सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ चित्रकार… भाग-१ – लेखक : श्री शशांक सुर्वे ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆
एखाद्या चौथीच्या प्राथमिक वर्गात असलेल्या मुलाकडून अस काही ऐकणे तुम्हाला नवल वाटेल पण हो करतो मी जास्ती विचार… माझी आज्जी पण नेहमी म्हणते “पुष्कर लहान आहे पण एखाद्या मोठ्या व्यक्ती पेक्षा जास्त समज त्याच्यात आहे” आता ह्याला वरदान म्हणावे की श्राप??….. श्रापच…. अवेळी आलेली गोष्ट तशी धोकादायकच…. मग ते अवेळी आलेलं प्रौढत्व का असेना….. असो….. ह्या सगळ्या दुनियादारी गप्पा तुमच्या सोबत ह्यासाठी मारतोय कारण हे जग सोडण्याचा मी निर्णय घेतला आहे….. कारण??….. मी स्कॉलर ITP परीक्षेत जिल्ह्यात 9 वा आलो म्हणून?? अजिबात नाही….. कारणे खूपशी आहेत…. ती सुद्धा माझ्यासोबत घेऊन जाईन….. माझ्याबद्दल विचाराल तर अभ्यासापेक्षा इतर गोष्टीत रमणारा मी आहे… मी रोज पेपर वाचतो… तो पेपर तिथल्या मोठ्यांच्या गोष्टी….. पण पेपर मधल्या न समजणाऱ्या गोष्टी शेजारच्या काकांना विचारतो ते सगळं समजावून सांगतात मला…. त्यात किनी बातम्या येतात बघा “मानसिक त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या”….. आता मी युवक तर नाही….. शाळकरी मुलगा आहे…. पण खरं सांगू का लहान मुले सुद्धा विचार करतात…. त्यांना सुद्धा मानसिक त्रास येतो ह्याचा विचार कदाचित पालक करत नसतील पण ते खरे आहे… लहानमुले म्हणजे मातीचा गोळा… मातीचा गोळा…. त्यांना आकार देण्यासाठी एवढं बदड बदड बदडलं जातं की हे मडकं तुटू शकतं ह्याचा कुणी विचारच करत नाही… लहान मुलांना पण मन असत… त्यांच्या सुद्धा मनावर परिणाम होत असतो.. कोण करणार विचार??… बरं.. ते सगळं जाऊ द्या.. कुठे होतो आपण….. हा तर ITP स्कॉलर परीक्षेत माझा 9 वा नंबर आला…. बाकी हा सगळा नंबर्सचा खेळ माझ्या डोक्या बाहेरचा आहे…… इथे फक्त 1 ह्या नंबरलाच मानाचे स्थान आहे….. कारण मागच्या वेळी ITP परीक्षेत मी 4 नंबर वर होतो तरीही बाबांचा मार खाल्ला आणि आता ह्या वर्षी तर थोडा जास्तच….. पप्पा आणि मी शाळेत गेलो निकाल हातात आला आणि तिथेच लक्षात आलं की घरी गेल्यावर फुल्ल धुलाई होणार आहे आणि तसच झालं… पप्पांनी अगदी हात दुःखेपर्यंत मला धोपटून काढलं….. साहजिक मार खाताना ओरडायच नाही हा एक कायदा आमच्या घरी होता त्यामुळे हुंदके देत सगळा मार खाऊन घेतला….. मम्मी कोपऱ्यात उभी राहून बघत होती….. दिवस सगळा रडण्यात गेला…. रात्री पप्पा आले काहीवेळ त्यांनी मोबाईल बघितला आणि परत येऊन धोपटून काढलं…… नक्कीच त्यांनी बाजूच्या प्रतीकच्या वडिलांचे स्टेटस बघितले असेल….. प्रतीक 3 रा आला होता….. बाकी माझ्या पप्पांना स्टेटसचे जाम वेड आहे….. पण आपल्या मुलाचा प्रथम 3 क्रमांकात येणाचे स्वप्न मी काही पूर्ण करू शकलो नाही त्यामुळे ते एक दुःख त्यांच्या मनात सलत असावं परिणामी माझी बारीकसारीक गोष्टीसाठी होणारी धुलाई, शिव्या देणे हे सगळं चालूच असायचं….. पण पप्पांच्या मारापेक्षा जर कोणती गोष्ट मला जास्त वेदना देते ती म्हणजे मम्मीचा अबोला….. माझा रिझल्ट लागला की माझी पप्पांच्या कडून येथेच्छ धुलाई होणार हे मला माहित होतं आणि त्याची जराही भीती वाटायची नाही कारण मार खाऊन खाऊन मी पुरता धीट झालो होतो पण मम्मीचा अबोला??….. तो मात्र अगदी आत मनापर्यंत वेदना द्यायचा…. वास्तविक मी प्रथम 3 क्रमांकात नाही आलो तर आई अबोला धरेल कित्येक दिवस बोलणार नाही ह्या विचाराने मी अभ्यास करायचो….. माराचं काही विशेष वाटत नव्हतंच….. पण काय करू?? अभ्यासात माझं मनच लागत नाही….. मला चित्रे काढायला खूप आवडतात….. मला आजूबाजूचा निसर्ग रेखाटायला जाम आवडतो…. शाळेत देखील माझं लक्ष बाजूच्या बगीच्यात असत….. म्हणून तर वर्गातल्या मुलांशी भांडून मी खिडकी कडेची जागा घेतली….. बगीच्यातले पक्षी, खारुताई, फुलझाडे सगळं काही मला आनंदित करून सोडत…. ती फुले, खारुताई वैगेरे मी वहीच्या मागच्या बाजूला रेखाटायचो… माझ्या चित्रकलेच्या मॅडमांना माझी चित्रे खूप आवडायची…. त्यांनी पप्पाना किती वेळा सांगितलं की ह्याची चित्रे खूप चांगली आहेत ह्याला चित्रकलेची आवड आहे तर चित्रकलेच्या क्लासला घाला….. पण त्या दिवशी घरी आल्यानंतर मात्र पप्पांनी माझी सगळी चित्रे जाळून टाकली…… परत तीच धुलाई….. त्यांनी दमच भरला…. “परत चित्र काढताना दिसलास तर तंगड मोडीन”…….. म्हणून तर वहीच्या मागे पेन्सिलने चित्र काढून खोडून घरी जात होतो….. खर सांगू का….. माझं मन नाही लागत अभ्यासात…… मला चित्रे काढायला आवडतात….. शाळेतली मुले जेव्हा एकत्र जमून अभ्यासाच्या चर्चा करतात तेव्हा खूप वेगळं वेगळं वाटत.. कमीपणाचा भाव येतो…. म्हणून तर मी एकटा राहण्याचा प्रयत्न करतो…… आजूबाजूचा निसर्ग पशु पक्षी माझे मित्र बनले आहेत….. आता मला समजून घेणारं कुणीच नाही एवढंच काय तर माझे आई वडील सुद्धा मला समजून घेत नाहीत…. कधी कधी अस वाटत की त्यांनी मला एका मिशन साठी जन्माला घातलं आहे….. मिशन कलेक्टर….. मला ते झालंच पाहिजे असं ते सतत बोलतात….. ते त्यांचं स्वप्न आहे म्हणे पण मग माझ्या स्वप्नांचे काय??…… मला जगप्रसिद्ध चित्रकार व्हायचं आहे…… ज्याचा ह्या वास्तविक जगाशी काहीही संबंध नसेल तो आपल्याच काल्पनिक जगात हरवून वेगवेगळ्या रंगानी चित्र रंगवत जाईल….. पण असो…. आजकल मुलांच्या स्वप्नांना कुठे किंमत आहे म्हणा…… पालकांनी शाळेत अभ्यासात एवढं गुंतवून टाकलं आहे की आधीच्या पिढी सारखं फिरावं, खेळावं, पोहवं हे सगळं आमच्यासाठी स्वप्नवत आहे.. आमच्या उन्हाळी सुट्या सुद्धा क्लासेस आणि स्कॉलर परिक्षमध्येच जातात…. उन्हाळ्याच्या सुट्टीत देखील आमच्या कडून एखादा पेपर किंवा पुढच्या वर्षीची तयारी ते क्लासेस सुरूच असत….. पालकांच्या स्वार्थात आमच्या स्वप्नांचा बळी जातोय ह्याचा विचार कोण करणार आहे??…… मी तरी त्या दप्तराचे आणि घरच्यांच्या स्वप्नांचे ओझे वाहून अक्षरशः थकून गेलो आहे….. खरंच
अजून दुसरी गोष्ट सांगायची झाली तर सगळेच लोक माझ्या विरुद्ध किंवा माझ्यावर ओरडणारे नाहीत बरं….. काही लोकांना माझे जाम कौतुक देखील आहे…. आता तिला “लोक” ह्या कॅटेगरी मध्ये गणले जाऊ शकत नाही… ती फक्त जाणवते तिचा आकार नेहमी बदलत असतो एखाद्या कंपना सारखा तिचा घोगरा आवाज समजण्यासाठी थोडे कष्ट पडतात पण ठीक आहे ना…… अशी ती जरी जिवंत नसली तरी माझ्या आयुष्यात जेवढी जिवंत माणसे आली त्यांच्यापेक्षा ह्या कमला काकूंनी मला खूप प्रेम दिलं आहे….. इतरांच्या दृष्टीने जरी त्या भूत वैगेरे असल्या तरी माझ्या दृष्टीने एक प्रेमळ मायेची ऊब देणारी स्त्रीच आहे…
– क्रमशः भाग पहिला
☆☆☆☆☆
लेखक:- श्री शशांक सुर्वे
प्रस्तुती : उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈