर काही लागवड नव्हती, काका कायम मुंबईत, त्याना पण ती विकून टाकायची होती, काकांना सांगून कमी किमतीत ती दहा गुंठे जमीन गण्याला विकत दयायला सांगितली.

गण्याने आणि त्याच्या बायकोने मेहनत करून करून छोटेसे घर बांधले आणि मग सरकारी मदत घेऊन  मोठं घर केल, मग मुलगा झाला, त्याच नाव त्याच्या आजोबाच म्हणजे सहदेव आणि म्हणायला आपा.

माझी मुलगी अर्पिता आपा पेक्षा दोन वर्षांनी मोठी. लहानपणी अर्पिता अभ्यासाला बसली की आपा त्याच्या शेजारी येऊन बसायचा. तिची पाटी धुवून दयायचा, अभ्यास झाला की तीच दप्तर भरून ठेवायचा, कायम तिच्या मागे मागे असायचा.

अर्पिता त्याचा अभ्यास घयायची, पण अभ्यासाचे नाव काढले की तो पळून जायचा. तो नाईलाजाने शाळेत जायचा पण त्याचे अभ्यासात लक्ष नसायचे.

गण्याचे आणि त्याच्या बायको चें पण त्याच्या शिक्षणाकडे लक्ष नसायचे, ती दोघ शहरातील हॉटेल मध्ये. मुलगा शाळेत कधी जायचा कधी नाही, अर्पिता आणि माझी बायको त्याच्याकडे लक्ष द्यायची पण त्याने अभ्यास केलाच नाही आणि त्याने सातवी तुन शाळा सोडली.

शाळा सोडल्यावर त्याला सर्वच मोकळे, मग ती उनाड व्यसनी मुलांच्या संगतीत गेला आणि तेरा चवदा वर्षाचा होता, त्यावेळी पासून विड्या ओढू लागला, मटका खेळू लागला आणि दारू पिऊ लागला.

माझी बायको गण्याच्या बायकोला त्याच्या व्यसनाची कल्पना देत होती पण त्याच्या आईचे आणि बाबाचे पण तो ऐकेना.

आपा वीस वर्षाचा झाला आणि रिकामा राहू लागला आणि पैसे मिळाले तर चोरून दारू पिऊ लागला. माझ्या ओळखीच्या एका गवंडी होता, मी त्याला सांगून आपाला त्याच्याकडे कामाला पाठविले, तेथे तो चिरे उचलणे, चिरे तासणे आदि कामे करू लागला.

गण्याने त्याला आपल्या हॉटेलात नेऊन पाहिले, पण आपा पैसे लंपास करू लागला,गिर्हाईक बरोबर हुज्जत घालू लागला.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments