सुश्री साधना प्रफुल्ल सराफ
जीवनरंग
☆ बॅटरी – भाग 2 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆
डॉ हंसा दीप
(ती श्वास रोखून त्या गाडीच्या निघून जाण्याची वाट बघत होती. तेवढ्यात त्या गाडीचे ब्रेक जोरात दाबले गेले आणि चर्र करत ती थांबली.) – इथून पुढे —
कोणीतरी तिच्या गाडीवर टक टक केलं. काहीतरी धोका आहे, नाहीतर हा गाडीवाला का थांबला असेल? हे जे काही आहे, ते या रात्रीतलं आणखी एक चक्रीवादळच आहे! ती श्वास रोखून पडूनच राहिली, अजिबात न हलता.
“हॅलो! मी मदत करू शकतो, दार उघडता का?”
ती गप्पच राहिली.
“मी पाहिलं आहे तुम्हाला, तुम्ही इथे गोठून जाल. घाबरू नका.”
आता काही पर्यायच नव्हता. तिनं कसाबसा दरवाजा उघडला आणि बोलली—“माझी बॅटरी डेड झाली आहे, फोन पण डेड आहे आणि मी पण मरणारच आहे. तुम्ही जा.”
“मी तुमची गाडी जंप स्टार्ट करून देऊ शकतो.”
सोफिनी काही म्हणायच्या आत तो अगांतुक तिच्या गाडीचं बॉनेट उघडू लागला. तो थंडीने कुडकुडत होता, आणि तीच परिस्थिती सोफीची पण होती. बोलण्यासाठी तिनं फक्त तोंड उघडं ठेवलं होतं, बाकी सगळं गुरफटलेलंच होतं. बोलताना तोंडातून भरपूर वाफ बाहेर पडत होती. दोघंही थंडीमुळे थरथरत होते. सोफीची थरथर त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक होती. थंडी आणि भीति दोन्हींचा एकत्र हल्ला झालेला होता तिच्यावर. त्याने जंप स्टार्ट करून दिली गाडी आणि म्हणाला, “आता गाडी बंद करू नका, इंजिन चालूच ठेवा. मी तुमच्या मागून गाडी चालवत रहातो.”
“तुम्ही गेलात तरी चालेल, मी ठीक आहे आता. मी फोन पण लावते चार्जला.”
“हवा फार वाईट आहे, मी तुमच्या मागेच राहीन. तुमची गाडी अर्धा तास सतत चालू राहिली नाही, तर परत बंद पडू शकते.”
तो सोफीच्या मागेच रहात होता. दोन्ही गाड्या मंदगतीने सरपटत चालल्या होत्या. थोडा जरी वेग वाढला, तरी गाडी घसरण्याचा धोका होता. शंभरच्या गतीने जाण्याजोग्या रस्त्यावर वीसच्या गतीने गाड्या चालवाव्या लागत होत्या. असा प्रवास की ज्याच्या शेवटाचा पत्ता नव्हता! याच प्रकारे जावं लागणार होतं. सोफीची भीति वाढत गेली—नक्कीच कुठल्याही क्षणी तो गाडी पुढे आणून मला थांबवेल आणि मग….!
त्यानं इतके कपडे घातले होते, स्वेटर, मफलर, टोपी, की त्यात गुंडाळलेला माणूस कोण, कसा आहे, काही कळायला मार्गच नव्हता. फक्त त्याचा आवाज येत होता. दहा मिनिटं ते असे गेले असतील, नसतील, तेवढ्यात तो परत तिच्या बाजूला आला, आणि त्यानी हॉर्न दिला, आणि गाडी थांबवण्याची खूण केली. एकटी स्त्री असण्याची भीति परत तिच्या मनात दाटून आली. हात पाय कापू लागले. कसेबसे तिने ब्रेक दाबले. मरणाच्या भीतीपेक्षाही ही भीति जास्त विक्राळ स्वरुप घेऊन तिच्यासमोर उभी राहिली.
तो गाडीतून बाहेर आला नाही, फक्त खिडकी उघडायची खुण त्याने केली. “दहा मिनिटात एक सर्व्हिस एरिया येईल, तिथून मी गरम कॉफी घेऊन येतो, तुम्ही गाडी बंद नका करू. पार्किंग लॉटमधे थांबून रहा.”
सोफिने मान हलवली. खरंच तिचा घसा कोरडा पडला होता, कॉफी मिळेल, या सुखद जाणिवेपेक्षा त्याचं काही कट कारस्थान तर नाही ना, ही भीति मोठी होती. कोणजाणे, याच्या मनात काय आहे! संशय येत होता, की कॉफी द्यायचं निमित्त करून हा गाडीत तर घुसणार नाही? आणि कॉफीत काहीतरी मिसळलं असेल तर? आसपास बर्फाशिवाय काहीच दिसत नव्हतं. कोणाला बोलावणार मदतीला? तो जे म्हणेल, ते करण्याशिवाय तिच्या हातात काहीच नव्हतं. पण तो लगेचच कॉफी घेऊन आला. बहुतेक मशीनची कॉफी असावी. अशा थंड रात्रीत कॉफी हाऊसमधे कोण असणार होतं? तो आला आणि तिला कॉफी देऊन त्याच्या गाडीत परत गेला.
भीतिच्या सावटाखाली असल्याने कॉफीची चवच लागत नव्हती. बेचव! एकदा वाटलं, बेशुद्ध करण्यासाठी काहीतरी घातलेलं असणार. बरंच होईल, बेशुद्ध झाल्यावर यातना तरी जाणवणार नाहीत. ती तशीच कॉफी पीत राहिली. कॉफीचा गरमपणा कणाकणानी शरीरात भरत होता. निघण्याचा इशारा मिळाल्यावर दोघं निघाले परत एकमेकांच्या मागे. तो तिच्यापेक्षा हळू गाडी चालवत होता, कारण त्याला तिच्या मागेच रहायचं होतं.
सोफीचं थंडीनं थरथरणं आता कमी झालं होतं, गाडीच्या हिटिंग सिस्टिमने थंडी काही प्रमाणात कमी केली होती. पण तिची भीति वाढतच चालली होती. सुनसान रस्त्यावर, मिट्ट अंधारात दोन्ही गाड्या चालल्या होत्या. आणि फिसफिस आवाज करत वायपर्स काचेवर साठणारा बर्फ सतत दूर करत होते. परत दहा मिनिटं गेल्यावर त्यानं परत एकदा थांबण्याचा इशारा केला.
या वेळी तर भीतिने सोफिचे प्राणच कंठात आले! या अनोळखी माणसाचा काय इरादा होता? आता शिकार पुरती आपल्या ताब्यात आली आहे, असं तर वाटत नाहिये याला? मुलगी आता बेशुद्ध व्हायच्या बेतातच असेल? मग तिच्या लक्षात आलं, “मी तर पूर्णपणे शुद्धीवर आहे! कॉफी पिऊन तरतरी आली आहे, नशा नाही!” काय करावं ते कळेनासं झालं होतं तिला, पण बघितलं, तर परत त्यानं तशीच तिच्या बाजूला गाडी आणत तिला ओरडून सांगितलं, “तुमच्या गाडीच्या मागच्या दिव्यांपैकी एक लागत नाहिये, अजून जरा गाडी हळू चालवा.”
आणि परत सोफीच्या गाडीच्या मागे जाऊन गाडी चालवू लागला. या वेळी दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ गेला. सोफिने आरशात पाहिलं, तो अजूनही तशीच तिच्या मागे गाडी चालवत होता. मिनिटा-मिनिटांनी पुढे जाणा-या या दोन गाड्या जशा काही वर्षानुवर्षे प्रवास करत होत्या. एखाद्या नवशिक्या ड्रायव्हरप्रमाणे थरथरणारे हात कसेबसे गाडी नियंत्रित करत होते.
परत एकदा त्याची गाडी तिच्या गाडीच्या बाजुला आली. तशाच पद्धतीने गाडी थांबवून त्याने सांगितलं- “ तुमची बॅटरी आता काही त्रास देणार नाही. आता मी जातो.” आणि तो गाडी पुढे काढून, तिला बाय करून निघून गेला.
हतप्रभ झालेल्या सोफिने हात हलवून त्याला निरोप दिला, त्याने ते पाहिलं की नाही कोणजाणे! तिने मनातल्या मनातच त्याचे आभारही मानले. जातानाची त्याची गाडी एखाद्या देवदूताच्या विमानासारखी वाटली, ज्याने आकाशातून उतरून एका मुलीचा जीव वाचवला होता. आता शरीराची थरथर बंद झाली होती.
संकटांच्या एका लांबलचक रात्रिची इतिश्री झाली होती. आता पहाट फटफटायला लागण्याची लक्षणंही दिसायला लागली होती. हिमवर्षाव पण आता थकून परतेल असं वाटायला लागलं होतं. पुढे दूर अंतरावर, रस्त्यांवर मीठ टाकणाऱ्या ट्रक्सचे दिवे चमकताना दिसू लागले होते. शहराच्या जवळ आल्याच्या खुणाही दिसू लागल्या होत्या. मृत्युच्या भीतीतून सुटका झाल्याबरोबर सोफीला तहान, भूक या सगळ्याची जाणीव होऊ लागली. कित्येक तासात काहीही खाल्लेलं नव्हतं. धिम्या गतीने चालणारी गाडी एका हाताने सांभाळत तिचा दुसरा हात शेजारच्या सीटवर ठेवलेल्या खाण्याच्या वस्तू धुंडाळू लागला, जेणे करून तिची बॅटरी पण उतरणार नाही!
तिच्या डोळ्यांसमोर एका पाठोपाठ एक बॅटरीची रूपं दिसू लागली— गाडीची बॅटरी, फोनची बॅटरी, तिची स्वतःची आणि खास करून त्या अनोळखी देवदूताची, जो आपल्या मदतीच्या बॅटरीने जीवनभरासाठी एक सुखद, ऊर्जादायी जाणीव ठेवून गेला होता. आता त्याला परत एकदा भेटलं पाहिजे या जाणीवेने तिचं मन उतावळं झालं. त्याला डोळेभरून बघायला हवं या इच्छेने उचल खाल्ली आणि तिच्या पायांनी ताबडतोब गाडीची गती वाढवली
– समाप्त –
मूळ लेखिका – डॉ हंसा दीप, कॅनडा
मराठी भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ
संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈