श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ शबरी – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(त्यानन्तर पुढील वर्षातील सुट्टीत सुद्धा अश्विन आणि हेमंत आले, या वेळी मुंबई हुन मोटर सायकल घेऊन आले. मी कामावर गेले की ही तिघ गाडीवरून फिरायची. स्विमिंगला जायची, सिनेमा पाहायची.) – इथून पुढे —
एक दिवशी हेमंत आणि शबू दोघेच स्विमिंग ला जाताना यांच्या मोटर सायकल ला ट्रकने उडवले. हेमंत रस्त्यावर पडला, त्याला फारसे लागले नाही पण शबरी जोराने फुटपाथ वर पडली, तिची शुद्ध गेली. मला ड्युटीवर असताना फोन आला, मी धावले. तिला सिव्हिल मध्ये आणि मग खाजगी हॉस्पिटल मध्ये ठेवले. तिचे हात पाय मोडले होते, त्यांना प्लास्टर घालून बरे केले पण तिचे मजरज्जू पूर्ण चेचून गेले आहेत. कंबरेची हाडे मोडली आहेत.
ही मोठी महागडी ट्रीटमेंट आहें. अशा प्रकारे ऑपरेशन्स करणारे मोजके डॉक्टर्स आहेत. मुंबई मधील कोकिळाबेन हॉस्पिटल आणि जसलोग मधेच या सोयी आहेत. याचा खर्च चार वर्षा पूर्वी वीस लाख सांगितलं होता, आता अजून वाढला असेल.
मी हात जोडून अनेक नातेवाईक, ओळखीचे यांना विनंती केली, पण सर्वांनी कसेबसे तीन लाख जमवून दिले. ते बँकेत ठेवले आहेत, अजून मोठी रक्कम जमवायची आहें, पण कशी?
गेली चार वर्षे मी नोकरीवर न जाता हिला सांभाळते आहें.
ही सर्व हकीगत ऐकून मेधा आश्रयचकित झाली होती. तिने शबरीचा हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवला होता. मग मेघा म्हणाली
“अश्विन आणि हेमंत यांना हे सर्व माहित होतं, मग त्यानी काय केल
“काहीच केल नाही मात्र याच घटने प्रमाणे अश्विन जो लेखन करत होता, त्याने एकांकिका लिहिली, ज्यात तू शबरी चें काम केलंस ‘.
“कमाल वाटते मला म्हणजे त्यानी एकांकिका सुद्धा “शबरी ‘याच नावाने लिहिली, मग नाटक, मग सिनेमा ‘.
“हो, पण तू काम केलंस त्या नाटकात शबरी त्या मित्राच्या प्रेमाने आणि डॉक्टर उपयांनी बरी होते, असे दाखवले आणि नाटकाचा शेवट गोड केला पण इथे काय परिस्थिती आहें तू पाहिलीस ‘.
“पण काकी, अश्विन तुमचा भाचा आणि हेमंत इथे येणारा शिवाय शबरीवर प्रेम केलेला, त्यानी काय केले नंतर?
“दुर्दैव माझे आणि शबरीचे, त्या अपघातनंतर ते मुंबई ला गेले ते गेल्या चार वर्षात पुन्हा इकडे फिरकले नाहीत.,,’
पण तुम्ही फोन नाही करत त्यांना?
“नेहेमीच करते, मला माहित आहें आता दोघाकडे पैसे आहेत पण ते दाद देत नाहीत, आता तुझ्यासमोर फोन लावू का?
“हो लावा पण स्पीकर मोठा ठेवा म्हणजे मला ऐकता येईल ‘.
शबरीच्या आईने हेमंतला फोन लावला. बराच वेळ रिंग वाजल्यावर त्याने फोन घेतला, फोन स्पीकर वर असल्याने मेधाला ऐकू येत होते.
“अरे हेमंत, पैशाची व्यवस्था होईल काय रे?
तिकडून हेमंत बोलत होता, त्याचा आवाज तिने ओळखला.
“कुठे काय, नुकतीच शूटिंग सुरु झाली, पैसे नाहीत म्हणून काम बंद आहें, त्यात ती नटी मेघा पैसे मागत असते म्हणून वसंतरावांनी काम बंद ठेवलाय ‘
अस म्हणून हेमंतने फोन खाली ठेवला.
मेधा संतापाने थरथरत होती. तिचा होणारा नवरा आणि प्रियकर तिला खोटं पाडत होता.
तिने शबरीचा हात हातात घेतला आणि तिच्या आईला सांगितलं
“काकी, मी तुम्हांला शब्द देते, या शबरीला मुंबई मध्ये नेऊन तिच्यावर उपचार करण्याची जबाबदारी माझी, तुम्ही काळजी करू नका, या खऱ्या शबरीच्या मागे ही नाटकातील शबरी कशी उभी रहाते बघाच ‘.
मेधा बाहेर पडली, बाहेर पडता पडता तिने पर्स मधील होत्या तेवढ्या नोटा काढून त्याच्या हातात कोंबलंय आणि ती गाडीत जाऊन बसली.
मेधा हॉटेल वर परातली, तिने आपल्या आईला सर्व वृत्तांत सांगितलं, तिची आई पण अश्विन आणि हेमंत चें रूप पाहून आश्चर्यचकित झाली.
दुसऱ्या दिवशी मेधा सेटवर गेली. गेल्या गेल्या तिने मेकअप करायला नकार दिला आणि हेमंतला फोन करून बोलावले. हेमंत तिच्या रूममध्ये घुसताना “डार्लिंग ‘म्हणणं जवळ येत होता. तिने त्याला झिडकारले आणि प्रश्नांची सरबत्ती चालू केली.
“ही शबरी कथा कुणा वरुन सुचली?खरी शबरी आहें का जिवंत?
हेमंतला ही आज अस काय बोलते, हे कळेना.
“छे, अशी कोण शबरी नाही, अश्विनने काल्पनिक नाटक लिहिले, त्यात खरं काही नाही ‘.
“मग या गावातील अंबाई टॅंक जाताना कुणाचा असिसिडेन्ट झाला होता?
हेमंत दचकला. हिला ही बातमी कशी हे त्याला कळेना.
तो त त प करू लागला.
“हेमंत, मी काल शबरीला भेटून आले. काल तिच्या आईने तुला शबरीच्या उपचारासाठी फोन केलेला ना, तेंव्हा मी तेथे होते. शबरीची अशी अवस्था कुणामुळे झाली हे मला कळले. मी निर्मात्याकडे एकसारखी पैसे मागत असते, हे तिला सांगताना, मी तेथे होते.’
हेमंत लटपटू लागला. त्या AC मध्ये त्याला घाम फुटला.
“हेमंत, मी शबरीला पुन्हा उभी करणार आहें, तसा तिच्या आईला मी शब्द दिलंय, मला पंचवीस लाख रुपये जमा करायचे आहेत लवकरात लवकर. निर्मत्याने दिलेले पाच लाख रुपये माझ्या बँकेत आहेत. बाकीचे दहा लाख मला दोन दिवसात हवेत तरच मी पुढील शूटिंग करेन. अजून दहा लाख कमी आहेत.
जिच्या कथेवर आणि तेंच नाव वापरून तू आणि अश्विनने एवढा पैसा आणि नाव मिळविलात, ते तुम्ही दोघे आणि तुमचे निर्माते वसंतराव पैसे देता की नाही, ते पण मला आज दुपारपर्यत सांगा, नाहीतर पत्रकार परिषध बोलावून मी त्याना खऱ्या शबरीची भेट घालून देते. तू जा येथून.
दुपारपर्यत मला कळायला हवे ‘.
घाम पुसत हेमंत बाहेर पडला आणि अश्विनकडे धावला, ते दोघे मग निर्माते वसंतरावाकडे गेले. दुपारी वसंतरावांनी तिचे राहिलेले दहा आणि हेमंत, अश्विन कडून दहा लाख मिळून वीस लाख जमा केले.
त्याच रात्री मेधाने शबरी वर उपचार केलेल्या कोल्हापूर मधील डॉक्टरना भेटून कोकिळाबेन हॉस्पिटल मध्ये शबरीची अपॉइंटमेंट ठरवली.
शूटिंग बंद होते, जो पर्यत शबरीवर उपचार सुरु होतं नाही, तोपर्यत मी मेकअप करणार नाही, हे तिने वसंतरावना सांगितले होते.
तीन दिवसांनी स्पेशल ऍम्ब्युलन्स घेऊन शबरी, शबरीची आई आणि मेधा मुंबई कडे निघाली.
हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करून मेधा कोल्हापूर मध्ये आली आणि तिने शूटिंग सुरु केले. ऑपरेशनच्या दिवशी ती पुन्हा संपूर्ण दिवस हॉस्पिटल मध्ये होती,
डॉक्टरनी ऑपरेशन व्यवस्थित झाले असून पंधरा दिवसानंतर तिला डिस्चाज मिळेल मग फिजिओ कडून दोन महिने ट्रीटमेंट घ्या, चार महिन्यात ती हिंडूफिरू लागेल असा विश्वास व्यक्त केला.
“शबरी ‘सिनेमा पुरा झाला. मेधा आणि तिची आई मुंबईत आल्या, मेधाने शबरीला आणि तिच्या आईला पण आपल्यासोबत आणले.
शबरी सिनेमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या सिनेमाची हिंदी आणि तामिळ मध्ये आवृत्ती निघण्याच्या तयारी सुरु झाल्या. सर्वाना शबरी साठी मेधा हवी होती. मेधा बरोबर कोटी रुपयांची कॉन्ट्रॅक्ट केली गेली. मेधा आंनदात होती.
तिने तिच्या आयुष्यातून हेमंतला हाकलून लावले.
फिल्मफार पुरस्कार साठी “शबरी ‘ची निवड झाली. पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाताना तिने शबरीच्या हातात हात घेऊन तिच्यासामवेत पुरस्कार स्वीकारला. त्या वेळी ती म्हणाली
“माझा रस्त्यावर अपघात झाला आणि मी दोन महिने घरात वेदना सहन करत बसले. त्या वेदना आणि तो काल मला असह्य झाला, पण जिच्या खऱ्या घडलेलंय आयुष्यात जिची काही चूक नसताना चार वर्षे जी वेदना सहन करत राहिली, ती ही शबरी. ही शबरी हीच खरी फिल्मफारे विजेती आहें, मी नाही.’
त्या तुडुंब भरलेलंय हॉलमध्ये त्या टाळ्या वाजत राहिल्या.. वाजत राहिल्या.
– समाप्त –
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर