श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ शबरी – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
दीनानाथ नाट्यगृह, शनिवारी सायंकाळी “शबरी ‘नाटकाचा प्रयोग. या नाटकाचा हा पाचशेवा प्रयोग. नाटक नेहेमीप्रमाणे फुल्ल. नाटकाच्या मध्यंतरात शबरी नाटकाने पाचशे प्रयोग केले त्याचा कौतुक सोहळा ठेवला होता.
पहिल्या अंकाचा पडदा खाली गेला आणि पाच मिनिटात पुन्हा वर गेला. स्टेजवर मुंबईचें महापौर, नाट्य परिषदचे अध्यक्ष तसेच नाटकाचे लेखक अश्विन, दिग्दर्शक आणि या नाटकात भूमिका करणारा हेमंत आणि शबरीची भूमिका करणारी मेधा होती.
प्रास्ताविक नंतर महापौरानी सध्याच्या काळात एका नाटकाचे पाचशे प्रयोग होतात यासाठी नाट्यनिर्माता जाधव, लेखक अश्विन आणि दिग्दर्शक हेमंत यांचे कौतुक केले आणि विशेष करून अपंग शबरी ची भूमिका करणाऱ्या मेधा चें कौतुक केले.
नाट्यनर्माता अध्यक्ष यांनी बोलायला सुरवात केली आणि ते शबरी ची भूमिका करणाऱ्या मेधा चें तोंड भरून कौतुक केले. शबरी ची भूमिका रंगभूमीवर करणे हे खूपच आव्हान होते, आणि एका अपंग मुलीचा अभिनय तिने अचूक केला आहें. तिचे कौतुक करावे तेवढे थोडे, अशी भूमिका आणि असे नाटक लिहिणारा अश्विन याचे पण कौतुक.
मग या नाटकाचा दिग्दर्शक आणि भूमिका करणारा हेमंत उभा राहिला “रसिकहो, आमच्या वझे कॉलेज मधून उन्मेष एकांकिका स्पर्धे साठी एकांकिका शोधत होतो, त्यावेळी अश्विन यांची ही एकांकिका वाचनात आली. या एकांकिकेने भारावून गेलो आणि करायला घेतली. शबरी च्या अत्यन्त कठीण भूमिकेसाठी माझ्याच वर्गातील मेधा हिची निवड केली आणि मी जिंकलो. कारण एका अपंग मुलीचे बेअरिंग तिने पूर्ण पन्नास मिनिटे उत्तम निभावले. ती एकांकिका अनेक ठिकाणी पहिली आली आणि मेधा प्रत्येक ठिकाणी विजयी ठरली. त्या एकांकिकेचा खूपच बोलबला झाला आणि मग अश्विन ने त्याचे दोन अंकी नाटक केले
हेमंत पुढे म्हणाला “रसिकहो, आजच्या पाचशे प्रयोगादरम्यान एक आनंदाची बातमी जाहीर करतो ती म्हणजे हे नाटक पाचशे एकावन्न प्रयोगानंतर बंद करण्यात येईल ‘.
अशी घोषणा होताच प्रेक्षक उभे राहिले “नाही नाही,हे नाटक बंद करायचे नाही, आम्ही पुन्हा नाटक पाहायला येणार, याचे हजार प्रयोग करायचे,’
हेमंत त्यांना शांत करत म्हणाला “शांत व्हा, शांत व्हा, प्रयोग बंद करायचे आहेत कारण या नाटकावर सिनेमा करायचा आहे आणि त्याचे दिग्दर्शन पण मीच करणार आहे आणि शबरी कोण करणार सांगा?
प्रेक्षक ओरडत राहिले “मेधा.. मेधा.. मेधा..
हेमंत प्रेक्षकांना समजावत म्हणाला ‘होय होय.. मेधा शिवाय कोण? आणि म्हणूनच प्रयोग थांबवावे लागणार. पण शूटिंग संपले की पुन्हा प्रयोग सुरु करू ‘
अशी घोषणा होताच प्रेक्षक शांत झाले.
नाटक पुढे चालू झाले आणि मग संपले. दुसऱ्या अंकात शबरी अपघातात सापडते आणि ती अपंग बनते, ते प्रसंग पहाताना प्रेक्षक नाटकाशी समरस होतात आणि कधी रडू लागतात हे त्यांनाच कळत नाही, अशा वेळी तिच्या शेजारी रहाणारा मनोज तिच्या मदतीला येतो आणि ती त्यातून बाहेर पडते.
नाटक संपले, प्रेक्षक भारावलेल्या स्थितीत आत येऊन मेधाला भेटायला येतच असतात. त्याची तिला सवय झालेली होती.
नाटक संपल्यावर मेधा आणि हेमंत कॅन्टीन मध्ये शिरली. त्यांना नेहेमी आवडणारी जागा कोपऱ्यातील. त्या कोपऱ्यातुन तलावाचे पाणी आणि पाण्यातील फिरणाऱ्या नौका दिसत. संध्याकाळी मंद लाईट सोडलेले असत. छोटी छोटी मुले आपल्या आई वडिलांसोबत नौकेतून फिरत. मेधाला हे दृश्य फार आवडे.ती एका खुर्चीवार येऊन बसली, तिच्यासमोर हेमंत येऊन बसला.
हेमंत -बोल, काय मागवू ?
मेधा -कॉफी आणि टोस्ट.
हेमंतने वेटरला ऑर्डर दिली.
हेमंत -प्रयोग छान झाला.
मेधा -एवढी तालीम मग एवढे पाचशे प्रयोग. प्रयोग बरा होतोच पण रोज तेच तेच करून मेक्यानिकल व्हायला होत.
हेमंत -आणखी पन्नास प्रयोग. मग शूटिंग सुरु.
मेघा गमतीने म्हणाली, “मला घेणार ना फिल्ममध्ये?
हेमंतने तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला “काय गम्मत करतेस ग, तूझ्याशिवाय शबरी कोण करणारे आहें काय?तलावातील फिरणाऱया होडीकडे पहात मेघा म्हणाली
मेघा -हेमंत, मग मुलुंडच्या जागेच काय झालं?
हेमंत -अजून थोडे पैसे भरावे लागतील, तू मागे दिलेले तीन लाख आणि माझे दोन मिळून पाच भरलेत.हौसिंग करायला पाहिजे.
मेधा -मी वसंतरवाकडून ऍडव्हान्स मागते. पण फिल्मचे मला किती मिळतील?
हेमंत -आता वसंताकडे पैसे आलेत. आणि सिनेमा करणार म्हणजे तो कर्ज काढणार. बाकी इंडस्ट्रीत बाकी नट्या अंदाजे दहा लाख घेतात. तू पंधरा माग.
मेधा -एवढे पैसे देतील मला?
हेमंत -दयायलाच लागतील त्यांना.तूझ्या खेरीच शबरी कोणी उत्तम करू शकणार नाही, आणि दुसऱ्या नटीना प्रेक्षक पसंत करणार नाहीत. कारण या नाटकामुळे तुला सोशल मीडिया वर कमालीची पसंती मिळाली आहें.मेधा मग उठली. ती निघताना हळूच हेमंतने तिचा हात हातात घेतला. निघता निघता ती म्हणाली “साईट वर केंव्हा जाऊया?’.
“नुकत प्लॉट सफाई सुरु आहें, जरा बांधकाम वर येउदे, मग जाऊ, तसा तुला प्लॅन पाठवलाय मी व्हाट्सअपवर ‘.
हो, मी निघते ‘
म्हणत मेधा बाहेर पडली आणि आपल्या स्कूटरकडे गेली. तिने हेल्मेट डोक्यावर चढवले आणि सफाईदार वळण घेत ती नाट्यगृहाच्या बाहेर पडली.
या नंतर नाटकाचे दौरे नागपूर पासून संभाजीनगर पर्यत आणि पुणे पासून कोल्हापूर, कोकण ते गोवा असे सुरु झाले.
दौऱ्यावर असताना ती दोघे फिरून घ्यायची. विशेष करून कोकण गोव्यातील बीच, देवळ आणि वेगवेगळी हॉटेल्स चवदार जेवणासाठी. आता दोघांना एकमेकांशिवाय चैन पडायची नाही. नाट्य सिनेमा वर्तुळात आणि मासिकत आणि सोशल मीडिया वर त्याच्या प्रेमाची चर्चा आणि खबरबात चर्चली जात होती.
अशात प्रयोग सुरू होते. फिल्म करण्याच्या दृष्टीने पण धावपळ सुरु होती. फिल्म साठी इतर कलाकार निवडले जात होते. कॅमेरामन, संगीतकार, नृत्यदिग्दर्शक, एडिटर असे अनेक माणसे जवळ येत होती.शूटिंग साठी कोल्हापूर सांगली या भागातील लोकेशन्स निवडली गेली होती.
मेधाचें कपडे तयार होत होते. तिच्यासोबत तिच्या आईची भूमिका सुकन्या ही मोठी अभिनेत्री साकारणार होती. वडील मोहनराव, मोठा भाऊ अजिंक्य, हेमंत तिच्या प्रियकराचा रोल करणार होता आणि त्याच्या आई वडिलांसाठी निलीमा आणि जयंत हे मोठे कलाकार करणार होते, सर्वांनी आपल्या डेट्स या फिल्म साठी दिल्या होत्या, आणि…
“शबरी ‘
प्रयोग क्रमांक 549
आज मुलुंड मधील कालिदास नाट्यगृहात प्रयोग. आता शेवटचे दोन प्रयोग आणि मग पंधरा दिवसांनी शूटिंग साठी कोल्हापूर भागात निघायची सर्वांनी तयारी केलेली. जून महिन्याचा पाऊस सुरु झालेला.
आज मेधाच्या आईचा वाढदिवस म्हणून प्रयोग संपल्यावर मेधा झटपट बाहेर पडली. बाहेर थोडा थोडा पाऊस होता म्हणून तिने रेनकोट चढवला आणि डोक्यावर हेल्मेट चढवून तिने स्कुटर चालू केली, तिची स्कुटर मुलुंड चेकनाक्यावरून पुढे गेली आणि तिथून टर्न घेऊन तिला मुख्य रस्त्याला लागायचं होत म्हणून तिने गाडी वळवली पण काही कळायचंय आत गाडी स्लिप झाली आणि मेधा रस्त्यात पडली, तिच्या अंगावर स्कूटर पडली.
मोठा आवाज झाला,
” गिर गयी.. गिर गयी.., अशी ओरड पडली, मागच्या गाड्या करकचून ब्रेक दाबत थांबल्या.
कोणी तरी धावलं, पोलीस धावले आणि तिच्या अंगावरची गाडी ओढून बाजूला घेतली, मेधा जोरात जोरात ओरडत होती, रडत होती. पोलिसांनी ऍम्ब्युलन्स बोलावली आणि तिला उचलून आत ठेवले आणि ऍम्ब्युलन्स हॉस्पिटलच्या दिशेने पळाली.
– क्रमशः भाग पहिला
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर