श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ बोलायचे राहून गेले – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(वंदना घरी आली तरी सरांच्या बोलण्याचा विचार करत राहिली. मिताला कुठे बिझी ठेवावे? तिला कसली आवड नाही पण अश्विनपासून तिला लांब ठेवावेच लागेल.) इथून पुढे —
पुन्हा सर तिच्या मदतीला धावून आले. चार दिवसानंतर ते तिला म्हणाले “वंदना, तुझी बहीण B. Sc आहे ना?”
“हो सर “.
“मग माझ्या डिपार्टमेंटमधील गोगटे मॅडम प्रेग्नन्सी लीव्हवर जात आहेत एक तारीखपासून.त्या जागेवर डेमॉन्स्ट्रेटर म्हणून मिता जर काम करायला तयार असेल तर प्रोफेसर शास्त्रींना मी सांगतो,”.
“पण सर मिताला अनुभव नाही हो, तिला जमेल प्रॅक्टिकल घयायला ? “
“का नाही जमणार? आणि मी असतो ना तेथे. सुरवातीला तिला थोडं अवघड वाटेल, पण पंधरा दिवसात ती तयार होईल “
“ बरं सर.. मी विचारते.. आणि कळविते “ असं म्हणत वंदना क्लासवर गेली.
वंदनाने रात्री आईसमोर मिताला कॉलेजमधील जॉबबद्दल विचारले. हल्ली मिता ताईबरोबर बोलत नव्हती, त्यामुळे तिने तिला उडवून लावले पण जेव्हा तिला कळले की जोगळेकरसरांच्या हाताखाली काम करायचे आहे, तेव्हा ती तयार झाली.
मग वंदनाने मिताच्या नावाचा अर्ज तयार केला आणि प्रोफेसर शास्त्रींकडे नेऊन दिला. शास्त्रीसरांनी एक तारखेपासून प्रोफेसर जोगळेकरना मदत करायला सांगितले आणि अशा रीतीने मिताला तात्पुरता का असेना पहिला जॉब मिळाला.
एक तारखेला वंदना आपल्या गाडीवरून मिताला घेऊन गेली आणि तिची जोगळेकर सरांशी गाठ घालून दिली. सर समोर येताच तिने “थँक्स “ म्हंटले. सरांनी पण हसून मिताचे स्वागत केले.
“आता मिताला थोडे दिवस दाखवावे लागेल पण थोडया दिवसांनी ती स्वतः मुलांचे प्रॅक्टिकल घेईल “
“हो ना सर, तुम्ही असताना तिची काळजी नाही, तुम्ही तिला तयार कराल “.
मिताला नवीन वर्गावर सोडून सर आणि ती कॅन्टीन मध्ये गेली. वंदनाला वाटत होतं, सरांशी काही तरी बोलाव, पण सर समोर असले की तिची बोलती बंद होई.
“सर, जरा सांभाळून घ्या मिताला. मागचं सर्व विसरायला हवं तीने “
“त्याची काळजी करू नकोस वंदना, एकदा काम सुरु झालं की सर्व विसरेल, हें वय वेड असतं. ‘”
वंदनाच्या मनात आले, ‘ किती समजूतदार आहेत सर, आता आपल्यापुढे आहेत तर सांगावे का मनातले? किती दिवस मनातच राहिल्या आहेत भावना.’
सरांना मिटिंग होती त्यामुळे ते चहा पिऊन गेले. वंदनाला परत कविता आठवली
“रोज तुला मी येथे भेटते, बोलायाचे राहून जाते…. “
मिता पहिल्या दिवसापासून खूष होती. आता रोज ती आईला कॉलेजमधील मुलांच्या गमती आणि जोगळेकरसरांचे कौतुक सांगत राहिली. वंदनाचे बारीक लक्ष होतं, मिता आता व्यवस्थित प्रॅक्टिकल घेत होती, एकंदरीत ती कॉलेजमध्ये रमली होती. हेच तर वंदनाला हवं होतं. वडील गेल्यानंतर मिताची जबाबदारी तिने घेतली होती, पण मिता अवखळ होती, म्हणून तिची नाव व्यवस्थित पैलतीराला लावायला हवी होती .
तिने कॉलेज मध्ये पाहिलं, जोगळेकर सर आणि मिता कॅन्टीनमध्ये थट्टामस्करी करत असत. तिला स्वतः ला सरांची थट्टा कधीच जमली नव्हती.
एकदा ती उशिरा घरी आली तर तिची आई म्हणाली “आज तुमचे जोगळेकरसर येऊन गेले.”
वंदनाला आश्यर्य वाटलं, “सर कसे काय घरी?” तिने आईला विचारले. तर ती म्हणाली “अग मिता दोन दिवस कॉलेजमध्ये गेली नव्हती ना, म्हणून पहायला आले.” तिला कमाल वाटली सरांची. तसे सर कॉलेज मध्ये माझ्याकडे चौकशी करू शकले असते ना?
वर्ष संपत आले, कॉलेजमध्ये परीक्षा सुरु होत्या. आता एप्रिलअखेर मिताचा जॉब संपणार होता. मिता पण नर्व्हस झाली होती, आता दुसरीकडे कुठे जॉब असेल तर.. वंदनाने तिच्या नोकरीसाठी कुठे कुठे सांगून ठेवलं होतं. एका गोष्टीचं वंदनाला समाधान होतं, मिताने अश्विनचा नाद पूर्ण सोडला होता,कारण अश्विन नवीन मुलीबरोबर दिसत होता.
एप्रिल अखेर एक दिवस सरांचा फोन आला “वंदना, महत्वाचे बोलायचं होतं, उद्या सायंकाळी त्या हॉटेलमध्ये भेटशील का?”
वंदनाच्या शरीरावर मोरपीस फिरवल्यासारखे झालं. तिने ओळखले सर काय बोलणार आहेत ते? खरं तर तिलाच सरांना विचारायचं होतं पण,”बोलायचे राहून जाते ‘असे तिचे होत होते. ‘काही हरकत नाही, आपल्या संस्कृतीत पुरुषच पुढाकार घेतो,’ तिच्या मनात येत होतं, आपलं लग्न होण्याआधी मिताला जॉब मिळायला हवा, मग ती आणि आई राहतील, मग मिताचे लग्न.. मग आई एक महिना माझ्याकडे एक महिना मिताकडे .’ ..
पुरी रात्र वंदनाला झोप आली नाही, या कुशीवरून त्या कुशीवर ती तळमळत राहिली. सर काय बोलतील.. मग आपण लाजायचं.. मग हळूच हो म्हणायचं.. तिचं स्वप्नरंजन रात्रभर सुरु होतं.
तिला शोभणारे कपडे नेसून, हलकासा मेकअप करून हसरा चेहेरा ठेऊन ती सायंकाळी हॉटेलमध्ये गेली. सर वेळेवर आलेच. त्यानी दोन कप कॉफीची ऑर्डर दिलीं आणि ते बोलू लागले…..
“वंदना, माझे आईवडील आले आहेत. या वर्षी कोणत्याही परिस्थितीत माझे दोनाचे चार हात होताना त्यांना पहायचे आहे ‘
वंदनाच्या मनात आले केवढी ही सरांची प्रस्तावना, त्याची काही गरज आहे का? सरळ सांगायचे, तू मला आवडतेस म्हणून.
सर बोलत होते,” माझे वय एकतीस वर्षे आहे, त्यामुळे आता लग्न करणे आवश्यकच आहे. तू मागे म्हणाली होतीस, सर माझ्यामागे घट्ट उभे राहा, मी तुला जमेल तसे सल्ले दिले, तुला ते पटले असतील.
मिताला तिच्या प्रेमातून आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यात आपण यशस्वी झालो. पण मी तिच्या आठ महिन्याच्या सहवासाने तिच्यात अडकलो. वंदना, मला आणि मिताला लग्न करायचे आहे, पण तुझी आणि आईची परवानगी हवी.” … वंदनाला वाटले, जग आपल्याभोवती फिरत आहे. तिच्या कानात सरांचे उदगार घुमत राहिले “मला आणि मिताला लग्न करायचे आहे.. मला आणि मिताला लग्न करायचे आहे… मला आणि मिताला लग्न करायचे आहे….. “
वंदना सटपटली. तिच्या घशाला कोरड पडली. आपल्या डोक्यात कुणी लोखंडाचे घण मारीत आहे, असे तिला वाटले. तिचा विचित्र चेहेरा पाहून सर म्हणाले “काही होतंय का वंदना.. तुला मितासाठी मी पसंत नसेल तर तसे सांग..”
वंदना सावरली,”तसे नाही सर, तुम्हाला पसंत न करणारे म्हणजे…. “
तिला पुढे बोलवेना, डोळयांतून अश्रूचा पूर धडका मारत होता, तिने स्वतः ला सावरले आणि ती म्हणाली
“माझी पसंती आहेच सर पण आईला विचारते “ असं म्हणून ती बाहेर पडली.
वंदना कशी घरी आली, गाडी कशी चालवली.. तिच्या काही लक्षात नव्हते. तिने घरात प्रवेश केला मात्र, आई हसतहसत बाहेर आली “अग, तुला मिताची काळजी वाटायची ना, बघ तिने व्यवस्थित स्थळ पटकवले, अग जोगळेकरसरांनी तिला मागणी घातली, आहेस कुठे?”
वंदनाने पण काही माहित नसल्यासारखे सोंग केले “आई, तुला कुणी सांगितलं?”
“ अग मिता सांगते आहे, शनिवारी त्याचे आईबाबा भेटायला यायचे आहेत.”
“होय काय? अभिनंदन मिता. चांगला नवरा पटकवलास. आई, शनिवारच्या कार्यक्रमांची तयारी करायला हवी “
वंदनाने अश्रूना बांध घातला आणि ती मिताच्या लग्नाच्या तयारीत जुम्पलीं. त्याच वेळी ती आपल्यासाठी लांबच्या कॉलेजमध्ये नोकरीसाठी अर्ज करू लागली.
मे अखेरीस मिता आणि जोगळेकरसर विवाहबंधनात अडकले.
दुसऱ्या दिवशी वंदना लातूरच्या कॉलेजमध्ये हजर होण्यासाठी आईसह एस.टी त बसली.
…… पण काही केल्या तिच्या मैत्रिणीची कविता तिचा पिच्छा सोडत नव्हती ….
” रोज तुला मी येथे भेटते, बोलायचे राहून जाते..”
– समाप्त –
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈