सुश्री वर्षा बालगोपाल
जीवनरंग
☆ दोन बोधकथा – अक्षय / गणपती ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
१) अक्षय
एक राजा होता. त्याला आपल्या प्रजेसाठी काहीतरी करावे असे नेहमीच वाटायचे. त्या प्रमाणे तो नेहमीच काहीतरी करून प्रजेला आनंदी ठेवायचा प्रयत्न करायचा. कारण त्याला माहित होते की प्रजा आनंदी तर राज्य आनंदी आणि राज्य आनंदी तर राजा मनापासून आनंदी.
एके दिवशी त्याला असे वाटते की आपण प्रजेला अशी एखादी गोष्ट देऊ की जी कधीच संपणार नाही. अर्थातच अशी कोणती गोष्ट आहे जी कधीच संपणार नाही याचा शोध त्याने घ्यायचे ठरवले.
त्याने नगरात दवंडी पिटवली की जो कोणी राजाला अशा गोष्टीची माहिती देईल त्याला राजा मोठे बक्षीस तर देईलच पण ती गोष्ट तो प्रजेला देऊन प्रजेला अजून सुखी करण्याचा प्रयत्न करेल.पण त्या व्यक्तीने ती गोष्ट नाशवंत नाही असे सिद्ध करून दाखवावे लागेल.
राजाची दवंडी ऐकून बक्षीसाच्या आशेने अनेकजण येतात आणि सांगतात. पण सिद्ध करायची वेळ आली की त्यात ते नापास होतं होते.
एक जण येतो आणि म्हणतो सूर्यप्रकाश नाशवंत नाही. तो इथे नसला तरी दुसरीकडे प्रकाशमानच असतो म्हणून तो नाशवंत नाही. पण राजा म्हणतो ते जरी खरे असले तरी रोज रात्री सूर्यास्त झाला की हा प्रकाश येथे रहातच नाही त्यामुळे ते काही खरे नाही. मग तो म्हणतो सोलर एनर्जी साठवली तर ते शक्य आहे. आणि त्याने ते करूनही दाखवले. राजा खूष होतो. त्याला बक्षीस देऊन आपल्या राज्यात सगळीकडे सोलर सिस्टीमने रात्री पण प्रकाश निर्माण करतो. त्यामुळे वीज बचत होऊन राज्याची प्रगतीच होत आहे असे त्याला वाटले.
परंतु पुढे जून महिन्यात दिवसाच सूर्यप्रकाश अपूरा असल्याने सोलर सिस्टीम सक्रिय होत नव्हती म्हणून ते पण नाशवंत आहे हे लक्षात आले.
मग राजा त्या व्यक्तीला परत बोलावतो आणि सांगतो अरे ही सूर्यप्रकाशाची वाट तूच दाखवलीस पण ती चुकीची ठरली. आता तू अजून दुसरी गोष्ट सांग नाहीतर बक्षीसाच्या दुप्पट दाम लगेच परत कर… असे केले नाही तर तुला राजाची फसवणूक केली म्हणून मृत्यूदंड दिला जाईल.
ती व्यक्ती घाबरते. थोडा विचार करते आणि पटकन म्हणते, ” अमृतमं ज्ञानम अभयस्य तत् कदापि नहन्यते ” अर्थात हे राजा जगात अमृत, ज्ञान आणि अभय या तीन गोष्टी शाश्वत आहेत. याचा कधीच नाश होत नाही.
राजाला ते पटते आणि तो त्या व्यक्तीची शिक्षा माफ करतो. तसेच एका गोष्टी ऐवजी तीन तीन गोष्टी सांगितल्या म्हणून त्याला अतिरिक्त बक्षीस देतो.
मग तो आपल्या प्रजेला निडर रहायचे धडे देतो त्यामुळे अभय भाव मनात येऊन कोणत्याही संकटाला धीराने सामोरे जायचे मग काही बिघडत नाही हे लक्षात येऊन राज्याकडे वाकड्या नजरेने कोणी पाहिले नाही. अमृत ही गोष्ट तो प्रजेसाठी देऊ शकला नाही पण अमृताचे गुण जाणून त्याने प्रजेला आयुर्वेद महत्व सांगितले. त्याप्रमाणे सगळ्या प्रजेने वागल्याने प्रजेचे आरोग्य सुधारले आणि आयुष्यमान वाढले. अर्थात हे ज्ञान सगळ्यांना दिल्याने हा ज्ञानदीवा अखंड तेवता राहिला ज्याचा कधीच नाश नाही झाला.
राजाने सगळ्यांना ही शिकवण दिल्याने पिढ्यानुपिढया सगळ्यांच्या मनात आत्मविश्वास आला आणि सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्ञान प्राप्त करू लागल्याने राज्याची प्रगतीच होत राहिली.
पण तरी अमृत ही गोष्ट तो देऊ शकला नाही म्हणून त्याने ती गोष्ट नाशवंत न म्हणता अस्तित्वातच नाही असे सांगून ते सुभाषित बदलले आणि स्वानुभवातून त्याने सांगितले सत्यम ज्ञानम अभयस्य तत् कदापि नहन्यते…
सत्य हे कायम सत्यच रहात असल्याने ते पण अक्षय म्हणून मानले जाऊ लागले.
लेखिका : सुश्री वर्षा बालगोपाल
२) गणपती
श्रीपाद आणि सुलोचना गरीब जोडपे. लोकांच्या घरची धुणी भांडी, आणि मोलमजुरीचे काम करून आपली उपजीविका करत होते. खाऊन पिऊन सुखी होते.
निसर्ग नियमाने सुलोचना आई होऊ घातली होती. खरे तर इतकी आनंदाची बातमी तरी सुलोचना धस्तावलेलीच होती. तिला त्याबद्दल विचारले तर ती म्हणाली श्रीपाद आणि घरच्यांना मुलगी नको आहे. मुलगी झाली तर आम्ही सांभाळणार नाही म्हणत आहेत. म्हणून काळजी वाटते.
असे म्हटले तरी तसे होणार नाही. शेवटी आपलेच बाळ म्हणून स्वीकारतील. तसे नाही झाले तर त्यांना समजावता येईल. तू काळजी करू नको असे सुलोचनाच्या घरचे तिला धीर देत होते.
यथावकाश सुलोचना प्रसूत होऊन मुलगीच झाली. ती सुद्धा दिव्यांग… हात पाय छोटे असलेली. गिड्डूच रहाणारी. डॉक्टरांनी हे सांगितले मात्र श्रीपाद आणि त्याच्या घरच्यांनी मुलगी नाकारली. तिला तू कोठेही सोडून ये आम्हाला मुलगीच नको होती त्यातून अशी तर मुळीच नको. तुला आम्ही स्वीकारू….
असे म्हणताच सुलोचनाने त्याला ठाम नकार दिला. मी येईन तर मुलीला घेऊनच नाहीतर मी मुलीला घेऊन कशीही राहीन. असे म्हणून ती त्यांच्याकडे अपेक्षेने पाहू लागली पण त्याला न बधता ते खरेच तिला आणि मुलीला सोडून गेले.
मामाने भाचीला आधार दिला तरी सुलोचनाने तिला धुणं भांड्यांची कामे करून चांगले वाढवले. तिला 10वी पर्यंत शिकवले. मानिनी तिचे नाव. पुढे याच बळावर मानिनीने दिव्यांग मुलांसाठीच शाळा काढण्याचा निर्णय घेऊन त्या दृष्टीने 2 कोर्स केले आणि मामाच्या घराच्या पडवीतच ही शाळा सुरु केली. तिला सरकारी मदत मिळाली आणि मग त्या जागेत तिने मोठी शाळा चालू केली.
ते पाहून श्रीपाद तिच्या पैशासाठी तिला स्वीकारायला तयार झाला.
तेव्हा सुलोचना म्हणाली तुम्ही श्री गणेशाची पूजा करता ना? श्रीपाद म्हणाला हो. पण त्याच काय इथे? पुढे सुलोचना म्हणाली तुम्ही गणपतीची भक्ती विघ्नहर्ता म्हणून करता त्यावेळीच तो बुद्धीदाता आहे कलाधिपती आहे हे विसरलात. आणि ज्या गणपतीची उपासना तुम्ही करता त्याच्याकडे नीट बघता का तरी? गणपतीच्याही जीवनात त्याच्या जन्माच्या वेळेसच संकट आले आणि तो स्वतः दिव्यांगच झाला नाही का? त्याच्या डोक्याच्या भारामुळे त्याचे पोट मोठे झाले म्हणून बेढब नाही का झाला? पण तरीही आपल्या बुद्धीच्या जोरावर कलांच्या साहाय्याने त्याने आपले स्थान अबाधित केलेच ना?
तशीच माझी मुलगी आहे. तिने तिच्या बुद्धीने आज यश मिळवून तिची महानता सिद्ध केली आहे.
एक लक्षात घ्यायला हवं आंधळ्या माणसाला सिक्सथ सेन्स असतो म्हणून त्याला समजते. न बोलता येणाऱ्याला ऐकू चांगले येते. म्हणजेच एक भाग कमी असला तरी काही ना काही जास्त त्याकडे असते. तेच आपल्यातील बळ आहे हे ओळखून काम केले तर दिव्यांग व्यक्ती अविश्वसनीय काम करून दाखवते. त्याला प्रोत्साहन द्यायचे पाठिंबा द्यायचे काम समाजातील इतर घटकांनी करायचे असते. मग दिव्यांग खऱ्या अर्थाने दिव्यांग होतील. अगदी गणपतीबाप्पासारखे.
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈