श्री मकरंद पिंपुटकर
🌸 जीवनरंग 🌸
☆ दोन लघुकथा : १) चिमूटभर आपुलकी… २) टेडी बेअर ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
१) चिमूटभर आपुलकी…
रोजच्याप्रमाणेच आजही तो घाईघाईत कामावर निघाला. आणि दोनच मिनिटांत घरी परतला. बेल वाजल्यावर आईने दार उघडलं, तिला वाटलं – हा बहुधा डबा, किल्ली, पाकीट काहीतरी विसरला धांदरटपणे.
पण तो घरात शिरलासुद्धा नाही. दारातूनच आईला म्हणाला, “मी निघालो तेव्हा तू आंघोळीला गेली होतीस. तुला टाटा केला नव्हता, म्हणून परतलो. टाटा. चल, मी पळतो!” म्हणत तो परत गेला पण.
आज त्याची रोजची ९:१३ चुकणार होती. पण त्याच्या आईच्या चेहऱ्यावर आज दिवसभर हसू राहणार होतं.
🌸
आज ऑफिसासाठी डबा भरताना, तिनं एका छोट्या डबीत लिंबाचं लोणचं घेतलं होतं. तिच्या ऑफिसमधली स्मिता परवा दुसऱ्या कोणाला तरी सांगत होती, तिला सध्या लोणचं खावंसं वाटत होतं म्हणून.
🌸
आज तो ऑफिसहून घरी येताना, गरमागरम बटाटेवडे घेऊन आला होता. त्याचे निवृत्त वडील चाळीतल्या त्यांच्या घरासमोरील व्हरांड्यात बसले होते. याने त्यांना ते वडे देऊ केले.
हा शाळकरी असताना, त्याचे वडील ऑफिसमधून येताना, कधीकधी, त्याच्यासाठी असंच काहीतरी चटकमटक आणायचे. त्यांना ते आठवलं आणि मोतीबिंदू झालेले त्यांचे डोळे चष्म्याआडून लुकलुकले.
🌸
त्याच्या गिरणीत – कंपनीत हडताळ चालू होता. खर्च भागवताना तो मेटाकुटीला आला होता. बायकोशी त्याचं यावरूनच बोलणं चाललं होतं. एवढ्यात त्यांचा दुसरीतला मुलगा आपली पिगी बँक घेऊन आला, त्याला दिली आणि म्हणाला,
“बाबा, हे घ्या. माझ्याकडे चिक्कार पैसे आहेत!”
🌸
लेकीच्या कॉलेजमध्ये आज ‘साडी डे’ होता. हिने आज तिच्या आईची आठवण असलेली तिची सर्वात लाडकी साडी लेकीला दिली.
🌸
ऑफिसमध्ये तो तसा कडक शिस्तीचा बॉस म्हणून ओळखला जाई, पण चहा पिऊन परतताना तो रोज वॉचमनसाठी चहा घेऊन येई, हे कोणालाच ठाऊक नव्हतं.
🌸
त्याचे वडील रस्त्यावरील एका अपघातात अचानक वारले. हा जेमतेम कॉलेजमधून बाहेर पडलेला. दोन वर्षांपूर्वी ज्या मित्राशी भांडण झाल्याने अबोला धरला होता, तो आला, आणि पैशाचं एक पाकीट त्याला देऊन गेला,
“राहू देत, लागतील,” म्हणाला.
🌸
आज ती एक नवी रेसिपी ट्राय करत होती. Sugar free टॅब्लेटस् घालून मिठाई करत होती. सासूबाईंना मधुमेह असल्याने, कालच एका बारशाला तिने त्यांना गोडधोड खाऊ दिलं नव्हतं.
🌸
माहेरी असताना लाडकं शेंडेफळ म्हणून खूप नखरे होते तिचे. आज ती आई झाली होती, लेकाला सर्दी झाली होती. रात्री झोपला की शेंबडानं नाक चोंदायचं लेकाचं. त्याला कडेवर उभं धरून, ही रात्ररात्र बसून रहायची.
आज तिचा वाढदिवस होता. हा ऑफिसमधून येताना एक मस्त सुवासिक गजरा घेऊन आला तिच्यासाठी, आणि नाटकाची दोन तिकिटं!
🌸
या धकाधकीच्या जीवनात, सुख मिळवण्यासाठी दरवेळी वारेमाप पैसा खर्च करायची गरज नसते. ही ‘चिमूटभर आपुलकी’ पुरते, घेणाऱ्यालाही आणि देणाऱ्यालाही!
लेखक : मकरंद पिंपुटकर
चिंचवड, पुणे
२) टेडी बेअर …
माने हवालदारांची नुकतीच पुण्यातील मंडईजवळच्या शुक्रवार पेठ पोलीस चौकीत बदली झाली होती. शरीर विक्रयासाठी – वेश्या व्यवसायासाठी बदनाम असलेल्या बुधवार पेठेला लागून असलेली ही पोलीस चौकी.
तरुण, तडफदार इन्स्पेक्टर भोसले स्टेशन इन् चार्ज आहेत, शिस्तीला कडक आहेत, असं त्यांच्याविषयी माने बरंच काही ऐकून होते.
माने कामावर रुजू झाले अन् भोसल्यांना त्यांनी नियमाबरहुकूम एक कडक सॅल्युट ठोकला. नमस्कार चमत्कार झाले, प्रथमदर्शनीच भोसल्यांबद्दल मान्यांचं चांगलं मत झालं.
आणि आज ते भोसल्यांच्या बरोबर जीपने राऊंडला निघाले होते. भोसले साहेब जीपमध्ये पुढच्या सीटवर, जाधव ड्रायव्हरच्या शेजारी डावीकडे बसले होते आणि माने मधल्या रांगेत जाधवच्या मागे.
काही कामासाठी भोसल्यांनी पॅसेंजर सीटसमोरचा कप्पा उघडला आणि मान्यांना त्यात दोन तीन टेडी बेअर (सॉफ्ट टॉईज) दिसले. मान्यांना आश्चर्य वाटलं. काल काहीतरी कारणाने त्यांनी साहेबांच्या टेबलाचा ड्रॉवर उघडला होता, त्यातही दोन टेडी बेअर होते, थोडे वेडेवाकडे पडले होते ते मान्यांनीच नीट करून ठेवले होते.
साहेबांचं लग्न झालं असावं आणि त्यांना छोटी मुलं असावीत असं मनातल्या मनात म्हणत मान्यांनी मान डोलावली.
“माने, तुमचं निरीक्षण चांगलं आहे, पण निष्कर्ष चुकीचा आहे,” आरशातून भोसले सरांनी आपल्याला कधी पाहिलं हे मान्यांना उमगलंच नाही.
“म्हणजे माझ्याकडे टेडी बेअर असतात, हे खरं. पण माझं अजून लग्न झालेलं नाही, त्यामुळे मला मुलं असण्याचा प्रश्नच नाही,” भोसले म्हणाले, जाधव ड्रायव्हर खुदकन हसले आणि साहेबांनी आपलं मन कसं काय वाचलं याचं मान्यांना आश्चर्य वाटलं.
पण मग साहेब या खेळण्यांचं करतात तरी काय असा प्रश्न मान्यांना सतावू लागला. जाधवांना विचारलं, तर “कळेल तुम्हाला योग्य वेळी,” असं त्यांनी काहीतरी गूढ सांगितलं.
एक या टेडी बेअरचं गूढ आणि आठवड्यातून एक दोनदा तरी बुधवारातल्या वेश्या वस्तीतल्या कोणी ना कोणी बायका साहेबांच्या केबिनमध्ये यायच्या आणि त्यांना पाच मिनिटं तरी भेटून जायच्या – हा काय प्रकार आहे हे दुसरं अशी दोन रहस्यं मान्यांच्या डोक्याला भुंगा लावून होती.
आज सकाळी सकाळीच माने मोटारसायकलने भोसले सरांना घेऊन निघाले होते, अप्पा बळवंत चौकातून येऊन, फरासखाना चौकीला उजवीकडे वळून गाडी मंडईकडे वळली, आणि तेवढ्यात शाळेत जाणाऱ्या एका मुलाला पाहून भोसल्यांनी मोटासायकल थांबवायला सांगितली. ते गाडीवरून उतरले, खिश्यातून एक चॉकलेट काढून त्या मुलाला दिलं, त्याच्या अभ्यासाची चौकशी केली, आणि निघताना गाडीवर टांग मारून बसताना विचारलं, “आणि आमचा छोटू कसा आहे ? मजेत आहे ना ? शाळेत येतो ना तुझ्याबरोबर ?”
त्या मुलाच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू फुललं, त्याने दप्तरात हात घालून एक टेडी बेअर बाहेर काढला.
“मी नेहमी त्याला माझ्या बरोबरच ठेवतो. तुम्ही म्हणालात ना की एकटा राहिला की भीती वाटते त्याला म्हणून. तो आता माझा बेस्ट फ्रेंड आहे.” मुलानं मोठ्या अभिमानानं आणि आत्मविश्वासानं सांगितलं. गडगडाटी हसून, त्या मुलाच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन भोसल्यांनी गाडी पुढे घ्यायला सांगितली.
पोलीस चौकीत आल्यावर सरांच्या पाठोपाठ माने केबिनमध्ये आले. त्यांना बसायची खूण करत भोसले त्यांना सांगू लागले. “माने, मी जेव्हा सब इन्स्पेक्टर म्हणून डिपार्टमेंटला रुजू झालो, तेव्हापासून हा टेडी बेअरचा सिलसिला सुरू झालेला आहे. हे मला माझ्या आईने दिले आहेत. आई स्वतः आपल्या हाताने हे टेडी घरी बनवते.
मी तिला तेव्हा म्हटलंही की, आई, अग हे काय माझं वय आहे का टेडी बेअरशी खेळायचं ? अग मी आता पोलीस सब इन्स्पेक्टर आहे.
तेव्हा तिच्या अनुभवांचं पोतंडं उघडत तिनं मला सांगितलं. “बाळा, या दोन वाक्यांत तुझ्या तीन चुका झाल्या आहेत. पहिलं म्हणजे आईसाठी मूल नेहमीच लहान असतं. दुसरं म्हणजे टेडी बेअरशी खेळण्याचा वयाशी काही संबंध नसतो. आणि तिसरं म्हणजे, हे टेडी तुझ्यासाठी नाहीतच मुळी.
तुझ्या कामात तुला जेव्हा कोणी बावरलेला, घाबरलेला, उदास, निराश दिसेल, तेव्हा तू एक टेडी त्या व्यक्तीला दे. त्या टेडीचा सांभाळ करायला सांग, कोणाला तरी आपल्या आधाराची गरज आहे हे भावना त्या माणसाला जगण्याचं उद्दिष्ट देऊन जाईल.
आणि मग हा प्रघातच झाला. दर दहा पंधरा दिवसांनी महिन्याने आई आणखी टेडी पाठवते. आणि आपल्या कामाचं स्वरूपच असं आहे की असे दुःखी कष्टी आपल्याला भेटतातच.
लहान मुलंच काय, पण या वस्तीत राहणाऱ्या माता भगिनीसुद्धा आपल्या स्वतःसाठी किंवा त्यांच्याबरोबर राहणाऱ्या अन्य कोणासाठी हे टेडी घेऊन जातात.
आपल्या टेडीने कोणाला तरी मदत होत आहे ही भावना आईला सुखावून जाते, आणि तिनं केलेले टेडी सांभाळताना या सगळ्यांना आनंद मिळतो.
आपण केवळ पोस्टमनचं निमित्तमात्र काम करत राहायचं,” भोसले सर पुन्हा गडगडाटी हसले. आणि यावेळी मान्यांनी सरांना जो कडक सॅल्युट मारला, तो फक्त नियमाबरहुकूम नव्हता, त्यात त्यांच्याबद्दल प्रेम – माया आणि आदरही होता.
© श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈