डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ क्लेप्टोमॅनिया — भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
(किती हो गुणी मुलगी आहे सुरुची. देवाने हा असला दुर्मिळ आजार या सोन्या सारख्या मुलीला का द्यावा?” माहीच्या डोळ्यात पाणी आलं..).. इथून पुढे —
दोघी मैत्रिणी खुशीत मावशीच्या फार्म हाऊसवर गेल्या.. खूप मजा केली त्यांनी.. मावशीने खूप लाड केले त्यांचे. दोघी खूप हिंडल्या, दंगामस्ती केली,धबधब्याखाली मनसोक्तभिजल्या. रोज जेवल्यावर माहीला हळूच आपली पर्स दाखवायची सुरुची.. त्यात कधी चमचे कधी टिशू पेपर असल्या फुटकळ वस्तू असत तर कधी काहीही नसे.. माही गुपचूप सगळ्या वस्तू जागेवर ठेवून देई.. सुरुचीला अत्यंत गिल्टी वाटे .ती माहीला म्हणायची,”माही,कोण होतीस तू माझी मागच्या जन्मी?किती मला संभाळून घेतलंस ग आजपर्यंत? पण कायम अशी तुझ्यावर अवलंबून कशी रहाणार मी?काय आहे माझ्याभविष्यात देव जाणे.” खिन्न होऊन सुरुची म्हणायची..
“होईल ग सगळं ठीक!आत्तापर्यंत नाही का झालं तसंच होईल” माही म्हणाली..
दोघींचे रिझल्ट्स लागलेआणि दोघींनाही पहिल्याच लिस्ट मध्ये मेडिकलला ऍडमिशन मिळाली.
दोघींचा आनंद गगनात मावेना.. छोट्या डबक्यातले मासे आता नदीत पोहायला जाणार होते,क्षितिजे विस्तारणार होती..
नवीन कॉलेज सुरू झाले.. दोघींच्या टर्म्स नशिबाने एकत्रच लागल्या.. अभ्यास प्रॅक्टिकल्स करताना दिवस कसे कुठे जात ते दोघींनाही समजत नसे.. माहीची परिस्थिती जरा बेताची होती..माही परीक्षेच्या दिवसात सुरुचीकडे रहायलाच यायची.. सुरुचीच्या बेडरूम मध्ये कॉट वर पडून दोघी आपली स्वप्नं रंगवत..”माही, मी नोकरी करणार नाही. स्वतःचेच क्लिनिक सुरू करीन.उगीच दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये जाऊन माझा हा आजार लक्षात आला तर किती बदनामी होईल माझी..” शहाणी सुरुची म्हणायची. .माहीला या गुणी मैत्रिणीबद्दल फार वाईट वाटायचे..
दिवस भरभर उलटत होते.. बघताबघता दोघीही चांगले मार्क्स मिळवून पास झाल्यासुद्धा.. माहीने पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन ला प्रवेश घेतला. कितीही आग्रह करूनही सुरूचीने ठाम निर्णय घेतला, मी पुढे काहीही करणार नाही.. मला स्पेशलायझेशन करायचं नाही.मी सरळ आता दवाखाना उघडणार. बाबांच्या बंगल्यातला खालचा मजला घेईन छान रिनोव्हेट करून..”कितीही सांगून माही ,सुरुचीचे बाबा दमले तरी सुरूचीने ऐकलं नाहीच.. “बाबा, इतके दिवस माझ्या मागे माही ढाली सारखी उभी राहिली म्हणून निभावलं. तिला तिचं आयुष्य नाहीये का? तिलाही पुढे शिकू दे,दुसरे मित्र मैत्रिणी जमवू दे.. आता मात्र नको बाबा..चोरटी डॉक्टर म्हणून मला मोठ्या हॉस्पिटल मध्ये जाऊन बदनामी नाही करून घ्यायची..हे कधीतरी लोकांना समजणार हो बाबा..त्यापेक्षा माझे स्वतःचे क्लिनिकच बरे… झाकली मूठ राहू दे झाकलेलीच राहील तितकी..” सुरुचीच्या डोळ्यात पाणी आलं..
बाबा,अजून आठवतं हो मला,लहानशी सुरुची कोपऱ्यात उभी असलेली आणि बस मधली मुलं तिच्याकडे संशयाने बघत असलेली! पण त्याचा गाजावाजा झाला नाही.. मला चांगलं काही दिसलं की ते उचलायची अनावर उर्मी यायचीच.. आणि नंतर ती नाहीशीही व्हायची.. तेव्हा तुम्ही ,माही,शाळेतले सहृदय फादर माझ्यासाठी उभे राहिलात..म्हणून तर आजचे हे दिवस मला दिसत आहेत..
नशिबाची फार परीक्षा बघू नये असं तुम्हीच म्हणता ना? मी इथेही छान यशस्वी होऊन दाखवीन बाबा. “सुरुची म्हणाली. ठीक आहे म्हणून बाबा मागे फिरले. त्यांनी सुरुचीला खालचा मजला सुंदर रिनोव्हेट करून दिला.. सुरूचीने दवाखाना सुरूकेला..कॉलनीत दुसरा डॉक्टर नव्हताच..सुरुचीच्या गोड बोलण्याने,उत्तम रोगनिदानाने बघता बघता तिचा उत्तम जम बसला. सुरूचीने माया म्हणून हुशार रिसेप्शनिस्ट नेमली होती..कोणत्याही पेशंटने आपली कोणतीही वस्तू पर्स काहीही आत आणायचे नाही..
तपासण्याच्या रूममध्ये रिकामे जायचे हा कडक नियम होता सुरुचीच्या दवाखान्यात.. त्याचे कारण फक्त सुरुचीलाच माहीत होते..त्या दिवशी माही सुरुचीला भेटायला आली. वॉव सुरुची..केवढी गर्दी ग दवाखान्यात.
मिंटिंग मनी हं? ग्रेट. अगदी अचूक ठरला तुझा निर्णय ग. .शाबास!!”माही मनापासून म्हणाली..
बरं हे पेढे घ्या..झाली तुझी मैत्रीण एम डी.. अजूनही कष्ट संपत नाहीत”..हसत हसत माही म्हणाली..” हो ग माही,सोपी आहे का तुझी ही वाट?पण मग सोन्याची फळंही मिळतील बरं.”सुरुची हसून म्हणाली.. सुरुचीच्या आईबाबांना तिच्या लग्नाचे वेध लागले..आपली ही गुणी मुलगी चांगल्या मुलाच्या हातात पडावी असं मनापासून वाटायचं त्यांना..इतकी गुणी, हुशार भरपूर पैसे मिळवणारी मुलगी कदर असणाऱ्या मुलाला मिळावी या अपेक्षेत गैर काय होते? सुरुचीची अट होती. मला कोणालाही फसवून लग्न करायचे नाही.मला क्लेप्टोमॅनिया आहे हे सांगूनच मी लग्न करणार. मग भले मी तशीच राहिले तरी चालेल. सुरुची आपल्या म्हणण्यावर ठाम होती.. नंतर ते लग्न मोडण्यापेक्षा आधीच सत्य माहीत असलेले केव्हाही चांगले असे सुरुचीचे मत…दरम्यान माही लग्न होऊन परदेशात गेली.. सुरुचीची प्रॅक्टिस आणखीच जोरात चालायला लागली. एक दिवस तिच्या दवाखान्या समोर एक कार येऊन उभी राहिली.. सुरुची खाली मान घालून काहीतरी काम करत होती.. वर बघितलं तर हे कोण आहे?असं तिने प्रश्नार्थक नजरेने बघितलं..बसा ना, मी ओळखलं नाही तुम्हाला. सुरुची म्हणाली..
आठवतो का मी? शिरीष? तुझ्या वर्गात होतो शाळेत.. तुझं कसं लक्ष जाणार म्हणा? बॅक बेंचर आम्ही आणि तू स्कॉलर! पटतेय का ओळख?”त्याने हसून विचारलं..
अरे हो! शिरीष तू? बस ना..इथे कसा आलास?” सांगतो. माही भेटली होती मला अमेरिकेत.. मी गेलो होतो तिकडे कॉन्फरन्स साठी..अर्थात तुझी चौकशी केलीच मी.. माही मस्त आहे तिकडे. तुम्ही आहात ना रोज टेक्स्ट वर? मस्त चाललंय तिचं. तर मला माहीने तुझ्याबद्दल सगळं सांगितलंय.मी डॉक्टर झालो पण इथून नाही,, गुजरात मधून.. .म्हणून मला इथली तुमची काहीच माहिती नव्हती. आता पुण्यात आलोय आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला जॉब करतोय. सुरुची, मला लग्न करायचं आहे तुझ्याशी..ते क्लेप्टोमॅनिया बद्दल मला सगळं सांगितलंय माहीने.मी त्याला महत्व देत नाही.उगीच त्याचा बाऊ करू नकोस. तुझ्या सगळ्या गुण दोषांसकट तू मला हवी आहेस..” बोल काय ते. आधीच उशीर झालाय. आता नाही म्हणू नकोस.” सुरुचीच्या डोळ्यात पाणी आलं. उठून उभं रहात तिने घट्ट मिठीच मारली शिरीषला.. शिरीष हसायला लागला .सुरुची लाजून दूर झाली. दोनच महिन्यात सुरुची आणि शिरीषचं शुभमंगल झालं .. सुरुचीच्या आईवडिलांना स्वप्नात कल्पना केली नव्हती असा जावई मिळाला..आज सुरुचीला दोन मुलगे आहेत आणि तिचा संसार मस्त चाललाय. याचं श्रेय शिरीष आणि सुरुची अर्थात माहीला देतात. बालवर्गापासून ते आपल्या लग्नापर्यंत सतत आपल्या मागे सावली सारख्या उभ्या असलेल्या माही सारख्या आधारवडाला विसरणे, सुरुचीला शक्य तरी होते का?
– समाप्त –
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈