श्री मकरंद पिंपुटकर
🌸 जीवनरंग 🌸
☆ दोन लघुकथा — (१) एका लग्नाची गोष्ट / (२) शठम् प्रति शाठयम्… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
(१) एका लग्नाची गोष्ट – माझे मन तुझे झाले…
१२ मे २०२४ – आज त्या दोघांच्या लग्नाचा सुवर्ण महोत्सव.
तो – कंपनीत टर्नर फिटरची नोकरी करणारा. ती – अकराव्वी (तेव्हाचे मॅट्रिक्युलेशन) पास. मुंबईत, बोरीवलीत दहा बाय दहाची एक पत्र्याची खोली.
रेल्वेच्या संपामुळे जोडप्याची वरात निघालेली एका ट्रकमधून. नवीन जोडपे – ड्रायव्हर क्लिनरच्या मध्ये फ्रंट सीटवर बसलेलं. मागे ट्रकमध्ये सासरची माणसं आणि रुखवतात मिळालेली भांडीकुंडी आणि बाकीचा आहेर. ती भांडीकुंडी आणि आहेर कोणी, कुठे, कधी उतरवून नेली हे आजवर कोणालाच ठाऊक नाही.
एका ॲल्युमिनियमच्या भांड्याच्या साथीने सुरू झालेला राजा राणीचा संसार. आर्थिक ओढाताण सुरू व्हायची महिन्याच्या वीस पंचवीस तारखेलाच. पण त्याने तिची हुशारी ओळखलेली, तिला पुढे शिकायचा आग्रह धरलेला. नवऱ्यापेक्षा बायको जास्त शिकलेली नको – “नाकापेक्षा मोती जड नको” हे म्हणणाऱ्या दुनियेत, नवऱ्याचा हा विश्वास तिला हुरूप देऊन गेलेला. ती जिद्दीने शिकली. D.Ed., BA, MA, शिकतच गेली.
आता ती शाळेत शिक्षिका झाली होती आणि त्याने स्वतःचा वर्कशॉप टाकला होता. संसार-वेलीवर दोन गोजिरवाणी फुलं. छोटा परिवार – सुखी परिवार. पण इतकं छोटंसंच विश्व नव्हतं त्या दोघांचं.
तो कर्णाचाही अवतार आणि भोळ्या सांबाचाही – वर्कशॉपमधील कामगार, शेजारीपाजारी – अडीअडचणीला सगळेच याच्याकडे यायचे. आणि तोही पदरमोड करून – धावपळ करून – शब्द खर्ची करून सगळ्यांना मदत करायचा. यात खरंतर त्याचा गैरफायदा घेणाऱ्यांचीच संख्या जास्त. याला ते उमगायचेही, पण त्याने लोकांना मदत करणं काही सोडलं नाही.
आणि ती तर काय ? शिक्षिकाच झालेली. ती नोकरी नव्हती, व्यवसाय नव्हता, तो एक पेशा होता – पु लं च्या चितळे मास्तरांसारखा. “पोरगं हातात आलं, की त्याला ठाकूनठोकून घडवायचं आणि जगात पाठवायचं” हे जे व्रत तिनं अंगिकारलं, ते कधी सोडलंच नाही.
तिच्या कर्तुत्वाची सरकार – दरबारी दखल घेतली जाऊ लागलेली, तिला पुरस्कार मिळू लागलेले. मार्गदर्शनासाठी तिला आमंत्रणे येऊ लागलेली. आणि तिच्या यशात हाच जास्त सुखावू लागलेला.
लेकाचं लग्न झालेलं, तो नोकरीनिमित्त आखाती देशात. सून नातू आधी त्याच्या बरोबर परदेशी पण आता मुंबईतच बोरिवलीला राहायला आलेले. लेकीची इथेच नोकरी छान सुरू.
दिवस – वर्षे सरली, ती निवृत्त झाली, त्यानेही वर्कशॉप बंद केलेलं. पुण्यात घर घेतलेलं, बोरिवलीच्या जागेच्या पुनर्विकासात एक छान फ्लॅट मिळालेला. “सुख म्हणजे नक्की काय असतं” याची ते दोघं पुरेपूर अनुभूती घेत असलेले.
पण अचानक संकटाची वादळं घोंघावू लागलेली. कोविडने त्याला ग्रासलेले. ऑक्सिजन लेव्हल कमालीची खाली गेलेली, तो ICUमध्ये ऍडमिट. ती स्वामींसमोर ठाण मांडून बसलेली. आणि तो सहीसलामत बचावलेला.
मग तिची पाळी. आयुष्यात कधी डॉक्टरचं नव्या पैश्याचं बिल न केलेली ती, एकदम कर्करोगानं गाठलेलं. साडे अठरा सेंटिमीटरची गाठ. केमो सुरू झालेली. डोक्यावरचा केशसंभार शिशिराच्या पानगळीसारखा पूर्णपणे झडलेला – पण डोक्यावरचं काळजीचं ओझं मात्र वाढलेलं. आता तो स्वामींसमोर ठाण मांडून बसलेला.
वाकड्या चालीचा कर्करोग आटोक्यात आलेला, ऑपरेशन यशस्वी झालेलं.
दोघेही स्वामी (समर्थ) भक्त. स्वामी त्यांच्या पाठीशी होतेच.
आज लग्नाच्या सुवर्ण महोत्सवदिनी- ते दोघं – हे सगळंच पुन्हा एकदा अनुभवत होते – एखाद्या चित्रपटासारखं – झरझर डोळ्यासमोरून जाताना.
लेकाने, लेकीने आई बाबांच्या लग्नाच्या सुवर्ण महोत्सवाचा एक छानसा घरगुती कार्यक्रम आयोजित केलेला. त्या दोघांनाही आश्चर्याचे धक्क्यांवर धक्के बसत होते. अगदी संगीत, मंगलाष्टकं यांसमावेत पुन्हा एकदा छान लग्न लागलेलं, सुवासिनींनी ओवळलेलं, अगदी उखाणे – घास भरवणं : सगळं कसं साग्रसंगीत. घरचाच पण व्यावसायिक फोटोग्राफर सगळ्या भावमुद्रा अलवारपणे टिपून घेताना.
आणि ती आता तिचं मनोगत व्यक्त करताना –
“हे” आजारी असताना, मला कर्करोग झाला आहे हे कळल्यावर माझे असंख्य विद्यार्थी, आमचे अनेकानेक नातेवाईक हे सगळे सगळे एकजुटीने आमच्या पाठीशी उभे राहिले, स्वामींचे आशिर्वाद आहेतच. माझ्या कर्करोगाचे निदान कळल्यावर लेकाने क्षणभरही विचार न करता, परदेशातली लठ्ठ पगाराची नोकरी सोडून दिली आणि कायमचा भारतात – घरी परतला. लेकीने नोकरी सोडून दिली, ती पूर्ण वेळ माझ्यासोबत खंबीरपणे उभी राहिली.
पैशांच्या जोरावर पूर्ण वेळ सांभाळणारी नर्स हे दोघं सहज ठेऊ शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही, मायेची पाखर धरली. आणखी आयुष्यात काय हवं ?
गेल्या १२ मे ला, मी हॉस्पिटलमध्ये होते, श्वास घेतानाही जीव जात होता. पण “हे”, माझा लेक, माझी लेक, सून, नातू – सगळे आले, आम्ही केक कापला, लग्नाचा वाढदिवस साजरा केला. आणि आज, तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छेने, मी तुमच्या समोर उभी आहे – हा सुवर्ण सोहळा अनुभवते आहे,”
ती बोलत होती, पार्श्वभूमीला, तिच्या लाडक्या विद्यार्थ्याचा आवाजात पुरिया धनश्री दरवळत होता, सांगत होता – माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले….
… सगळा आसमंत धूसर, सांद्र झालेला,
गळ्यात दाटलेला आवंढा, डोळ्यात दाटलेले अश्रू …
आज तो आनंद, आनंद !
एका लग्नाची सुवर्ण महोत्सवी गोष्ट ….
( २ ) शठम् प्रति शाठयम्…
शनिवार संध्याकाळ, आणि नेहमीप्रमाणे “निगडी पिझ्झा”ला ग्राहकांची तुंबळ झुंबड उडाली होती.
निगडी प्राधिकरण – अतिशय वेगाने वाढणारे पुण्याचे एक उपनगर. तेथील एका प्रतिष्ठित खाजगी मानित विद्यापीठाच्या (deemed university) भोवतालचा विस्तीर्ण परीसर. जवळील हिंजवडी आयटी पार्क, चाकण, पिंपरी चिंचवड येथील ऑटोमोबाईल उद्योग यामुळे बहुसंख्येने येऊन स्थायिक झालेले तरुण – तरुणी आणि भरीस या विद्यापीठातील उच्चभ्रू विद्यार्थी. त्यामुळे रेस्टॉरंट, फास्ट फूड यांच्या दुकानांची नुसती रेलचेल होती या परीसरात.
शनिवार रविवार म्हणजे तर या व्यवसायांना पर्वणीच. वीक एण्ड म्हणजे ऐशआरामाचे हक्काचे दोन दिवस असं जणू अलिखित समीकरणच. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी अहमहिका लागलेली. वेगवेगळ्या सवलती, कुपन्स यांचा भडीमार असायचा तेव्हा. एकावर एक बर्गर फ्री, ५०% सवलत, मोफत कोल्ड कॉफी – अशा अनेक सवलती. आणि सवलतींच्या मोहाने ग्राहकही तुटून पडायचे खाद्यपदार्थांवर.
“निगडी पिझ्झा” या स्थानिक दुकानाचा त्या परिसरात निःसंशय दबदबा. तिथला पिझ्झा दोन पैसे महाग असायचा, पण फुल टू पैसा वसूल. आजूबाजूच्या अन्य नामांकित आणि स्थानिक पिझ्झा दुकानांचा व्यवसाय “निगडी पिझ्झा”मुळे चांगलाच मार खात असे.
आफताब बेकर्सला, या आठवड्यात नुसत्या “निगडी पिझ्झा”चेच नव्हे, तर सगळ्याच फास्ट फूडवाल्यांचे ग्राहक आपल्याकडे खेचायचे होते. त्यांच्या डोक्यात एक प्लॅन शिजत होता. त्याने स्थानिक वर्तमानपत्रांत टाकण्यासाठी एका पत्रकाची (flyer) ऑर्डर दिली. “कोणत्याही दुकानाची पंचवीस कुपन्स आणा – आमच्याकडून ४९९/- चा एक पिझ्झा फक्त ४९/- रुपयांत घेऊन जा.”
सगळेच ग्राहक इतर दुकानांची सगळी कुपन्स घेऊन आपल्याच दुकानी येतील, या आठवड्याअखेरीसचा (weekendचा) त्यांचा सगळा धंदा पूर्ण बसेल आणि एकदा ग्राहकांना आपल्याकडे यायची सवय झाली, की मग ते इतरांकडे फिरकणार नाहीत – असा आफताबवाल्यांचा ठोकताळा.
प्लॅन सुंदर होता, पण ज्या छापखान्यात हे पत्रक छापायला दिलं होतं त्या छापखान्याच्या मालकाला, सॅमला काही हे पटलं नाही. “निगडी पिझ्झा”वर सॅम लहानाचा मोठा झालेला, उसे उसके नमक का कर्ज अदा करना था.
सॅमने “निगडी पिझ्झा”ला फोन लावला आणि शनिवारी वर्तमानपत्रासोबत येणाऱ्या आफताबच्या पत्रकाबद्दल सांगितले. “निगडी पिझ्झा”वाल्याने सॅमचे आभार मानले, आणि मग पुढे त्यांच्यात काही बोलणी झाली.
शनिवार उजाडला, वर्तमानपत्रे वाटली गेली, त्यात दोन पत्रकं होती. एक आफताब बेकरीवाल्याचं आणि दुसरं “निगडी पिझ्झा”चं.
“निगडी पिझ्झा” या शनिवारी सर्व ग्राहकांना त्या पत्रकाद्वारे पंचवीस मोफत कुपन्स देऊ करत होते. गंमतीचा भाग म्हणजे या सर्व पंचवीस कुपन्सवर मिळून फक्त पाच रुपयांचे एक चॉकलेट मिळणार होते.
एरवी असल्या पाच रुपयांच्या भुक्कड कुपनकडे, ते जरी अगदी “निगडी पिझ्झा”वाल्यांचं असलं, तरी कोणी ढुंकूनसुद्धा पाहिले नसते. पण आज “निगडी”च्या या पंचवीस कूपनच्या मोबदल्यात आफताबची घसघशीत ऑफर होती. आणि लोकं ४९९/- चा पिझ्झा फक्त ४९/- रुपयांत मिळवण्याची अशी सुवर्णसंधी अर्थातच सोडणार नव्हते.
ज्यांनी ज्यांनी शनिवारी सकाळी वर्तमानपत्रे उघडली, त्या सगळ्यांनीच आफताब बेकर्सकडे आपला मोर्चा वळवला. अधिक चाणाक्ष लोकांनी दोन तीन वर्तमानपत्रे घेतली, त्यातील “निगडी पिझ्झा”ची कुपन्स घेतली, आणि आफताबकडे कूच केलं.
संपूर्ण weekend साठी आफताबने जी तयारी ठेवली होती, ती शनिवारची संध्याकाळ सुरू होण्यापूर्वीच पार संपली. आणि हा तिहेरी आतबट्ट्याचा व्यवहार झाला होता. पिझ्झा अगदी स्वस्तात – नुकसानीतच विकावा लागला होता, “निगडी पिझ्झा”वाल्याचं विशेष काहीच नुकसान झालं नव्हतं, आणि संध्याकाळी जेव्हा खरं गिऱ्हाईक आलं, तेव्हा त्यांना देण्यासाठी आफताबकडे काहीच शिल्लक नव्हतं.
आणि म्हणूनच, आत्ता शनिवार संध्याकाळ होती, आणि नेहमीप्रमाणे “निगडी पिझ्झा”ला ग्राहकांची तुंबळ झुंबड उडाली होती.
© श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈