डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ प्रभाव — भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
(एकदा पूजाला तिने त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे नेले.आधी मोहिनी त्यांना जाऊन भेटली होती. या मुलीवर वडिलांचा असलेला प्रचंड प्रभाव तिने डॉक्टरांना सांगितला.) इथून पुढे —
आणि मग ती सहज म्हणून पूजाला त्यांच्याकडे घेऊन गेली. डॉक्टरकाकांनी तिला हळूहळू बोलते केले आणि तिचे councelling केले…. “ पूजा, काही वर्षांनी तू मोठी होशील, तुला लग्न करावेसे वाटेल,तेव्हाही तू आपल्या बाबांसारखा जोडीदार शोधणार का? नाही ना? तुझे आयुष्य हे फक्त तुझे आहे बाळा.वडिलांचा आदर्श असणे वेगळे आणि त्यांना चिकटून रहाणे वेगळे.तुला हवे तेच करिअर तू कर पूजा.” डॉक्टर काकांनी तिला समजावून सांगितले… होतात मुली अशा वडिलांकडे आकर्षित. त्याला फादर फिक्सेशन म्हणतात.पण सहसा आई नसलेल्या किंवा घरात फक्त वडीलच असलेल्या मुलींचा वडील हा आदर्श असतो आणि त्यांच्यावर वडिलांचा फार दबावही असतो. तुमच्याकडे तुझी आई एक आदर्श आई आहे पूजा. हे बघ तू तुला हवे तेच कर यापुढे.” पूजा डॉक्टरांसमोर मोकळी होत गेली.
एकदाच मोहिनीने उमेश नसताना पूजाला समोर बसवून विचारलं होतं, “ बाळा,तुला मनातून काय करायचं आहे? तुझी काय इच्छा आहे? न घाबरता सांग.” पूजा गडबडून गेली. “ आई , पण बाबा….”
“ हे बघ पूजा,हे आयुष्य तुझं आहे ,बाबांचं नाही. तुला काय करायचं आहे ते तू ठरवायचं आहेस.बाबांनी नाही. तुझा कल कुठे आहे? “ पूजा म्हणाली “ आई, मला नाही ग आवडत ते मेडिकल. मलाही दादासारखं इंजिनीअर होऊन मग परदेशात पण जावंसं वाटतं.” आज इतक्या वर्षात प्रथमच पूजा मोहिनीशी इतक्या जिव्हाळ्याने बोलत होती. “ हो ना? मग तू तुझ्या मनाचा कौल घे आणि तेच कर. करिअर म्हणजे काही गंमत नाही पूजा. तुझ्या मनाविरुद्ध तू तुला आवडत नसलेले मेडिकल करिअर करणार का? केवळ बाबा म्हणतात म्हणून? आणि का? तुला तुझं मत नाही का? हे बघ पूजा ! आई आहे मी तुझी. मी राहीन तुझ्या पाठीशी उभी. मी तुला बाबांच्याविरुद्ध भडकवत नाहीये, पण असं बाबांच्या ओंजळीने नको कायम पाणी पिऊ. आम्ही तुला जन्मभर पुरणार नाही बाळा.” मोहिनीने पूजाला कळकळीने सांगितलं. आणि मगच तिला डॉक्टर काकांकडे नेलं .
केवळ उमेशच्या हट्टाखातर पूजाने p c m b चारही विषय घेतले. परीक्षा झाली आणि उमेश तिच्या रिझल्टची तिच्यापेक्षाही आतुरतेने वाट बघू लागला. पूजाचा रिझल्ट लागला. तिला बायॉलॉजीमध्ये जेमतेम पास होण्याइतके मार्क्स होते आणि फिजिक्स आणि मॅथ्समध्ये मात्र अत्यंत उत्तम रँकस्. अर्थात आता मेडिकलची दार बंदच होती तिला.
उमेशने खूप धिंगाणा केला, तिला वाट्टेल ते बोलला. “ दोन्ही मुलांनी माझी निराशा केली. तू तरी माझं स्वप्न पूर्ण करशील असं वाटलं होतं मला. माझी सगळी मेहनत वाया गेली. कर आता काय हवं ते.” उमेश तिथून निघूनच गेला. पूजा बिचारी कावरीबावरी झाली. इतके सुंदर मार्क्स मिळूनही कौतुक तर सोडाच पण बाबांची बोलणी मात्र खावी लागली तिला.
न बोलता तिने इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला आणि तीही मुंबईला निघून गेली प्रसाद उत्तम मार्कानी इंजिनीअर झाला आणि त्याला सिंगापूरला छान जॉबची ऑफर आली. पूजा सुट्टीवर घरी आली होती. प्रसाद तिला म्हणाला, “ काय मस्त कॉलेज ग पूजा? डायरेक्ट पवई?ग्रेट ग तू.”.
“ अरे पण दादा,बाबांना हे आवडलं नाही ना. ते बोलत नाहीत माझ्याशी.” पूजा रडवेली होऊन म्हणाली. प्रसाद खो खो हसला आणि म्हणाला “ मॅडच आहेस. लहानपणापासून सारखी बाबांच्या पंखाखाली राहून तू स्वतःचे आयुष्यच विसरलीस पूजा. सारखं काय बाबा आणि बाबा. गाढव आहेस का? याला ना, फादर फिक्सेशन म्हणतात वैद्यकीय भाषेत. तुला फक्त बाबा हेच आदर्श वाटायचे लहानपणापासून. त्यात वाईट काहीच नाही ग पूजा. पण किती त्यांचा इम्पॅक्ट तुझ्यावर? ते म्हणतील ते कपडे घालायचे, ते म्हणतील ते वाचायचे,ते म्हणतील तेच सिनेमे बघायचे. तुला स्वतःचं मत नाही का? काही मुली तर लग्न करताना, नवराही आपल्या वडिलांसारखा असावा अशी अपेक्षा ठेवतात.नशीब यावेळी तरी आपल्या मनाचा कौल घेतलास,आणि मेडिकलचं खूळ झुगारून दिलंस.” प्रसादने तिला जवळ घेतलं… “ मस्त कर करिअर तुझं. कसली हुशार आहेस तू. आगे बढो. मी आहे तुझ्यासाठी.” पूजाने प्रसादला मिठीच मारली.” दादा आई, सॉरी हं. मी तुम्हाला ओळखलंच नाही नीट. पण बाबानीही खूप प्रेम केलंय रे माझ्यावर. त्यांना दुखावलं मी खूप.” पूजाच्या डोळ्यात पाणी आलं.
“ अग ठीक आहे पूजा. तू काहीही गैर केलेलं नाहीयेस. उलट पवईसारख्या ठिकाणी प्रवेश मिळणं चेष्टा आहे का? तू नको वाईट वाटून घेऊ बाबांचं. आपल्या अपेक्षा मुलांच्यावर लादणे हे अत्यंत चुकीचेच आहे.तू निर्धास्तपणे जा बरं आता.”
मोहिनीने पूजाची समजूत घातली.जाताना पूजा नमस्कार करायला वाकली तर उमेश तिथून न बोलता निघूनच गेला. पूजा पवईला गेली. अत्यंत सुरेख करिअर चाललं होतं तिचं. शेवटच्या वर्षात ती घरी आली ती हातात नोकरीचे अपॉइंटमेंट लेटर घेऊनच. ”बाबा,बघा ना. किती छान जॉब मिळालाय मला. राग सोडा ना आता “ .उमेशने ते लेटर बघितले आणि छान आहे म्हणून तिथून निघूनच गेला.पूजा आईजवळ बसली आणि म्हणाली, “आई ,सगळं लहानपण मी बाबांच्या मर्जीनेच वागून घालवलं ना? ते म्हणजे माझा आदर्श होते. तुलाही मी कधीही महत्व दिलं नाही.. उलट दुखवलंच ग तुला मी. आता आणखी एक गोष्ट सांगायची आहे. मी लग्न ठरवतेआहे. फार छान मित्र आहोत आम्ही. माझ्याच वर्गात आहे … आशिष तिवारी.आपल्या जातीचा नाहीये पण अत्यंत हुशार आणि लाखात एक मुलगा आहे. आता मात्र मी चूक करणार नाही.आणि आशिषमध्ये बाबा शोधायचा वेडेपणा करणार नाही आई. मी मोठी आहे आणि माझं भलं मला समजतं. दादाचे आणि तुझे खूप उपकार आहेत ग माझ्यावर, वेळीच डोळे उघडलेत माझे तुम्ही.”
उमेशला पूजाने हे लग्न ठरवलेले अजिबात आवडले नाही. त्याने खूप आकांडतांडव केले पण यावेळी मोहिनी आणि प्रसाद तिच्या पाठीशी उभे राहिले. प्रसाद म्हणाला, “ तुम्ही नसला येणार तर नका येऊ लग्नाला. आई आणि मी लावून देऊ त्यांचं लग्न. लाखात एक मुलगा आहे आशिष. कसली जात घेऊन बसलाय हो तुम्ही?”
पूजाचं लग्न प्रसाद आणि मोहिनीने थाटात लावून दिलं. केवळ नाइलाज म्हणून उमेश लग्नाला उपस्थित होता. पूजाच्या डोळ्यात अश्रू आले. “बाबा,मला माफ करा तुम्ही. पण अभिमान वाटावा अशीच तुमची दोन्ही मुलं आहोत ना आम्ही? आता तर मी आशिषबरोबर अमेरिकेला चाललेय. राग सोडून द्या बाबा.” पूजा म्हणाली. उमेशच्या डोळयातून अश्रू वाहू लागले.” पूजा प्रसाद ,माझं चुकलं.कोणालाही लाभणार नाहीत अशी मुलं मला देवाने दिली. मी जन्मदाता आहे,पण तुमच्या आयुष्याचा मालक नाही हे मला फार उशिरा समजलं. कदाचित मला जे लहानपणी मिळालं नाही ते मी तुमच्याकडून पुरं करायला बघत असेन. यात मी मोहिनीवरही खूप अन्याय केला. पूजाला कधी आईजवळ जाऊच दिलं नाही. यात पूजाची काहीही चूक नाही पण माझं चुकलं… मला माझी मुलं गमवायची नाहीत रे. आता तर तुम्ही दोन्ही मुलं दूरदेशी चाललात. मला माझी चूक कबूल करू दे. मोहिनी,मला माफ करशील ना? मी खूप स्वार्थीपणाने वागलो ग तुझ्याशी..पूजा आशिष, सुखात संसार करा आणि प्रसाद माफ कर मला.”
प्रसाद म्हणाला.. “ काय हे बाबा?असं नका बोलू. आपण पूजाला आनंदाने निरोप द्यायला एअरपोर्ट वर जाऊया .. .येताय ना? “ डोळे पुसत उमेश आणि मोहिनी ‘हो’ म्हणाले आणि प्रसादची कार एअरपोर्ट कडे धावू लागली..
— समाप्त —
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈