श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ मानिनी… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(तो MR गेला पण तिच्या काळजाचे पाणीपाणी झालं. ती मनातल्या मनात रडू लागली. पुढे काय झालं शिरीषचे हे तिला कळेना. कुणाला विचारावे तरी पंचायती.) – इथून पुढे
म्हणता म्हणता ती साठ वर्षाची झाली. जय बारावी झाला, मग तो B. Farm ला गेला. त्याला व्यवसायाची आवड म्हणून तिने त्याला “जय एजन्सी ‘सुरु करून दिली. एवढी वर्षे ती मेडिकल चालवत होती, त्यामुळे तिच्या ओळखी होत्याच. एका वर्षात त्याला वीस कंपन्याच्या agencies मिळाल्या. दहा माणसे कामाला ठेवली. जोरात धंदा होऊ लागला. मग माल सप्लाय करण्यासाठी टेम्पो घेतला. त्याला मुली सांगून येऊ लागल्या, मग परंजपे डॉक्टर यांच्या ओळखीच्या कुटुंबातील वर्षा चें स्थळ आले आणि जयचे लग्न होऊन वर्षा सून म्हणून घरात आली.
गॅलरीतल्या खुर्चीवर बसल्या बसल्या आशुच्या डोळ्यसमोर तिच्या आयुष्याचा चलदचित्रपट सरकत होता. साठ वर्षे आपण पुरी केली, कळलेच नाही. या आयुष्यात आईवडिलांसारखे विजुआते आणि काका तसेच डॉ पराजपे यांचे उपकार न विसरण्याजोगे. याच आयुष्यात शिरीष भेटला आणि मनात वसला तसेच बाहेर पण पडला.
हे आपले साठ वर्षाचे आयुष्य. जय आणि वर्षा यांनी आपली एकस ष्ठी ठेवली आहें आणि तो विचारतो, जन्मदात्याला आणि काकाकाकूला बोलवणार का, म्हणून?
काय केल बाबा तूझ्या पित्याने?
काकाकाकूने? हाकलून दिल घरातून, पुन्हा चौकशी पण केली नाही कधी. जिवंत आहोत का मेलो याची..
आशुची एकसष्ठी पार पडली. बहीण भावोजी, भाचरे, भाऊ वहिनी तसेच मावंशी आणि तीच कुटुंब, विजुआते, डॉ काका, डॉ पराजपे फॅमिली हॉस्पिटलस्टाफ, जिल्ह्यातील केमिस्ट परिवार तसेच अनेक ओळखीची मंडळी हजर होती. कार्यक्रमला मंगळसूत्र घातलेल्या बाईचा नवरा उपस्थित नाही म्हणून काही मंडळींनी कुजबुज केली पण ज्यांना आशुची परिस्थिती माहित होती, त्यांना आश्यर्य वाटले नाही.
सर्व मंडळी आपापल्या घरी गेली, पुन्हा आशू मेडिकल मध्ये आणि जय वर्षा एजन्सी मध्ये मग्न झाले. एक दिवस वर्षाने आपल्या नवऱ्याला म्हणजे जयला विचारले
“जय, तूझ्या आईचा जवळजवळ पस्तीस वर्षे नवऱ्याशी संबंध नाही मग तिला दुसरे लग्न करावे असे वाटले नाही कधी?
“विजआजी मला एकदा म्हणाली होती, शिरीष गोखले नावाचा एक कोल्हापूरमधील MR तिला आवडायचा, असे आईने आजीला सांगितले होते. त्याची बायको घटस्फोट घेणार होती आणि मग आई घटस्फोट घेऊन त्यांच्याशी लग्न करणार होती, पण काही कारणाने ते लग्न झाले नाही. शिरीष गोखले आता कुठे असतांत कोण जाणे?
एक दिवस आशू दुकानात असताना जयचा फोन आला “आई, गावाकडून काकूने निरोप दिला आहें, तुझे बाबा जास्त आजारी आहेत, त्यांना घेऊन जा ‘
“आत्ता आठवण झाली का आमची, पण तुझा पत्ता त्यांना कळला कसा?
“अग त्या गावातील एक मुलगा माझ्या एजन्सी मध्ये कामाला आहें, त्याने त्यांना सांगितले असणार. ‘
“काय आजारी आहेत?”हार्ट अटॅक आलाय बहुतेक ‘.
“ठीक आहे, मुलगा आहेस म्हणून कर्तव्य कर, गाडी घेऊन जा त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट कर ‘.
जय गाडी घेऊन गेला आणि आपल्या वडिलांना घेऊन आला आणि डॉ परकार हॉस्पिटल मध्ये त्याना ऍडमिट केले.
हॉस्पिटल मध्ये सर्व तपासण्या झाल्या आणि बायपास करायला हवे असे डॉ नी सांगितले. जयने सर्व पैश्याची व्यवस्था केली. जय रोज हॉस्पिटल मध्ये जात होता पण आशू एकदाही गेली नव्हती. पंधरा दिवसांनी त्यांना डिस्चार्ज मिळाला. आधल्या दिवशी जय आईला म्हणाला “आई, ते म्हणत आहेत, माझे गावाकडे खुप हाल होत आहेत, जेवणं पण मिळत नाही, खिशात पैसे नाहीत, मी तुमच्याघरी येऊ काय?’
आशू कडाडली -“जय, त्यांना त्यांच्या घरी पोहोचून ये. त्या घाणीतून मी पस्तीस वर्षांपूर्वी मी तुला घेऊन बाहेर पडले, ती घाण परत माझ्या घरात नको. आणि परत असले निरोप मला देऊ नकोस. यांनतर तूझ्या माणसाला सांगून ठेव, त्या घरातले बरे किंवा वाईट निरोप दयायचे नाहीत. मी इथे मानाने रहाते आहें, मानिनी सारखी. त्यांची दृष्ट लागायला नको ‘.
जय वडिलांना गावी पोहोचून आला.
आशुचे आयुष्य नेहेमीसारखे सुरु होते, सून वर्षा हल्ली सतत म्हणायची “आई, तुम्ही कुठेच फिरला नाहीत. अजून धड कोकण पाहिले नाहीत. केंव्हा तरी लग्नकार्याच्या निमित्ताने मुंबई किंवा पुणे, ते पण घाईत. लोक आता युरोप ट्रिप करतात, नर्मदा परिक्रमा करतात, तुम्ही पण जा ना… ,
आशू मनात म्हणायची, मला पण जावेसे वाटते पण जाऊ कुणाबरोबर…
रोज सारखा कंटाळवाणा दिवस सुरु होता, निमा आणि मीना काऊंटर सांभाळत होत्या, आशू स्टोकिस्ट कडून आलेली बिले चेक करत होती, एव्हड्यात दुकानासमोर रिक्षा थांबली आणि गृहस्थ हातातील बॅग सांभाळत सरळ आत येत म्हणाला “मॅडम, चहा मागवा ‘.
आशू चमकली, तोच आवाज, बोलण्याची तीच पद्धत वीस वर्षा पूर्वीची. तिने झटकन मान वर करून पाहिले, डोळे विसफ़ारले, चेहरा आश्रयचकित झाला, ती किंचाळली “शिरीष ‘.
काही कळायच्या आत ती त्याला बिलगली. शिरीषने तिला थोपटत म्हणाला, “होय आशू, मी शिरीष ‘.
ती रडत रडत म्हणाली “अरे तू आहेस?
“होय आशू, मी आहें. तुला कुणीतरी सांगितले असेल मी आत्महत्या केल्याचे. करायचा होता मला नाश स्वतःचा, पण शेजाऱ्यांनी धावपळ करून मला वाचवलं, आता गेल्या महिन्यात ती पण गेली कॅन्सरने. माझा शत्रू संपला पण मी आहें ‘.
आशुच्या लक्षात आलं, आज आपण जे वागलो ते पाहून दुकानातल्या मुलींना आश्यर्य वाटलं असणार. ती परत शिरीष पासून अलग झाली आणि त्याला म्हणाली “चल, आपण घरी जाऊ, मला तुझ्याशी खुप खुप बोलायचं आहें ‘. निमाला दुकानाकडे लक्ष दयायला सांगून तिने रिक्षा बोलावली आणि त्याला घेऊन ती घरी आली.
मग शिरीषने आपली सर्व हकीकत सांगितली. मग बायको आपल्यावर कसा लक्ष ठेऊन असायची. कुणाला फोन करतो, कुणाचा येतो हे पहायची. रोज पैशावरून, जेवणावरून भांडणे. आपण या काळात तीन नोकऱ्या सोडल्या. कंटाळून खुप झोपेच्या गोळया घेतल्या, पण शेजारी बरा होता त्याच्या लक्षात आले, त्यानी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आणि वाचवले. कंटाळवणे आयुष्य चालले होते. दोन वर्षांपूर्वी बायकोला कॅन्सर झाला. मी हयगय न करता सगळे उपचार केले पण उपयोग झाला नाही, आपण जगत नाही हे लक्षात आल्यावर तिला माझ्या बरोबर दुष्ठपणाने वागल्याचा पक्षचताप झाला, तिने क्षमा मागितली आणि पंधरा दिवसात ती गेली ‘.
आशू शिरीषला म्हणाली “शिरीष, तू पुन्हा भेटशील ही आशा मी सोडली होती, माझ्या मनातला पुरुष तूच होतास, आता मी समाजाचा विचार करणार नाही, माझ्यावर कसल्या जबाबदाऱ्या नाहीत. जय चें लग्न झाले आहें, दुकान, एजन्सी जोरात सुरु आहें, पण मी एकटी आहें रे, तुझ्यावाचून मी अपुरी आहें, मला या वयात साथी हवा आहें आणि तो तूच आहेस. आपण लग्न करू आणि आयुष्याचा शेवटचा काळ एकमेकासामावेत घालवू, नाही म्हणू नकोस शिरीष..
“नाही कशाला म्हणू आशू, मी मनापासून तुझ्यावरच प्रेम केलाय. ‘
“तर मी आज जय आणि वर्षाला सांगते, आम्ही लग्न करतोय म्हणून ‘
त्याच दिवशी जय आणि वर्षा घरी आली आणि अनोळखी माणूस पाहून चक्रवली.
आशू ने जयला ओळख करून दिली
“जय, हा शिरीष, शिरीष गोखले.
जयला एकदम आश्यर्य वाटले, त्याने त्यांचे नाव विजूयाआजी कडून ऐकले होते. त्याला माहित होत, आईला यांच्याशी लग्न करायची इच्छा होती.
“अरे हो, छान छान.. मी ऐकलं होत तुमच्याबद्दल.. विजू आजी म्हणाली होती ‘
“हो ना, जय तेंव्हा आम्ही लग्न करू शकलो नव्हतो, पण समाज काय म्हणेल, कोण काय म्हणेल याची पर्वा न करता आम्ही लग्न करत आहोत ‘.
जयच्या डोळयांतून पाणी आलं, आपल्या आईने कसे संन्यासी सारखे आयुष्य काढले, हे त्याने पाहिले होते. आईला सुख मिळालेच पाहिजे निदान या वयात.
जयने शिरीषला मिठी मारली, वर्षाने आशूला मिठी मारली.
चार दिवसांनी आशू आणि शिरीष यांचे मोजक्या लोकात लग्न झाले.
जयने दुसऱ्या दिवशी दोन युरोप ट्रिपची तिकिटे शिरीषच्या हातात ठेवली.
आयुष्यात पहिल्यांदा आशू विमानात बसणार होती. ती घाबरत नव्हती कारण तिचा प्रिय शिरीष तिच्यासमवेत होता. त्याचा हात हातात घेऊन ती लंडन, पॅरिस, स्वित्झर्लंड, जर्मनी फिरणार होती.
– समाप्त –
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈