श्री नंदकुमार पंडित वडेर
जीवनरंग
☆ “जरा हा पत्ता कुठे आला सांगता?…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
बबनराव शिवडीकर रिटायर्ड हाडाचा प्राथमिक शाळेचा मास्तर… उंच शरीरयष्टी, किरकोळ बांधणीचा देह, नाकावर चष्मा गॅलरीतून वाकून बघण्याऱ्या माणसा सारखा.. विद्यादानाच्या सेवाव्रतालाच अख्ख आयुष्य वाहून घेतलेलं ,त्यामुळे गृहस्थाश्रमाला तिलांजली दिलेली.. दोन वेळेचा सरस्वतीबाईंच्याकडे जेवणाचा डबा लावलेला… बाकी सर्व स्वावलंबनाचा परिपाठ ठेवलेला… शाळा सुरू होती तोपर्यंत सगळं काही सुरळीत सुरू होतं… घड्याळात फावला वेळ नसायचा.. नि आता दिवसाचे बरोबर रात्रीचे तास जाता जात नसत… रिटायर्ड होईपर्यंत विद्यादानाचं अग्निहोत्र अखंड चालू होतं ..पण आता त्यात विरंगुळा हवा होता… म्हणून शिकवण्याच्या मोहा पासून दूर राहिले… आणि हो पेन्शन उत्तम मिळत होती त्यामुळे कसलीच ददात नव्हती… सकाळी फिरायला जाणे, वाचनालयातून पेपर वाचणे, पुस्तक घरी आणून वाचनाची भूक भागवणे, संध्याकाळी कुठे टेकडीवर, एखाद्या देवळात नाहीतर बागेत फेर फटका मारून रात्र वस्तीला घरी चल म्हटल्यावर झोपायला घरी येणे…एक दोन जुन्या शिक्षकांशी स्नेह होता पण जुजबी… त्या सगळ्यांना प्रपंच होता अर्थात त्याच्या जबाबदाऱ्याही होत्या.. बबनराव काय सडाफटींग माणूस.. पिंपळावरचा मुंजा असल्यासारखा… सुखी माणूस, राजा माणूस.. कसलं व्यसन नाही कि कुठं जाणं येणं नाहीच… कुणी जवळचे नातलग सुद्धा नाहीत… रिटायर्ड झाल्यावर सुरवातीला कसे अगदी आखून रेखून मोजून मापून दिवसाचा सगळा कार्यक्रम पार पडला जाई.. नि रात्री शांत झोप लागे… पण पण जेव्हा हा दिनक्रम यांत्रिकी सारखा वाटू लागला, तेव्हा निरस, उदास उदास वाटू लागले… शेजारी पाजारी अवतीभवती जरी असले तरी त्यांचे त्यांचे व्याप का कमी होते.. नाही म्हणायला जुजबी बोलाचाली होत असे. पण बबनरावानाची संवादाची भुक मात्र शमत नसे.. हळूहळू त्यांनी सगळ्या शेजारी पाजारींचा वेळ खायला सुरुवात केली… त्यांना बरं वाटत होतं पण लवकरच शेजारी पाजारी शहाणे झाले.. त्यांना हळूहळू टाळू लागले.. ते समोर दिसताच दिशा बदलू लागले.. स्वताची सुटका करून घेण्यात धन्यता मानू लागले… बबनरावानां ही बाब लक्षात आली. .. आता पुढचा पर्याय काय शोधावा या विचारात असताना.. त्यांना रस्त्यावरून जाणारा पोस्टमन दिसला आणि त्यांच्या सुपिक डोक्यात एक कल्पना अवतरली…
… रोज सकाळी वाचनालयात पेपर वाचताना त्यातील जाहिरातीतील पत्याचा एकच भाग लिहून घेऊन त्यापुढे दुसऱ्या जाहिरातीतील दुसरा भाग, त्यापुढे तिसरा, चौथा… असं करत एक संपूर्ण आगळा वेगळा पत्ता कागदाच्या चिटोऱ्यावर लिहून घेऊन वाचनालयातून जे बाहेर पडायचं ते चिठोऱ्यावर लिहिलेला पत्ता हुडकण्यासाठी… मग त्यासाठी सुरुवातीला रस्त्यावर पहिला जो भेटेल त्याला थांबवून,
“मला जरा हा पत्ता कुठे आला सांगाल काय? ” असं म्हणून त्या माणसाकडे तो पुढे काय सांगतोय इकडे उत्सुकतेने नजर फिरवून बघणे .. पत्ता वाचला कि माणूस अचंबित होऊन जाई… कशाचा कशाला लागाबांधा लागायचाच नाही.. जर घाईत असेल तर
” नाही बुवा नक्की कुठला पत्ता आहे ते कळत नाही.. तुम्ही शेजारच्या दुकानदाराला विचारा. तो तुम्हाला नीट सांगेल.. “
संवाद खुंटला कि बबनराव ते चिठोरे घेऊन पुढे निघत.. मग एखादा दुकानदार, चहाचा टपरीवाला.. एकादा रिक्षावाला असे नवे नवे गिर्हाईक शोधली जायची.. पण पत्ता सापडयला मदत होत नसे.. कुणी विचारले या गावात नवीन आलात काय? तर तोच धागा पकडून काही वेळा संवादाची गाडी सुरू करत असत.. ” नाही हो इथलाच…गावाकडचा जुना मित्र या पत्त्यावर आला आहे त्यानं मला तिथं भेटायला बोलावलं असल्यानं हा पत्ता शोधतोय… गडबडीत मोबाईल नंबर लँडलाईन नंबर लिहून घ्यायचा राहून गेला.. आणि असा हा पत्ता शोधण्याची पायपीट करतोय… तुम्ही त्या पत्त्याच्या एरियातले आहात तर… ” संवाद रेंगाळत चालला आहे पाहून बबनरावांना आनंद झाला… पण फार काळ तो टिकला नाही…पत्तात बरीच सरमिसळ झालेली दिसतेय.. एव्हढं बोलून मग समोरचा माणूस कलटी मारे… वाचनालयातून निघाल्या पासून दोन तीन तासाचा वेळ छान जाई… मग दुपारी घरी येऊन जेवण करून विश्रांती घेतली जाई.. त्यावेळी कोण कसं रिॲक्ट झालं याची मनाशी उजळणी होई.. बबनराव हसू येई… संध्याकाळी पुन्हा पत्ता शोध मोहीम सुरू व्हायची…आता रोजचा कार्यक्रम ते राबवू लागले.. रोज नवी नवी डोकी धरु लागली.. कधी संवादाची गाडी रेंगाळे तर कधी जलदगतीने निघून जाई… रोज नव्या नव्या एरियातल्या आड रस्तावर ते बाहेर पडायचे… सकाळचा नि संध्याकळचा घराजवळच्या चहाच्या टपरीवाला कडून चहा पिऊन झाला कि आपल्या पत्ता शोध मोहिमेला निघत असत…त्या चहाच्या टपरीवाल्याला सुद्धा त्यांनी सोडलं नाही… तो तर कायम बुचकळ्यात पडलेला असायचा.. या माणसाला असा विचित्र पत्ता दिला कुणी असा प्रश्न त्याला पडायचा.. कि हा पत्ता कधीच न सापडेल असाच आहे.. आणि हा शाळा मास्तर असून याला हे ठाऊक असू नये.. म्हणजे… का काहीतरी या माणसाचा रिकामटेकडेपणाचा चाळा असावा…कधी कधी बबनरावांचे ग्रह फिरलेले असले तर बोलाचाली… वादावादी… गाव जमा होऊन आरोप प्रत्यारोप… लफंगा, भुरका चोर… बाईलवेडा… वगैरे वगैरे शेलक्या शब्दात, तर कधी प्रकरण हातघाई वर येई.. त्यांच्या घराबाहेर असलेल्या त्या चहा टपरीवाल्याकडे पोलिसांनी बबनरावांची चौकशी केली..तो टपरी टपरीवाला म्हणाला अरे साब वो मास्टर एक नंबरका पागल है..उसका कोई नही है इसिलिए एक झुठा पत्ता धुंडने लता है और उसके बहाने लोगोंसे बाते करता रहता है..जिस दिन बाते ज्यादा होती है तो खुशीकेमारे सिटी बजाता देर रात को घर आता है..और जिस दिन बात ही नहीं बनती तो मेरे यहा दो दो कप कटिंग चूप चाप पी के घर चलता है… रात्री घरी आल्यावर त्यांना खूप खजिल वाटायचे.. हा पत्ता शोध उपक्रम आपल्या हवा तसा प्रतिसाद मिळत नाही हे पाहून ते खूप दुखी कष्टी झाले.. एक दोन दिवस बाहेर सुध्दा पडले नाहीत.. नवा मार्ग शोधयाचा प्रयत्न करून पाहू लागले… पण एकांत सुटावा संवाद घडावा याची भुक मात्र खूप खवळली जाऊ लागली… . त्या टपरीवाला चहावाल्याला सुद्धा बबनराव दोन दिवस न दिसल्या बदल वेगळीच शंका येऊन गेली.. तो घरी जाऊन त्यांना दारातून पाहून आला… बबनराव एका कागदाच्या चिठोऱ्यावर पत्ता लिहिण्यात मश्गुल होते… दहाबारा पते त्यांनी तयार करून घेतले… आज त्यांनी हा पत्ता शोधायचा नाद सोडून देण्याचे मनानेच ठरवले होते.. तयार होऊन घराबाहेर पडले.. टपरीवाला चहावाल्याच्या समोरून शीळ घालत पुढे निघून गेले…
… चालत चालत नदीच्या काठावर आले… संध्याकाळची वेळ होती काठ अगदी निर्मनुष्य असल्याने शांत शांत होता… बबनरावांनी खिशातले ते सगळे पत्ते काढले आणि हळूहळू एकेक करत त्या नदीच्या प्रवाहात सोडत राहिले… जणूकाही आपल्या छंदाला त्यांनी जलार्पण केले होते… आपणच आपल्या या वेगळ्या छंदाला हसत होते…
.. अरे हा तर माझ्या घराशेजारचाच पत्ता आहे कि.. कोणीतरी बोललं.. त्या वाहत्या पाण्यातील एक पत्याचा भिजलेला अक्षर धुवून गेलेला कागद हाती घेऊन तो बबनरावांकडे बघत म्हणाला… बबनराव चमकले त्यांनी त्या अनोळखी व्यक्ती कडे पाहिले आणि हसत हसत विचारले..
” इथं बसून तुम्ही काय करता आहात..काय शोधताय या ठिकाणी ?… त्या अनोळखी माणसाने आपल्या खिशातील एक कागदाचा चिटोरा काढत म्हटले…..
.. ‘ मला जरा हा पत्ता कुठे आला सांगता? ‘…
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈