श्री दीपक तांबोळी
जीवनरंग
☆ जीवनसंग्राम… – भाग – 1 ☆ श्री दीपक तांबोळी ☆
भल्या पहाटे मार्केटमध्ये जाऊन लिलावात घेतलेली भाजी कमलाने टोपलीत टाकली आणि ती जड टोपली डोक्यावर घेऊन ती भाजी विकायला निघाली.काल म्हणावा तसा धंदा झाला नव्हता.”आज तरी चांगली कमाई व्हायला पाहीजे”अशी मनाशीच बडबडत ती “भाजी घ्या होsss मेथी,पालक,भोपळा भेंडी,मिरची,कोथिंबीर “असं ओरडत गल्ल्यागल्ल्यातून फिरु लागली.फिरतांना मात्र तिचं मन थाऱ्यावर नव्हतं.मनात सतत येणारे विचार ती थांबवू शकत नव्हती.घटनाच तशा घडल्या होत्या.नुकतीच बाळंतीण झालेली तिची मुलगी घरी आली होती.दुसरी मुलगीच झाली म्हणून तिच्या नवऱ्याने आणि सासूने त्या ओल्या बाळंतिणीला तिच्या निष्पाप पोरीसकट घरी आणून टाकलं होतं.जावयाची तिनं खुप मनधरणी केली.त्याच्या पाया पडली.जावई थोडा नरमला.बायकोमुलीला घरी घेऊन जायला तयार झाला.पण सासू महाहलकट होती.ती जावयावरच भडकली “नातू झाल्याशिवाय इस्टेटीतला एक रुपया पण देणार नाही” अशी धमकी दिल्यावर जावई घाबरला.शेवटी कमलाच्या मुलीला आणि दोन्ही नातींना तिथंच सोडून निघून गेला.आता मुलासाठी तो दुसरं लग्न करणार होता.एका बाईलाच दुसऱ्या बाईचा जन्म नकोसा का होता हे कमलाला कळत नव्हतं.वंशाला दिवा पाहिजे म्हणे!वंशाचा दिवा असणाऱ्या तिच्या नवऱ्याने काय दिवे लावले होते हे काय तिला माहित नव्हतं?कमलाच्या पोटी दोन मुलांना जन्माला घातलं हाच काय त्याचा पराक्रम.त्यानं जन्माला घातलेला दुसरा वंशाचा दिवा,कमलाचा चोविस वर्षांचा मुलगा काहीच कामधाम न करता एका राजकीय पुढाऱ्याच्या मागेमागे फिरायचा.रात्री अकराबारा वाजेपर्यंत त्याचा पत्ता नसायचा.कोबडी खायला मिळते आणि दारु प्यायला मिळते म्हणून त्यानं आपलं आयुष्य असं बरबाद करावं हे काही तिला पटत नव्हतं.पुढाऱ्याने त्याला नगरसेवक बनवण्याचं आश्वासन दिलं होतं.पण तो अशी स्वप्नं सगळ्याच तरुण पोरांना दाखवून त्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी वापरुन घेत होता हे कमलाला कळत होतं.तिनं ते पोराला अनेकवेळा समजावूनही सांगितलं होतं.पण पोरगा ऐकत नव्हता.नवरा वारल्यानंतर तीनंच मुलांना मोठं केलं होतं.तसाही नवऱ्याचा तिला काहीच उपयोग नव्हता.रोज दिवसा पत्ते खेळत बसायचं,रात्री दारु पिऊन तमाशे करायचे आणि कमलाने विरोध केला की तिला मारहाण करायची हेच त्याचं रोजचं काम.त्याची अशी थेरं पाहून लग्नानंतर दोनच वर्षांत कमलाने भाजीची टोपली हाती धरली होती.नवऱ्याने तिला पोसायच्या ऐवजी तिनंच नवऱ्याला पोसलं होतं.शेवटी तिच्या कुंकवाचा धनी होता ना तो!नवरा लिव्हर सडून मेला तेव्हा ती लोकलाजेस्तव रडली खरी पण खरं तर तिला खुप हायसं वाटलं होतं.आता मुलगा मोठा झाला की तो काहीतरी कामधाम करुन घरात पैसे आणेल आणि आपलं हे असं उन्हातान्हात, थंडीपावसात दारोदारी फिरुन भाजी विकणं बंद होईल अशी तिला आशा वाटत होती.ती मुलाने फोल ठरवली होती.शेवटी तो बापाच्याच वळणावर जातो की काय अशी कमलाला भिती वाटायला लागली होती.
विचारांच्या गर्दीत ती किती गल्ल्या फिरली तिचं तिलाच कळलं नाही.उन्हाचे चटके बसायला लागले तशी ती भानावर आली.आज अजूनही बोहनी झाली नाही हे तिच्या लक्षात आलं तेव्हा ती धास्तावली.अजून बंगलेवाल्यांची काँलनी बाकी आहे हे पाहून ती त्या काँलनीत शिरली.
खरं तर तिला या काँलनीत यायला आवडायचं नाही.करोडोंच्या बंगल्यात रहाणारे,लाखांच्या गाड्या उडवणारे आणि नवीन वर्षाला हजारोंची दारु पिणारे हे बंगलेवाले तिच्याशी पाचदहा रुपयांसाठी घासाघीस करायचे,वाद घालायचे.बाईच बाईचं दुःख समजू शकते असं ती नेहमी ऐकायची पण या बंगल्यातल्या बायकांना कधीही तिची दया आल्याचं तिच्या अनुभवाला आलं नव्हतं.उन्हाळ्यात साधं पाणीसुध्दा पाजायला त्या नखरे करायच्या.
उन्हाच्या चटक्यांनी आणि थकव्याने कुठेतरी बसून पाणी प्यावं असं तिला वाटू लागलं.एका बंगल्याच्या सावलीत ती बसली.टोपलीतून गरम झालेली बाटली काढून तोंडाला लावून ती पाणी पिणार तेवढ्यात तिथं एक आलिशान कार येऊन थांबली.गाडीतून एक तरुण बाई उतरली.कमलाबाईला पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या.
“काय आहे?कशासाठी रस्त्यात बसलीये?” ती जोरात कमलावर खेकसली
“ताई काही भाजी हवी अशीन तर घ्या.भोपळा आहे,भेंडी आहे,मेथी,मिरची……”
“काही नको.तू जा इथून “ती चिडून बोलली तशी
कमला उठून जायला निघणार तेवढ्यात ” अग अशी काय करतेस?” असं म्हणत एक तरुण तिच्या मागून येत म्हणाला”परवा आपल्याकडे कार्यक्रम आहेच. त्याला लागेल ना भाजी!मावशी सांगा कितीची होईल ही सगळी भाजी?”
तो सगळी भाजी घेतोय यावर कमलाचा विश्वास बसेना तरी तिनं हिशोब लावला.तो भावात घासाघीस करेल या विचाराने तिनं भाजीचे शंभर रुपये वाढवून पाचशे रुपये सांगितले.पण त्याने काही न बोलता लगेच पाकिट काढून तिला पाचशे रुपये दिले.गडी माणसाला बोलावून टोपली रिकामी करुन दिली.
“अरे आपण मार्केटमधून आणली असती भाजी.स्वस्त मिळाली असती.दारावर येणाऱ्या या बायका खुप महाग देतात “
त्याच्या बायकोची कटकट अजून सुरुच होती.
“जाऊ दे गं.मावशींकडची भाजी चांगली फ्रेश असते आणि वीस पंचवीस रुपयांकडे काय बघायचं?बिचाऱ्या मावशींना एवढ्या कडक उन्हात उगीचची पायपीट करावी लागते.वीसपंचवीस रुपये त्यांनी जास्त घेतले तर बिघडलं कुठं ?”तो तिला आत नेत म्हणाला.
कमला खुश झाली.बायांपेक्षा हे बापे जास्त दिलदार असतात याचा पुन्हा एकदा तिला प्रत्यय आला.बोहनी झाली होती तीही दणदणीत पाचशे रुपयाची!आणि तीही एका फटक्यात!आनंदाने ती रिकामी झालेली टोपली घेऊन सरळ घरी आली.स्वयंपाक करुन मुलीला,नातीला जेवू घातलं.मग नातींशी खेळताखेळता झोपून गेली.
उन्हात फिरल्याने संध्याकाळी तिला सणकून ताप चढला.ती नाही नाही म्हणत असतांनाही मुलीने तिला डाँक्टरकडे नेलं.सकाळी झालेली सगळी कमाई डाँक्टरची फी आणि औषधात साफ झाली.आता उद्या भाजी विकता येईल की नाही या चिंतेने आणि मुलांच्या काळजीने तीला रात्रभर झोप लागली नाही.
दुसऱ्या दिवशीच काय तीन दिवस तिला तापामुळे भाजी विकायला घराबाहेर पडता आलं नाही. तीन दिवसांनी तिचा ताप उतरला.तिन्ही दिवस ती घरीच होती.डाँक्टरचं बिल थकलं होतं.प्रचंड अशक्तपणा आला होता.उन्हातान्हात भाजीची जड टोपली घेऊन फिरायचं त्राणही तिच्या शरीरात राहीलं नव्हतं.एकीकडे मुलगा काही कमवत तर नव्हताच पण तिच्याकडेच सतत पैशांची मागणी करुन तिला त्रास देत होता आणि दुसरीकडे लेकुरवाळी पोरगी उरावर येऊन बसली होती.सगळीकडे अंधार पसरला होता.आशेचे किरण कुठंच दिसत नव्हते.कमलाला आता खचल्यासारखं वाटू लागलं.या जबाबदाऱ्यांचं ओझं तिला पेलवेनासं झालं.कुणीतरी येऊन हे सगळं सांभाळावं असं वाटू लागलं.पण कोण येणार याचं उत्तरही तिच्याकडे नव्हतं.दुसऱ्याच्या दुःखांनी खुश होणाऱ्या नातेवाईकांकडून तर ति ला काडीचीही अपेक्षा नव्हती.त्यापेक्षा छताला लटकून मरुन जावं म्हणजे या सगळ्या कटकटींतून मुक्तता तरी होईल अशीही भावना तिच्या मनात डोकावू लागली.
नैराश्याच्या या अवस्थेतच संध्याकाळी शेजारच्या बायका तिला बळजबरी किर्तनाला घेऊन गेल्या. किर्तनकार सांगत होते
– क्रमशः भाग पहिला
© श्री दीपक तांबोळी
जळगांव
मो – 9503011250
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈