श्री सुनील शिरवाडकर
जीवनरंग
☆ वाटणी ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
रोडच्या एका बाजुला जरा मोकळी जागा दिसली तशी किसनने आपली कार तेथे पार्क केली.रस्त्यावर तशी शांतताच होती. एखाद दुसरी रिक्षा,स्कुटर जात येत होती.पलिकडे असलेल्या मार्केटमध्ये त्यांचे नेहमीचे सराफी दुकान होते. पण तिकडे कार लावायला जागा मिळत नाही. म्हणून मग त्याने दुसरीकडे कार पार्क केली आणि चालत मार्केटमध्ये आले.बरोबर त्याची मोठी बहिण होती.
“चल ताई..आलं सुवर्ण लक्ष्मी ज्वेलर्स” किसन म्हणाला.
“अनिलशेठ आहे का बघ.आपण फोन केलाच नव्हता त्यांना”
“असतील.या वेळी ते असतातच”
काचेचा जाड दरवाजा ढकलुन ते दुकानात आले.रणरणत्या उन्हातुन ते आल्यामुळे त्यांना दुकानातली एसीची थंडगार झुळुक सुखावुन गेली. मंगलने पदराने घाम पुसला. जवळच्या पर्समधून पाण्याची लहान बाटली काढली.खुर्चीत टेकत दोन घोट घेतले.
दुकानात अनिलशेठ तर होतेच..पण त्यांचा मुलगाही होता.समोर लावलेल्या टीव्हीवर कुठला तरी चित्रपट पहात होते.
“या किसनभाऊ.आज काय बहिण भाऊ बरोबर. काय काम काढलंत?”
” शेठजी आम्ही आज एका वेगळ्याच कामासाठी आलोय. तुम्हाला तर माहीतीच आहे. आमचे अण्णा गेले दोन महीन्यापुर्वी”
“हो समजलं मला. बऱच वय असेल ना त्यांचं?”
“हो नव्वदच्या आसपास होतच.तर आम्ही हे दागिने आणले होते. जरा बघता का!”
किसनने पिशवीतून पितळी डबा काढला. काऊंटरवर असलेल्या लाल ट्रे मध्ये ठेवला. त्यात त्यांचे पिढीजात दागिने होते.
अनिलशेठनी ते बाहेर काढले.मोहनमाळ, पोहेहार,बांगड्या, पाटल्या, काही अंगठ्या,वेढणी,आणखी तीन चेन होत्या.
“आम्ही तिघे भावंडं. याचे तीन भाग करायचे आहे. त्यासाठी तुमच्याकडे आलोय.”
अनिलशेठनी ते दागिने पाहिले. कसोटीवर त्याचा कस उतरवुन शुध्दतेचा अंदाज घेतला.काही दागिने तापवुन घेतले.२२ कैरेटचे दागिने बाजुला ठेवले. चोख सोन्याच्या बांगड्या, पाटल्या आणि काही वेढणी होती.ते एका वेगळ्या डिशमध्ये ठेवली. वजने वगैरे करुन ते आकडेमोड करत होते.
“तु सांग ना त्यांना..”
“नको.तुच सांग..”
अनिलशेठनी मान वर करुन पाहीले.दोघा बहिण भावात काहीतरी कुजबुज चालु होती.
‘काय.. काही प्रॉब्लेम आहे का?”
किसन आणि मंगल दोघे एकमेकांकडे पहात होते. कसं सांगावं..नेमकं कोणत्या शब्दात सांगावं त्यांना समजत नव्हतं.
“बोला किसनभाऊ.निःसंकोचपणे बोला.पैसे करायचे का याचे?का फक्त तीन भागच करायचे आहे?”
मग शेवटी मंगलच पुढे झाली. शब्दांची जुळवाजुळव करत ती म्हणाली..
“तीन भाग तर करायचेच आहे हो,पण..”
“पण काय..?”
“दोन भागात ते चोखचे सगळे दागिने टाका.आणि उरलेल्याचा तिसरा भाग करा”
“असं कसं?तिसऱ्या भागात सगळे २२ कैरेट दागिने? अहो त्यातले काही डागी आहेत.त्याला बऱ्यापैकी घट येणार आहे”
“हां..पण तुम्ही टाका ते तिसऱ्या भागात.”
“असं कसं? मग सारखे भाग कसे होतील?”
“ते आम्ही बघू. मी सांगते तसं करा”
अनिलशेठनी मग मंगलने सांगितल्याप्रमाणे भाग केले.खरंतर ते असमान वाटप होते.पण तसं सांगण्याचा अधिकार त्यांना नव्हता. तीन डिशमध्ये तीन भाग झाले. आणि मग किसनने बहिणीला विचारले..
“ताई,बोलवू का रमेशला?’
“हांं..लाव फोन त्याला.लवकर ये म्हणावं.वेळ नाहीये आमच्याकडे”
तोवर किसनने फोन लावलाच होता.
“हैलो रम्या कुठे आहेस तु? हां..गैरेजवरच आहे ना.. लगेच ये..अरे अनिलशेठच्या दुकानात.. नाही नाही.. लगेच.वेळ नाहीये आम्हाला. थांबतोय आम्ही”
“हातात काम आहे म्हणत होता तो.”
“हो..आम्हीच बसलोय बिनकामाचे.ये आणि घेऊन जा म्हणावं तुझा वाटा”
रमेश म्हणजे त्यांचा तिसरा भाऊ.जवळच्याच एका गैरेजमध्ये काम करायचा.वयाने बराच लहान. त्याचं आणि किसन,मंगलचं फारसं पटायचं नाही. पटायचं नाही म्हणजे तोच यांच्यापासून बाजुला पडल्यासारखा झाला होता. आणि त्याचं कारण म्हणजे त्याची परीस्थिती.किसन,मंगलच्या तुलनेत तो कुठेच नव्हता.
थोड्या वेळात तो आलाच.अंगावर कामाचेच कपडे होते. काळे.. ऑईलचे डाग पडलेले. हातही तसेच.आत आल्यावर तो जरा बावरला.अश्या एसी शोरुममध्ये येण्याची त्याची ही पहीलीच वेळ.आल्या आल्या त्याने दोघांना नमस्कार केला.
” काय गं ताई..तु पण इथे आहे का? कशाला बोलावलं मला दादा?”
“हे बघ,अण्णा तर गेले. आता हे दागिने. त्यांच्या कपाटातले… त्याची वाटणी केलीय. अनिलशेठनीच वजनं वगैरे करुन तीन भाग केलेत. त्यातला हा तुझा वाटा”
असं म्हणून किसनने ती तिसरी डिश त्याच्या समोर ठेवली. आता त्याची काय प्रतिक्रिया होते याची उत्सुकता दोघांच्या.. आणि हो..अनिलशेठच्या चेहऱ्यावर पण…
रमेशने त्या डिशमध्ये ठेवलेले दागिने पाहिले. इतरही दोन वाटे तेथेच होते. तेही त्याने पाहीले.अशिक्षित होता तो..पण तरी त्याच्या लक्षात आले..ही वाटणी असमान आहे. बोलला काही नाही तो..फक्त मनाशीच हसला.
“काय रे..काय विचार करतोस? दिला ना तुला तुझा वाटा?मग घे की तो.आणि जा.घाई आहे ना तुला?”
“हो जाणारच आहे मी.ताई..दादा, तुम्ही मला आठवणीने बोलावले.. माझा वाटा दिला. खुप आनंद वाटला. पण मला तो नकोय”
किसन,मंगल,आणि अनिलशेठही थक्क झाले. त्या सगळ्यांनाच वाटलं होतं की तो आता चिडणार..जाब विचारणार. पण हा तर म्हणतोय..मला काहीच नको.
“का रे..का नको?कमी पडतयं का तुला?अं..तुलनेत काय वाटतंय.. तुला कमी दिलंय आणि आम्ही जास्त घेतलयं?”
“कमी आणि जास्त..काय ते तुमचं तुम्हाला माहीत. पण दादा, ताई खरं सांगु का? तुम्ही माझ्यासाठी खूप केलंय”
“अरे असं का बोलतोस रमेश..” मंगलचा सूर जरा नरम झाला होता.
“नाही ताई..आई गेली तेव्हा मी लहान होतो. तुच माझं सगळं केलं. तुझ्या, दादाच्या लग्नात मी काही देऊ शकलो नाही. कारण मी कमवतच नव्हतो ना तेव्हा. तर हाच माझा आहेर समजा तुम्हाला “
असं म्हणुन त्याने त्याच्या वाट्याची डिश त्यांच्याकडे सरकवली.
” गरीबी आहे माझी.. पण मी समाधानी आहे. हे सोनं नाणं..नाही गरज मला याची.जे मिळतं त्यात सुखानं माझा संसार चाललाय. घ्या तुम्ही हे खरंच. निघतो मी.कामं आहेत मला आज जरा”
असं बोलून दरवाजा ढकलुन तो बाहेरही पडला. किसन,मंगल अवाक झाले. काय झाले.. रमेश काय बोलला हे समजेपर्यंत तो निघूनही गेला होता.
आत्ता आत्तापर्यंत लहान असलेला त्यांचा भाऊ आज त्यांना आपल्यापेक्षा मोठा वाटून गेला. गरीब असलेला रमेश त्या सर्वांपेक्षा एका क्षणात श्रीमंत ठरुन गेला.
सत्य घटनेवर आधारित
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈