श्री दीपक तांबोळी
जीवनरंग
☆ जीवनसंग्राम… – भाग – 2 ☆ श्री दीपक तांबोळी ☆
(नैराश्याच्या या अवस्थेतच संध्याकाळी शेजारच्या बायका तिला बळजबरी किर्तनाला घेऊन गेल्या.किर्तनकार सांगत होते – –) – इथून पुढे —
‘गड्यांनो देवांनासुध्दा स्वतःसाठी युध्दं करावी लागली.सीतामाईला आणण्यासाठी प्रभु रामचंद्रांना स्वतःला लंकेला जाऊन युध्द करावं लागलं.दुष्ट कंसमामाला मारण्यासाठी क्रुष्णाला स्वतः कंसाशी युध्द करावं लागलं.महिषासुराला मारण्यासाठी देवीला स्वतः युध्द करावं लागलं.आपण तर शुद्र माणसं आहोत.आपल्या आयुष्यात लढाईचे,युध्दाचे प्रसंग वारंवार येतात.दुसरं कोणीतरी येऊन आपली लढाई लढेल ही अपेक्षा सोडून द्या. तो देव आपल्याला मार्ग नक्की दाखवेल पण आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे हे लक्षात ठेवा.तुम्ही देवांचे फोटो बघितले असतील.प्रत्येकाच्या हातात धनुष्यबाण, गदा,तलवार अशी शस्त्रं आहेत.आपण सामान्य माणसं अशी शस्त्रं बाळगू शकत नाही.पण संयम,धैर्य, चिकाटी आणि हुशारी हीच आपली शस्त्रं आहेत.त्यांचा वापर करुन आपल्याला आपली लढाई जिंकायची आहे “
ते ऐकून कमलाच्या अंगावर शहारे आले.आपली परिस्थिती तिच्या डोळ्यासमोर उभी राहिली.आशेचे किरण असे सहजासहजी दिसणार नाहीत.त्यांच्या मार्गात येणारे अडथळे आपल्यालाच प्रयत्नांनी दुर करावे लागतील हे तिच्या लक्षात येवू लागलं “आपल्यालाबी आता लढलं पाहिजे.असं हातपाय गाळून कसं चालेल?”तिनं मनाला समजावलं आणि तिला थोडासा का होईना हुरुप आला.
दुसऱ्या दिवशी ती तिच्याकडून नियमित भाजी घेणाऱ्या वकीलीण बाईकडे पोहचली.वकीलसाहेब घरीच होते.कमलाने मुलीचं प्रकरण त्यांच्यासमोर मांडलं.दोनतीन वर्ष का होईना नियमित पैसे देणारं अशील मिळालं या कल्पनेने वकीलसाहेब खुष झाले.
“ठिक आहे.आपण तुमच्या मुलीच्या नवऱ्याला नोटीस पाठवू.जर तरीही त्याने नाही ऐकलं तर आपण कोर्टात केस दाखल करु.पण त्या अगोदर तुमच्या मुलीला रितसर पोलीस स्टेशनला सासू आणि नवरा छळ करत असल्याची तक्रार करावी लागेल”
कमला गोंधळली.पोलिस, कोर्ट या शब्दांनी तिला कापरं भरलं.ती वकीलसाहेबाला म्हणाली
” साहेब ते नोटीस, पोलिस ,कोर्ट मले काय बी म्हाईत नाई.पोलिसात गेलो तर माह्या जावई आनखीनच डूख धरीन.दुसरं करता यीन का?”
” खरंच हो!ते नोटिस,पोलिसात कंप्लेंट,कोर्टकचेऱ्या यात तर अनेक वर्ष निघून जातील.आणि ही गरीब बाई एवढा खर्च कुठून करणार?दुसरं काही करता येत असेल तर सांगा बिचारीला “
बायकोच असं म्हणायला लागल्यावर वकीलसाहेबांचा चेहरा पडला.मग त्यांनी कमलाला महिला दक्षता समितीला भेटायला सांगितलं.त्यांचा फोन नंबर आणि पत्ताही दिला आणि आपली जबाबदारी झटकून टाकली.दुसऱ्या दिवशी त्यांनी दिलेल्या पत्यावर कमला हिंमत करुन मुलीला घेऊन पोहचली.त्या तिला घेऊन पोलिस सुपरिटेडंट साहेबांकडे गेल्या.एस.पी.साहेब कडक शिस्तीचे आणि प्रामाणिक असले तरी दयाळू होते.कमलाच्या मुलीची हकिकत ऐकून त्यांना तिची दया आली.त्यांनी फोन उचलला.कमलाचा जावई ज्या गावात रहात होता तिथल्या पोलिस ठाण्याला आदेश दिले.चक्रं फिरली.एक तासात कमलाचा जावई आणि त्याच्या आईला पोलिस स्टेशनला उचलून आणल्या गेलं.एस.पी.साहेबांनी दोघांना सज्जड दम भरला.पहिल्या बायकोला घटस्फोट न देता दुसरं लग्न केलं तर जेल होईल आणि जेल झाली तर आहे त्या सरकारी नोकरीला मुकावं लागेल अशी धमकी जावयाला दिली.तो थरथर कापू लागला.महिला पी.एस.आय.ने सासूला ताब्यात घेतलं.मुलगा किंवा मुलगी जन्माला घालण्यात बाई जबाबदार नसते हे तिला समजावून सांगितलं.पण म्हातारी मोठी चिकट होती.म्हणाली
“ते मले काय बी माहित नाय.मले नातू पाहिजे म्हणजे पाहिजे “
” मावशी तुम्हाला मुलं किती?”
“एक पोरगा आणि दोन पोरी “
” त्या दोन पोरी तुम्ही का बरं जन्माला घातल्या?त्यांच्याऐवजी पोरांना का नाही जन्म दिला ?”
म्हातारी गडबडली.चिडून म्हणाली
“आता ते काय माह्या हातात हाये?”
” आम्हीही तेच म्हणतोय.पोरींना जन्म देणं तुमच्या हातात होतं का?आणि मला सांगा या सुनेला फारकत देऊन तुम्ही दुसरी सुन आणली आणि तिलाही पोरीच झाल्या तर?मग तिलाही फारकत देऊन तिसरी सुन आणली आणि तिलाही पोरीच झाल्या तर तुम्ही काय सुनाच बदलत रहाणार का?”
आता मात्र म्हातारीला हसू आलं.महिला पी,एस.आय.म्हणाली
” आणि हे बघा मावशी.तुमची सुन चांगली आहे म्हणून तिनं अजून लेखी तक्रार केलेली नाही. तिनं तशी तक्रार केली रे केली की आम्ही तुम्हांला आणि तुमच्या पोराला सुनेचा छळ केल्याच्या आरोपावरुन अटक केलीच समजा “
म्हातारी घाबरली.दुसऱ्याच क्षणी जवळच उभ्या असलेल्या कमलाच्या पोरीला म्हणाली
“चाल वं सरले,घरला चाल”
पुन्हा मुलावरुन बायकोचा छळ करणार नाही असं आश्वासन कमलाच्या जावयाने दिलं.मग कमला दोघांना घेऊन घरी घेऊन गेली.झणझणीत मटन करुन जावयाला आणि त्याच्या आईला खाऊ घातलं.
संध्याकाळी मुलगी मुलींना घेऊन जावयासोबत सासरी गेली.कमलाने सुटकेचा निश्वास सोडला.एक लढाई तिने जिंकली होती.आता पोराचा निकाल लावायचा होता.तिने सरळ मुळावर घाव घालायचं ठरवलं.
दोन दिवसांनी ती पुढाऱ्याला जाऊन भेटली.त्याला कळवळून म्हणाली
“सायेब माह्याकडून आता हे भाजीचं काम होत नाही. पोरानं लई सेवा केली तुमची.आता त्याला कामधंद्याला लावून द्या “
पुढारी महाबेरकी होता.असे आपले कार्यकर्ते कामधंद्याला लागले तर आपल्यामागेमागे कोण फिरेल,आपली चमचेगिरी कोण करेल असा विचार करुन तो कमलाला टाळण्याच्या द्रुष्टीने म्हणाला
” मावशी दोन वर्ष थांबा.दोन वर्षांनी महानगरपालिकेच्या निवडणूका आहेत.त्याला तुमच्या वार्डाचा नगरसेवकच बनवतो.एकदा नगरसेवक बनला की मग काय पैसाच पैसा “
कमलाने पुढाऱ्याचा डाव ओळखला.ती उसळून म्हणाली
“अवो साहेब नगरसेवक बनण्याची त्याची लायकी तरी हाये का?दोन मुस्काटात मारल्या तर चड्डीत मुतेल तो.तो काय नगरसेवक बनतो!आणि नगरसेवक बनायला करोडो रुपये खर्च कराया लागत्यात.हायेत का त्याच्याजवळ करोडो रुपये?ते काही नाही साहेब आता म्या त्याला कामधंद्याला लावणार.ते भाजी मार्केटमधी एक दुकान हाये.ते घेऊन द्या.लई मेहरबानी होईन तुमची “
कमला काही ऐकत नाही हे पाहून पुढाऱ्याने फोन उचलला.त्या दुकानाची चौकशी केली.फोन ठेवून म्हणाला “पाच लाखाचं दुकान आहे.जमेल?”
“साहेब माझं सोनंनाणं विकून दोन लाख जमतील.तीन लाखाचं कर्ज द्या.आम्ही दोघं मिळून फेडू”
पुढारी काही बोलेना.कमलाने त्याच्या मनात काय चाललंय ते ओळखलं.ती म्हणाली
” साहेब काही काळजी करु नका.गरज लागीन तवा पोराला बोलवा.तुमच्यासाठी त्याला कवा बी हजर करीन “
आता मात्र पुढारी हसला.कमलाचं काम झालं.
आठवडाभरात दुकान मिळालं.सुरवातीला पोरगा दुकानात बसायला तयार होईना.सारखा दुकान बंद करुन पळून जायचा.मग ती स्वतःच त्याच्यासोबत बसायची.त्याला जागचं हलू द्यायची नाही.कमलाच्या नशिबाने एक चांगली गोष्ट घडली.एका खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर असलेल्या पुढाऱ्याला सजा झाली.तो तुरुंगात गेला.आपल्यावरही कारवाई होऊ नये या भितीने त्याचे चमचेही राजकारण सोडून कामधंद्याला लागले.कमलाचा पोरगाही मग हळूहळू धंद्यात रमला.तो रमला हे पाहून कमलाने परत भाजी विकायला सुरुवात केली.कामाची सवय असल्याने असंही तिला घरात करमत नव्हतंच.
भाजीची टोपली घेऊन कमला मंदिराजवळ आली.बाहेरुनच तिने देवाला हात जोडले.’आपली लढाई आपणच लढायची’हे ती देवाकडून तर शिकली होती.तिच्या मनात आलं.’अजून लई लढाया बाकी आहेत.पोराचं लग्न,येणाऱ्या सुनेशी जमवून घेणं,सुनेची बाळंतपणं,तिचं स्वतःचं म्हातारपण,त्यासोबत येणारे आजार.हा कधीही न संपणारा जीवनसंग्राम होता.त्यात कधी चांगली माणसंं भेटतात कधी वाईट.पण युध्द करणं टळत नाही हेच खरं!
त्याशिवाय आयुष्यात मजाही नाही.देवा मला लढण्याची शक्ती दे रे बाबा “
कमलाने टोपली उचलली आणि ती चालू लागली.पण आता तिच्या पावलात आत्मविश्वास भरला होता आणि जीवनसंग्रामाला तोंड देण्याचं सामर्थ्य!
– समाप्त –
© श्री दीपक तांबोळी
जळगांव
मो – 9503011250
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈