सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ पाच अनुवादित लघुकथा… ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆
((१) – पायरी – सुश्री मनोरमा जैन पाखी (२) – भेट – डॉ. योगेन्द्रनाथ शुक्ल (३) – करुणा – श्री ललित समतानी (४) – उंबरठ्याचे बंधन – डॉ. विनीता राहूरीकर (५) – स्वातंत्र्य – सुश्री विभा रानी श्रीवास्तव)
(१) – पायरी
‘ए, ऐकलंस का, आपला अभिजीत…..’
‘त्याचं काय?’
‘त्याला साहित्य अॅकॅडमीचा पुरस्कार मिळालाय.’
‘माहीत आहे. त्यात काय खास आहे?’
‘खास कसं नाही? एवढा साहित्य अॅकॅडमीचा पुरस्कार…..’ तिचं बोलणं ऐकून नीतू चकित झाली.
‘कागदी सर्टिफिकेट आणि चार दमडया….’
‘तू तर कमाल करतेस हं स्वाती! अभिनंदन केलंस की नाही त्याचं?’ नीतूने उत्सुकतेने विचारलं. स्वातीने सामान गोळा करून बॅगेत भारत म्हंटलं, ‘उशीर होतोय. मुलांना भूक लागली असेल. लवकर घरी जाऊ या.’ तिचा आवाज विस्कळीत झाला होता.
‘काय झालं स्वाती? तू तर त्याची बेस्ट फ्रेंड आहेस ना!’
‘हं!’
‘सांग ना! काही तरी झालय, जे मला माहीत नाही. ‘
स्वातीने मॉलमधील जिन्याकडे बोट दाखवत म्हंटलं, या पायर्यांचं काम आहे, दुसर्याला दुसर्या मजल्यावर पोचवणं, जिथे त्यांच्या जरुरीचं सामान आहे. ‘
स्वातीच्या डोळ्यात तिला वापरून घेतल्याचं दु:ख झळकत होतं. अभिजीतच्या वर चढण्यातील तीही एक पायरी होती.
मूळ कथा – सीढियाँ
मूळ लेखिका – सुश्री मनोरमा जैन पाखी
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
मो. – ८८३९९३४७४२
☆☆☆☆☆
(२) – भेट
‘प्रशांत भाऊ, आपण अनेक विद्यार्थ्यांना, डॉक्टर बनवलं आहे. भाऊसाहेब, माझे बॉसदेखील आपल्या पत्नीला पी.एचडी. करवू इच्छितात. जर तुम्ही कृपा केलीत, तर माझीही त्यांच्यापुढे पत-प्रतिष्ठा वाढेल.’
‘प्रकाशजी, आपण आहात एक प्रशासनिक अधिकारी आणि मी प्राध्यापक. आम्हाला आपल्यासारखं सामान, गाडी, बंगला, नोकर-चकार मिळत नाहीत. अन्य सुविधाही नसतात, म्हणून या कामात लागून राहिलोय. तीन-चार विद्यार्थी नेहमीच माझ्या सेवेसाठी तत्पर असतात.’
‘भाऊसाहेब, स्पष्ट बोलणं झालं, तर नेहमीच संबंध चांगले रहातात. नाही का? म्हणून विचारतोय, किती खर्च येईल?’
‘प्रकाशजी, आपल्या स्पष्टवक्तेपणाचं मला नेहमीच महत्व वाटतं. आपण माझे मित्र आहात, त्यामुळे एक लाखात काम भागवू…. हं…. बाहेरून जे परीक्षक येतील, त्यांना हॉटेलमध्ये उतरवणे, हिंडवणे-फिरवणे, त्यांचे खाणे-पिणे, त्यांना द्यायच्या भेटी यांचा खर्च वेगळा.’
‘खर्चाची आपण चिंता करू नका. बॉसची कमीत कमी एक लाखाच्या वर मिळकत आहे. फक्त, ते आपल्या पत्नीला पी.एचडी.ची डिग्री तिच्या वाढदिवसाची भेट म्हणून देऊ इच्छितात.’
‘…. मग डील पक्कं !’
‘पक्कं!’
मूळ कथा – तोहफे
मूळ लेखक – डॉ. योगेन्द्रनाथ शुक्ल
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
मो. – 9977547030
☆☆☆☆☆
(३) – करुणा
रतन – ‘डॉक्टर साहेब, माझ्या वडलांना एकदा तरी दाखवा. मी आपल्या पाया पडतो. मी त्यांना दुरूनच बघेन. तीन दिवस सतत चालून मी इथपर्यंत पोचलोय.
डॉक्टर – एकदा सांगितलं नं, तू आत नाही जाऊ शकत.
रतन – ‘डॉक्टर साहेब, त्यांना दिसत नाही. मी एकदा जरी त्यांना पहिलं, तरी मनाला शांती मिळेल.
डॉक्टर – तुला कळत कसं नाही. ते करोंनाचे पेशंट आहेत. त्यांना कोणीच भेटू शकत नाही.
रतन – ‘डॉक्टर साहेब, माझ्या पायाच्या जखमा बघा. मी किती मुश्किलीने इस्पितळापर्यंत पोचलोय, माझं मला माहीत!
डॉक्टर – अरे, तुझ्या पायात तर पस झालाय. याचा ताबडतोब इलाज करून घे, नाही तर पाय कापायची वेळ येईल. सिस्टर करुणा, यांना ड्रेसिंग रूममध्ये नेऊन ताबडतोब यांच्या जखमांवर मलमपट्टी करा.
सिस्टर करुणा – भाऊ, या जखमा कशा झाल्या?
रतन – सिस्टर मी तीन दिवस पायी चालत इथे माझा बाबांना बघण्यासाठी आलो. पण डॉक्टरसाहेब मला त्यांना भेटू देत नाहीत. तुम्ही मला भाऊ म्हणालात. ताई, असं काही तरी करा की मी माझ्या वडलांना बघू शकेन.’
सिस्टर करुणा – हे बघ, मी तुला, मला काहीच माहीत नाही, असं दाखवून कोरोंनाच्या वॉर्डमध्ये सोडते. पुढचं तुझं तू पहा.
रतन – बाबा, हे पाणी घ्या.
बाबा – अरे रतन, तू इथे कसा पोचलास?’
रतन – आता मी आलोय बाबा. तुम्ही काळजी करू नका.
डॉक्टर – (वॉर्डमध्ये रतनच्या पायांच्या पट्ट्यांकडे दुर्लक्ष करत) सिस्टर करुणा तू साक्षात करुणेची मूर्ती आहेस आणि मी किती विवश होतो.
मूळ कथा – करुणा
मूळ लेखक– श्री ललित समतानी
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
मो. – ९८२६०९५७११
☆☆☆☆☆
(४) – उंबरठ्याचे बंधन
‘हे काय वाहिनी, बॅगेत कपडे भारतीयस. कुठे निघालीस?’+++
‘रामनगरच्या कॉलेजमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. तो मंजूर झालाय. दोन दिवसांनी जॉईन होईन. संध्याकाळच्या गाडीने निघेन. ‘
‘तुला नोकरी करण्याची काय आवश्यकता आहे? आणि संध्याकाळपर्यंत भाऊसुद्धा परत येईल.’
‘आता आपलं पोट भरण्यासाठी नोकरी तर करायलाच हवी ना! आई-वडलांवर ओझं होऊन तर राहू शकणार नाही. ‘
‘वाहिनी, आपलं पोट भरण्यासाठी म्हणजे…. गेली दोन वर्षे भाऊला त्या हलकट बाईच्या तावडीतून सोडवण्यासाठी तू जीवाचं रान केलंस. आता सगळं काही ठीक झालय. त्याची अक्कलदेखील ठिकाणावर आलीय. त्याला आता कळून चुकलय, की केवळ पैशासाठी तिने त्याला जाळ्यात अडकवलं होतं. आता तो परत येतोय, आणि तू…’
कुटुंबाची बदनामी होत होती. आई-बाबा, म्हातारपणी मुलाच्या या असल्या वागण्यामुळे दु:खी – कष्टी झाले होते. लोक नावे ठेवत होते. कसले कसले टोमणे मारत होते. शिवाय, उद्या तुझ्या लग्नातही अडचणी आल्या असत्या. मी या घराबाद्दल असलेलं माझं कर्तव्य निभावलं. तुला तुझा भाऊ आणि आई-बाबांना त्यांचा मुलगा परत मिळवून दिला.’
‘आणि तुझा नवरा ….. भाऊ अन मुलगा या व्यतरिक्त तो तुझा नवराही आहे नं! ‘
‘जो परततोय, तो या घरचा मुलगा आहे. भाऊ आहे. माझं नातं तर त्याच दिवशी संपलं, ज्या दिवशी त्याने दुसर्या बाईशी संधान बांधलं आणि या घराच्या बाहेर पाऊल ठेवलं. उंबरठ्याचं बंधन काय केवळ बायकांसाठीच असतं का? ‘
मूळ कथा – दहलीज का बंधन
मूळ लेखिका – डॉ. विनीता राहूरीकर
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
मो. – ९८२६०४४७४१
☆☆☆☆☆
(५) – स्वातंत्र्य
‘मी आज सकाळपासून बघतोय अम्मी, तू गुपचुप आहेस. काय झालं? ‘
‘होय बेटा, मलाही असंच वाटतय. बेगम, बेटा बरोबर बोलतोय. तुझं असं उदास होणं आपल्या घराला उदास करतय. आता सांग तरी काय झालं? ’ शौकत मलिकने आपल्या बायकोला विचारले.
उद्या रविवार आहे. आमच्या विद्यालयात बाहेरची परीक्षा आहे. इंटर्नल म्हणून ज्यांची नेमणूक झाली होती, त्यांची तब्बेत अचानक बिघडली. त्यांचा आणि मुख्याध्यापकांचा दोघांचा फोन होता, की मी ती जबाबदारी घेऊन तिथे परीक्षेच्या वेळी उपस्थित रहावं.’
‘पण ही जबाबदारी तुलाच का? आणखीही शिक्षक असतीलच नं तुमच्या विद्यालयात.’
‘जास्तकरून बिहारी शिक्षिका आहेत. दिवाळीपासून पौर्णिमेपर्यंत त्यांचा पर्व काळ असतो. त्या असतात कुठे घरात? ‘ मिसेस मलिकच्या बोलण्यातील उदासीनता अधिक गडद होऊ लागली होती.
‘काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल.’ मुलगा म्हणाला.
‘चिंता कसली? सरळ कळवून टाक, की आईची सहाय्यिका रविवारी सकाळी चर्चला जाते. तुझं घरी असणं गरजेचं आहे.’ पती मलिक महोदयांनी फर्मान सोडलं. काहीशा घाबरलेल्या सहाय्यिकेने सुटकेचा दीर्घ नि:श्वास सोडला.
‘कसं बोलताय अब्बा आपण? आपल्या ऑफीसमध्ये अशी काही परिस्थिती अचानक निर्माण झाली असती, तर आपण काय केलं असतंत?’
‘मी पुरुष आहे. पुरुषाचं बाहेरचंच काम असतं!’
काळ खूप बदललाय अब्बू! बदलत्या काळाबरोबर आपणही बदलायला हवं. उद्या अम्मी आपल्या विद्यालयात जाऊन आपली जबाबदारी निभावेल. सहाय्यिका चर्चमधून परत येईपर्यंत घर आणि दादीची जबाबदारी आपण सांभाळू! ‘
‘बेटा, तू बरोबर बोलतोयस. घर चालवायचं, तर आपापसात एक दुसर्याच्या अडचणी जाणून, समजून चालवायला हवं. तरच जिंदगी मजेत जाईल!’
एवढ्यात मुलाचे लक्ष पिंजर्यात बंद असलेल्या पक्ष्याकडे गेले. तो बाहेर पडण्यासाठी तडफडत होता.पिंजर्याचं दर उघडून पक्ष्याला आकाशात उडवत मुलगा म्हणाला, ‘सगळ्यांना स्वातंत्र्य मिळायला हवं.’
मूळ कथा- खुले पंख
मूळ लेखिका – सुश्री विभा रानी श्रीवास्तव
अनुवादिका – सौ. उज्ज्वला केळकर
मो. – ९१६२४२०७९८
☆☆☆☆☆
अनुवादिका – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈