सौ राधिका माजगावकर पंडित
जीवनरंग
☆ वाचलेली आणि वेचलेली माणसे… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित ☆
मी अनेक गावं फिरलो. माणसं वाचली आणि मनात वेचलीत सुद्धा. कधी डोक्याला ताप झाला तर कधी गुरुही भेटले.
भीमाशंकर जवळ असल्याने तिथल्या निसर्ग सौंदर्यात मी आकंठ बुडालो आणि जास्तीत जास्त दिवसांकरता चाकणला बुड टेकवलं. तिथेच डॉक्टर सोनवणेंशी माझी ओळख झाली. आमची इतकी मैत्री वाढली की माझा संध्याकाळी कायम मुक्काम त्यांच्या दवाखान्यातच असायचा.
चाकणचे शेतकरी, व्यापारी, भाजी विक्रेते वृत्तीने धार्मिक आणि भाविक होते. डॉ. सोनवणे म्हणजे त्यांच्यासाठी दैवतच होतं म्हणा नां ! नाही तरी डॉक्टर म्हणजे प्रति परमेश्वरच असतात नाही का?
त्या दिवशी दवाखान्यात खूप गर्दी होती. रिसेप्शनिस्ट रुग्णांना नंबर वारी आत सोडताना मेटाकुटीला आली होती. कारण नुकतंच तिचं एका तिरपांगड्या, रांगड्या पैलवानाशी भांडण झालं होतं.
मी तिला मदत करीत असतांना तो पैलवान गुरगुरत आम्हाला म्हणाला, “माझा नंबर लवकर का नाही लावत ?” गरम डोक्याच्या त्या महाशयांनी शिव्यांचा भडीमार पण सुरू केला.
गडबड ऐकून डॉक्टर बाहेर आले. त्यांनी खूप समजावलं त्याला, पण हा बाबा आपला इरेलाच पेटलेला.! शेवटी “बघून घेईन मी डॉक्टर तुम्हाला.! “असं म्हणून तो जमदग्नी तणतणतच बाहेर पडला. मुर्खपणाचा कळस म्हणजे रस्त्यावर जाऊन त्याचं शिव्या देणं चालूच होतं. डॉक्टरांना वाईट वाटलं.
‘अशी माणसं आपल्या आयुष्यात येऊ शकतात का ?’ ह्या विचाराने मीच अस्वस्थ झालो होतो. मात्र प्रसंग सावरत हसत डॉ. म्हणाले, “चला हा ही एक अनुभव.! पाऊस पडताना बघतो आपण. पण असेही अनुभवाचे पावसाळे आपल्या आयुष्यात येतातच. हं, पुढचे पेशंट आत पाठवा”असे म्हणून डॉक्टर आत मध्ये गेले. जरा वेळानी ते पैलवानी वादळ पाय आपटीत निघून गेलं .
इतर पेशंटकडे माझं लक्ष गेलं. वार्धक्यानी वाकलेलं एक जोडपं केव्हापासून कोपऱ्यात अवघडून बसलं होतं. त्यांचे उठता बसतांनाचे हाल बघून मी दोनदा त्यांना म्हणालो होतो, “आधी नंबर लावून आत सोडू का तुम्हाला? बसवत नाहीये का तुम्हाला? काही त्रास होतोय का?”
तेव्हा सरकुतलेल्या चेहऱ्यावर हास्य उमललं आणि ते म्हणाले, “नाही रे बाळा, तरास काय बी नाय. आता नंबरावरी जाऊदे बाबा, इतर आजारी पेशंटना.नाय तर मगा सारका एकादा आग्या वेताळ त्या देव माणसाच्या डोक्याला ताप द्यायचा. आमची तब्येत मस् चांगली झालीया. पर एक डाव डागदरला भेटायचयं आमाला.”
मला नवलचं वाटलं त्यांच्या बोलण्याचं. ‘त्रास काही नाही, पण डॉक्टरांना नुसतं भेटायचंय’ म्हणजे काय?
इतक्यात डॉक्टरच बाहेर आले आणि त्या जोडीला बघून आश्चर्याने म्हणाले, “हे काय माऊली! एवढ्या उन्हाचं आलात? अजून बरं वाटत नाही का तुम्हाला?”
कापऱ्या आवाजात कमरेत वाकलेली ती माऊली म्हणाली, “डागदरा, तुझ्या गोळीने ठणठणीत बरी झाले म्या. आता काय बी तरास नाही बघ. तुला एकदा डोळं भरून बघायचं हेच काम होतं. ‘बरे झालो’ ह्येचं सांगाया आलोय आमी. आता फकस्त देवाच्या पाया पडाया आलोया.”
हसत डॉ. म्हणाले, “अहो मग विठोबा मंदिर शेजारी आहे. इकडे कसे काय वळलात?”
यावर दोघजण डॉक्टरांच्या पायाशी वाकले आणि म्हणाले, “डागदरा, अरे तूच आमचा ईठोबा हाईस. मला मरणाच्या दारातून ओढून काढलंस आणि आता फकस्त हे सांगाया आलोया, की तुझ्या गोळीनं उतारा झाला आणि लई बरं वाटतंय आता आमाला. देव तुला सुखात ठेवो.”
आता मात्र चकित होण्याची पाळी आमची होती. डॉक्टर हात जोडून म्हणाले, “गुरुमाऊली माझाच तुम्हाला कोपरापासून शिरसाष्ठांग नमस्कार. गुरुपौर्णिमेलाच गुरु पूजा करावी असं थोडंच आहे ? आज मला साक्षात गुरुदेव दत्त भेटले.”
एव्हाना बाहेरच्या हॉलमधली लोकं आत आली होती. त्यांच्याकडे वळून डॉक्टर म्हणाले, “शाळेच्या प्रांगणात भेटलेले गुरु, हे गुरुच असतात. पण अनुभवाच्या शाळेत हे असेही गुरु भेटतात..आणि आपल्याला नवीन धडा शिकवून जातात. माझ्याकडे अनेक व्याधीग्रस्त पेशंट येतात, पण बरं वाटल्यावर पुन्हा या दवाखान्याची पायरी ‘चढणं नको रे बाबा’ असं म्हणत, दवाखान्याकडे आणि माझ्याकडेही पाठ फिरवून जातात. पण आता आम्हाला बरं वाटतंय हे सांगायला येणारी ही पहिलीच जोडी आहे.”
हा सगळा प्रकार बघून मी भारावलो, खरंच ‘बरं वाटत नाही’ हे सांगायला पेशंट येतात. पण ‘आम्हाला आता बरं वाटतंय’ हे एवढं एकच वाक्य उन्हातून चालत येऊन सांगणारी ही वृद्ध जोडी खरंच महान आहे, गुरुस्थानी आहे. डिग्री वाल्यांनाही हे सुचलं नसतं.
डॉक्टर आपला रोग मानपाठ एक करून, मानसिक क्लेश सहन करून बरा करतात. मग त्यांची परतफेड म्हणून शब्दांची फुंकर घालून आयुष्याचं गणित सोडवणारं हे जोडपं खरंच खूप खूप श्रेष्ठ आहे.
पेशंट मध्ये काही वारकरीही होते. तेही पुढे धावले आणि “विठू माऊली! विठू माऊली!” म्हणून या विठोबा रखुमाईच्या पाया पडले. जणू काही शेजारच्या मंदिरातले विठ्ठल रखुमाई त्यांच्यापुढे उभे होते.
डॉक्टर म्हणजे साक्षात ‘देव असतो’ असं सगळे म्हणतात, पण या दैवत्वालाही शिकवण देणारा गुरु कुठेतरी कधीतरी भेटतोच.
या प्रसंगावरून मला एक किस्सा आठवला. त्याचं असं झालं, गुलबर्ग्याचे डॉक्टर श्रीनाथ औरादकर यांचेशी व्हाट्सॲप द्वारे माझी ओळख झाली. त्यांनी मला त्यांच्या लहानपणीचा एक मजेशीर, मनोरंजक किस्सा सांगितला.
ते बेळगाव हुबळी प्रवास करीत होते. प्रवासात घाटातून गाडी जात असताना मध्येच एक गृहस्थ उठले, ड्रायव्हरशी आणि कंडक्टर शी काहीतरी बोलले. त्या तिघात काय खलबत् झाली कोण जाणे! ड्रायव्हरने हसून गाडीचा वेग कमी केला. कंडक्टरनी ‘नामी शक्कल’ असं म्हणून दिलखुलास दाद दिली.
शबनम वाल्या गृहस्थांनी मुठभरून खजिना बाहेर काढला. प्रत्येकाला तो खजिना मुठी मुठी ने देताना ते सांगत होते “या पेरू, जांभूळ, करवंद, सिताफळ, चिक्कु इत्यादीच्या बिया आहेत. आपण प्रत्येकाने या बिया घाटात टाकायच्यात.”
डॉ श्रीनाथ त्यावेळी वयाने लहान होते. त्यांच्या डोळ्यात कुतूहल मावत नव्हतं. हा काय प्रकार आहे? सगळे संभ्रमावस्थेत होते.
ते कुतूहल न्याहाळताना हसतच शबनम वाले म्हणाले, “आता पाऊस पडेल. या बिया जमिनीत रुजतील, कोंबं फुटतील, रोपं तरारून डोलतील आणि खट्याळ वाऱ्याशी खेळत जोमाने वाढतील. त्यांची काही वर्षांनी वृक्षं होतील. निसर्गाचं दान आपण त्याचं त्यालाच परत करतोय, हो ना? ही धरणी त्यांना उत्तम प्रकारे जोपासेल. आणि मग फळा फुलांना काय तोटा हो !
आपल्याला नाही त्या फळांचा आस्वाद घेता येणार! पण म्हणून काय झालं! वाटेचा वाटसरू येईल विसाव्यासाठी, झाडाखाली विसावेल आणि फळांचा रसास्वाद घेऊन अगदी प्रसन्न तृप्त होउन पुढे जाईल, खरंय कीं नाही? त्याबरोबर पक्षी, खारुताई, वानर सेना येऊन पोटोबा शांत करतील ते वेगळंच. काय मग, पटतंय ना तुम्हाला माझं म्हणणं?”
आणि मग काय! सगळे प्रवासी पुढे सरसावले. दऱ्या खोऱ्यातल्या कानाकोपऱ्यापर्यंत शंभर मुठीतल्या, लाखो, करोडो बिया धरणीच्या कुशीत विसावल्या. आणि मग साध्या सामान्य वेशातले ते शब्नम वाले, सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय झाले.’
डॉक्टरांनी मला हा साधा पण मोठ्या आशयाचा किस्सा सांगितला. तेव्हा माझ्या मनात आलं, काही वर्षानी मोठे झाल्यावर डॉक्टर त्या घाटातून जाताना ती वाढलेली निसर्ग दत्त देणगी बघून मनात म्हणाले असतील, “किती साधा माणूस, पण केवढा मोठा आशय तो देऊन गेला आपल्या सगळ्यांना, ‘वेष असावा बावळा, परी अंतरी असाव्या नाना कळा’ ही उक्ती आठवली असेल त्यांना. पण काही म्हणा, तो सामान्य माणूस सगळ्यांचाच गुरु झाला होता. आयुष्याच्या शाळेत मार्ग दाखवून, योग्य दिशेने नेणाऱ्या त्या परोपकारी सेवाभावी पर्यावरण प्रेमी सज्जनाला गुरुचीच उपमा योग्य आहे असं मला वाटतंय.अशा सामान्य पण असामान्यत्व प्राप्त झालेल्या गुरूंकडे बघून म्हणावसं वाटतंय.. ‘तस्मै श्री गुरवे नमः’
☆☆
© सौ राधिका माजगावकर पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈