श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ मानिनी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
आशाने साठ वर्षे पुरी केली आणि तिचा मुलगा जय तसेच सून वर्षा यांचे म्हणणे पडले, आईची एकसष्ठी साजरी करायची.जयने त्याच्या अनुमावशीला आणि माधवमामाला फोन केला.
जय – मावशी, आईने साठी पुरी केली, आमची इच्छा आहें तिची एकसष्ठी साजरी करूया, तुझे काय मत आहें?
मावशी – होय बाबा, तिने आयुष्भर कष्ट केलेत, त्रास खुप सोसलाय. तुला वाढवताना आणि व्यवसाय सुरु करून पैसे मिळविताना, तीच कोणी कौतुक केलंच नाही पण इतरांचे कौतुक करायला ती सर्वांच्या आधी पुढे असते. आणि नेहेमी हसतमुख, तू दिवस ठरव, आम्ही आहोत तूझ्या मदतीला.
जय – हो मावशी, मामाला पण फोन केलाय, तो पण मामीसह येणार आहें.
संध्याकाळी जय आणि वर्षाने आईला एकसष्ठी कार्यक्रमाबद्दल सांगितले, तेंव्हा आशाने त्याला उडवून लावले.
आशा – असले कार्यक्रम मला आवडत नाहीत रे आणि मी माझ्या आयुष्यात काय एवढे दिवे लावलेत की पराक्रम केलाय म्हणून माझा एवढा कार्यक्रम करतोस तू? मी आपली साधी बाई, नवऱ्याने घरातून हाकलून लावलेली. माझे कसले कार्यक्रम नकोत.
आई अशी ऐकणार नाही हे जयला माहित होते, त्यामुळे त्याने अनुमावशीला आणि आशाच्या आत्या विजूआत्या ला कळविले. मग विजू आत्या ने आशाला दम भरला तशी आशा तयार झाली.
मग जय आणि वर्षाने तयारी चालू केली, छोटा हॉल पाहिला,आईला न कळवता हिऱ्याची अंगठी केली,सोन्याचा नेकलेस केला. साडया खरेदी केल्या. जवळच्या नातेवाईकांना भेटी घेतल्या. एका योग गुरुचे प्रात्यक्षिक आणि लेक्चर ठेवले.
कुणा कुणाला बोलवायचे याची यादी करण्यासाठी जय आणि वर्षा बसली. एव्हड्यात वर्षाच्या लक्षात आलं म्हणून तिने जयला विचारले “तूझ्या बाबांना, काका काकू ना बोलवणार आहेस क?’
जय थंबकला. हा जटील प्रश्न त्याच्या लक्षात आला नव्हता.
“हे आईलाच विचारायला हवं ‘जय म्हणाला.
रात्री आशा मेडिकल स्टोअर मधून आली, त्यानंतर काही वेळाने जय आणि वर्षा आपल्या एजन्सी मधून आली. रात्री जेवताना तिघांनी एकत्र जेवायचं हे ठरलेलं.
जेवायला सुरवात केली एव्हड्यात जय ने आईला विचारले
“आई, बाबांना काका काकूंना बोलवायचं आहें ना?
हे वाक्य आशाने ऐकलं मात्र, हातातला घास ताटात टाकून ती किंचाळली “नाही, अजिबात नाही,’
“अग पण एकसष्ठी ला बायकोबरोबर नवरा…
“नावाचा नवरा तो, हिम्मत नव्हती म्हणून सोडल नाही मी.. पण मनातून कधीच कंटाप केलाय त्याला, मला घरातून हाकलून लावलेल्या माणसाला कार्यक्रमला बोलवायचं, पुरुष नाही का बायको नसेल तर कणवतीला सुपारी लाऊन कार्य उरकतात, मग आम्ही बायका तसं का करू नये?’.
संतापलेल्या आशाने घास ताटात टाकला आणि हात धुवून खोलीत गेली आणि धाडकन दरवाजा लाऊन घेतला.
जय वर्षाला म्हणाला “उगाचच बाबांचं नाव घेतलं, त्या रागाने आई रात्रभर झोपायची नाही.
बेडवर पडलेल्या आशाचा संताप संताप झाला.काही गोष्टी विसरायचंय म्हंटल तरी पिशाच्च होऊन समोर उभ्या राहतात. तिच्या डोळ्यसमोर तीस वर्षांपूर्वीचें तीच लग्न डोळ्यसमोर आले.
तीस वर्षांपूर्वी
आशा भावंडात शेंडेफळं. सर्वात देखणी आणि सर्वांची लाडकी.अभ्यासात जेमतेम पण खेळात, नृत्यात पुढे.शाळेतील नाटकात सुद्धा तिने भाग घेतलेला आणि बक्षीसे मिळविलेली. तिने तारुण्यात प्रवेश केला आणि ती अनेकांची “दिल की धडकन ‘झाली.पण तिने कुणाकडे लक्ष दिले नाही. मोठया बहिणीचे अनुचे लग्न झाले आणि मग भावाचे माधवचे पण लग्न झाले.त्यानंतर आशा साठी नवरा शोधणे सुरु झाले.
आशाचा आपल्या आईवडिलांवर विश्वास होता. आपल्यासाठी ते योग्य ते स्थळ शोधतील हे तिला माहित होत. मग ओळखीतून नितीनचें स्थळ आले, दापोलीच्या जवळच त्यांचे घर होते, गावात औषध दुकान होते. नितीन आणि त्याचा मोठा भाऊ दुकान सांभाळत होते. घरी फक्त नितीनची मोठी वहिनी आणि त्यांची दोन मुले. म्हणजे नितीन आणि भावाची चार माणसे.
वडिलांना नितीन बरा वाटला. आपण पण आईवडिलांना जास्त त्रास नको म्हणूंन होय म्हंटल.थोडक्यात लग्न झालं आणि आपण सासरी गेलो. नव्याचे चार दिवस संपले आणि सासरची नेमकी परिस्थिती लक्षात यायला लागली. घरात जशी थोरल्या जाऊची दादागिरी तशीच मोठया दिराची दुकानात.दुकानचा सर्व व्यवहार मोठया दिराच्या हातात -आलेले पैसे, दयायचे पैसे, माल मागवणे, चेक्स वर सही सर्व मोठया भावाकडे. नितीन फक्त काऊंटर वर उभा किंवा एका टेबलावर बसलेला.
घरी पैशाचा व्यवहार थोरल्या जाऊकडे, पैसे हवे असतील तर तिच्याकडे मागायचे.
रात्री नितीन खोलीत आला की ती नवऱ्याला विचारायची.
“तुम्हाला या घरात आणि दुकानात कसलीच किंमत नाही, सर्व काही मोठया भावाच्या आणि वहिनीच्या ताब्यात. मग इथे राहता कशासाठी? आता लग्न केले आहें तर माझा पण काही विचार करायला नको?मी तिच्याकडे पैसे मागणार नाही. मी तुमच्यकडे मागेन. तुम्ही मला पैसे आणुन द्या ‘.
असे ती बोलली की नितीन चिढी आणि अबोला ठेवी.
आशाला काय करावे हे सुचेना. तिच्या लक्षात आले, या घरातून बाहेर पडायला हवे तरच पुढचे आयुष्य सुसह्य होईल.
आशाने शहरात जाऊन नवीन औषधं दुकान काढायचे म्हंटले की तिचा नवरा चिडायचा, भाऊ वहिनी, पुतणे पासून वेगळे व्हायचे नाव घेईना.त्यात आशाला दिवस गेले त्यामुळे तिची आणखी चिडचिड व्हायची.
प्रसूतीसाठी आशा माहेरी आली, तिच्या घरची एकांदर परिस्थिती पाहून तिची आई रडायची. मोठया मुलीला समजूतदार माणसे मिळाली, मुलाला चांगली बायको मिळाली पण लाडक्या धाकट्या मुलीच्या बाबतीत फसवणूक झाली, म्हणून तिला वाईट वाटायचं.
जयचा जन्म झाला आणि आशा सुखावली. त्याचा चेहरा थेट तिच्यासारखा होता. सहा महिने माहेरी राहून आशा घरी आली पण घरची परिस्थिती होती तशीच.
सासरी आल्यानंन्तर पुन्हा तसेच दिवस जाऊ लागले. मोठी जाऊ जयचा तिरस्कार करत होती, तो रात्रीचा रडायला लागला की हिची बडबड सुरु होई, मोठे दीर सुद्धा चिडत असत. आशाची पुतणी लहान जयला खेळाऊ पहात असे पण तिचे आईवडील तिच्यावर चिडत असत.
छोटया जयला डॉक्टर कडे न्यायचे तिने तीन तीन वेळा नवऱ्याला सांगितले, पण तो सोबत आला नाही. मान खाली घालून तिला जावकडे पैसे मागावे लागत होते. जाऊ चिडून बोलून दोनशे रुपये हातावर टिकवत असे. सुदैवाने तिची अनुमावशी आली की तिच्या हातात हजार रुपये टेकावून जात असे, त्या पैशाचा तिला आधार होता.
जुन्या आठवणींनी डोक्यात पिंगा घालायला सुरवात केली तशी आशाची झोप उडाली, मग ती बेडवरून उठली आणि तिच्या रूममध्ये असलेल्या झुलत्या खुर्चीवर येऊन बसली.
मन मारून नाईलाजाने ती घरात राहत होती. मधल्या काळात बाबा देवाघरी गेले, दोन वर्षांनी आई गेली. माधव मुंबईला आणि मोठी बहीण पुण्यात. अशा वेळी तिला रत्नागिरीत राहणाऱ्या विजूआतेचा आधार वाटे. महिन्यातून एकदा ती विजूआते कडे जाई.
अशा परिस्तितीत जय पाच वर्षाचा झाला, तेंव्हा ती परत एकदा नवऱ्याच्या मागे तगादा लावला, त्या गावात जिल्हा परिषदेची चौथी पर्यत शाळा होती पण चार किलोमीटरवर. या असल्या शाळेत मुलाला घालून त्याचे नुकसान होईल म्हणून दापोली नाहीतर खेड मध्ये नवीन दुकान काढू म्हणजे तेथे बिऱ्हाड करता येईल आणि जयला पण शाळेत घालता येईल.
तिचा मोठा आवाज ऐकून जाऊ मध्ये पडली, मग दीर बोलू लागला. त्याच्या धीराने नवरा आशा बरोबर भांडू लागला. मग जाऊ घरात गेली आणि कपडे सुकत घालायची काठी घेऊन आली आणि त्या काठीचे दोन तडाखे तिच्या डोक्यात घातले, आशाच्या डोक्याला खोक पडली आणि रक्त येऊ लागले.
तिचा नवरा मग पुढे झाला आणि त्याने तिला हाताला धरून बाहेर ढकललं. ती अंगणात पडली. तिचे रडणे ऐकून जय जागा झाला आणि आईच्या दिशेने धावला.
आशाच्या जावेने दार बंद करून घेतले. रडत रडत आशा उठली, तिच्या पायाकडे बसलेल्या जयला तिने उचलून घेतले आणि बंद केलेल्या दाराकडे पहात ती अंगणातून बाहेर पडली.
या रात्रीच्या वेळी सोबत लहान बाळाला घेऊन कुठे जावे, असा ती विचार करत असताना तिला मारुतीच्या देवळाशेजारचे बाबीं काका आठवले. बबिकाका आणि काकीकडे ती कधीमधी जायची. त्यांची एकूलती एक मुलगी लग्न करून दिलेली मालवणला असायची, त्यामुळे ती दोघेच घरात असायची. काकी तिला खूप प्रेमाने वागवायची.आशाचे घरची मंडळी तिला खुप त्रास देतांत, म्हणून ती हळहळायाची.
रात्रीच्या अशा वेळी आशाला काका काकीची आठवण आली. ती त्यांच्या घरच्या दिशेने चालू लागली.
आशाने काकाच्या घरचा दरवाजा खटखटवला, काकीने दरवाजा उघडला, काकीला तिला यावेळी आशा परिस्थितीत पाहून आश्यर्य वाटले.
–क्रमशः भाग पहिला
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈