श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ वारस… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

(८०टक्के माणसं जेवणाच्या हाॅलकडे पळाली. ज्यांना जेवायला जागा मिळाली नाही अशी उरलेली २० टक्के बुकस्टाॅलकडे वळली.) – इथून पुढे — 

अरुण कलेक्टरसाहेबांशी बोलत असतांनाच त्याचे साहेब समोर आले.

“अरे अरुण आम्हांलाही पैसे द्यावे लागणार आहेत का पुस्तकाचे?”त्यांनी विचारलं.

“काय साहेब तुमच्याकडून कोण पैसे घेईल?मी सांगतो स्टाँलवरच्या मुलाला पुस्तक द्यायला ” अरुण म्हणाला पण महिन्याला दिड लाख पगार घेणाऱ्या आणि पंधरा लाखांच्या गाडीत फिरणाऱ्या साहेबाला तिनशे रुपयेही जड व्हावेत याचा त्याला राग आला.

थोड्यावेळाने त्याच्या मेव्हण्या आल्या.

“पंत आम्हालाही तुमच्याकडून गिफ्ट म्हणून हवंय पुस्तक “अरुणच्या बायकोनेे त्याच्याकडे डोळ्यांनी इशारे केले’नाही म्हणू नका’ असा त्यांचा अर्थ होता.

“आणि आम्हांलापण” जवळच उभे असलेले त्याचे भाऊ आणि इतर नातेवाईक म्हणाले. अरुण नाही म्हणणं शक्यच नव्हतं.

“अभिनंदन अरुण. अरे सगळ्यांना फुकट पुस्तकं देतोय आणि आम्ही मात्र पैसे देऊन घ्यायचं?बहुत नाइन्साफी!ऐसे नही चलेगा अरुण. अरे एवढ्या जीवलग मित्रांपुढे तीनशे रुपये कुठे लागतात?”अरुणच्या मित्रांचा घोळका अरुणच्या भोवती जमा झाला. फुकट पुस्तकांच्या मागणीने अरुण अस्वस्थ झाला. पुस्तक लिहितांना आपण घेतलेल्या मेहनतीचं जरासुद्धा मोल या लोकांना जाणवू नये या विचारांनी तो बैचेन झाला.

जेवणं झाली. बरेचसे पाहुणे अरुणचं अभिनंदन करुन निघून गेले. अरुण पुस्तकांच्या स्टाॅलवर आला. स्टाॅलवर अगदी मोजकी पुस्तकं दिसत होती.

“वा बरीच पुस्तकं गेलेली दिसताहेत”त्याने आनंदाने स्टाॅलवरच्या मुलाला विचारलं.

“हो साहेब आपण तीनशे पुस्तकं ठेवली होती त्यातली फक्त पंचवीस उरली आहेत. पण त्यातली फक्त पन्नास पुस्तकं लोकांनी विकत घेतलीत. बाकीची दोनशेपंचवीस पुस्तकं फुकट वाटण्यात गेली आहेत”

“काय्यsssकुणी नेलीत एवढी फुकट पुस्तकं?”अरुणने संतापाने विचारलं

“साहेब मी कुणाला ओळखत नाही पण बऱ्याच जणांनी तुमचं नाव सांगून पुस्तकं नेली. मग मॅडमच्या मैत्रिणी आल्या होत्या. या दादाचेही मित्र आले होते. त्यांनी मला सांगितलं म्हणून मी दिली पुस्तकं”

अरुणने रागाने बायको आणि मुलाकडे पाहिलं. बायको म्हणाली

“हो मग! तुम्ही तुमच्या मित्रांना फुकट दिली. मग माझ्या मैत्रिणींनी काय घोडं मारलंयं?त्या नेहमी मला काही ना काही गिफ्ट देत असतात मग मला त्यांना काही द्यायला गिफ्ट द्यायला नको?”

“हो ना. माझे मित्रही तसेच आहेत. दहाबारा  पुस्तकं त्यांना दिली तर बिघडलं कुठे?”मुलाने विचारलं

“अरे बाबा प्रश्न असा आहे की ही माणसं पुस्तक वाचणार आहेत की फक्त शोकेसमध्ये ठेवणार आहेत?”

“ते आम्ही कसं सांगणार?नेलं तर वाचतीलच ना?”

“तसं नसतं रे. खरा पुस्तकप्रेमी पुस्तक विकत घ्यायला मागेपुढे पहात नाही. या फुकट्या लोकांना साहित्यप्रेमी कसं म्हणणार?”

पुस्तकविक्री झाली म्हणजे छपाईकरता केलेला खर्च काही प्रमाणात तरी वसुल होईल हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा हेतू साध्य न झाल्याने अरुण अत्यंत नाराजीनेच घराकडे निघाला.

घराजवळ येऊन पहातो तर एक बाई आणि एक तेराचौदा वर्षाचा मुलगा गेटजवळच उभे होते. कपड्यांवरुन तरी ते गरीब दिसत होते. अरुण गाडीखाली उतरताच ते त्याच्याजवळ आले. अरुणने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिलं.

“साहेब ते पुस्तक पाहिजे होतं” तो मुलगा घाबरत घाबरत म्हणाला.

“पुस्तक? कोणतं पुस्तक?”

तशी त्या मुलाने घडी केलेलं वर्तमानपत्राचं कटींग खिशातून काढून दाखवलं. अरुणच्या “संघर्ष” या पुस्तकाचा एका लेखकाने करुन दिलेला परीचय होता तो. कालच्याच वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेला.

” हो मिळेल ना! पण फुकट नाही मिळणार. पैसे लागतील त्याचे” त्याची चिडलेली बायको पुढे येत म्हणाली.

“किती लागतील ताई पैसे?”त्या बाईने विचारलं

“पाचशे रुपये”अरुणचा मुलगा म्हणाला. त्याचा हा आगाऊपणा अरुणला मुळीच आवडला नाही.

त्या बाईने कसलीही चर्चा न करता कमरेला लावलेली पिशवी सोडली. त्यातुन बऱ्याच दहा वीस रुपयांच्या चुरगळलेल्या नोटा काढून मुलाजवळ दिल्या.

“मोज रे सुशा”

मुलगा नोटा मोजू लागला. तशी ती बाई अरुणला म्हणाली

“दादा पोराला लई आवड आहे पुस्तक वाचायची. जे मिळेल ते वाचीत बसतो. पेपरमध्ये तुमच्या पुस्तकाचा फोटो पाहिला तवापासून मागे लागलाय हे पुस्तक घ्यायचं म्हणून”

“कुठे रहाता तुम्ही ताई आणि काय करता?”अरुणने उत्सुकतेने विचारलं

“ती बिल्डींग दिसती नव्हं का?”थोड्याशाच अंतरावरील बांधकाम सुरु असलेल्या बिल्डींगकडे बोट दाखवत ती म्हणाली”तिथंच म्या बांधकामावर मजुरी करते. पोरगाबी शाळा सुटली की तिथंच मजुरी करतो. बिल्डींगजवळ त्या झोपड्या दिसतात ना त्याच्यात आमी रहातो”

“या मुलाचे वडील काय करतात?”

“बाप नाही त्याचा. मेलं ते मागच्याच वर्षी. लय दारु प्यायचं”

तेवढ्यात मुलाने पैसे मोजून त्याच्या हातात दिले.

“मोजून घ्या साहेब, पाचशे आहेत”

“काय नाव बेटा तुझं?”

“सुशांत”

“कोणत्या शाळेत जातो आणि कितवीत आहेस?”अरुणने विचारलं

“नगरपालिकेच्या शाळेत जातो. नववीत आहे”

त्याचं शुध्द बोलणं ऐकून अरुण आश्चर्यचकित झाला.

“अजून कोणकोणती पुस्तकं वाचली आहेत?”

“अरे सुशा जा पुस्तकं घिवून ये आणि दाखीव साहेबाला ” सुशा पळतपळत झोपडीकडे पळाला.

“साहेब लई हुशार पोरगं हाय. नेहमी पयल्या नंबरने पास होतं”बाईच्या डोळ्यातून पोराचं कौतुक ओसांडून वहात होतं. सुशा चारपाच पुस्तकं घेऊन आला. चेतन भगत, राँबिन शर्मा, पु. ल. देशपांडे आणि इतर अनोळखी लेखकांची जुनी फाटलेल्या अवस्थेतली पुस्तकं होती ती.

“कुठून मिळवलीस ही पुस्तकं?”अरुणने विचारलं

“ते भंगारवाले येतात बघा. त्यांना सांगून ठेवलंय. रद्दीत पुस्तकं आली की ते आणून देतात. एका पुस्तकाचे वीस रुपये देतो त्यांना. बरेच जण पैसे घ्यायला नाही म्हणतात पण फुकट कशाला घ्यायच?त्यांनाही पोट आहे ” सुशा म्हणाला. अरुणला लाखांच्या गाड्यांमध्ये फिरणारे, वीसपंचवीस हजाराचा फोन बाळगणारे आणि तरीही फुकट पुस्तक मागणारे आठवले आणि त्याचा संताप झाला. त्याने सुशांतला जवळ घेतलं आणि विचारलं

” बेटा तुला रोज नवीन पुस्तक वाचायला आवडेल?”

सुशांतचा चेहरा आनंदाने केवढा तरी फुलला

“हो साहेब”

अरुणने गाडीतून त्याचं नवीन पुस्तक आणि मागे प्रकाशित झालेली दोन पुस्तकं काढून सुशांतच्या हातात ठेवली. सुशांत त्याकडे गोंधळून पहात असतांनाच अरुणने पाचशे रुपयातले साठ रुपये काढून बाकीचे पैसे त्याला परत केले.

“तुला फुकट पुस्तकं घेणं आवडत नाही म्हणून प्रत्येक पुस्तकाचे वीस असे तीन पुस्तकाचे साठ रुपये फक्त मी घेतलेत”

“पण साहेब… तुमी इतकी मेहनत घेऊन लिहिलेलं पुस्तक… “

“नाही ताई. तुमचा मुलगा खरा पुस्तकप्रेमी आहे. त्याच्याकडून मला जास्त पैसे नकोत. आणि सुशांत, माझ्या घरातल्या लायब्ररीत हजारो पुस्तकं आहेत. तू रोज येऊन त्यातलं पुस्तक वाचू शकतो. एखादं नवीन पुस्तक बाजारात आलं तर मला सांग. कितीही महागडं असलं तरी मी तुला ते वीस रुपयातच  देईन. “

त्या बाईच्या डोळ्यात पाणी आलं. पदराने ते पुसता पुसता ती सुशांतला म्हणाली

“सुशा पाया पड साहेबाच्या”

सुशांत पाया पडायला खाली वाकला तोच अरुणने त्याला वरच्यावर उचलून छातीशी धरलं

“ताई आता हे वर्ष जाऊ द्या. दहावीला आपण सुशांतला चांगल्या शाळेत टाकू आणि घाबरु नका त्याच्या शिक्षणाचा खर्च मी करेन”

दोघां मायलेकांच्या तोंडावरुन आनंद ओसंडून वाहू लागला. अरुणलाही खुप आनंद झाला होता. त्याच्या पुस्तकांच्या संपत्तीला वारस मिळाला होता.

– समाप्त –

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments