श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ आय लव्ह यू पप्पा… भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(अरे मैत्रीत अहंकाराची भावना तर सोड, तरतम भाव देखील नसतो. अर्थात अशा गोष्टींवर तुझा विश्वासच नाहीये तर तुला अशा गोष्टी सांगूनही काही उपयोग नाही म्हणा. येतो गड्या, स्वत:ला सांभाळ.!’) इथून पुढे 

केशवची आणि माझी ती शेवटचीच भेट होती. त्यानंतर मनातून दुखावलेल्या केशवने माझ्याशी कधीच संपर्क साधला नाही. माझ्यातल्या अहंकारामुळे मीदेखील त्याच्याशी पुन्हा कधी संपर्क साधला नाही. मी केशवला दिनकरच्या लग्नातही बोलावले नाही. मी आपल्याच धुंदीत होतो.”

“काका, बाबांनीसुद्धा माझ्या लग्नात तुम्हाला कुठे निमंत्रण दिले होते? द्या सोडून तो विषय. आता दिनकर काय करतोय?”

“अरे मीच केशवशी संबंध तोडले होते, तर तो मला कशाला बोलवेल? माझ्या कर्तृत्वाने जर आमचे मालक एवढे कमावत असतील तर मी स्वत:चा व्यवसाय केला तर किती कमवीन असा विचार करून नोकरी करता करता मी स्वत:चा एक कारखाना सुरू केला. दिनकरला मध्येच शिक्षण सोडायला लावून त्याच्यावर मी कारखान्याची जबाबदारी सोपवली.

व्यवसायात गुंतवलेल्या तुटपुंज्या भांडवलीमुळे मी लवकरच अडचणीत आलो. कधीतरी चव चाखणाऱ्या केशवला मी व्यसनी म्हणवून हिणवले होते. एकेकाळी निर्व्यसनी असलेला मी दारूच्या व्यसनाच्या गर्तेत पुरता सापडलो. चांगल्या पगाराच्या नोकरीला मुकलो. लवकरच माझी भणंग अवस्था झाली. नियतीचे फासे उलटे पडत गेले. शनि महाराजांनी कधी माझा अहंकार तुडवून मला रसातळाला आणले होते ते कळलं देखील नाही. मला पाचही पुत्रच आहेत हा माझा अहंकार माझ्या मुलांना भोवला. विधात्याने माझ्या मुलांच्या पोटी केवळ कन्यारत्ने देऊन त्याची कसर भरून काढली.

माझ्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर वा चार्टर्ड अकाउंटट करीन अशी मी दर्पोक्ती केली होती, ते राहूनच गेले. पाचही बोटे एकत्रपणे एक मूठ बनून राहतील असे वाटत असतानाच माझी मुले वाट फुटेल तिकडे निघून गेली. मी त्यांना एकत्रही ठेवू शकलो नाही. माझ्या कर्माची फळे मला इथेच भोगावी लागली. असो.

आज केशवच्या वार्षिक श्राद्ध दिवशी तरी माझ्या मनात साठलेले हे दु:ख मोकळे करावे म्हणून मी आलोय. दिलदार मनाच्या केशवने मला कधीच माफ केले असेल.” असे म्हणत केशवांच्या तसबिरीला हात जोडून रामदास ह्यांनी नमस्कार केला.

“काका, बराच उशीर झाला आहे, आलाच आहात तर आता इथे जेवूनच जा.”

अविनाशच्या बोलण्याकडे काणाडोळा करीत ते एवढेच म्हणाले, “औक्षवंत हो बाळा.” आणि काही कळायच्या आतच पायऱ्या उतरून ते निमूटपणे बाहेर पडले.

अविनाश पप्पांच्या तसबिरीकडे पाहत राहिला. ‘मी नोकरीवर रूजू होताना पप्पांनी काडीचीही मदत केली नाही ही अढी किती वर्षे उराशी बाळगून होतो. त्यामागचा उद्देश्य आज कळला. खरंच, माझं पिलू माझं बोट सोडून दुडूदुडू चालताना मला कोण आनंद झाला होता. माझ्या पप्पांनी देखील, मी नोकरीला लागताना केलेल्या धडपडीत अगदी तोच आनंद अनुभवला असणार ! रामदास काकांनी सांगितलं नसतं तर माझ्या मनांत ती अढी कायम राहिली असती.’

अविनाशने सुस्कारा टाकला. आईकडे पाहत सहज म्हणाला, “आई, रामदास काका काय म्हणत होते ते ऐकलंस ना? लेकी असोत वा सून किंवा नातवंडांवर असलेले पप्पांचे प्रेम अगदी स्पष्टच दिसून यायचे. परंतु मी कधी पप्पांच्या तोंडून माझ्याविषयी कौतुकाचा शब्द ऐकल्याचे मला आठवत नाही. माझ्यावर ते कित्येकदा ओरडायचे. मी मोठा भाऊ असून देखील तिघी बहिणींना कधी एका शब्दाने बोलू द्यायचे नाहीत.”

सुमित्राबाई काहीशा गंभीर होत म्हणाल्या, “डेबू, तुला खरं सांगू? तुझ्या माघारी ते तुझा उल्लेख अविनाश किंवा डेबू असं केलेलं मी कधीच ऐकलं नाही. ‘साहेबांचं जेवण झालं का? साहेबांना हे सांगितलंस काय, ते सांगितलंस काय?’ असे विचारायचे. आपला डेबू साहेब आहे याचे त्यांना प्रचंड कौतुक होते. तुझ्याशी ते कोडगेपणाने वागायचे आणि तुझ्या बहिणींना मात्र लाडाने वागवायचे. हे आजवर तू कधी बोलून दाखवलं नाहीस परंतु ते त्यांच्या लक्षात आले होते. एकदा बोलता बोलता ते म्हणाले होते, ‘मुलगा आणि मुलगी यांच्यात मी भेदभाव करतो असं तुम्हा सगळ्यांना वाटत असेल. तसं मुळीच नाही. या उलट बहुतेक घरात वंशाचा दिवा म्हणून मुलाला ‘लाटसाहब’ सारखी वागणूक देतात आणि मुलगी परक्याचे घरचे धन आहे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करतात. याबाबत माझा दृष्टीकोन थोडासा वेगळा आहे. मुली उपवर झाल्या आहेत. त्यांची शिक्षणे होताच त्या कधी सासरी जातील याचा नेम नाही. मुलींना नवरा कसा मिळेल, सासर कसं मिळेल हे माहित नाही. जोवर कन्या आपल्या घरांत आहे तोवर आपल्या ऐपतीनुसार तिला एखाद्या राजकुमारीसारखे वागवावं. तिला काही कमी पडू देता कामा नये. तिचे करता येतील तेवढे लाड करावेत, असं मला वाटतं, या घरची लेक असल्याचा तिला अभिमान वाटला पाहिजे.

सुमित्रा, अगं ह्या चिमण्या कधी घरटं सोडून भुर्र्कन उडून जातील याचा नेम नाही म्हणून माझं बापाचं काळीज धडधडतं. हे मी कुणाला सांगू? पोरींना जप हो.’

भावुक होत गेलेले तुझे पप्पा लगेच स्वत:ला सावरत मला म्हणाले, “डेबू मोठा झाल्यावर त्याच्यात जोपासल्या गेलेल्या पुरूषी अहंकारामुळे त्याने स्त्रीला कधी दुय्यम लेखण्याची चूक करू नये म्हणून मी त्याच्याशी थोडा फटकळ वागतोय हे मला मान्य आहे. आपल्या मुलींनी जी घरकामे करावीत अशी तू अपेक्षा करतेस ना, ती सर्व कामे तू डेबूकडूनही करवून घे. ही तुला विनंती आहे.’ त्यांनी असं स्पष्टच सांगितल्यावर मी काय बोलणार सांग?

डेबू, तुला सांगते, २६ जुलै २००५ चा तो काळाकुट्ट दिवस मी विसरूच शकत नाही. मुंबईतल्या त्या प्रलयकारी पावसानंतर रस्ते पाण्याने भरून वाहतूक खोळंबली होती. माणसे जागच्या जागी अडकली होती. आम्ही टीव्हीवरच्या बातम्या पाहत होतो. तुझ्याशी संपर्क होत नव्हता. खूपच चिंता वाटत होती. अचानक फोन घणघणला. तुझे पप्पा लगेच ओरडले, ‘सुमित्रा, साहेबांचा फोन आला असेल बघ.’ मी फोनवर तुझ्याशी बोलले. त्यांनी देवाचे आभार मानले. पहाडासारख्या असणाऱ्या तुझ्या पप्पांच्या डोळ्यांत मी पहिल्यांदाच आसवं दाटलेली पाहिली. भीतीने हादरल्याचे आणि चिंतेतून सावरल्याचे असे ते ऊन पावसासारखे बरसणारे सुखदुःखाचे अश्रू होते. डेबू, आईबाबांना मुले आणि मुली सारखेच प्रिय असतात रे.”

अविनाश केशवच्या तसबिरीपुढे हात जोडून साश्रु नयनांने पुट्पुटला, “पप्पा, तुमच्या धाकामागे लपलेले तुमचे अपार प्रेम मी पाहू शकलो नाही. तुमच्या या पिलाला माफ करा. आय लव्ह यू पप्पा.”

— समाप्त —

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments